कीर्तिकर, कान्होबा रणछोडदास : (१८४९–१९१९). मराठी कवी. जन्म मुंबई येथे. मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात काही काळ घालविल्यावर इंग्लंडला विशेष

का. र. कीर्तिकर

अध्ययनासाठी प्रयाण (१८७४). तेथून परतल्यावर ‘ग्रँट मेडिकल कॉलेजा’त काही काळ प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुन्हा इंग्लंडला गेले व तेथे त्यांनी शस्त्रक्रियादी  विषयांचे विशेष अध्ययन केले व भारतात आल्यानंतर सैन्यात वैद्यकीय अधिकारी, ‘ग्रँट मेडिकल कॉलेजा’त प्राध्यापक इ. कामे केली. सेवानिवृत्तीनंतर ग्रंथवाचन व ग्रंथलेखन ह्यांत त्यांनी काळ व्यतीत केला.

काव्यलेखनाचा नाद त्यांस लहानपणापासूनच होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी भक्तिसुधा हे काव्य लिहीले. पत्नीनिधनानंतर विलापलहरी (१८८२) ही विलापिका लिहिली. आंगल कवी टेनिसन ह्याच्या प्रिन्सेस नामक काव्यावरून त्यांनी इंदिरा हे अनुवादात्मक कथाकाव्य लिहिले (१८८२). त्यात प्रतिभेपेक्षा परिश्रमच अधिक जाणवतात. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजिलेल्या विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्समध्ये मराठी वाङ्‍मयावर त्यांनी व्याख्याने दिली. बडोदे येथे झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९०९). जळगावच्या कविसंमेलनाचेही ते अध्यक्ष होते. (१९०७). त्र्यंबक बापूजी ठोमरे ह्यांस ‘बालकवी’ ही पदवी ह्यांच कविसंमेलनात त्यांनी  दिली. वनस्पतिशास्त्राचा त्यांचा व्यासंग गाढा होता. तत्संबंधीही त्यांनी लेखन केले.

जोग, रा. श्री.