टॉन्सिल : (गिलायू). तोंड व नाक यांच्या मागे आणि ग्रसनीच्या (घशाच्या) पुढे त्यांच्या संधिस्थानी दोन्ही बाजूंस जे वर्तुळाकार लसीकाभ ऊतक-पुंज (ज्यातील मधल्या मधल्या जागा लसीका पेशींनी भरलेल्या आहेत अशा जाळीदार ऊतकाचे म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींचे पुंज लसीका पेशी या रक्तातील एका विशेष प्रकारच्या पांढऱ्या पेशीच असतात) असतात, त्यांना टॉन्सिल अथवा गिलायू असे म्हणतात. या पुंजांपैकी जे सर्वांत वर म्हणजे नाकाच्या पश्चछिद्रापाशी असतात त्यांना ग्रसनी गिलायू [⟶ ॲडिनॉइडे] म्हणतात. खालच्या म्हणजे जिभेच्या दोन्ही बाजूंच्या कोटरांमध्ये (पोकळ्यांमध्ये) असलेल्या पुंजांना तालुगिलायू अथवा नुसते गिलायू असे म्हणतात. जिभेच्या मागच्या बाजूला असलेल्या लहान पुंजांना जिव्हागिलायू असे म्हणतात. गिलायूंचे हे कडे अन्नमार्ग आणि श्वसनमार्ग यांच्या सुरुवातीलाच असून त्या मार्गानी शरीरात प्रवेश मिळविणाऱ्या जंतूंच्या विरुद्ध प्रतिकार करण्याचे कार्य हे सर्व गिलायू करीत असतात, असे मानण्यात येते.

गिलायू : (१) दृढ तालू, (२) मृदू तालू, (३) पडजीभ, (४) ग्रसनीची पश्चभित्ती, (५) तालुग्रसनी कमान, (६) तालुजिव्हा कमान, (७) तालुगिलायू, (८) जीभ.

तालुगिलायू हे जरदाळूसारखे चपटे व लंबगोलाकृती असून तालुग्रसनी व तालुजिव्हा या दोन तालुस्तंभांमधील (तोंड आणि घसा यांच्या संधिस्थानी दोन्ही बाजूंस असलेल्या अस्तर त्वचेच्या घड्यांमधील) त्रिकोणाकृती खोलगट भागात बसविल्यासारखे दिसतात. या खोलगट भागाला ‘गिलायू-कोटर’ असे नाव आहे. तालुगिलायूचा आकार आणि आकारमान वयोमानावर अवलंबून असतो. लहानपणी हे गिलायू मोठे असून पुढे ते हळूहळू लहान होत जातात. प्रौढपणी हे आकारमान सु. १५–२० मिमी. असून प्रत्येक गिलायूचे वजन १–१·५ ग्रॅ. असते.

 तोंड उघडले असता जिभेच्या मागच्या टोकाच्या दोन्ही बाजूंना गिलायूंचा पृष्ठभाग दिसतो. जीभ दाबून धरली असता गिलायू अधिक स्पष्ट दिसतात. गिलायूंच्या पृष्ठभागावर १० ते २० गर्त (भेगा) दिसतात. गिलायूंचा रंग लालसर असून पृष्ठभाग कणमय असल्यासारखा दिसतो. पृष्ठभागावर दिसणारे गर्त आत खोलवर गेलेले असून त्यांना फाटे फुटल्यासारखे असतात. या गर्तांच्या भोवती लसीकाभ ऊतकाचे थर असतात.

 गिलायूंच्या पार्श्व बाजूवर जाड असा तंत्वात्मक थर असतो. त्यामुळे गिलायू व ग्रसनीचे स्नायू वेगवेगळे झालेले असतात. या तंत्वात्मक थराला गिलायु-प्रावरण म्हणतात. शस्त्रक्रियेने गिलायू काढून टाकताना ते प्रावरणासह काढून टाकतात.

 गिलायूला रक्ताचा पुरवठा आनन-रोहिणीच्या (मानेच्या मुख्य रक्तवाहिनीच्या बाह्य शाखेच्या) शाखांपासून होतो आणि तेथील रक्त बाह्यतालु-नीलेमार्फत परत जाते.

 जिव्हागिलायू जिभेच्या मुळाशी १०–१२ लसीकाभ ऊतकाच्या पुंजांचा मिळून बनलेला असतो. त्याला फारसे महत्त्व नाही.

 ग्रसनी गिलायू नाकाच्या मागच्या द्वारापाशी ग्रसनीच्या सुरुवातीस असून तो लसीकाभ ऊतकाच्या पुंजांचा बनलेला असतो. इतर गिलायूंप्रमाणेच हेही लहानपणी मोठे असून पुढे लहान होत जातात. हे गिलायू मोठे असताना नाकाच्या पश्च छिद्रांना रोध करीत असल्यामुळे मुलांना नाकावाटे श्वास घेता येत नाही. मूल तोंडानेच श्वास घेऊ लागल्यामुळे तालू व जीभ यांच्यामध्ये मोकळी जागा राहून जिभेचा दाब तालूवर न पडल्यामुळे तालू कमानदार बनते, वरचे दात पुढे येतात तोंड सतत उघडे राहिल्यामुळे चेहरा बावळट दिसतो. या गिलायूला वारंवार सूज येत राहिली, तर ग्रसनी आणि कान यांना जोडणाऱ्या ग्रसनी कर्णनलिकेचे (तोंड, नाक, घसा व कानाचा पडदा यांमध्ये संबंध प्रस्थापित करणाऱ्या नलिकेचे) ग्रसनीमधील तोंड बंद होऊन मध्यकर्णाला सूज येऊन कान फुटतो.

