स्कंक : या ⇨ वीझलसारख्या दिसणार्‍या सस्तन प्राण्याचा समावेश कार्निव्होरा ( मांसाहारी ) गणाच्या मुस्टेलिडी कुलात होतो. १९९७ पासून त्याचा समावेश मिफिटिडी या स्वतंत्र कुलात करतात. मिफिटीस या लॅटीन शब्दाचा अर्थ दुर्गंध असा होतो. जर्मनी येथे स्कंकचे ११-१२ दशलक्ष वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडलेले आहेत. त्याच्या मिफिटीस, स्पिलोगेल  आणि कोनेपॅटस या तीन प्रजातींमध्ये अकरा जाती आहेत. स्कंकचे मूळ स्थान पश्चिम गोलार्धातील कॅनडामधील हडसन बे ते दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकापर्यंत आहे. त्याला मार्जारिका ( पोलकॅट) असेही म्हणतात.

स्कंकचा प्रसार कॅनडा ते चिली यांमधील प्रदेशांत आढळतो. त्याचे आकारमान लहान मांजराएवढे असते. त्याच्या शरीरावर दाट काळ्या रंगाची ⇨ फर असून तिच्या लांब केसांचे पांढरे पट्टे किंवा ठिपके तयार झालेले असतात. यांवरून त्याचे पुढील तीन प्रकार पडतात : (१) पट्टेदार व नागफणीसारखे डोके असलेला स्कंक, (२) ठिपकेदार स्कंक व (३) वराह-नासिका स्कंक.

स्कंकचे तोंड लहान असून कान लहान व गोलाकार असतात. मुस्कट लांब व टोकदार असते. पाय लहान व चपटे असून प्रत्येक पायाला पाच बोटे व पुढील पायांच्या बोटांवर लांब व वळलेल्या नख्या असतात. त्यांचा वापर ते जमीन उकरण्याकरिता करतात. पाठ कमानदार असते. शेपटी झुपकेदार व जवळजवळ शरीराच्या लांबीएवढी म्हणजे ३० सेंमी. एवढी असते. शेपटीजवळ गुदग्रंथीची एक जोडी असते. स्कंकला ३/४ दात असून पटाशीचे दात ३/३, सुळे १/१, उपदाढा १/१ व दाढा १/२ असे दंतसूत्र असते.

स्कंक गवताळ प्रदेश व जंगलांत राहतात. ते नदीकिनारी दगडांमध्ये व झाडांमध्ये बिळे करून राहतात. ते सर्वभक्षी प्राणी आहेत. प्रामुख्याने ते कीटक, कीडे, भुंगेरे सुरवंट, उंदीर, इतर कृंतक (कुरतडणारे) प्राणी, मृत प्राणी, वनस्पती व फळे खातात. बॅबकॅट व शृंगी घुबड यांसारखे प्राणी स्कंकचे शत्रू आहेत. स्वसंरक्षणासाठी स्कंक शेपटीजवळील ग्रंथीमधून अतिशय दुर्गंधीयुक्त वास असलेला स्राव ३-४ मी.पर्यंत उडवितो. त्याचा दर्प दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ कित्येक दिवस तसाच राहतो. हा स्राव पिवळा व तेलकट असून त्यामध्ये ब्युटिल मर्कॅप्टनासारखे गंधकाचे संयुग असते. हा स्राव डोळे, नाक व तोंड यांच्या संपर्कात आल्यास आग व जळजळ होते. विशेषेकरून थेट संपर्क आल्यास तात्पुरते अंधत्व येते.

स्कंक हा निशाचर प्राणी आहे. प्रजोत्पादनकाल प्रामुख्याने जानेवारी ते मार्चपर्यंत असतो. गर्भावधी ५९—७७ दिवसांचा असतो. मादी एका वेळेस ३—१० पिलांना जन्म देते. पिले डोळे मिटलेल्या अवस्थेत असतात त्यांचे डोळे २२—३५ दिवसांनी उघडतात. स्कंकचा आयुःकाल साधारणपणे ८—१० वर्षांचा असतो.

स्कंकच्या मांसाचा उपयोग खाण्याकरिता तसेच शरीरावरील फरचा उपयोग आकर्षक बटवे व कपडे तयार करण्यासाठी होत असे. शेती-साठी हानिकारक ठरणार्‍या कीटकांवर ते उपजिविका करतात. तसेचशेतातील उंदीर व उंदरांच्या पिलांना देखील ते नष्ट करतात. त्यामुळे जिवंत स्कंक  माणसाला जास्त उपयोगी ठरतात. अमेरिकेत १८९४ मध्ये पहिल्यांदाच शेतकर्‍यांच्या मागणीवरून स्कंकच्या संरक्षणाचा कायदा करण्यात आला.

