धावरे : (इरिसिपेलास). त्वचेच्या तीव्र स्वरूपाच्या, त्वक्रक्तिमा त्वचेला लाली येणाऱ्या) व सूजयुक्त अशा, विशिष्ट स्ट्रेप्टोकॉकायमुळे होणाऱ्या संक्रामणजन्य रोगास धावरे म्हणतात. स्ट्रेप्टोकॉकाय अनेक प्रकारचे असून त्यांपैकी स्ट्रेप्टोकॉकस पायोजिनीस, स्ट्रेफीकॅलिस, स्ट्रे. व्हिरिडान्स रोगोत्पादक असतात. धावरे हा रोग स्ट्रे. पायोजिनीस या सूक्ष्मजंतूमुळे होतो. स्ट्रेप्टोकॉकस वंशातील सूक्ष्मजंतूचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच उगमस्थानातील व त्याच प्रकारचे सूक्ष्मजंतू निरनिराळ्या व्यक्तींत निरनिराळे रोग उत्पन्न करतात. उदा., तेच सूक्ष्मजंतू एकात गिलायुशोथ (टॉन्सिल्सची दाहयुक्त सूज), दुसऱ्यात लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर), तर तिसऱ्यात धावरे उत्पन्न करू शकतात.

समशीतोष्ण प्रदेशातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्ये हा रोग अधिक आढळतो. तो स्पर्शजन्य असल्यामुळे निर्जंतुकीकरणाविषयी ज्या काळात अज्ञान होते त्या काळात हा रोग रूग्णालयांतून एका रोग्याकडून दुसऱ्यात फैलावत असे. या फैलावास शस्त्रवैद्य, त्यांची उपकरणे, परिचारिका व इतर मदतनीस कारणीभूत असत. त्वचेवर सुरुवात झाल्यानंतर तो जलद पसरतो यावरून त्यास धावरे असे नाव पडले असावे. गौरवर्णियांमध्ये या रोगात त्वचा तांबडी भडक व ज्वालेच्या रंगाप्रमाणे दिसते म्हणून त्यास ‘सेंट ॲन्थनीच्या ज्वाला’ असेही म्हणत.

संप्राप्ती : धावऱ्याचे सूक्ष्मजंतू त्वचेचा भंग झालेल्या जागी शरीरात प्रवेश मिळवितात. पुष्कळ वेळा अगदी काळजीपूर्वक तपासणी करूनही त्वचाभंग कोठेही आढळत नाही. नाकपुड्यांच्या अवतीभोवती कळत नकळत होणारे छोटे व्रण किंवा ओरखडे, दाढी करताना होणाऱ्या सूक्ष्म जखमा यांमुळे हा रोग प्रामुख्याने चेहऱ्यावर आढळतो. पाय व हातावरही तो उद्‌भवतो.

सूक्ष्मजंतू त्वचेत शिरल्यानंतर लसीकावाहिन्या (रक्तद्रवाशी साम्य असणारा रंगहीन द्रव वाहून नेणाऱ्या नलिका) असलेल्या अवकाशस्थानी वाढू लागून जोरदार शोथ उत्पन्न करतात. संपूर्ण बाह्यत्वचा या शोथाने व्यापली जाते आणि तो बहुधा अंतस्त्वचेपर्यंत गेलेला नसतो. पायावर नीट व व्यवस्थित न बसणाऱ्या बुटामुळे होणाऱ्या जखमा (बूट चावणे), बोटांमधील भेगा, गुरुत्वीय व्रण [उदा., अपस्फीत नीलाजन्य व्रण → अपस्फीत नीला] यांमुळे चेहऱ्याच्या खालोखाल पायावर हा रोग होण्याची शक्यता असते. मधुमेह असलेल्या, मद्यपानाचा अतिरेक करणाऱ्या किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अशक्त बनलेल्या व्यक्तीस हा रोग चटकन होण्याची शक्यता असते. कोणत्याही वयात हा रोग होऊ शकतो परंतु बालवयात व वृद्धावस्थेत त्याचे प्रमाण अधिक असते. तसेच पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये ते अधिक असते. कधीकधी अशक्त व्यक्तीवरील शस्त्रक्रियेच्या जखमेच्या जागी हा रोग उद्‌भवतो. कीटकदंश व प्रसूतीनंतरची अवस्था या रोगास कारणीभूत होऊ शकतात. पशूंच्या, विशेषेकरून डुकरांच्या सान्निध्यात असणाऱ्यांना, तसेच मासळीशी संपर्क येणाऱ्यांना सूक्ष्म त्वचाभंगातून हा रोग होण्याचा संभव असतो परंतु तो स्ट्रेप्टोकॉकायजन्य नसून इतर सूक्ष्मजंतूंमुळे होतो.

