क्ष-किरण वैद्यक : क्ष-किरण हे ऊर्जेचे एक सर्वाधिक उपयुक्त असे रूप आहे. प्रत्यक्षात क्ष-किरण ही भेदनक्षम, अदृश्य व विद्युत् चुंबकीय तरंगांच्या रूपातील ऊर्जा आहे. क्ष-किरण प्रकाशासारखे असले, तरी त्यांची व्यक्तिगत प्रकाशकण (फोटॉन) ऊर्जा उच्चतर आहे. प्रकाशाच्या दृष्टीने अपारदर्शक असलेल्या द्रव्यांत ते घुसू शकतात. त्यांची तरंगलांबी सूक्ष्म म्हणजे अणूच्या मापाची असते. या त्यांच्या निश्चित गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे वैद्यक, उद्योग, ज्योतिषशास्त्र इ. विज्ञान क्षेत्रांत व्यापक उपयोग होतात. विशेष प्रकारचे क्ष-किरण स्रोत, अभिज्ञातक (ओळख पटविणारी साधने) आणि विश्लेषणाची तंत्रे विकसित झाली असून त्यांच्यामुळे सर्वांत साध्या रेणूंमधील आंतरक्रियांपासून ते मानवी मेंदूच्या संरचना एवढ्या विस्तृत पल्ल्यातील प्रश्नांची उत्तरे शोधणे शक्य झाले आहे. ते ज्या द्रव्यात प्रविष्ट होतात त्यांच्यामध्ये जीवविज्ञानीय, रासायनिक व भौतिकीय बदल घडवून आणतात. सदर नोंदीत क्ष-किरणांचा वैद्यकाच्या संदर्भातील बाबींचा आढावा घेतला असून त्यांच्या अन्य प्रकारच्या सविस्तर माहितीसाठी मराठी विश्वकोशातील ‘क्ष-किरण’ आणि ‘क्ष-किरण ज्योतिषशास्त्र’ या नोंदी पहाव्यात. क्ष-किरणांच्या उद्भासन मर्यादा, रोगनिदानासाठी त्यांचा होणारा उपयोग, त्यांचे वैद्यकीय उपयोग आणि त्यांचे धोके सदर नोंदीत दिले आहेत. तसेच पशुवैद्यकातील क्ष-किरण चिकित्सेची माहिती थोडक्यात शेवटी दिली आहे.

क्ष-किरणांचे मानवी शरीरावर हानीकारक परिणाम होतात, हे क्ष-किरणांच्या शोधानंतर थोड्याच काळातव्हिल्हेल्म कोनराट राँटगेन यांच्या लक्षात आले होते. त्या काळात जगात अनेक प्रयोगशाळांमध्ये क्ष-किरणांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या निर्वात नलिका आणि उच्च विद्युत् दाबाचे स्रोत आधीच उपलब्ध झाले होते. मात्र, क्ष-किरणांची जाणीव वा संवेदना होत नाही व ते शरीरावर पडल्यावर लगेचच शरीरक्रियावैज्ञानिक प्रतिक्रियांची जाणीव होत नाही.

उद्भासनाच्या मर्यादा : क्ष-किरणांच्या तीव्र, चिरकारी व जननिक परिणामांची अधिक माहिती झाल्यामुळे क्ष-किरणविषयक कामकरणाऱ्या व्यक्ती, रुग्ण व इतरांवर पडणाऱ्या क्ष-किरणांच्या प्रमाणाविषयीच्या (उद्भासनाविषयीच्या) मर्यादा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांनी सुचविल्या. क्ष-किरणांच्या परिणामांची वाढती माहिती मिळत गेली. व्यावसायिक कर्मचाऱ्यांना चालण्यासारख्या (अनुज्ञेय) कमाल मात्रेविषयीचे मत बदलत गेले. अशा क्ष-किरणाच्या मात्रेसाठी किंवा राशीसाठी (राँटगेन) हे एकक वापरतात.

अमेरिकेत याविषयीच्या शिफारशी नॅशनल कौन्सिल ऑन रेडिएशन प्रोटेक्शनमार्फत प्रसिद्ध होतात व त्या सरकारी छपाई कार्यालयाकडे उपलब्ध असतात. अनेक राज्ये व शहरे यांनी या शिफारशी आरोग्य व कामगार संहितांमध्ये लिहिल्या आहेत व त्या पाळणे बंधनकारक आहे.

