बाबा पदमनजी

बाबा पदमनजी : (मे १८३१ – २९ ऑगस्ट १९॰६). मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक. पूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. जन्म बेळगावचा. शिक्षण बेळगाव आणि मुंबई येथे. बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये शिकत असताना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान मिळाले बायबल तसेच अब्राहम, इझाक इत्यादींच्या कथा हे सर्व इंग्रजी समजू लागल्यानंतर वाचले मुंबईच्या फ्री चर्च विद्यालयात ‘बैबल मास्तर’ म्हणून काम केले. हळूहळू ख्रिस्ती धर्माकडे ओढा निर्माण झाला. काही काळ ते ‘परमहंस मंडळी’ ह्या प्रागतिक विचारांच्या गुप्त संघटनेतही होते परंतु तेथे व्यक्त होणारे नास्तिक विचार तसेच मंडळाच्या पुस्तिकेतील कोणताही धर्म ईश्वरदत्त नाही व कोणतेही शास्त्र ईश्वरप्रणीत नाही अशा आशयाचे विचार त्यांना पसंत न पडल्यामुळे त्यांनी ह्या संघटनेशी संबंध तोडला. ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची त्यांची इच्छा त्यानंतर अधिकाधिक तीव्र होत गेली व अखेरीस ३सप्टेंबर १८५४ रोजी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. ख्रिस्ती झाल्यानंतर ते पुण्यास गेले. पुणे येथे त्यांचे वास्तव्य सु. १६ वर्षे होते. तेथे असताना त्यांनी बरीच वर्षे फ्री चर्च मिशनच्या मंडळीचे पाळक म्हणून १८६७ मध्ये त्यांची नेमणूक झाली परंतु १८७३ मध्ये ह्या कामाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वत:ला लेखनास वाहून घेतले. १८७३ आधीही त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झालेली होतीच. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या शंभरांहून अधिक आहे. स्त्रीविद्याभ्यास निबंध (१८५२), व्यभिचारनिषेधक बोध (१८५४), यमुनापर्यटन (१८५७), सर्वसंग्रही ऊर्फ निबंधमाला (१८६॰) हे त्यांच्या आरंभीच्या ग्रंथापैकी काही होत.

वर उल्लेख केलेल्या ग्रंथांपैकी यमुनापर्यटन ही कादंबरी असून मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून तिचा उल्लेख करण्यात येतो. ‘ यमुनापर्यटन’ म्हणजे ह्या कादंबरीची नायिका यमुना हिच्या प्रवासाची कथा होय. मिशनऱ्यांच्या शाळेत शिकलेली आणि ख्रिस्ती धर्माबद्दल प्रेम असलेली यमुना आपला पती विनायक ह्याच्यासह प्रवासास निघते. ह्या प्रवासात काही हिंदू विधवा त्यांना भेटतात त्यांची दु:खे त्यांना दिसतात अशा स्त्रिया कुमार्गाला कशा लागतात ह्याचाही त्यांना अनुभव येतो. दु:खी विधवांना यमुना येशूचा उपदेश ऐकवते. ह्या प्रवासातच विनयकाला अपघाती मरण येते. मरतेसमयी यमुना त्याला बाप्तिस्मा देते. यमुना विधवा झाल्यामुळे तिचे केशवपन घडवून आणण्याचे प्रयत्न होतात पण यमुना ते होऊ देत नाही. तिचा सासराही तिला पाठिंबा देतो. पुढे यमुना एका ख्रिस्ती गृहस्थाशी विवाह करते स्वत:ही ख्रिस्ती धर्म स्वीकारते. यमुनेचा प्रवास जसा भौगोलिक, तसाच वैचारिकही आहे. ह्या प्रवासातील विविध अनुभवांतून यमुना ही खिस्ताच्या अधिकाधिक जवळ जाते आणि अखेरीस ख्रिस्ती होते. मनाने ती आरंभापासूनच ख्रिस्ती आहे.मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून यमुनापर्यटनाचा उल्लेख करण्यात येत असला, तरी यमुनापर्यटनात कादंबरीचे व्यवच्छेदक असे विशेष घटक सापडत नसून ती कांदबरी नव्हे, असेही विचार व्यक्तविले गेले आहेत. तसेच विधवांच्या दु:खापेक्षा बाबांची ख्रिस्ती धर्म प्रचाराची प्रेरणा यमुनापर्यटन लिहिताना बलवत्तर ठरली, असेही म्हटले गेले आहे. परंतु ह्या कादंबरीतील काही कलात्मक न्यूने दाखविल्यानंतरही वास्तववादी मराठी कादंबरीच्या प्रवासातील अगदी आरंभीचा व महत्त्वाचा टप्पा म्हणून तिचा गौरव करणारे अभ्यासकही आहेत.बाबा पदमनजी ह्यांच्या अन्य ग्रंथांत शब्दरत्नावली (१८६॰), महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास (१८६६), स्त्रीकंठभूषण (१८६८), ए काँप्रेहेन्सिव्ह डिक्शनरी इंग्लिश अँड मराठी (नवी आवृ. १८७॰), कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना (आवृ. तिसरी, १८७३), नव्या करारावर टीका (१८७७), उद्धारमार्गविज्ञान (१८७८) आदींचा समावेश होतो. अरुणोदय (१८८४) ह्या नावाने त्यांनी आपले लालित्यपूर्ण व कलात्मक आत्मचरित्रही लिहिले. आपल्या जन्मापासून बाप्तिस्म्यापर्यंतची हकीकत त्यांनी त्यात दिलेली आहे. ख्रिस्ती व हिंदुधर्म यांबाबत तुलनात्मक विचार करणारी बरीच ग्रंथरचना त्यांनी केली. स्फुटलेखनही त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेले आढळते. १८७७ पासून २५ वर्षे ‘बायबल सोसायटी’ आणि ‘ट्रॅक्स सोसायटी’ ह्या संस्थांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. उदयप्रभा, कुटुंबमित्,, सत्यदीपिका अशा काही नियत-कालिकांचेही त्यांनी संपादन केले.मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : कऱ्हाडकर, के. सी. बाबा पदमनजी : काल व कर्तृत्व, मुंबई. १९७९.

कुलकर्णी, अ. र.