यशवंत"यशवंत : (९ मार्च १८९९–२६ नोव्हेंबर १९८५). विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर. जन्म सातारा जिल्ह्यातील चाफळचा. शिक्षण सांगलीस झाले. मॅट्रिक झाल्यानंतर पुण्यास लेखनिकाची नोकरी केली. कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) ह्यांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे होती. पुढे ⇨रविकिरणमंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यशोधन (१९२९) हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध (१९३४), यशोनिधि (१९४१), यशोगिरी (१९४४), ओजस्विनी (१९४६) इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदुःखांशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरणमंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता त्यांना मिळाली. स्फुट कवितेबरोबर जयमङ्‌गला (एक प्रेमकथा) (१९३१), बन्दीशाळा (१९३२), काव्यकिरीट (१९४१) अशी दीर्घ काव्यरचनाही त्यांनी केली. बन्दीशाळेत बालगुन्हेगाराची जीवनकथा सांगितलेली आहे, तर जयमङ्‌गला म्हणजे कवी बिल्हणाची प्रेमकथा होय. २२ भावगीतांचे मिळून हे एक काव्य झालेले असून रचनादृष्ट्या यशवंतांनी केलेला हा एक वेगळाच प्रयोग होय. काव्यकिरीटात बडोद्याचे अधिपती प्रतापसिंह महाराज ह्यांच्या राज्याभिषेकोत्सवाचे वर्णन आहे. त्या काव्याने ते बडोदे संस्थानचे राजकवी झाले. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ‘महाराष्ट्र-कवी’ म्हणून गौरविण्यात आले. लहान मुलांसाठी त्यांनी काही काव्यरचना केली आहे. तसेच छत्रपती शिवराय (१९६८) हे त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेले महाकाव्यही प्रसिद्ध आहे. यशवंतांनी काही गद्यलेखन केले असले, तरी मुख्यत: कवी म्हणूनच ते विशेष मान्यता पावले आहेत. पुणे येथे ते निधन पावले.

जोग, रा. श्री.