रानडे, नीलकंठ बाबाजी : (१८७२ –१९१८). मराठी कोशकार. शिक्षण मुंबईचे विल्सन हायस्कूल व विल्सन कॉलेज येथे. मुंबई विद्यापीठाची बी. ए. पदवी मिळविल्यानंतर काही काळ भावनगर येथे इंग्रजी व इतिहास या विषयांचे प्राध्यापक. द ट्‍वेंटिएथ सेंच्युरी इंग्लिश मराठी डिक्शनरीची (१६ भाग, १९०३ –१६) रचना हे रानडे ह्यांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्य होय. रानडे ह्यांच्यापूर्वी मेजर टॉमस कँडी (१८०४ –७७) ह्याने इंग्रजी-मराठी कोश तयार केला होता. (१८४०– ४७). तथापि त्यानंतरच्या काळात मराठी भाषेच्या स्वरूपात पडलेला फरक आणि शब्दसंग्रहात पडलेली भर ह्यांचे भान ठेवून रानडे ह्यांनी आपला कोश तयार केला होता. त्यासाठी आवश्यक तेथे, पश्चिमी शास्त्रांत पारंगत असलेल्या विद्वानांचे साहाय्य त्यांनी घेतले. विशेषतः कोशातील पारिभाषिक शब्द संबंधित शास्त्रांतील तज्ञांच्या नजरेखालून जातील असे त्यांनी पाहिले. डॉ. ए. जे. मरे ह्याच्या ए न्यू इंग्लिश डिक्शनरी (हिचेच पुढे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी असे नामकरण झाले) ह्या ग्रंथाचे खंडही रानडे ह्यांच्या समोर आदर्श म्हणून होते. त्यामुळे मराठी भाषेच्या अभिवृद्धीच्या दृष्टीने हे काम मोलाचे ठरले. आजही रानडे ह्याच्या शब्दकोशाची तुलना होऊ शकेल, असा दुसरा इंग्रजी-मराठी शब्दकोश उपलब्ध नाही. लोकमान्य टिळकांनी ह्या शब्दकोशाच्या गौरवार्थ केसरी खास अग्रलेख लिहिला होता (२७ ऑक्टोबर १९०३). १९७७ साली ह्या शब्दकोशाचे पुनर्मुद्रण करण्यात आले.

कुलकर्णी, अ. र.