रामजोशी : (१७६२? – १८१३ ?). विख्यात शाहीर. पूर्ण नाव राम जगन्नाथ जोशी. त्यांचे घराणे सोलापूरचे. त्यांचे वडीलबंधू मुद्‌गल जोशी नावाजलेले संस्कृत पंडित आणि पुराणिक त्यामुळे घरात संस्कृत भाषेच्या अभ्यासाचे वातावरण होते. वडिलांच्या मागे मुद्‌गल जोशी हेच घरातले कर्ते पुरूष होते. घराचे वळण बाळबोध असले, तरी रामजोशी ह्यांना तमाशाचा छंद जडला होता. त्यावरून त्यांचे वडीलबंधू रागावल्यामुळे त्यांना घराबाहेर पडावे लागले. पुढे पंढरपुरास त्यांनी काव्य-व्याकरणाचा अभ्यास केला त्यांत प्राविण्य संपादन केले आणि सोलापुरास परतले. तथापि तमाशाचा नाद गेला नाही. सोलापुरातील धोंडी नावाच्या शाहिरासाठी ते लावण्या रचीत. आरंभी आपण रचिलेल्या लावण्यांत आपले नाव घालण्याचा संकोच वाटल्याचे ते धोंडी शाहीराचे नाव त्यांत घालीत परंतु नंतर काही काळ ‘राम’ आणि पुढे ‘कविराय’ असा स्वतःचा उल्लेख ते आपल्या लावण्यांतून करू लागले. त्यांच्या लावण्यांना फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली होती. पेशव्यांकडूनही त्यांना बिदाग्या मिळत. संस्कृत भाषेचे उत्तम संस्कार त्यांच्या प्रौढ, भारदस्त पण रसाळ रचनेवर दिसून येतात. शीघ्रकवित्व आणि समयसूचकता हे दोन गुणही त्यांच्या ठायी होते. आपल्या रचनांनी त्यांनी लावणी छंदाला संपन्नता प्राप्त करून दिली.

रामजोशींच्या पूर्वायुष्यातला जीवनक्रम रंगेल आणि चैनीचा होता ते शाक्त पंथाचे होते, असेही म्हटले जाते. परंतु उत्तरायुष्यात साध्या राहणीचा त्यांनी स्वीकार केला आणि ते ईश्वरसंकीर्तनाकडे वळले. कविवर्य मोरोपंत हे रामजोशांच्या काही वैराग्यपर रचना ऐकून संतुष्ट झाले होते. त्यांनी रामजोशांना ‘कविप्रवर’ म्हणून गौरविले आहे. मोरोपंतांच्या उपदेशावरून रामजोशी कथाकीर्तने करू लागले, असे सांगतात. उत्कृष्ट कीर्तनकार म्हणूनही ते ख्याती पावले आणि नीलकंठशास्त्री थत्त्यांसारख्या तत्कालीन विद्वानांचीही मान्यता त्यांनी प्राप्त केली होती.

शृंगारिक लावण्या, कृष्णलीलांवरील लावण्या, देवांची – तीर्थांची वर्णने करणारी, तसेच नीत्युपदेशपर, वैराग्यपर कवने, तीन चार पोवाडे अशी रामजोशींची रचना आहे. मदालसा चंपू हा संस्कृत ग्रंथ व रामाष्टक हे स्तोत्रही त्यांनी लिहिले आहे. रामजोशीकृत लावण्या शं. तु. शाळिग्राम ह्यांनी संपादिल्या आहेत (आवृ. ३ री, १९०८).

कुलकर्णी, अ. र.