सिल्व्हिअस, फ्रांसिस्कस : (दे ले बोए, फ्रांस्वा). (१५ मार्च १६१४— १५ नोव्हेंबर १६७२). जर्मन वैद्य, शरीरक्रियावैज्ञानिक, शरीररचनाविज्ञ व रसायनशास्त्रज्ञ. त्यांना सतराव्या शतकातील आइट्रोकेमिकल स्कूल ऑफ मेडिसीनचे जनक मानले जाते. मानवी जीवनविषयक सर्व आविष्कार व रोग हे रासायनिक क्रियेचे परिणाम असतात, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्र गूढवादी अटकळीकडून भौतिकी व रसायनशास्त्राच्या वैश्विक नियमांच्या बुद्घिप्रामाण्यवादी वापराकडे वळले.

सिल्व्हिअस यांचा जन्म जर्मनीतील हानाऊ येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेडन येथील कॅल्‌व्हीनिस्ट ॲकॅडेमीत झाले. नंतर ते लायडन येथे वैद्यकाच्या शिक्षणासाठी गेले. त्यांनी बासेल विद्यापीठातून १६३७ मध्ये वैद्यकाची पदवी संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ॲनिमल मूव्हमेंट अँड इट्स डिसऑर्डर असा होता. त्यांनी हानाऊ येथे दीड वर्ष व नंतर ॲम्स्टरडॅम येथे वैद्यकीय व्यवसाय केला (१६४१— ५६). ते ॲम्स्टरडॅम कॉलेज ऑफ फिजिशियन्स येथे पर्यवेक्षक (१६५७), लायडन विद्यापीठात वैद्यकाचे प्राध्यापक (१६५८— ६८) आणि त्याच विद्यापीठाचे कुलगुरु होते (१६६९-७०).

विल्यम हार्वी यांचा रक्ताभिसरणाचा शोध व ग्रीक शारीरविज्ञ गेलेन यांचा द्रववाद यांवर आधारित नवीन वैद्यकीय पद्घत तयार करण्याचा सिल्व्हिअस यांनी प्रयत्न केला. महत्त्वाच्या सर्वसाधारण जीवनक्रिया व रोग निर्माण झाल्यानंतरच्या जीवनक्रिया या रक्तामुळे होतात. तसेच सजीव घटकांत लवणे असतात व ही लवणे अम्ल आणि अल्कली यांच्या परस्परक्रियेतून तयार होतात हे त्यांना माहीत होते. यावरुन त्यांनी असा सिद्घांत मांडला की, रक्तातील रासायनिक असंतुलनामुळे (अम्लाचे किंवा अल्कलीचे अतिरिक्त प्रमाण झाल्यामुळे) रोग निर्माण होतात. या रोगांवरील उपचारांसाठी रसायनांचा वापर केला पाहिजे, असे त्यांनी सुचविले.

सिल्व्हिअस हे एक असाधारण शिक्षक म्हणून यूरोप खंडात प्रसिद्घ होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षणात विभागवार सूचनांचा प्रथम समावेश केला. त्यांनी लायडन विद्यापीठात प्रथमच रासायनिक प्रयोगशाळा उभारली. तेथे त्यांनी पचनक्रिया व शारीरद्रव्याबाबत संशोधन केले. तसेच त्यांनी ‘सिल्व्हिअन फिशर’ या मेंदूतील भेगेचा शोधही लावला. त्यांनी १६७१ मध्ये प्रॉक्सिऑस मेडिकी आयडिया नोव्हा (वैद्यकीय व्यवसायातील नवीन कल्पना) हा ग्रंथ प्रसिद्घ केला. त्यांनी कागनोमरेट (लहान लहान घटक एकत्र येऊन तयार झालेल्या) ग्रंथी व कागनोबेट (गोल आकाराच्या) ग्रंथी यांतील फरक स्पष्ट केला. त्यांचे विद्यार्थी यान स्वामरडाम, राइनर द ग्राफ, निल्स स्टेनसन आणि बर्चर्ड द वोल्डर यांनी संशोधक म्हणून प्रसिद्घी मिळविली.

सिल्व्हिअस यांचे लायडन (नेदर्लंड्स) येथे निधन झाले.

पाटील, चंद्रकांत प.