चुकार (किरकोळ) क्ष-किरण : क्ष-किरण घटकाकडून उत्सर्जित झालेले वा उपयुक्त कामांसाठी वापरले न जाणारे सर्व क्ष-किरण म्हणजे चुकार क्ष-किरण होत. शिशाच्या संरक्षक आवरणाने सर्व क्ष-किरण नेहमीच थांबविले जात नाहीत, म्हणजे चुकार क्ष-किरण ही अशी गळती असू शकते. हे रुग्णाकडून किंवा परीक्षण होत असलेल्या औद्योगिक द्रव्याच्या तुकड्याकडून प्रकीर्णित झालेले (विखुरलेले) क्ष-किरण चुकार असू शकतात. शिवाय क्ष-किरण निर्मितीसाठी नसलेल्या अनेक इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती असे क्ष-किरण उपपदार्थ म्हणून उत्सर्जित करतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, उच्च विद्युत् दाबाच्या एकदिशकारक नलिका आणि काही रडार सामग्रींत वापरण्यात येणाऱ्या नलिकांसारख्या उच्च विद्युत् दाब आंदोलक नलिका ही अशा प्रयुक्त्यांची उदाहरणे आहेत. विशिष्ट परिस्थितीत विद्युत् दाब नियामक नलिका, एकदिशकारक नलिका, रंगीत दूरचित्रवाणी संचातील (विशेषतः १९७२ सालापूर्वी तयार केलेल्या) चित्रनलिका यांच्या दर्शक (पहावयाच्या) पडद्यालगत बसणाऱ्या व्यक्तींना उद्भासनाच्या अनिष्ट उच्च पातळ्यांना सामोरे जावे लागते. नंतर यावर अनेक ठिकाणी निर्बंध घातले आहेत.

क्ष-किरण रोगनिदान : अधिक शक्तिशाली क्ष-किरणनिर्मिती यंत्रांचा विकास झाला, तसेच अचूक उपकरणे पुढे आली. त्यामुळे रोगनिदानातील क्ष-किरणांची व्याप्ती वाढली. पूर्वी क्ष-किरण उद्भासनांचा कालावधी पाच मिनिटे ते एक तास असे नंतर तो एकपंचमांश ते दोन व तीन सेकंदएवढा कमी झाला. पूर्वीच्या यंत्रांद्वारे जास्तीत जास्त अस्थिमय संरचना व काही मृदू ऊतके यांचा तपशील देणारे क्ष-किरण चित्रण करता येई. सुधारित यंत्रांमुळे ऊतकांच्या भिन्न घनता समजू लागल्या. त्यामुळे मृदू ऊतकांच्या अनेक स्थितींविषयी निदान करणे शक्य झाले.

फ्ल्युओरोस्कोपी प्रतिमादर्शन : (अनुस्फुरणदर्शन). फ्ल्युओरोस्कोप ही प्रयुक्ती पुढील गोष्ट साध्य करण्यासाठी बनविलेली असते. भिन्न घनतांच्या ऊतकांमधून क्ष-किरण जाऊन त्यांच्यामुळे अनुस्फुरक पडद्यावर छाया (सावल्या) निर्माण होतात व त्यांचे थेट परीक्षण (तपासणी) करता येते. आधुनिक फ्ल्युओरोस्कोपमध्ये (अनुस्फुरकदर्शकामध्ये) विद्युत् व चुकार क्ष-किरण या दोन्हींपासून योग्य रीतीने संरक्षित केलेली नलिका आणि क्ष-किरणांचा स्रोत असतो. रुग्ण ही नलिका व अनुस्फुरक पडदा यांच्या दरम्यान असतो. या पडद्यामध्ये सपाट पुठ्ठ्यावर अनुस्फुरक द्रव्याचे स्फटिक एकसमान पसरलेले असतात. हे द्रव्य सामान्यपणे कॅल्शियम टंगस्टेट असते. भिन्न घनतांची ऊतके त्यांच्या घनतेनुसार व अणुक्रमांकानुसार क्ष-किरणांचा मार्ग अधिक वा कमी प्रमाणात (मात्रेत) रोखतात. त्यांनी निर्माण केलेल्या छाया अनुस्फुरक पडद्यावर पडतात आणि पडद्यासमोर उभा राहणारा निरीक्षक त्यांचे निरीक्षण करू शकतो.

रुग्णाच्या फ्ल्युओरोस्कोपिक निरीक्षणामुळे क्रियाशील सजीव प्राण्यांचे अध्ययन करता येते. हृदयाच्या अशा निरीक्षणामुळे हृदयाचे आकुंचन-प्रसरण म्हणजे स्पंदन थेट पाहता येते. रुग्णाला विविध दिशांमध्ये फिरवून त्याच्या हृदयाचे विविध कप्पे वेगवेगळे ओळखता येतात आणि त्यांचे इतर कप्प्यांच्या संबंधातील कार्य निश्चित करता येते. श्वसन चालू असताना फुप्फुसांचा अभ्यास करता येतो. तसेच श्वासोच्छ्वास करताना श्वसनविषयक स्नायूंची वर-खाली होणारी हालचाल पाहता येते. अशा प्रकारे शरीरातील कोणत्याही पोकळीतील (कुहरातील) किंवा मृदू ऊतकांमधील परकी (बाह्य) गोष्टी कोठे आहेत ते सहजपणे ठरविता येते आणि इतर संरचनांशी असलेले परस्परसंबंध निश्चित करता येतात. अस्थिभंगातील हाडे योग्य स्थितीत आहेत की नाहीत हे निश्चित करण्यासाठी फ्ल्युओरोस्कोप व्यापकपणे वापरतात. अस्थीच्या तुकड्यांची तपासणी केल्यावर शल्यतंत्रज्ञ फ्ल्युओरोस्कोपमधील अस्थिभंगाचा अल्पकाळ अभ्यास करतो व हाडे चांगल्या स्थितीत आहेत की नाहीत, ते ठरवितो.

