आंत्र: पचननलिकेतील जठराच्या निर्गमद्वारापासून (जठरातून अन्न बाहेर पडण्याच्या मार्गापासून) गुदद्वारापर्यंतच्या भागाला आंत्र (आतडे) असे म्हणतात. प्रस्तुत नोंदीत फक्त मानवी आंत्राचे वर्णन केलेले असून प्राण्यांच्या आंत्रांसंबंधीची माहिती पचन तंत्र या नोंदीत दिलेली आहे. रचना व कार्य या दृष्टीने आंत्राचे दोन मुख्य विभाग होतात : (१) लघ्वांत्र (लहान आतडे) व (२) बृहदांत्र (मोठे आतडे).

लघ्वांत्र : जठराच्या निर्गमद्वारापासून शेषांत्र कपाटापर्यंतच्या (लहान आतड्याच्या शेवटच्या भागातील झडपेपर्यंतच्या) आंत्र विभागाला ‘लघ्वांत्र’ ही संज्ञा आहे. लघ्वांत्र ही एक लांबलचक पोकळ नळी असून तिची एकूण लांबी सु. सहा मी. असते. या नळीचा व्यास सुरुवातीस सु. पाच सेंमी. असून तो हळूहळू कमी होत शेवटी ३·५ सेंमी. होतो. उदर-पोकळीत मावण्यासाठी लघ्वांत्राची वेटोळी बनलेली असतात. ती मुख्यतः उदराच्या मध्य व अधोभागी बसविल्यासारखी असतात. लघ्वांत्राच्या पुढल्या बाजूस बृहद्वपा (उदारातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या थराचा म्हणजे पर्युदराचा चौपदरी पडदा) व उदराची अग्रभित्ती (पुढची बाजू) असून मागे उदरातील इतर अंतस्त्ये (इंद्रिये) असतात. उजव्या, डाव्या व वरच्या बाजूस बृहदांत्राची कमान असते. लघ्वांत्राचा शेवटचा भाग खाली कटिकोटरात (कंबरेपुढच्या पोकळीत) असून ते वर व उजवीकडे जाऊन शेषांत्र कपाटापाशी संपते. 

लघ्वांत्राचा पहिला विभाग पर्युदराच्या मागे असतो. बाकीचे विभाग पर्युदराने वेष्टित असून लघ्वांत्राच्या वरच्या कडेपाशी पर्युदरथर जुळून त्याची दुहेरी घडी बनते. तिला आंत्रबंध असे म्हणतात. आंत्रबंध पंख्यासारखे असून त्याच्या उगमापाशी असलेली लांबी आंत्रापेक्षा पुष्कळ कमी असल्यामुळे आंत्राला घड्या पडून त्याची वेटोळी बनतात. आंत्रबंधाच्या दोन्ही थरांच्या मधून लघ्वांत्राकडे जाणाऱ्या-येणाऱ्या  रक्तवाहिन्या व लसीकावाहिन्या (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहांकडून म्हणजे ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असलेला द्रवपदार्थ नेणाऱ्या वाहिन्या) आणि तंत्रिका (मज्जातंतू) असतात. 

वर्णनाच्या सोयीसाठी लघ्वांत्राचे तीन विभाग कल्पिलेले आहेत: (१) ग्रहणी, (२) रिक्तांत्र व (३) शेषांत्र. 

ग्रहणी: लघ्वांत्राच्या पहिल्या भागाला ग्रहणी म्हणतात. हा भाग सु. २५ सेंमी. लांब असून तो लांबीने लघ्वांत्राचा सर्वांत लहान व सर्वांत अधिक जाड असा भाग आहे. ग्रहणी पश्चोदर (उदराच्या मागील) भित्तीला घट्ट बांधल्यासारखी असून तिला आंत्रबंध नसतो. ग्रहणीच्या थोड्या भागावरच पर्युदराचा थर असतो. 

ग्रहणी अपुऱ्या वर्तुळाच्या आकाराची असून त्या वर्तुळाच्या मध्यभागी अग्निपिंडशीर्षाच्या भोवती ती वेटोळ्यासारखी घट्ट बसविलेली असते. ग्रहणीची सुरुवात जठराच्या खालच्या टोकाशी होऊन ती लघ्वांत्राच्या दुसऱ्या भागाशी म्हणजे रिक्तांत्राशी संपते. ग्रहणीचे चार विभाग कल्पिले आहेत : 

आ. १. लघ्वांत्राचा छेद. (१) रसांकूर, (२) अधःश्लेष्मकला-स्नायू, (३) अधःश्लेष्मथर, (४) वलयाकार स्नायू, (५) अन्वायाम स्नायू, (६) पर्युदर थर.