रोगजंतू शरीरात लसीकावाहिन्यांतून फैलावतात. जंतू शिरल्याजागी छोट्या छोट्या पुटिका दिसू लागतात. या स्थानीय संक्रामणापासून स्ट्रेप्टोकॉकायजन्य विष तयार होते  व ते लसीकांद्वारे रक्तात पसरून विषरक्तता निर्माण होते. कधीकधी प्रत्यक्ष सूक्ष्मजंतूच रक्तातून पसरतात, याला ‘जंतुरक्तता’ म्हणतात. यामुळे शरीरात इतरत्र संधिशोथ, विद्रधी (गळवे) इ. उपद्रव उद्‌भवण्याची शक्यता असते. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याविरुद्ध प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) उत्पन्न होत नाही. म्हणजेच तो त्याच व्यक्तीला वारंवार होण्याची शक्यता असते.

आ. २. चेहऱ्यावरील धावरे

लक्षणे : रोगाचा परिपाक काल (जंतू शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतचा काळ) सर्वसाधारणपणे २ ते ५ दिवसांचा असून रोग सौम्य प्रकारचा असल्यास त्या ठिकाणची त्वचा लाल, जाड व कठीण बनते. सुरुवातीस लाली ‘सीमाबद्ध’ असते. नंतर ती हळूहळू आजूबाजूच्या चांगल्या त्वचेत पसरू लागते. लाल भागाची कडा आजूबाजूच्या चांगल्या त्वचेपेक्षा वर उचललेली असते. स्थानिक वेदना होतात आणि मूळ भाग गरम झाल्यासारखे वाटू लागते. लाल भागात पुटिका दिसू लागतात. या पुटिकांतील द्रव स्वच्छ किंवा गढूळ असतो. हळूहळू सूज येते व सुजेचे प्रमाण शरीरस्थानावर अवलंबून असते. उदा., पापण्यांच्या जवळपास रोग असल्यास व तो त्यांत पसरल्यास बरीच सूज येऊन डोळा उघडणे अवघड होते. चेहऱ्याचे धावरे बहुधा पुष्कळ सूज उत्पन्न करते. नाकाच्या दोन्ही बाजूंस पसरून फुलपाखराच्या आकारासारखे दिसते. कधीकधी संबंध चेहराचविद्रुप दिसू लागतो. इतर ठिकाणच्या धावऱ्यात लसीकावाहिन्यांचा शोथ लाल रेषांच्या स्वरूपात स्पष्ट दिसतो. जवळील लसीका ग्रंथींची वाढ होते.

वरील स्थानिक लक्षणांशिवाय विषरक्ततेमुळे होणारी व एकाएकी उद्‌भवणारी शारीरिक तापमान वाढणे, थंडी वाजून येणे, लहान मुलात झटके येणे इ. सार्वदेहिक लक्षणेही आढळतात. अंगदुखी, डोकेदुखी व अस्वस्थता जाणवते. तीव्र स्वरूपामध्ये डोकेदुखी असह्य असून रोगी मुग्ध भ्रांती झाल्याप्रमाणे असंबद्ध बडबड करू लागतो. सौम्य स्वरूपात बहुधा स्थानिक लक्षणेच आढळतात कारण त्यात विषरक्तता नसते.

कधीकधी हा रोग अधस्त्वचीय ऊतकात (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहात) फैलावतो व त्या ठिकाणी पू तयार होतो. या प्रकारच्या धावऱ्याला अधस्त्वचीय क्षोभजनक धावरे म्हणतात. दुसऱ्या एका प्रकारात एका ठिकाणचे धावरे बरे होते न होते तोच ते नव्या जागी उद्‌भवते. या प्रकाराला स्थलांतरशील धावरे म्हणतात. वारंवार होणाऱ्या प्रकाराला प्रत्यावर्ती धावरे म्हणतात. चेहरा, डोके किंवा पाय यांवर हा प्रकार बहुधा आढळतो.

