संग्रहणी : ( मेदसंग्रहणी ). लहान आतडयामधील दोषामुळे वसा ( मेद ) द्रव्यांचे शोषण ( अवशोषण ) अपूर्णपणे होऊन ती द्रव्ये मलामध्ये ( विष्ठेत ) मोठया प्रमाणात उत्सर्जित होत असण्याच्या स्थितीस संग्रहणी असे म्हणतात. या दीर्घकालिक विकारात वसारेच ( मेदरेच विष्ठेत जादा वसा  असणारे रेच ) या लक्षणाबरोबरच मलविसर्जनाची वारंवारता अथवा ⇨ अतिसार, अपचन आणि विविध पोषक द्रव्यांची कमतरता यांचाही उद्‌भव होत असतो.

उदरगुहीय विकार व उष्णप्रदेशीय संग्रहणी हे संग्रहणीचे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यांची कारणे निराळी असली, तरी विकृतिप्रक्रिया आणि लक्षणे जवळजवळ तीच असतात.

उदरगुहीय विकार : ( ग्लुटेन आंत्रविकृती ). गहू, सातू, राय यांसारख्या धान्यांमध्ये असलेल्या ग्लुटेन या पदार्थामुळे ( प्रथिनद्रव्यामुळे )  हा विकार प्रतिरक्षा ( प्रतिकारक्षमतेच्या ) यंत्रणेच्या माध्यमातून प्रकट होतो. ज्या व्यक्तींमध्ये अथवा मुलांमध्ये ग्लुटेन-असह्यता हा उपजत आणि आनुवंशिक दोष असतो त्यांच्या आतडयात ग्लुटेन व त्याचे ⇨ प्रतिपिंड  यांची प्रतिक्रिया ( एकमेकांशी मीलन ) होऊन काही संयुगे तयार होतात. या संयुगांचा परिणाम आतडयाच्या आतील पृष्ठभागावर होऊ लागतो. त्यामुळे बोटांसारख्या दिसणाऱ्या सूक्ष्म रसांकुरांच्या पृष्ठभागावरील आंत्रकोशिकांच्या ( आतडयातील पेशींच्या ) संरचनेत बदल होऊ लागतात. प्रथम या कोशिकांची अन्नाच्या संपर्कात येणारी कड आपला केसाळ किंवा दातेरी दिसणारा पृष्ठभाग गमावून अधिक गुळगुळीत होते. त्यामुळे वसाद्रव्यांच्या पोषणासाठी उपलब्ध पृष्ठभाग जवळजवळ निम्म्याने कमी होतो. आरंभीच्या या अवस्थेत वसाद्रव्यांचे पचन ( विघटन ) अबाधित राहून फक्त शोषणच कमी होते. त्यामुळे मलामध्ये वसाम्लांचे क्षार ( लवणे ) मोठया प्रमाणात आढळतात. ग्लुटेनयुक्त आहार पूर्णपणे बंद केल्यास या अवस्थेत त्वरित आश्चर्यकारक सुधारणा दिसू लागते. अन्यथा आंत्र-कोशिकांवरील परिणाम अधिक तीव होऊन कोशिका नष्ट होऊ लागतात. काही दिवसांनी रसांकुरांची टोके पूर्णपणे नाहीशी होऊन हळूहळू ती बोथट होतात व अकार्यक्षम अथवा नष्ट होतात. त्यामुळे वसाद्रव्यांचे शोषण पूर्णपणे थांबते व पचनातही दोष निर्माण होतात. हीच प्रक्रिया पुढे चालू राहिल्यास इतर अन्नघटकही ( उदा., पिष्टमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम ) आतडयातून शोषले जाण्याचे प्रमाण कमी होते.

