अणे, माधव श्रीहरी : (२९ ऑगस्ट १८८०–२६ जानेवारी १९६८). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य पुढारी. जन्मस्थान वणी (जि. यवतमाळ). वकिली करीत असतानाच त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यांत भाग घेऊन विदर्भात काही नवीन संस्था स्थापन केल्या. लोकमत  हे साप्ताहिक ते काही काळ चालवीत होते. १९२८ मध्ये ग्वाल्हेर येथे झालेल्या मराठी साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. लो. टिळकांचे ते कट्टर अनुयायी असून त्यांच्या होमरूल लीगचे ते एकदा उपाध्यक्षही झाले होते. टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांनी म. गांधीच्या असहकाराच्या चळवळीत हिरिरीने भाग घेतला व काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची अधिकारपदे भूषविली.

अणे, माधव श्रीहरिदुसऱ्या महायुद्धकाळात ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे  ते सभासद होते परंतु १९४३ साली म. गांधींच्या उपोषणास सहानुभूती म्हणून त्यांनी त्यागपत्र दिले. जीवनाच्या उर्वरित काळात त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार केला. तिलक यशोर्णव  हे त्यांनी लिहिलेले लो. टिळकांचे संस्कृत चरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. त्यांच्यावरील प्रेमामुळे महाराष्ट्रीय जनता त्यांना ‘लोकनायक’ म्हणत असे.

देवगिरीकर, त्र्यं. र.