पट्टेदार स्कंक (मिफिटीस मिफिटी)

(१) पट्टेदार स्कंक : हा प्राणी मिफिटीस प्रजातीतील असून त्याचे शास्त्रीय नाव मि. मिफिटीस हे आहे. त्याच्या शरीरावर काळ्या रंगाची फर असून डोक्या-वर केसांचा पांढरा पट्टा असतो. तो पाठीवर एका रेषेत  येऊन शेपटीकडे त्याचे दोन रेषां-मध्ये विभाजन होते. यामुळेचयाला पट्टेदार स्कंक असे म्हणतात. याच्या दोन जातींचा आढळ दक्षिण-मध्य कॅनडा-पासून संपूर्ण अमेरिका व उत्तर मेक्सिको यांमधील प्रदेशांत आहे. त्याची खांद्यापर्यंतची उंची सु. १८ सेंमी. व शेपटीसहित लांबी ५५—७५ सेंमी. असते.प्रौढ स्कंकचे वजन १.३ — ४.५ किग्रॅ. असते.ही जाती जंगलांत आढळते.

मि. मॅक्रोरा ही नागफणीसारखे डोके असलेली जातीसुद्धा पट्टेदार स्कंकसारखीच असते परंतु त्याच्या पाठीवर पांढर्‍या पट्ट्याऐवजी एकत्र काळे-पांढरे केस असतात.ही जाती अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा नैर्ऋत्य भाग ते मध्य अमेरिका यांमध्ये आढळते.तिचे शरीर ३१—४१ सेंमी.लांब असून शेपटी २८—४४ सेंमी.लांब असते. प्रौढ स्कंकचे वजन २—२.५ किग्रॅ. असते.ही जाती वाळवंटी भागात आढळते.

  (२) ठिपकेदार स्कंक : स्पिलोगेल  या प्रजातीत तीन जाती असून हे प्राणी आकारमानाने इतर दोन प्रजातींतील प्राण्यांपेक्षा लहान असतात.पिग्मी ठिपकेदार स्कंक (स्पि. पिग्मेई ) ही जाती माणसाच्या तळहातावर मावू शकते. त्यांच्या शरीरावर फर असून तिच्यावर लांब, मऊ व काळे केस असतात.शरीरावर केसांचे पांढरे ठिपके असतात.डोक्याच्या पुढील भागावर त्रिकोणी आकाराचा पांढरा पट्टा असतो.तसेच त्याची शेपटीही पांढरी असते.प्रौढ स्कंकच्या शरीराची शेपटीसहित लांबी १८.५ — ५६.५ सेंमी.असून शेपटी ८—२२ सेंमी.लांब असते. प्रौढ स्कंकचे वजन ०.२—१ किग्रॅ.असते तिच्या दोन जाती असून त्या पश्चिम-दक्षिण कॅनडा ते कोस्टा रीका या प्रदेशांत आढळतात.ठिपकेदार स्कंक विशेषतः इतर प्रजातींपेक्षा जास्त चपळ असतात.

  (३) वराह-नासिका स्कंक : कोनेपॅटस या प्रजातीमधील हे प्राणी इतर दोन प्रजातींमधील प्राण्यांपेक्षा आकारमानाने मोठे असतात.तिच्या सात जाती असून त्या दक्षिण कोलोरॅडो आणि पूर्व टेक्सास ते दक्षिण चिली आणि अर्जेंटिना या प्रदेशांत आढळतात.या जातींमध्ये डोक्यावर केसांचा पांढरा पट्टा नसतो. त्याचे मुस्कट खूप लांब असून ते डुकराच्या मुस्कटासारखे असते, म्हणून त्याला वराह-नासिका स्कंक म्हणतात.मुस्कटाचा उपयोग त्याला जमीन उकरून तिच्यातील कीडे, झाडाची मुळे, मुंग्या व इतर अन्नघटक खाण्यासाठी होतो.त्याची लांबी ३०—४९ सेंमी. असून प्रौढ स्कंकचे वजन २.३—४.५ किग्रॅ.पर्यंत असते.

  १९९० पासून स्टिंक बॅजरला ( मायडौस प्रजाती  ) मिफिटिडी कुलात समाविष्ट केले असून त्यास आता स्कंक समजण्यात येते. त्याचे वर्णन वराह-नासिका स्कंकसारखेच आहे, मात्र त्याची शेपूट लहान असते. त्याच्या शरीरावरील पांढरे पट्टे एकटे व अरुंद असतात (कधीकधी ते नसतात ). हा स्कंक फक्त फिलिपीन्स, मलेशिया, इंडोनेशिया या देशांतच आढळतो.                              

मगर, सुरेखा अ.