शरीराच्या कोणत्याही भागाची फ्ल्युओरोस्कोपमधील प्रतिमा निरीक्षकाला चांगली स्पष्ट दिसत असली, तरी तिचा तपशील दिसतनाही आणि घनतेमधील सूक्ष्म बदल उघड होत नाहीत. शिवाय फ्ल्युओरोस्कोपमुळे कायमची नोंद उपलब्ध होत नाही. यामुळे त्याच्या उपयुक्ततेवर मर्यादा पडतात. म्हणून फ्ल्युओरोस्कोपिक निरीक्षणाबरोबर बहुधा क्ष-किरण चित्रण करतात.

फ्ल्युओरोस्कोपिक प्रतिमेचा तेजस्वीपणा अधिक तीव्र करण्यासाठी इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्या तयार केल्या आहेत. राँटगेन चलच्चित्रणासारख्या प्रतिमा तीव्र करणाऱ्या साधनांमुळे आणखी सुधारणा करणे शक्य झाले. जलद घटनाक्रम मंद गतीत पाहण्यासाठी जलदपणे उद्भासने करतात. शिकविण्यासाठी व तीव्रतेत आणखी वाढ करण्यासाठी प्रतिमा तीव्रताकारक बंदिस्त मंडलयुक्त दूरचित्र (सीसीटीव्ही) संचाला जोडतात. त्यावरून कॅमेऱ्याने परत छायाचित्र काढता येते. [→ वैद्यकीय प्रतिमादर्शन]


क्ष-किरण चित्रण : यात तपासावयाचा शरीराचा भाग क्ष-किरण स्रोत व छायाचित्रीय पटल (वा पट्टी) यांच्या दरम्यान असतो. ऊतकांच्या बदलत्या प्रभावशाली घनतांमुळे क्ष-किरणांचा मार्ग कमी-जास्त प्रमाणात अडविला जातो. त्यामुळे छायाचित्रीय पटलावर विविध तीव्रतांच्या छाया निर्माण होतात. क्ष-किरण चित्राला एक्स-रे हे लोकप्रिय नाव आहे. या लोकप्रिय पटलावर या छायांची नोंद झालेली असते. यात ऊतके अगदी तपशीलवारपणे दिसतात. शिवाय ही कायमची नोंदलेली गोष्ट असून तिचे दीर्घकाळ अध्ययन करून रुग्णाच्या लक्षणसमूहाच्या संदर्भात विचार केला जातो. अचूक यंत्रे व अतिशय संवेदनशील छायाचित्रीय पायसे आधीच उपलब्ध असल्याने प्राकृत ऊतक घनतांमधील कोणताही बदल सहजपणे ओळखता येतो. यामुळे प्रशिक्षित निरीक्षकाला विकृती ओळखता येऊ शकतात व अस्तित्वात असलेल्या परिस्थितीचे स्वरूप निश्चित करता येते. हाडांत कॅल्शियम उच्च प्रमाणात असते व त्याचा अणुक्रमांक सापेक्षतः जास्त आहे. त्यामुळे हाडे शरीरातील सर्वांत दाट संरचना आहेत व त्यांचे अतिशय तपशीलवारपणे अध्ययन करता येते. हाडाचा नाश झालेला कोणताही शरीराचा भाग व जेथे कॅल्शियमाचा अभाव आहे तो भाग पटलावर सहजपणे दर्शविता येण्यासारखा असतो. अशा प्रकारे हाडाच्या अनेक रोगांचे निदान करता येते. हाडातील संक्रामणाच्या प्रक्रिया ठरविता येतात आणि पुष्कळदा हाडातील गाठी सहजपणे ओळखता येण्यासारख्या असतात. हाडाच्या नाशाचे स्वरूप किंवा रोगग्रस्त सांध्याभोवतीची हाडाची वाढ यांसारखेसंधिवातामुळे झालेले बदल झटपट लक्षात येतात आणि रुग्णाच्या लक्षणसमूहाच्या संदर्भात त्यांचे मूल्यमापन करता येते.