 तालुगिलायू आणि ग्रसनी गिलायू बहुधा एकाच वेळी सुजून मोठे होतात म्हणून शस्त्रक्रियेच्या वेळी ते दोन्ही गिलायू एकाच वेळी काढून टाकतात.

 शरीरातील इतर लसीका ग्रंथींप्रमाणेच गिलायूंचे कार्य म्हणजे लसीका कोशिकांची उत्पत्ती करून शरीराचे जंतूंपासून रक्षण करणे हे होय परंतु गिलायूंमध्ये जंतुसंसर्ग वारंवार होत राहिला, तर गिलायू म्हणजे जंतूंचे घरच होऊन बसते. तसे झाले तर गिलायूपासून शरीराचे संरक्षण होण्याऐवजी जंतूंना शरीरात प्रवेश देणारे ते एक स्थानच बनते. अशा वेळी शस्त्रक्रिया करून गिलायू काढावे लागतात.

 गिलायुशोथ : (टॉन्सिलीटीस). जंतुसंसर्गामुळे गिलायूंना शोथ (दाहयुक्त सूज) येतो, त्याला गिलायुशोथ असे म्हणतात. हा शोथ तीव्र अथवा चिरकारी (फार काळ टिकणारा) अशा दोन प्रकारांचा असू शकतो. तीव्र शोथ पूर्णपणे बरा न होता कित्येक वेळा त्याचेच रूपांतर चिरकारी शोथात होते.

 तीव्र गिलायुशोथ अनेक प्रकारच्या जंतूंमुळे होऊ शकतो. त्यांपैकी घटसर्प, मालागोलाणू (स्ट्रेप्टोकॉकस) जंतू हे विशेष महत्त्वाचे आहेत. ⇨घटसर्प होऊन गेल्यानंतर कित्येक वेळा गिलायूंमध्ये घटसर्पजंतू आढळतात. अशा व्यक्तींपासून घटसर्पाचा प्रसार होण्याचा संभव असतो. 


लक्षणे : तीव्र गिलायुशोथामध्ये एकाएकी थंडी वाजून ताप भरतो. घसा दुखू लागून गिळण्याची अडचण उत्पन्न होते. अरुची, अस्वस्थपणा वगैरे लक्षणेही दिसतात. तोंड उघडून पाहिल्यास दोन्ही बाजूंच्या गिलायूंचा रंग लालभडक असून त्यांचे आकारमानही मोठे झालेले असते. घटसर्पजन्य तीव्र शोथात गिलायूंवर चिकट पांढरा असा साखा जमतो. इतर काही तीव्र शोथांतही असा साखा येऊ शकतो म्हणून कित्येक वेळा निदानाला अडचण पडते. इतर तीव्र शोथांत गिलायूंच्या पृष्ठभागावरील गर्तांच्या तोंडावर चिकट, घट्ट आणि पिवळ्या रंगाचे गठ्ठे जमल्यासारखे दिसून गर्तांची तोंडे बंद पडतात. श्वास दुर्गंधीयुक्त येऊ लागतो. या विकाराला पुटकीय गिलायुशोथ असे म्हणतात. 

निदान : तीव्र गिलायुशोथाचे निदान कठीण नाही. तोंड उघडून पाहिल्याबरोबर लालभडक गिलायू लगेच दिसतात. परंतु असा शोथ उत्पन्न करणाऱ्या जंतूंचे निदान करणे फार जरुरीचे असते कारण त्यावरच चिकित्सा अवलंबून असते. गिलायूच्या पृष्ठभागावरील पू व इतर घट्ट द्रव पदार्थ विशेष तऱ्हेने तपासावे लागतात.

चिकित्सा : तीव्र गिलायुशोथ झालेल्या रुग्णाला स्वस्थ निजवून ठेवावे. सुरुवातीस मानेभोवती बर्फाची पिशवी व पुढे मानेस आणि गळ्याला शेक केल्यास तात्पुरता आराम वाटतो. गरम पाण्यात जंतुनाशक औषधे टाकून त्याच्या गुळण्या घसा शेकत शेकत केल्यास बरे वाटते. सर्व पदार्थ गरम दिल्यास गिळण्याचा त्रास कमी वाटतो. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा शक्य तितक्या लवकर उपयोग करावा. घटसर्पाचे जंतू सापडल्यास घटसर्पविरोधी रक्तरस देतात. पेनिसिलीन, क्लोरँफिनिकॉल वगैरे औषधांचा त्वरित गुण येतो. सु. तीन-चार दिवसांत सूज व ज्वर कमी होऊन रोग्याला बरे वाटते.

