रघुनाथपंडित : (सतरावे शतक). मराठी पंडित कवी. त्याची चरित्रविषयक माहिती निश्चित स्वरूपात उपलब्ध नाही. तो कोण असावा, ह्याबद्दल पाच मते आढळतात : (१) तो कारवारकडील चंदावर गावचा सारस्वत ब्राह्मण असावा. (२) तो तंजावरचा असावा आणि मोरोपंतांचा समकालीन असावा. (३) तो मुळात रायगड जिल्ह्यातील चौलचा आणि त्याचे आडनाव मनोहर. तो पुढे कर्नाटकात स्थायिक झाला. त्याने वैद्यविलास, कविकौस्तुभ, छंदोरत्नावलि, चिकित्सामंजरीनाडीज्ञानविधी ही साहित्यविषयक व वैद्यकविषयक प्रकरणे संस्कृतात लिहिली. प्रसिद्ध दमयंतीस्वयंवरही त्यानेच लिहिले. (४) तो शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांपैकी एक असून ‘पंडितराव’ ह्या पदावर होता. (५) शिवकालातील राजव्यवहारकोश लिहिणारे रघुनाथ नारायण हणमंते हेच रघुनाथपंडित होत. दमयतीस्वयंवर किंवा नलोपाख्यान हे त्यांनीच लिहिले. ह्या सर्व मतांचा विचार करून, शं. गो. तुळपुळे ह्यांनी हा कवी तंजावरचा होता व तो राजकारणपटूही होता, असा निष्कर्ष काढला आहे.

रघुनाथपंडिताने रामदासवर्णन, गजेंद्रमोक्ष आणि दमयंतीस्वयंवर अशी तीनच काव्ये रचिल्याचे दिसते. रामदासवर्णनात वसंततिलका वृत्तातील अवघे अकरा श्लोक आहेत. रघुनाथपंडिताला समर्थ हे गुरुस्थानी होते, असे ह्या काव्यावरून दिसते. गजेंद्रमोक्ष हे आख्यानक काव्य असून त्यात ५८ श्लोक आणि ३ पदे आहेत. कीर्तन परिणामकारक करण्यासाठी वापरता यावे, असे हे काव्य आहे. रघुनाथपंडिताची कीर्ती आज मुख्यतः त्याच्या दमयंतीस्वयंवरावर अधिष्ठित आहे. संस्कृत कवी श्रीहर्ष ह्याच्या नैषधीयचरिताच्या आधारे रघुनाथपंडिताने त्याचे हे काव्य रचिले. नैषधीयचरितात एकूण १,७५० श्लोकांत सांगितलेला कथाभाग रघुनाथपंडिताने फक्त २५४ श्लोकांत मांडला आहे. ह्या काव्यातून रघुनाथपंडिताच्या संपन्न अभिरुचीचा आणि अभिजात रसिकतेचा प्रत्यय येतो. सुंदर व मार्मिक व्यक्तिचित्रण हे ह्या काव्याचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य.

रघुनाथपंडित हा राजव्यवहारकोशाचाही कर्ता असल्यास दहा भागांच्या आणि ३८४ श्लोकांच्या ह्या संस्कृत-फार्सी ग्रंथाची रचना करून मोठे कोशकार्य केल्याचे श्रेयही त्याला द्यावे लागेल.

जोशी, वसंत स.