मृदू ऊतकांतील रोगाच्या प्रक्रिया बऱ्याच दर्शविल्या जातात व त्यांनी निर्माण केलेल्या छायांच्या स्वरूपावरून व्यवच्छेदक किंवा भेददर्शी निदान करता येते. फुप्फुसांची क्षेत्रे (भाग) सहजपणे दिसू शकतात व त्यांच्यातील शोथकारक (दाहयुक्त सुजेला कारणीभूत) बदल वेगळे लक्षात येतात. क्षयासारखे फुप्फुसाशी निगडित विकार (पीडा) स्टेथॉस्कोप किंवा हस्त-स्पर्शाने उघड होण्याच्या पुष्कळच आधी ओळखू येतात. न्यूमोनियासारख्या फुप्फुसाच्या तीव्र शोथकारी प्रक्रिया सहजपणे लक्षात येतात. फुप्फुसांतील गाठी वेगळ्या ओळखू येतात. फुप्फुसे व छाती यांच्या भिंतीदरम्यानच्या परिफुप्फुसीय अवकाशांत द्रायू (द्रव किंवा वायू) तयार झाल्याने उद्भवलेल्या अभिस्यंदनयुक्त फुप्फुसावरण दाहाचे ताबडतोब निदान होते. हृदयविकार असलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे आकारमान व आकार ठरविता येतो आणि क्ष-किरण चित्रण ही कायमची नोंद असल्याने रुग्णात काही प्रगती झाली आहे की नाही ते भिन्न काळात काढलेल्या क्ष-किरण चित्रणांतून लक्षात येऊ शकते.

भेददर्शक माध्यमे : या माध्यमांची सामान्य शरीरघटकांत भर घालून किंवा यांपैकी काही घटकांच्या जागी अन्य घटक घालून शरीरातील विविध पोकळ्या भरतात व त्यामुळे शरीराचे भिन्न भाग क्ष-किरण चित्रणात दिसू शकतात. नंतर आकारमान व आकार यांतील झालेला कोणताही बदल सहजपणे लक्षात येतो. भेददर्शक माध्यमे संपूर्ण शरीराला किंवा कोणत्याही स्थानिक भागाला अपकारक नसावीत. त्यांच्यामुळे लक्षणांना किंवा रोगप्रक्रियेला चालना मिळायला नको. त्यामुळे रुग्णाची स्थिती अधिक खराब होऊ नये. शेवटी ही माध्यमे पचनमार्ग किंवा रक्तप्रवाह यांच्यामार्फत शरीरात सहजपणे घालता येण्यासारखी असावी लागतात.

क्ष-किरणांचा शोध लागल्यापासून त्यांची निदानातील व्याप्ती विविध भेददर्शक माध्यमांमुळे वाढत गेली. हवा हे पहिले व सर्वांत साधे भेददर्शक माध्यम आहे. हवा तिच्या भोवतीच्या अधिक दाट ऊतकांपेक्षा क्ष-किरणांना कमी अडथळा निर्माण करते. शरीरातील अनेक पोकळ्या हवेने सहजपणे फुगविता येतात यामुळे त्यांचे रूप व तपशील यांना उठाव प्राप्त होतो. परिफुप्फुस अवकाशांतील (पोकळ्यांतील), आतड्यांच्या मार्गातील, मूत्राशयातील तसेच मेंदू व मेरुरज्जू यांच्यातील किंवा त्यांच्याभोवती असलेल्या गाठीच्या राशी त्या भागातील सामान्य अवकाशांत हवा भरून पुष्कळदा तीव्र उठावदार करतात. 

वापरात असलेल्या बहुतेक भेददर्शक माध्यमांची घनता शरीरातील सामान्य ऊतकांपेक्षा अधिक असते. त्यामुळे ही माध्यमे शरीराच्या पोकळ्यांची बाह्य मर्यादा दर्शवितात. या माध्यमांना अपारदर्शक म्हणतात व त्यांतून क्ष-किरण जवळजवळ आरपार जात नाहीत. ती बहुधा काही धातूंची लवणे असतात. सर्वांत आधी वापरलेले अपारदर्शक माध्यम बिस्मथ हे होते, परंतु याच्या जास्त मात्रेमुळे प्रसंगी विषारी लक्षणे उद्भवतात; म्हणून त्याची जागा बेरियमाच्या संयुगांनी घेतली. जठरांत्रीय मार्गातून जाताना या संयुगांमध्ये बदल होत नाही व ती विषारी नाहीत. आतड्यांचा असा बेरियम अभ्यास ही नेहमीची पद्धत झाली आहे. इतर दुसऱ्या कोणत्याही उपायांनी ओळखता न येऊ शकणाऱ्या अनेक रोगप्रक्रिया बेरियम संयुगांमुळे प्रकाशात आल्या.

