उदर : पृष्ठवंशीय (पाठीला हाडांचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या धडातील वरच्या भागाला छाती आणि खालच्या भागाला ‘उदर’ असे म्हणतात. त्यालाच ‘उदरगुहा’ किंवा ‘पर्युदरगुहा’ असेही म्हणतात.

आ. १. उदरगुहेतील अंतस्ये व त्याजवळील महत्वाचे भाग : (१) मध्य पटल, (२) फुप्फुसे, (३) यकृताचा उजवा खंड, (४) यकृताचा डावा खंड, (५) जठर, (६) बृहदांत्राचा अवरोही भाग, (७) उंडुक, (८) लघ्वांत्राची वेटोळी, (९) बृहदात्रांचा अनुप्रस्थ भाग, (१०) पित्ताशय.

उदराचे दोन भाग दिसतात : वरच्या भागालाच उदर असे नाव असून खालच्या लहान भागाला ⇨ श्रोणी असे म्हणतात.

उदराच्या भित्ती बहुतेक स्नायूंच्या बनलेल्या असतात. ऊर्ध्वभागी छाती व उदर यांच्यामध्ये घुमटाच्या आकाराचा स्नायू असतो, त्याला ‘मध्यपटल’असे म्हणतात. उदराची अग्रभित्ती स्नायूंची बनलेली असून तिच्या वरच्या भागात बरगड्यांचा समावेश असतो. अग्रभित्तीत मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंस जाड व सरळ उभे स्नायू असतात, त्यांना उदरदंडी स्नायू असे नाव असून त्यांशिवाय उदरभित्तीवर एकावर एक असे तीन चपट्या स्नायूंचे तीन थर असतात. बाहेरचा थर बाह्य तिर्यक् (बाहेरच्या बाजूस तिरका असलेला) स्नायूंचा बनलेला असून, त्याच्या खाली अंतस्तिर्यक (आतल्या बाजूस तिरका असलेला) स्नायू असतो. त्याच्याही खाली अनुप्रस्थ (आडवा) उदर स्नायू असून या तीन स्नायूंची मिळून कंडरा-कला [स्नायू एकत्र बांधणारा पातळ व चपटा, तंतुसमूहांच्या दोरीसारखा पांढरा भाग, → कंडरा] तयार होते. ही कंडरा-कला मध्यरेषेत दुसऱ्या बाजूच्या कंडरा-कलेला संलग्न असते. पार्श्वभित्तीही याच तीन स्नायूंच्या बनलेल्या असतात. पश्चभित्तीमध्ये मध्यरेषेत पृष्ठवंशाचा कटिरभाग (श्रोणीकडील भाग) असून दोन्ही बाजूंस असलेले बृहत् आणि लघुनितंब स्नायू आणि चतुरस्र-कटिस्नायू या स्नायूंमुळे पश्चभित्ती फार बळकट झालेली असते [→ स्नायु तंत्र]. उदराच्या सर्व बाजू स्नायुमय असल्यामुळे आतील इंद्रियांच्या आकारमानात फरक पडेल तसा उदरगुहेचा आकारही कमी जास्त होऊ शकतो.

आ. २. उदरगुहेचे पोटविभाग : (१) अधिजठर, (२) नाभी, (३) अधोजठर, (४) अधःपर्शुक, (५) कटी, (६) श्रोणि- फलकीय. 

उदराच्या अग्रभित्तीच्या अगदी खालच्या भागात वंक्षबंधाशी (पोटाखालच्या पार्श्वभागी असलेल्या हाडाच्या नाजूक वर आलेल्या भागांपासून म्हणजे प्रवर्धापासून मध्यरेषेकडे जाणाऱ्या तंतुमय पट्टाशी) समांतर अशी पोकळ जागा असते, तिला वंक्षसरणी असे नाव असून तिच्यातून पुरुषांमध्ये रेतवाहिका आणि स्त्रियांमध्ये पृथुबंध (तंतुमय गोल बंधपट्ट) असतो. उदराच्या अग्रभित्तीचा हा भाग सापेक्षतेने थोडा दुर्बळ असल्यामुळे तेथे इजा झाल्यास अथवा तेथील स्नायू अशक्त झाल्यास अंतर्गळ होण्याचा संभव असतो.

उदराच्या अग्रभित्तीतील स्नायूंचे एकावर एक असे तीन थर असल्यामुळे उदरपाटन (पोट उघडण्याच्या) शस्त्रक्रियेच्या वेळी हे तीन थर वेगवेगळे छेदावे व शिवावे लागतात.

उदरगुहेमध्ये अनेक अंतस्त्ये (पोकळीतील इंद्रिये) असतात. त्यांपैकी महत्त्वाची म्हणजे जठरापासून बृहदांत्राच्या (मोठ्या आतड्याच्या) अवरोही भागापर्यंतच्या पचननलिकेचा भाग, यकृत, अग्निपिंड, प्लीहा, वृक्क (मूत्रपिंड) आणि ⇨ अधिवृक्क ग्रंथी, रक्त व लसीकावाहिन्या [→ लसीका तंत्र] आणि तंत्रिका (मज्जातंतू) ही होत. वर्णनाच्या सोईकरिता दोन उभ्या आणि दोन आडव्या कल्पित रेषांनी उदराचे नऊ पोटविभाग पाडण्यात आलेले आहेत : मध्यभागी वरून खाली (१) अधिजठर, (२) नाभी आणि (३) अधोजठर असे तीन भाग असून प्रत्येक बाजूस वरून खाली (१) अधःपर्शुक (बरगड्यांचा खालचा), (२) कटी आणि (३) श्रोणि-फलकीय असे एकूण सहा भाग आहेत.

उदरातील अंतस्त्यांवर कमीअधिक प्रमाणात पर्युदराचे आवरण असते. त्या आवरणाचे दोन थर असून त्यांपैकी एक थर उदरभित्तीच्या आतील पृष्ठभागावर आणि दुसरा अंतस्त्यांच्या पृष्ठभागावर कमीअधिक प्रमाणात पसरलेला असतो. पर्युदराच्या विशिष्ट रचनेमुळे उदरगुहेचे बृहत्‌गुहा आणि लघुगुहा असे दोन विभाग होतात.

पहा : पर्युदर.

ढमढेरे, वा. रा.