(१) पहिला किंवा ऊर्ध्व (उभा) भाग सु. ५ सेंमी. लांब असून तो जठराच्या खालच्या टोकाशी सुरू होऊन उजव्या बाजूकडे आणि मागे पाठीच्या बाजूकडे आडवा असतो. या भागाच्या अग्रभागी पर्युदराचा थर असून पश्च (मागील) भाग यकृत आणि पित्ताशय यांना टेकलेला असतो.

(२) दुसरा किंवा अधोगामी (खालच्या दिशेने जाणारा) भाग सु. ८ – १० सेंमी. लांब असून तो कशेरुक (मणक्याच्या) दंडाच्या उजव्या बाजूस सरळ खाली जातो. या भागाची सुरुवात बाकदार असून शेवटीही त्याला बाक येऊन तिसरा भाग सुरू होतो. पित्ताशय नलिका आणि अग्निपिंड नलिका याच भागाच्या पश्च भित्तीतून आत उघडतात.

(३) तिसरा किंवा आडवा भाग सु. १० सेंमी. लांब असून त्याच्या अग्रभागावर पर्युदराचा थर असतो. या भागाचा पश्च भाग कशेरुक दंडावर टेकलेला असतो.

आ. २. रिक्तांत्राचा अंतर्भाग. रिक्तांत्राच्या श्लेष्मकलेवरील घड्या.

(४) शेवटचा, चौथा किंवा ऊर्ध्वगामी (वरच्या दिशेने जाणारा) भाग सु. २·५ सेंमी. लांब असून तो पुढच्या बाजूस वळून रिक्तांत्राला मिळतो. (चित्रपत्र).

रिक्तांत्र : लघ्वांत्राच्या पहिल्या सु. २/५ विभागाला रिक्तांत्र म्हणतात. ग्रहणीतून अर्धवट पचलेले अन्य या विभागातून त्वरेने खाली जाते तेथे ते फार वेळ राहत नाही म्हणून त्याला रिक्तांत्र ही संज्ञा आहे. त्याची लांबी सु. २·५ मी. असून व्यास सरासरी ४ सेंमी. असतो. रिक्तांत्राच्या भित्ती चार थरांच्या बनलेल्या असतात.

सर्वांत बाहेरचा थर पर्युदराचा असतो. त्याच्या आतील दुसरा थर स्नायूंचा बनलेला असतो. हे स्नायू अनिच्छायत्त (स्वेच्छेच्या ताब्यात नसलेले) असून त्यांचे एकावर एक असे दोन थर असतात. बाहेरचा थर लांब स्नायुतंतूंचा असून तो रिक्तांत्राच्या अक्षाशी समांतर असतो आतला थर आंत्राभोवती गोलाकार असतो. या दोन प्रकारच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे अन्नात पाचकरस चांगला मिसळला जाऊन अन्न पुढे रेटले जाते शिवाय अन्नाचा श्लेष्मावरणाशी (आतड्याच्या सर्वांत आतील बुळबुळीत थराशी) घनिष्ठ संबंध आल्यामुळे अन्नशोषण सुलभ होते. स्नायूंच्या आत अध:श्लेष्मावरणाचा थर असतो. हा थर अवकाशी ऊतकाचा (एक प्रकारच्या संयोजी म्हणजे जोडणाऱ्या ऊतकाचा) बनलेला असून त्यात आंत्रातील स्त्रावी ग्रंथी असतात. या ग्रंथींच्या स्त्रावातील एंझाइमामुळे (रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त संयुगामुळे) अन्नपचन होऊन अन्नशोषण त्वरित होते. या थरातून श्लेष्मावरणाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहिन्या व तंत्रिका असतात. सर्वांत आतला थर श्लेष्मावरणाचा असून तो स्तंभाकार  कोशिकांचा (पेशींचा) बनलेला असतो. या कोशिका त्यांच्या तळाशी असलेल्या श्लेष्मस्नायूशी निबद्ध असतात.


श्लेष्मावरणाला आडव्या गोलाकार घड्या पडल्यासारख्या असतात. श्लेष्मावरण मऊ मखमलीसारखे व अंकुरात्मक असते. हे अंकुर अगदी सूक्ष्म असून आंत्राच्या पोकळीत बोटासारखे घुसलेले असतात. त्यांना रसांकुर असे म्हणतात. त्यांच्यामुळे श्लेष्मावरणाचा अन्नशोषण करणारा पृष्ठभाग सहस्रपटीने वाढतो.

रसांकुरांच्या तळाशी स्रावी ग्रंथींची तोंडे असून त्यातूनच आंत्रस्राव अन्नात मिसळतो. श्लेष्मावरणात तुरळक अशी लहान लसीका-क्षेत्रे असतात. श्लेष्मावरणाच्या पृष्ठभागापासून उत्पन्न होणारा श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) अन्नात मिसळून तो अन्नास पातळ व बुळबुळीत बनवतो. 