वृक्कांत (मूत्रपिंडांत) मूत्राशयामार्फत अपारदर्शक द्रव्य घालण्याचा प्रयत्न १९०५ इतक्या आधी केला होता व त्यामुळे वृक्कांच्या उत्सर्जक भागाची बाह्य रूपरेषा पाहता येऊ शकली असती. यासाठी विविध विद्रावांची चाचणी घेण्यात आली. शेवटी १९३० मध्ये आयोडिनाचा विद्राव आत घातला. जेव्हा तो शिरेद्वारे (नीलेतून) रक्तप्रवाहात घालण्यात आला, तेव्हा तो वृक्कांनी उत्सर्जित केला. त्याच्या वृक्कांतील मार्गात या विद्रावाने दाट छाया दर्शविली. या गडद छायेमुळे संकलक लहान नलिका, गर्भाशय आणि मूत्राशय यांची रूपरेषा दिसली. याद्वारे संरचनांचे रेखाचित्र काढणे आणि पारदर्शक अश्मरी (खडे) व विद्रुपता (व्यंगे) दाखविणे हे भेददर्शक माध्यमाचे कामच फक्त केले असे नाही, तर वृक्काच्या कार्याची चाचणी म्हणूनही त्याने काम केले. जखमा व शस्त्रक्रिया यानंतरच्या कोटरमार्गांची लांबी व व्याप यांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही हा बिनविषारी विद्राव फार उपयुक्त आहे.

नंतर अशा अनेक लवणांच्या विद्रावांची चाचणी घेण्यात आली उदा., टेट्राआयोडोफिनॉलप्थॅलीन हे सोडियम लवण तयार केले. यात आयोडिनाचे प्रमाण जास्त असल्याने पित्ताशयाची रूपरेषा दर्शविण्याच्या बाबतीत ते कार्यक्षम ठरले व त्याची विषारी प्रतिक्रिया अल्प होती वा नव्हती. नंतर तोंडाने औषध घेतल्यास त्याचाही तेवढाच चांगला उपयोग होतो हे लक्षात आले. हे औषध आता गोळीच्या रूपात घेता येते आणि पित्ताश्मरी व पित्ताशयाचा शोथ (दाहयुक्त सूज) यांच्या निदानासाठी ते नेहमी वापरतात. 


शेंगदाण्याच्या तेलात आयोडिनाचा विद्राव १९२२ मध्ये फ्रान्स येथे तयार करण्यात आला. नंतर खसखशीच्या तेलात ३५% आयोडिनाचा विद्राव अमेरिकेत तयार केला. ही तेले शरीराच्या अनेक भागांतील पोकळ्यांत अंतःक्षेपण करण्याच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट भेददर्शक माध्यमे आहेत. ती नाकातील अतिरिक्त (गौण) कोटरांत वापरतात. तेथे असलेल्या वृद्धी वा पुंजराशी ती दर्शवितात. श्वासनलिकांची बाह्य रूपरेषा दर्शविण्यासाठी जेव्हा श्वासनलिकांच्या शाखांत ती घातली, तेव्हा त्यांची पुढील गोष्ट उघड होण्यास मदत झाली. फुप्फुसात असू शकणारी पोकळी वा गाठ या रूपांतील दोषस्थळांची व्याप्ती व प्रकार उघड होतात. वंध्यत्वाच्या बाबतीत अंडवाहिन्या (फॅलोपियन नलिका) अवरुद्ध झाल्या आहेत की नाहीत, हे निश्चित करण्यासाठी विद्रावातील आयोडिनाचा उपयोग होतो. तेल गर्भाशयाद्वारे अंतःक्षेपित करतात आणि गर्भाशयाच्या पोकळीची व अंडवाहिन्यांची बाह्य रूपरेषा दाखविण्यासाठी पटल (फिल्म) घेतात. मेरुनाल व मेरुरज्जूमधील आणि त्याच्या सभोवतालच्या गाठींचे निदान करण्यासाठी आयोडीन तेलयुक्त विद्रावांचा लवकरच वापर होऊ लागला. नंतर मेरुनालातील उपयोगासाठी दुसरी आयोडीनयुक्त सामग्री (उपाय) विकसित करण्यात आली. अंतःक्षेपित विद्रावाची प्रवृत्ती एका स्तंभात एकत्र राहण्याची असते. त्यामुळे जेव्हा रुग्णाला कलंडवले (एका अंगावर वळवले) जाते, तेव्हा विद्राव कण्यांमध्ये इष्ट त्या भिन्न पातळ्यांत खाली-वर जाताना पाहणे शक्य होते.

नंतर मुख्यतः मूत्रमार्ग व परिवहन तंत्र यांच्यात वापरण्यासाठी अपारदर्शक आयोडीन माध्यमे तयार करण्यात आली.