या सर्व दोषांमुळे अर्भकावस्थेतून शिशु-अवस्थेत प्रवेश करीत असताना आहारातील बदलाबरोबरच बालकाचा बाळसेदारपणा कमी होतो, नितंबा-वरील मेद घटून खळगे पडू लागतात. अतिसार, पोट सतत फुगीर दिसणे,  वाढ खुंटणे, लोह आणि जीवनसत्वे यांच्या अभावामुळे ⇨ पांडुरोग   यांसारखी लक्षणे उद्‍भवतात. वरचेवर तोंड येणे, जीभ सुजणे, तोंडाभोवती भेगा पडणे यांसारखी ब जीवनसत्त्वाच्या अभावाची लक्षणे कधीकधी प्रामुख्याने आढळतात. काही बालकांत ( आणि प्रौढांत ) के जीवन- सत्त्वाच्या अभावामुळे रक्तक्लथनातील दोष निर्माण होऊन थोडेसे खरचटल्यास रक्तस्राव लवकर थांबत नाही [→जीवनसत्त्व के] कॅल्शियमाच्या अभावामुळे हाडात वेदना, अस्थिमार्दव, हाडांची सच्छिद्रता यांच्यामुळे हालचालींवर मर्यादा पडतात.

झायलोज या शर्करेच्या शोषणाचे मापन करून संग्रहणीचे निदान करता येते. क्ष-किरण चित्रण, ऊतकपरीक्षा, मलपरीक्षा यांचाही उपयोग होतो. मल आकारमानाने मोठा, फिकट रंगाचा आणि फेसयुक्त असतो.  त्याला दुर्गंधी येते. ग्लुटेन आहार पूर्ण थांबवून काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा सुरू केल्यास काही रूग्णांमध्ये रोगाचा पुन्हा उद्‍भव  होत नाही. क्वचित प्रसंगी दीर्घकाळ उपचाराशिवाय राहिलेल्या संग्रहणीचे रूपांतर लसीकार्बुदात [→ लसीका तंत्र] होऊ शकते. इतरांमध्ये पोषण-द्रव्ये, अधिवृक्काची कॉर्टिसोनासारखी द्रव्ये आणि आहाराचे काटेकोर नियोजन यांमुळे विकारावर नियंत्रण ठेवता येते.

उष्णप्रदेशीय संग्रहणी : मुख्यत: प्रौढांमध्ये आढळणाऱ्या या विकाराचा प्रादुर्भाव काही विकारप्रवण प्रदेशांमध्ये अधिक दिसून येतो. जगाच्या अशा विशिष्ट भागांमध्ये प्रवास करून आल्याचा पूर्वेतिहास अनेक रूग्ण सांगतात. विकृतिप्रक्रिया उदरगुहीय संग्रहणीशी मिळतीजुळती असली, तरी प्रारंभ करून देणारे कारण नक्की सांगता येत नाही. अज्ञात सूक्ष्मजीव, विषाणू , परोपजीवी संकामण किंवा खवट अन्नपदार्थात निर्माण होणारे विषारी पदार्थ यांसारख्या काही घटकांमुळे आंत्रकोशिकांमधील बदल घडण्यास प्रारंभ होत असावा. काही तज्ञांच्या मते जीवनसत्त्वांचा अभाव [उदा., शोषण न झाल्याने फॉलिक अम्लाची कमतरता → फॉलिक अम्ल] हेच कारण असू शकते. 

या रोगाची प्रगती, लक्षणे, कुपोषणजन्य परिणाम आणि निदान करण्याच्या पद्धती वर दिल्याप्रमाणेच असतात. उपचारासाठी पोषक द्रव्ये आणि प्रतिजैविके ( अँटिबायॉटिक पदार्थ ) यांचा उपयोग केला जातो. टेट्रासायक्लीन वर्गातील बहुप्रभावी प्रतिजैविके संकामणाचा नाश करण्याच्या उद्देशाने वापरली जातात. ती दीर्घकाळ (३ ते ६ महिने ) दयावी लागतात. कॉर्टिकोस्टेरॉइड औषधांचाही अवलंब कधीकधी करावा लागतो.

पहा : जठरांत्र मार्ग.

संदर्भ : 1. Berkow, R., (Ed.) Merck Manual of Medical Information, New Jersey, 1997.

             2. Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1996.

             3. Spiro, H. M. Clinical Gastro- enterology, New Jersey, 1993.

श्रोत्री, दि. शं.