शेषांत्र : लघ्वांत्राच्या तिसऱ्या  शेवटच्या ३/५ विभागाला ‘शेषांत्र’ असे म्हणतात. त्याची लांबी सु. ३·२५ मी. असून सरासरी व्यास ३·५ सेंमी. असतो. शेषांत्राची रचना रिक्तांत्रासारखीच असते मात्र शेषांत्राच्या भित्ती रिक्तांत्रापेक्षा पातळ असून त्यातील श्लेष्मावरणातील घड्या हळूहळू कमी होत जाऊन शेवटच्या भागात त्या मुळीच नसतात. रिक्तांत्रात तुरळक असलेली लसीका क्षेत्रे येथे बरीच मोठी — कित्येक  ठिकाणी २·५ सेंमी. लांब — असतात. त्यांना ‘लसीका क्षेत्रे’ किंवा ‘पेयर क्षेत्रे’ म्हणतात. जंतुसंसर्गाचा प्रतिकार करण्याच्या कामी या क्षेत्राचा उपयोग होतो.

शेषांत्राचा शेवट उंडुकाच्या (मोठ्या आतड्याच्या गोमुखाकार व टोकाशी बंद असलेल्या भागाच्या) डाव्या भित्तीमध्ये होतो. त्या ठिकाणी श्लेष्मावरणाच्या दोन जाड घड्या बनलेल्या असल्यामुळे, उंडुकात एकदा गेलेले द्रव्य परत शेषांत्रात येऊ शकत नाही म्हणून त्या जाड घड्यांना उंडुक-शेषांत्र-कपाट असे म्हणतात. 

बृहदांत्र : हे सु. १·५ मी. लांब असून लघ्वांत्रामध्ये पचन आणि शोषण होऊन राहिलेला अन्नांश त्यात येतो. बृहदांत्रात त्यातील द्रव शोषिले जाऊन त्याला मल असे स्वरूप प्राप्त होते व नंतर तो मल गुदद्वारातून विसर्जित होतो. 

बृहदांत्र आणि लघ्वांत्र यांच्या रचनेमध्ये खालील फरक आहेत : (१) बृहदांत्राचा अंतर्व्यास लघ्वांत्रापेक्षा मोठा असतो. (२) बृहदांत्रातील लांबीच्या बाजूचे उभे स्नायू सर्व परिघावर थरासारखे पसरलेले नसतात. त्यांचे फितीसारखे तीन पट्टे समांतर असे झालेले असून त्या पट्ट्यांची लांबी बृहदांत्रापेक्षा कमी असल्यामुळे बृहदांत्राला चुण्या पडल्यासारख्या दिसतात. (३) बृहदांत्रावर विशेषतः त्याच्या अनुप्रस्थ (आडव्या) विभागावर पर्युदराखाली पिवळ्या रंगाच्या वसेच्या (चरबीच्या) गाठी चिकटलेल्या असतात, त्यांना बृहद्वपा-पुच्छ असे म्हणतात. (४) बृहदांत्र उदराच्या पश्चभित्तीला घट्ट बांधल्यासारखे असते.

वर्णनाच्या सोयीसाठी बृहदांत्राचे खालील भाग मानतात : (१) उंडुक, (२) आरोही (वरच्या दिशेला जाणारे) बृहदांत्र, (३) अनुप्रस्थ-बृहदांत्र, (४) अवरोही (खालच्या दिशेला जाणारे) बृहदांत्र, (५) श्रोणीय अथवा अवग्रहाकृती (इंग्रजी S अक्षरासारख्या आकाराचे) बृहदांत्र, (६) गुदांत्र (मलाशय), (७) गुदमार्ग. (चित्रपत्र) 

(१) उंडुक : बृहदांत्राचा हा पहिला भाग ७·५ सेंमी. लांब व तेवढ्याच अंतर्व्यासाचा असून त्याची खालची बाजू बंद असल्यामुळे त्याचे स्वरूप पिशवीसारखे असते. या खालच्या बाजूपासूनच आंत्रपुच्छाचा उगम होतो. 

(२) आरोही बृहदांत्र : हे उंडुकापासूनच सुरू होऊन यकृताच्या उजव्या खंडाच्या खालच्या पृष्ठभागापर्यंत असते. त्याची लांबी सु. १५ सेंमी. असून ते यकृताच्या खाली, मागच्या आणि डाव्या बाजूकडे वळते. या वळणाच्या जागेला उजवे किंवा यकृतवळण असे म्हणतात. याच्या पुढच्या बाजूस पर्युदराचा एक थर असतो.