फ्ल्युओरोस्कोपी व चलच्चित्रे : या दोन्हींचा संयुक्तपणे क्ष-किरण निदानात वापर करण्याचे सुचविण्यात आले होते. तथापि, हे तंत्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विकसित झाले. व्यक्ती फ्ल्युओरोस्कोपी पडद्याखाली असते आणि जलद गती भिंगे असलेला व जलद गती फिल्म भरलेला कॅमेरा या पडद्यापुढे ठेवतात. याद्वारे हृदयाची गती, जठरांत्रमार्गाची हालचाल आणि शरीरातील अवयवांची हालचाल चलच्चित्रांच्या रूपात नोंदली जाते. यामुळे अशा तपासणीसाठी मर्यादित, परंतु अतिशय निश्चित क्षेत्र उपलब्ध झाले. शिवाय अध्यापनासाठी अशी चलच्चित्रे मोलाची आहेत.

सीटी स्कॅनिंग : १९७०–८० या दशकात संपूर्ण शरीर किंवा अलग शरीरभाग यांची एका स्तरामागून दुसरा स्तर अशी क्ष-किरण चित्रे काढण्याच्या पद्धती पुढे आल्या. नंतर संगणक अगदी पातळ थर योग्य अशा क्रमाने एकत्रित करतो व ते दूरचित्रवाणीसारख्या प्रतिमांच्या रूपात पडद्यावर प्रेषित करतो. याला संगणकीकृत अक्षीय छेददर्शन [काँप्युटराइज्ड ॲक्सियल टोमोग्राफी किंवा अधिक सामान्यपणे CAT किंवा CT स्कॅनिंग (क्रमवीक्षण)] म्हणतात.

मेंदूमधील गाठी, गुठळ्या व इतर विकारांच्या निदानासाठी हे तंत्र व्यापकपणे वापरतात. पुष्कळदा हे तंत्र शरीरातील मृदू ऊतकांच्याअनेक विकारांच्या निदानासाठीही वापरतात. कारण हे अधिक जलद, अधिक प्रभावी आणि शरीरात परकीय द्रव्य अंतःक्षेपित किंवा अंतर्ग्रहण करणाऱ्या क्ष-किरण कार्यपद्धतींपेक्षा पुष्कळदा अधिक सुरक्षित ठरते. [→ वैद्यकीय प्रतिमादर्शन].

क्ष-किरणांचे वैद्यकीय उपयोग : वैद्यकात क्ष-किरण मुख्यतः रोगनिदान, उपचार व वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी वापरतात. यांपैकी महत्त्वाचे उपयोग पुढे विस्ताराने दिले आहेत.

क्ष-किरण चित्रण : (रेडिओग्राफी). यामध्ये क्ष-किरणांमुळे तयार होणाऱ्या छायाकृतींची एक स्थिर प्रतिमा निर्माण होते. क्ष-किरण चित्रण ही स्थूल संज्ञा असून तिच्यात शरीरांतर्गत विविध प्रकारांच्या अवयवांचा अभ्यास करतात. क्ष-किरण शरीरातून बाहेर पडत असताना काहीफोटॉन शरीरात शोषले जातात तर त्यांचा काही विखुरलेला भाग बाहेर पडणाऱ्या फोटॉनांमुळे एक विशिष्ट चित्र निर्माण होते. हे चित्र छायाचित्रीय पटलावर (फिल्मवर), क्ष-किरणांना संवेदनशील अशा खास प्लॅस्टिक पटलावर किंवा संगणकाच्या पडद्यावर पाहता येते. उदा., विविध सांध्यांच्या स्थितींचा अभ्यास ऑर्थोग्राफीत करतात. यातून संधिवातांचे विविध प्रकार व परिस्थिती समजते. वयोमानानुसार हाडे ठिसूळ होऊ लागतात. त्यामुळे त्यांची घनता मोजतात व त्यानुसार उपाय योजणे आवश्यक असते. दातांची रचना व स्थिती समजण्यासाठी क्ष-किरण चित्रण उपयुक्त असते. छातीची क्ष-किरणांच्या मदतीने तपासणी करणे ही सर्वाधिक वापरली जाणारी तपासणी आहे. फुप्फुसांतील विविध संसर्गांची चाचणी करण्यासाठी तसेच कर्करोगाची अर्बुदे (शरीराला अनुपयुक्त गाठी) शोधण्यासाठी क्ष-किरण चित्रण वापरतात. मोडलेली हाडे व त्यांच्या जुळण्याची स्थिती समजण्यासाठी तसेच अन्ननलिकेची तपासणी करण्याकरिताही क्ष-किरण चित्रणाचा उपयोग करतात. बेरियम धातूतून क्ष-किरण पलीकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बेरियम संयुगाने भरलेला शरीराचा भाग पांढरा दिसतो. यासाठी बेरियम अशन किंवा बेरियम बस्ती यांचा उपयोग करतात. मूत्रपिंड तसेच मूत्राशय यांमुळे होणाऱ्या लघवीच्या विकारांवर इंट्राव्हिनस पायलोग्राम आणि सिस्टायूरेथ्रोग्राम या तपासण्या करतात. गर्भधारणेचा त्रास होणाऱ्या स्त्रियांचे गर्भाशय व अंडवाहिनी यांच्यातील दोष समजण्यासाठी हिस्टेरोसालपिंगो-ग्राफी किंवा राँटगेनोग्राफी तपासणी करतात. तेव्हा आधी क्ष-किरणांना अपारदर्शक द्रव्य अंतःक्षेपणाने आत घालतात.

