रातांधळेपणा : अंधुक अथवा मंद प्रकाशात कमी दिसणे किंवा काहीही न दिसणे या विकृतीला ‘रातांधळेपणा’ म्हणतात. दिवसा उत्तम दिसणे, परंतु रात्रीच्या वेळी कमी दिसणे यावरून रातांधळेपणा (रात्र-रात) ही संज्ञा बनली आहे. डोळ्याच्या जालपटलातील शंकु-शलाकांमधील रंगद्रव्यावर प्रकाशकिरण पडल्यामुळे त्याचे विघटन (घटकद्रव्ये अलग होण्याची क्रिया) होते. या रासायनिक बदलांना शंकु-शलाका हे प्रकाशग्राही असलेले तंत्रिका तंतूंचे (मज्जातंतूंचे) संवेदनाग्राहकच आहेत [ ⟶ डोळा]. या रंगद्रव्याला ‘दृग्नीलारुण’ (ऱ्होडॉप्सीन) म्हणतात व त्यावरील विक्रियेकरिता अ जीवनसत्त्व आवश्यक असते आणि त्याची न्यूनता हे रातांधळेपणाचे प्रमुख कारण असते.
रातांधळेपणा हे काही रोगांचे लक्षण असते. जालपटल रंगद्रव्य अपकर्ष या विकृतीत शंकु-शलाकांचा अपकर्ष होत असल्यामुळे रातांधळेपणा हे प्रमुख लक्षण असते. जालपटल श्रांती (शिणवटा) या विकृतीत दृग्नीलारुणाच्या पुनर्निर्मितीत दोष असल्यामुळे प्रकाशसंवेदना ग्रहण कमी होते. कधी कधी ही विकृती जन्मजात असते. नेत्रगोलाच्या पोषण दोषामुळे (उदा., पांडुरोगात) रातांधळेपणा असू शकतो. जन्मजात प्रकारात ‘ओगुची रोग’ या सी. ओगुची या जपानी नेत्रविशारदांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या विकृतीत रुग्णास दोन-तीन तास संपूर्ण अंधारात ठेवल्यानंतर नेत्रपरीक्षकाने तपासल्यास नेत्रबुघ्न (नेत्रपटलातील नेत्राचा तळभाग) पिवळ्या किंवा करड्या रंगाचा दिसतो. कालांतराने त्याचा प्राकृतिक नारिंगी-लालसर रंग पुन्हा दिसू लागतो. जन्मजात लघुदृष्टिदोष (लांबच्या वस्तूपासून येणारे समांतर किरण जालपटलावर न पडता त्याच्या पुढे केंद्रित होणे) या विकृतीत तिरळेपणा, नेत्रदोल (वस्तूकडे बघताना नेहमीप्रमाणे दोन्ही डोळे स्थिर न राहता त्यांची सूक्ष्म हालचाल किंवा आंदोलने होणे) यांबरोबरच रातांधळेपणा असतो.
अ जीवनसत्वाची न्यूनता रातांधळेपणाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी जालपटल रंगहीन व रंगयुक्त अशा दोन्ही प्रकारच्या उद्दीपनांनी संवेदित होते. यात शंकु-शलाकांचा प्रमुख भाग असतो. प्रत्येक जालपटलात १२.५ कोटी शलाका व ७० लक्ष शंकू आहेत आणि त्यांतील संवेदना दृकतंत्रिकेमार्फत मस्तिष्क बाह्यकापर्यंत (मेंदूच्या सर्वांत बाहेरील भागात) पोहोचतात.