उपद्रवांमध्ये स्थानिक स्वरूपाचा ऊतकमृत्यू जंतुरक्तता, पूयरक्तता, स्वरयंत्र शोफ (पूयुक्त सूज), फुप्फुसशोथ (फुप्फुसांची दाहयुक्त सूज),  हृदंतस्तरशोथ (हृदयाच्या कप्प्यांच्या आतील अस्तराची दाहयुक्त सूज) व क्वचित वेळी चेहऱ्यावरील रोगाचे जंतू मस्तिष्कावरणशोथ (मेंदूच्या आवरणाची दाहयुक्त सूज) उत्पन्न करतात.

निदान : चेहऱ्याचा संयोजी ऊतकशोथ (जोडणाऱ्या ऊतकाचा शोथ) व धावरे यांमधील भेददर्शी निदान करणे महत्त्वाचे असते. धावरे कानावर पसरते परंतु संयोजी ऊतकशोध कानावर कधीही पसरत नाही. कारण कानावर अधस्त्वचाच नसते आणि त्वचा व उपास्थी (एक प्रकारचे लवचिक संयोजी ऊतक) एकमेकांस घट्ट जोडलेली असतात. या विशिष्ट फरकाला ‘मिल्या यांची खूण’ (जी. मिल्या या फ्रेंच त्वचारोगविज्ञांच्या नावावरून) म्हणतात.

फलानुमान : सल्फॉनामाइडांच्या शोधानंतर या रोगाचे फलानुमान एकदम सुधारले आहे. तरीही बालवयात व वार्धक्यात हा रोग अजूनही गंभीरच मानला जातो. नवजात अर्भकातील धावरे अतिशय गंभीर असते. मधुमेह, मूत्रपिंड विकृती आणि मद्यपी व्यक्तींमध्ये या रोगाविरुद्ध झगडण्याची शक्ती कमी असते. जंतुरक्तता, हृदंतस्तरशोथ, मस्तिष्कावरणशोथ यांसारखे उपद्रव नेहमी गंभीर स्वरूपाचे असतात. वयस्कर व्यक्तीच्या पायावरील धावऱ्याची सूज ते बरे झाल्यानंतरही काही महिने टिकून राहू शकते.

चिकित्सा : प्रतिबंधात्मक इलाजामध्ये सर्वसाधारणपणे इतर संक्रमणजन्य रोगांप्रमाणे काळजी घ्यावी लागते. रोग्यास संसर्गी रोग्यांच्या रूग्णालयात न हलविल्यास व नेहमीच्या सर्वसाधारण रुग्णालयात ठेवल्यास ‘रोधक रुग्णपरिचर्या’ तत्त्व अंमलात आणणे जरूर असते. यामध्ये रोग्याचे कपडे, भांडे इ. नित्य उपयोगाच्या वस्तू अलग ठेवणे, एकाच रुग्णपरिचारिकेने रोग्याकडे लक्ष पुरविणे व तिने इतर रोग्यांशी संपर्क टाळणे यांचा समावेश असतो. वैद्य व रुग्णपरिचारिकांनी निर्जंतुकतेकडे विशेष लक्ष पुरविणे जरूर असते. सल्फॉनामाइड औषधे व पेनिसिलीन या रोगावर अत्यंत गुणकारी ठरली आहेत. स्थानिक किंवा वरून लावण्याच्या औषधांची जरूरी नसते. फोड फोडून त्यातील द्रव हलक्या हाताने निर्जंतुक फडक्याने (पट्टी बांधण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट वीण असलेल्या कापडाने) टिपून घ्यावा. विद्रधी झाल्यास रोगाची तीव्रता कमी होईपर्यंत तो कापून पू काढून टाकण्याचे टाळावे. तसे न केल्यास जंतुरक्तता होण्याचा संभव असतो. रोग्यास खाजवू देऊ नये. त्याकरिता जरूर पडल्यास रोग्याचे दोन्ही हात बांधून टाकावेत.