मॅमोग्राफी : ही स्तनांच्या अभ्यासाची क्ष-किरण तपासणी असून ती करताना प्रपिंडीय (ग्रंथिल) वाहिनीत भेददर्शक (विरोधी) माध्यम अंतःक्षेपित करतात अथवा करीत नाहीत. अशा रीतीने स्तनांतील भागांचा अभ्यास करण्यासाठी क्ष-किरण वापरतात. अशा उच्च प्रतीच्या तपासणीने अत्यल्प प्रमाणात असलेला स्तनांचा कर्करोग लवकर लक्षात येतो व त्यामुळे उपचार सुलभ होतात. मॅमोग्राफीचे उपकरण चौकोनी खोक्याच्या आकाराचे असून त्याच्या आतील नळीमधून क्ष-किरण निर्माण होतात. या विशिष्ट संरचनेमुळे क्ष-किरण फक्त स्तनांवरच पडतात. आतमध्ये असलेल्या उपकरणांमुळे स्तन विशिष्ट रीतीने दाबले जाऊन त्याची वेगवेगळ्या दिशांतून घेतलेली छायाचित्रे निर्माण होतात.

प्रत्यक्ष एका फिल्मवर छायाचित्र घेणारा (पडदा-पटल मॅमोग्राम) स्क्रीन फिल्म मॅमोग्राम व एका विशिष्ट क्रमवीक्षकावर छायाचित्र घेणारा संपूर्ण संगणकीकृत मॅमोग्राम ही दोन प्रकारची मॅमोग्राम उपकरणे उपलब्ध आहेत. दुसऱ्या उपकरणातून छायाचित्र (प्रतिमा) विविध दर्शकांवर प्रेषित करता येते.

गॅलॅक्टोग्राफी हा मॅमोग्राफीचाच प्रकार असून यात एक विशिष्ट पदार्थ स्तनाच्या दुग्धनलिकेत सोडला जातो. स्तनातून रक्तस्राव किंवा पाण्यासारखा स्राव होत असल्यास ही तपासणी करतात. 


सीटी स्कॅन : (काँप्युटराइज्ड ॲक्सियल टोमोग्राफी संगणकीकृत अक्षीय छेददर्शन किंवा सेक्शनल रेडिओग्राफी म्हणजे काप वा छेद क्ष-किरण चित्रण). या चित्रणाच्या प्रक्रियेत शरीराच्या विविध अंगांचे पातळ काप वा छेद दर्शविले जातात. या तंत्राचे कार्य पुढीलप्रमाणे चालते : प्रथम रुग्ण ज्या शय्येवर पडलेला असतो ती एका वर्तुळातून हलविली जाते. नंतर या वर्तुळाकृतीत एका बाजूस क्ष-किरणांचा स्रोत, तर विरुद्ध दिशेला क्ष-किरण दर्शक (दर्शिका) असतो. या दोन्ही गोष्टी रुग्णाभोवती फिरतात. एका फेऱ्याला साधारणपणे १ सेकंद एवढा वेळ लागतो. क्ष-किरणांचा स्रोत पंख्याच्या पात्याच्या आकाराचा म्हणजे त्रिकोणाकृती असतो. मात्र, क्ष-किरणांचा अगदी पातळ झोत रुग्णाच्या शरीरातून आरपार जातो. पुढील टप्प्यात विरुद्ध दिशेला असलेल्या दर्शकात या झोताचे रूपांतर एका स्थिर चित्रिकेत होते. एका फेऱ्यात अशा वेगवेगळ्या स्थिर चित्रिकांचे एकत्रीकरण (समुच्चयन) होते. पुढील टप्प्यात अशा वेगवेगळ्या स्थिर चित्रिका अंकीय संगणकाद्वारे एकत्रित केल्या जाऊन शरीरांतर्गत अवयवांचे चित्रण होते. यामुळे शरीराच्या आधीच निश्चित केलेल्या प्रतलातील तपशील पहाता येतो व त्याचवेळी इतर प्रतलांमधील संरचनांच्या प्रतिमा पुसट होतात. 

संगणकीकृत छेददर्शन (सीटी स्कॅन) प्रक्रिया : (१) क्ष-किरण उद्गम, (२) क्ष-किरण शलाका, (३) क्ष-किरण दर्शक (दर्शिका), (४) विद्युत् चलित्र बसविलेले टेबल, (५) रुग्ण, (६) विरुद्ध दिशेला असलेले क्ष-किरण स्रोत व क्ष-किरण दर्शक रुग्णाभोवती फिरणारे वर्तुळ.