  उपद्रव : काही विशिष्ट जंतूंच्या संसर्गामुळे तीव्र गिलायुशोथ झाल्यास त्याचा परिणाम शरीरातील इतर इंद्रियांवरही होतो. संधिवात, हृद्‌रोग, वृक्कशोथ (मूत्रपिंडाची सूज) इ. उपद्रव रक्तनाशी मालागोलाणुसंसर्गांमुळे होणाऱ्या गिलायुशोथात होण्याचा संभव असतो. या उपद्रवांचा परिणाम सर्व जन्मभर होऊ शकत असल्यामुळे तीव्र गिलायुशोथाच्या रोग्याची वारंवार तपासणी करावी लागते आणि हे उपद्रव होऊ नयेत म्हणून योग्य ते उपचार पुष्कळ दिवसांपर्यंत चालू ठेवावे लागतात [⟶ संधिवात].

  परिगिलायु-विद्रधी : तीव्र गिलायुशोथानंतर अथवा त्याच वेळी परिगिलायु-विद्रधी (गिलायूभोवती होणारे गळू) होऊ शकतो. या प्रकारात गिलायूंच्या भोवतीच्या पोकळ जागेत पू तयार होऊन साठून राहतो. घसा दुखणे, ज्वर वगैरे सर्व लक्षणे दिसतात. तालुस्तंभावर क्षत घेऊन साठलेल्या पुवाला वाट काढून दिली असता हा रोग बरा होतो.

  चिरकारी गिलायुशोथ : हा बहुधा तीव्र शोथाचाच परिणाम असतो. क्वचित प्रसंगी सुरुवातीपासूनच सौम्य शोथ असल्यास त्याचे स्वरूप चिरकारी शोथ असे होते. या प्रकारात मुख्य लक्षणे म्हणजे अशक्तपणा, वारंवार सर्दी होणे, अरुची, सौम्य प्रमाणात ज्वर, मानेतील गाठी मोठ्या होणे, कान फुटणे वगैरे असतात. गिलायूंमध्येच जंतूंचे प्रजनन होत राहिल्यामुळे त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या विषांचा सर्व शरीरावर विपरीत परिणाम होतो. रोगी अशक्त होत जातो, मधून मधून ताप येतो, हवा बदलली की प्रकृती बिघडते. प्रतिजैव औषधांचा परिणाम फार वेळ टिकत नाही. अशा वेळी शस्त्रक्रियेने गिलायू काढून टाकणे हाच उत्तम उपचार आहे.

  गिलायु-अर्बुदे : गिलायूची अर्बुदे (नव्या पेशींची अत्यधिक वाढ होऊन निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) अगदी क्वचित होतात. बहुधा एका बाजूच्या गिलायूवरच अर्बुदाची वाढ होऊन तो गिलायू मोठा दिसतो. गिळण्यास अडचण होते. गिलायूअर्बुद सौम्य वा मारक असू शकते. शक्य तितक्या लवकर गिलायू व त्याचे अर्बुद काढून टाकणे, हा एकच उपाय आहे.

  शस्त्रक्रिया : गिलायू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया दोन प्रकारांनी करतात. एका प्रकारात विशिष्ट प्रकारचे उदग्र-कर्तन यंत्र वापरून गिलायू कापून काढतात. दुसऱ्या प्रकारात गिलायूंचे चाकूने विच्छेदन करून ते प्रावरणासह काढून टाकतात.

  गिलायू काढून टाकण्याची जरुरी खालील परिस्थितींत असते : (१) वारंवार तीव्र गिलायुशोथ होणे, (२) परिगिलायु-विद्रधी, (३) गिलायू फार मोठे असल्यामुळे श्वासोच्छ्‌वास व गिळण्याला अडथळा येणे, (४) चिरकारी गिलायुशोथ आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा, (५) कर्णशोथ आणि कान फुटणे, (६) गिलायूमध्ये घटसर्प जंतू सापडल्यास, (७) गिलायूंची अर्बुदे.

  काही विशिष्ट परिस्थितींत गिलायू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करीत नाहीत. उदा., (१) रक्तस्राव फार वेळ चालू राहण्याची प्रवृत्ती (२) तीव्र गिलायुशोथ असताना (३) घटसर्प वा बालपक्षाघाताची (पोलीओची) साथ चालू असताना (४) तीव्र रक्तदाबाधिक्य, क्षय, उपदंश वगैरे रोग (५) पाच वर्षे वयाच्या आत (६) ज्यांना शुद्धिहारके व संवेदनाहारके सोसवणार नाहीत अशा व्यक्ती.

संदर्भ :

1. Davies, D. A. Davies, F., Eds. Gray’s Anatomy, London, 1962.

2. Wakeley, C. Harmer, M. Taylor, S., Eds. Rose and Carless Manual of Surgery, London, 1960.

अभ्यंकर, श. ज. ढमढेरे, वा. रा.

परिगिलायु-विद्रधी          घटसर्प          पुटकीय गिलायुशोथ