आ. ३. रसांकुराची सूक्ष्मरचना. (१) केशवाहिनी-जाल, (२) रसांकुर, (३) लसीका-पायस-केशवाहिनी, (४) आंत्र ग्रंथी, (५) लसीका-वाहिनी, (६) रोहिणी, (७) नीला.

(३) अनुप्रस्थ बृहदांत्र : हे यकृतवळणापाशी सुरू होऊन उदरात उजवीकडून डावीकडे आडवे गेलेले असते. त्याची लांबी सु. ५० सेंमी. असून त्याचा डावीकडचा भाग प्लीहेला (पानथरीला) टेकलेला असतो. येथे त्याला खाली व पुढे असे वळण येते. त्या वळणालाडावे किंवाप्लीहावळण असे नाव आहे. या बृहदांत्रभागाचा मध्यभाग बाकदार असल्यामुळे उदरात लोंबल्यासारखा दिसतो. याच्या खालच्या कडेपासून बृहद्वपा लोंबत असते.

(४) अवरोही  बृहदां त्र : हे प्लीहावळणापासून खाली श्रोणिफलकाच्या (घडाच्या शेवटी ज्या हाडांमुळे पोकळी सारखा भाग म्हणजे श्रेणी तयार होते त्यांपैकी एका चपट्या हाडाच्या) सु. २५ सेंमी. लांब असते. त्याच्या पुढच्या भागावर पर्युदराचा थर असतो. 

(५) श्रोणीय बृहदांत्र : श्रोणिफलकाच्या वरच्या भागापासून श्रोणीच्या आत खाली गेलेल्या अवग्रहाकृती भागाला श्रोणीय किंवा अवग्रहाकृती बृहदांत्र असे म्हणतात. याची लांबी सु. ४० सेंमी. असून ते श्रोणिफलकाच्या पोकळीतच असते. या बृहदांत्राच्या खालच्या भागाला घडी पडल्यासारखी दिसते. त्या घडीपासून खाली गुदांत्र सुरू होते. 

(६) गुदांत्र : हे त्रिकास्थीच्या (श्रोणीच्या पश्चभागातील मणक्यांच्या मिळून झालेल्या अस्थीच्या) तिसऱ्या खंडापुढे सुरू होऊन त्या अस्थीच्या खोलगट भागात बसविल्यासारखे असते. त्याची लांबी सु. १२ सेंमी. असते. 

(७) गुदमार्ग : हा मार्ग गुदांत्राच्या खाली अरुंद असा असतो. त्याची लांबी ३ ते ४ सेंमी. असून तो गुदद्वारापाशी संपतो. 

 बृहदांत्राला श्लेष्मकला (बुळबुळीत पातळ थर), अधिश्लेष्म, स्नायू आणि पर्युदर असे चार थर असून त्यांपैकी स्नायूंच्या थरातील स्नायूंचे तीन फितीसारखे पट्टे असतात व त्या फितींनाच बृहद्वपा पुच्छे चिकटल्यासारखी असतात. पर्युदराचा थर लघ्वांत्राप्रमाणे सर्व बाजूंनी नसतो तर पुढे व बाजूसच असतो. काही ठिकाणी पर्युदराचा थर नसतोच. बृहदांत्राला ऊर्ध्व आणि अधो आंत्रबंधीय रोहिण्यांच्या शाखांपासून रक्ताचा पुरवठा होतो. अनुकंपी आणि परानुकंपी तंत्रिकाशाखांच्या [→ तंत्रिका तंत्र] उद्दीपनामुळे त्याचे अनुक्रमे प्रसरण व आकुंचन होते. बृहदांत्रातून लवणे, जल आणि द्राक्षशर्करा (ग्लुकोज) ही शोषिली जातात. बृहदांत्रात श्लेष्मोत्पत्ती होत असल्यामुळे मलोत्सर्ग सुलभपणे होऊ शकतो.

पहा : पचन तंत्र मलोत्सर्ग. 

संदर्भ : 1. Best, C. H. Taylor, N. B. Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1961.

           2. Goss, C. M., Ed. Gray’s Anatomy, London, 1962.

ढमढेरे, वा. रा.


बृहदांत्र. (१)आरोही बृहदांत्र,(२)अनुप्रस्थ बृहदांत्र, (३) अवरोही बृहदांत्र,(४) अवग्रहाकृती बृहदांत्र,(५) लघ्वांत्र. ग्रहणी : (१)ग्रहणी, (२) अग्निपिंडाचे डोके, (३) वृक्क, (४) बृहदांत्र, (५) अधःस्थ महानीला, (६) ऊर्ध्व आंत्रबंध रोहिणी, (७) उदरगुहीय गुच्छिका, (८) ग्रसिका.
प्राकृतिक आंत्रपुच्छ. शोथावस्थेतील आंत्रपुच्छ.