दिवाकर

दिवाकर:(१८ जानेवारी १८८९–१ ऑक्टोबर १९३१). मराठीतील ⇨नाट्यछटा या वाङ्‌मयप्रकाराचे जनक. पुणे येथे जन्म. वडिलांचे नाव गोविंद बळवंत दिवाकर.दत्तक गेल्यानंतरचे नाव शंकर काशिनाथ गर्गे. वाङ्‌मयनिर्मिती ‘दिवाकर’ या नावाने. दिवाकरांचे बहुतेक सर्व जीवन पुणे येथे व्यतीत झाले. स्कूल फायनल ही मॅट्रिकच्या बरोबरीची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. १९११–३० ह्या काळात त्यांनी लेखन केले. प्रथम पोलीस खात्यात अल्प वेतनावर कारकून म्हणून आणि पुढे काही काळ डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नौकरी केल्यानंतर १९१६ पासून पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून ते अखेरपर्यंत राहिले. इंग्रजीचे नाणावलेले शिक्षक म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. १९१० पासून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजातील इंग्रजीचे एक व्यासंगी प्राध्यापक ⇨ वासुदेव बळवंत पटवर्धन यांच्याबरोबर पाश्चात्त्य वांङ्‌मयाचे वाचन आणि अध्ययन केले. प्रथम शेली, बायरन, वर्ड्‌सवर्थ इ. कवींच्या काव्याचा अभ्यास त्यानंतर शेक्सपिअर, ब्राउनिंग यांच्या वाङ्‌मयाचा अभ्यास व नंतर टॉलस्टॉय, इब्सेन, गॉल्झवर्दी, माटरलिंक, हाउप्टमान वगैरे यूरोपीय लेखकांच्या वाङ्‌मयाचे वाचन–मनन त्यांनी केले. ब्राउनिंग, वर्ड्सवर्थ, शेक्सपिअर यांचा विशेष प्रभाव दिवाकरांच्या मनावर पडलेला होता. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांमुळे (ड्रॅमॅटिक मोनोलॉग) नाट्यछटा लिहिण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. एक्कावन्न नाट्यछटांचा संग्रह हे त्यांचे मुख्य वाङ्‌मय होय. नाट्यछटा हा एक नाट्यात्म लघुवाङ्‌मय प्रकार. ‘छटा’ ह्या शब्दाने हे लघुत्व सूचित झालेले आहे. एखाद्या कल्पित व्यक्तीचा नाट्यात्म आत्माविष्कार तीत अभिप्रेत असतो. नाट्यछटेत बोलणारे पात्र एकच असले, तरी ते दुसऱ्‍या एक अथवा अनेक व्यक्तींशी बोलत असते आणि त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद ह्या एकमुखी संवादात गृहीत आणि सूचीत असतो. बोलणाऱ्‍या पात्राचे अंतरंग थोडक्या शब्दांत उलगडून दाखविण्याचे व त्यातून जीवनावर मार्मिक भाष्य करण्याचे सामर्थ्य यशस्वी नाट्यछटेत अपेक्षित असते. त्याचा प्रत्यय फक्त दिवाकरांच्या नाट्यछटांनीच दिला. ‘पंत मेले राव चढले’,‘फाटलेला पतंग’,‘वर्ड्सवर्थचे फुलपाखरू’ इ. त्यांच्या नाट्यछटा ह्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. यांशिवाय ‘भरचौकात’,‘मी माझ्याशी’ या नाट्यसंवादांच्या लेखमाला ‘कारकून’,‘ऐट करू नकोस’ इ. नाटिका व केशवसुत आणि त्यांच्या कविता यांविषयी संशोधनात्मक लेख यांचाही उल्लेख आवश्यक आहे. बहुसंख्य नाट्यछटांचे लेखन १९११–१३ या काळात झालेले आहे. केशवसुताविषयक लेखन मात्र १९२६–३० या अवधीत झाले. वेचक, मोजक्या शब्दांत सूचकतेने बव्हर्थ व्यक्त करणारी रेखीव, संयमशील अशी शैली त्यांनी प्रयत्नपूर्वक कमाविली होती. काही काळ ते प्रसिद्ध रविकिरणमंडळाचे सभासद होते. त्यांच्यानंतर मराठी वाङ्‌मयात नाट्यछटांना पूरच आला. दिवाकरांचा आदर्श त्या लेखकांपुढे होता व त्यांच्या नाट्यछटा हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते. पुणे येथे त्यांचे निधन झाले.

जोग, रा. श्री.