रानडे, म. आ. भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय चिकित्सा : आयुर्वेदात ह्याला अग्निवीसर्प असे म्हणतात. हा त्वचेवर झाल्यानंतर सारखा पसरत असतो व पसरणारी कडा लाल पुरळयुक्त असते तसेच ताप व अतिशय आग होत असते. प्रथम लंघन द्यावे आणि रक्त काढावे. त्यानंतर ओकारीचे औषध देऊन ओकारी आणि रेचक औषध देऊन रेच करवावे. ह्या रोगात तूप वैगरे स्नेहाचा उपयोग मुळीच करू नये. गेळफळाबरोबर ज्येष्ठमध व इंद्रजव घालून ओकारी करवावी. त्रायंत्री द्राक्षा किंवा त्रिफला ह्यांच्या रसाबरोबर तेडाचे चूर्ण द्यावे. ज्यांना वांती किंवा रेच करवता येत नाही अशा रोग्यांना दोष जर कमी असेल, तर चंदन, निलकमळ किंवा कडुनिंब, कडुपडवळ, दह्याची निवळ किंवा पडवळाचा गण ह्यांचा काढा द्यावा. वमन, विरेचन व रक्तस्राव केल्यानंतर दोषशुद्धी झाली असता त्वचा, मांस आणि संधी ह्या ठिकाणी धावरे असताना लेप द्यावे. वड इत्यादिकांचा गण किंवा पद्मोत्पलादी गण ह्यांचा लेप द्यावा. केळीच्या कांद्यांचा किंवा वडाच्या पारंब्यांचा केळीच्या कांद्यातून लेप द्यावा. कमलिनीच्या तळ्यातील चिखल किंवा मोती पाण्यामध्ये वाटून लावावे किंवा शंख, प्रवाळ, मोत्याची शिंप, गेरू हे तुपामध्ये घासून त्यांचा लेप करावा.

पटवर्धन, शुभदा अ.

पशूंतील धावरे : पाळीव पशूंमध्येही हा संसर्गजन्य रोग आढळून येतो. डुकरांना होणारा धावरे हा महत्त्वाचा रोग आहे. वासरांना व कोकरांना हा रोग होतो.

वासरांना हा रोग एरिसिपेलोथ्रिक्स इन्सिडिओसा या सूक्ष्मजंतूंमुळे होतो. सांध्यांना सूज येते व त्यांतील उपास्थीला व्रण पडतात. सांध्यांची सूज, लंगडत चालणे व सांधे जास्त सुजल्यावर जमिनीवर आडवे पडणे आणि खंगत जाणे अशी लक्षणे वासरांत दिसतात. वयस्क जनावरात हा रोग आढळलेला नाही.

कोकरांना होणारे धावरे वर उल्लेखिलेल्या सूक्ष्मजंतूमुळेच होते. रोगजंतू बहुधा जन्माच्या वेळी नाळेला होणाऱ्या वा शेपटी कापण्याच्या क्रियेत होणाऱ्या जखमांतून शरीरात प्रवेश करतात. कळपातील अर्धीअधिक कोकरे आजारी झाली, तरी मृत्यूचे प्रमाण अल्प (५%) असते. रोगपरिपाक काल १४ दिवसांचा असतो. एकाएकी कोपराच्या किंवा ढोपराच्या सांध्याला सूज आलेली दिसते व कोकरू लंगडत चालते. सांध्याची सूज लवकर कमी होत नाही. आजाराच्या सुरुवातीस पेनिसिलीन टोचल्यास कोकरू बरे होते.

मेढ्यांच्या अंगावरील बाह्यकीटकांचा (उवा, लिखा वा गोचिड्या) नाश करण्यासाठी त्यांना किटकनाशक विद्राव असलेल्या हौदातून चालवितात. पुष्कळदा अशा हौदातून मेंढरांना भिजवून काढल्यावर लॅमिनायटिस (खूर व पायाच्या कातड्याच्या संधीपाशी सूज येणे) हा रोग होतो. त्याचे कारण . इन्सिडिओसा हा सूक्ष्मजंतूच असल्याचे आढळून आले आहे. हौदातील विद्रावात कीटकनाशकाबरोबर जंतुनाशक घातल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो. पेनिसिलीन हे औषध टोचल्यास मेंढरे लवकर बरी होतात.

डुकरांना होणाऱ्या धावरे या रोगाची माहिती ‘डुक्कर’या नोंदीमध्ये पहावी.

दीक्षित, श्री. गं.