अंधुक प्रकाशात दिसण्याकरिता शलाकांमधील दृग्नीलारुण आवश्यक असते. हे रंगद्रव्य प्रथिन व रिटीनीन नावाच्या रंगद्रव्याचे मिळून बनलेले असते आणि ते अंधुक प्रकाशात स्थिर असते. प्रखर प्रकाशात त्याचे अपघटन होऊन प्रथिन व रिटीनीन अलग होतात व या संयुगाला दृक्पीतरुण म्हणतात. या अवस्थेत तमोनुकूलन (अंधुक प्रकाशात दृग्नीलारुणाची पुनर्निर्मिती होणे व बाहुलीचे विस्फारण होणे) नाहीसे होते. प्रकाशाची तीव्रता वाढत गेल्यास दृग्नीलारूणाचीपुनर्निर्मिती होते व तमोनुकूलन प्रस्थापित होते. प्रखर प्रकाश चालूच
राहिल्यास अपघटनाने प्रथिन व अ जीवनसत्त्व तयार होतात व या संयुगाला दृक्श्वेतरुण म्हणतात. ते प्रकाशाला असंवेदनक्षम असते. अ जीवनसत्त्व रक्ताद्वारे अभिशोषित होते. प्रकाशाची तीव्रता कमी होताच दृग्नीलारुण बनते व याकरिता आवश्यक अशा अ जीनवसत्त्वाचा पुरवठा रक्तप्रवाहातूनच होतो. म्हणून या जीवनसत्त्वाची न्यूनता तमोनुकूलन मंद गतीने होण्यास कारणीभूत होते. दृग्नीलारुणातील प्रकाश आणि अंधार यांमुळे होणारे रासायनिक बदल आ. २ मध्ये दाखविले आहेत. यालाच ‘दृग्नीलारुण चक्र’ म्हणतात.
वरील आंगिक कारणांशिवाय अनांगिक अथवा क्रियात्मक रातांधळेपणा असू शकतो. इंग्लंडसारख्या प्रगत देशातून मानसशास्त्रीय रातांधळेपणाचे प्रमाण अधिक आढळते. याला उन्मादजन्य रातांधळेपणा असेही म्हणतात. डोळ्यांच्या तपासणीत काहीही दोष न आढळणाऱ्या या विकृतीत रूग्ण आपली तक्रार बहुधा नाट्यमय रीतीने वर्णितो. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांत व जीवितास सतत धोका असलेल्या अंधुक प्रकाशात सतत काम करावे लागणाऱ्या आघाडीवरील सैनिकांत ही विकृती आढळते. विमानचालकांतही रातांधळेपणा असू शकतो. रातांधळेपणा असलेल्या मोटारचालकाला पुढील दिव्यांच्या प्रखर उजेडात फक्त २-३ मी. पर्यंतचाच रस्ता दिसतो. याउलट दृष्टिदोष नसलेल्या चालकाला कित्येक मीटरपर्यंतचा रस्ता स्वच्छ दिसतो.
रातांधळेपणाच्या नेमक्या उलट दृष्टिदोषाला म्हणजे अंधुक प्रकाशात प्रखर प्रकाशापेक्षा चांगले दिसण्याला ‘दिवांधत्व’ म्हणतात. तंबाखूसेवनजन्य जालपटल विकृतीत ही विकृती आढळते. स्वच्छमंडलाच्या (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागाच्या) मध्यभागी अपारदर्शकता येणाऱ्या विकृतीत आणि डोळ्यातील भिंगाच्या मध्यभागी अपारदर्शकता आल्यास कमी प्रकाशात चांगले दिसते, कारण विस्फारित बाहुलीमुळे अधिक प्रकाशकिरण आत शिरू शकतात.
अ जीवनसत्त्वन्यूनताजन्य रातांधळेपणा त्या जीवनसत्त्वाच्या योग्य मात्रांनी बरा होतो. शंकु-शलाका अपकर्ष असल्यास बहुधा रुग्ण बरा होत नाही.
संदर्भ :
- Heaton, J. M., The Eye, Philadelphia, 1968.
- Lyle, T. K.; Cross, A. G., Eds., May and Worth’s Manual of Diseases of the Eye, London, 1959.लेखक
लेखक : नाडकर्णी, सुरेश; भालेराव, य. त्र्यं.