पूर्ण शरीराचा सीटी स्कॅन : या पद्धतीत हनुवटीपासून कमरेपर्यंतच्या शरीराचा सीटी स्कॅन करतात. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग तसेच हृदयविकार इ. व्याधींचा प्रसार होण्याआधीच या पद्धतीने त्यांचा सुगावा लागतो. मल्टिस्लाइस (बहुकाप) सीटी स्कॅन (एमएससीटी), इलेक्ट्रॉन बीम सीटी स्कॅन (ईबीसीटी) इ. या टोमोग्राफीचे विविध प्रकार आहेत. ईबीसीटी या प्रकाराने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमाच्या संचयावरून (साठ्यावरून) एखाद्या व्यक्तीला किती प्रमाणात हृदयविकार होण्याची शक्यता आहे, हे सांगता येते.

फ्ल्युओरोस्कोपी : क्ष-किरण तपासणीकरिता फ्ल्युओरोस्कोप वापरतात. फ्ल्युओरोस्कोप हा अनुस्फुरक (फ्ल्युओरेसंट) पडदा असून तो क्ष-किरण नलिकेबरोबर वापरण्याच्या दृष्टीने तयार केलेला असतो. याच्यामुळे क्ष-किरण नलिका व हा पडदा यांच्यामध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या क्ष-किरण छाया प्रतिमांचे थेट दृश्य रूपात निरीक्षण करता येते. यात क्ष-किरणांचे सातत्याने छायाचित्रण होते व त्यातून एक क्ष-किरण चलच्चित्र निर्माण होते. यातून रुग्णाच्या अवयवांची होणारी हालचाल स्पष्ट दिसते. फ्ल्युओरोस्कोपी वेगवेगळ्या तपासण्यांसाठी वापरतात. यांतील काही ठळक तपासण्या अशा आहेत : (१) अन्ननलिकेच्या मार्गाचे बेरियम अशन वापरून चित्रण केले जाते. (२) रक्तवाहिन्यांचे आकुंचन आणि प्रसरण हे वाहिनीदर्शन (म्हणजे अँजिओग्राफी) या पद्धतीने केले जाते. (३) फुप्फुसांतील छिद्रे व त्यांचा होणारा विकास (वाढ), तसेच श्वासपटलाची हालचाल आणि शक्ती (क्षमता) यांचे अवलोकन करता येते.

अमेरिकेमध्ये साधारणत: ५% जनता वर्षाकाठी फ्ल्युओरोस्कोपीचा उपयोग करून घेते. यातील ५३% वापर जठर, अन्ननलिका आणि छोटे आतडे यांच्या तपासणीसाठी, तर २८% वापर बेरियम बस्ती ( मोठ्या आतड्यांच्या तपासणीकरिता) यासाठी होतो. उर्वरित १९% वापर इतर कारणांसाठी (हाडे आणि सांधे यांकरिता) केला जातो.

फ्ल्युओरोस्कोपी वापरण्याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यावा लागतो. याचे कारण असे की, क्ष-किरण तपासणीपेक्षा फ्ल्युओरोस्कोपीमध्ये उद्भासन ३० पटींनी जास्त असते.

कर्करोगासाठी क्ष-किरण उपचार : अंतर्गत किरणोत्सर्ग उपचार (ब्रँकी चिकित्सा), बाह्य शलाका चिकित्सा (एक्स्टर्नल बीम थेरपी ईबीटी) व छायाचित्राच्या अनुरोधाने केलेले क्ष-किरण उपचार हे या उपचारांचे काही वेगवेगळे प्रकार आहेत.

अंतर्गत किरणोत्सर्ग उपचार : या पद्धतीत किरणोत्सर्गाची महत्तम मात्रा छोट्या भागाला किमान वेळात देतात.अष्ठीला ग्रंथी, त्वचा, स्तन, गर्भाशय, आंतरिक योनिमार्ग, फुप्फुस, गुदद्वार, डोळा, मेंदू इ. अवयवांच्या कर्करोगांवरील उपचारासाठी ही चिकित्सा वापरतात. बऱ्याच वेळेस ही चिकित्सा तत्कालिक व काही वेळेस कायमस्वरूपी असते. तत्कालिक चिकित्सेत किरणोत्सर्गी मूलद्रव्य एका छोट्या नळीद्वारे विशिष्ट काळासाठी कर्करोगग्रस्त अवयवाजवळ थोड्या अंतरावर वा अवयवाच्या आत ठेवतात. कायमस्वरूपी चिकित्सेत तांदळाच्या दाण्याच्या आकारमानाचे किरणोत्सर्गी पदार्थ कर्करोगाच्या गाठीत (अर्बुदात) वा गाठीजवळ कायमस्वरूपी ठेवतात. यातील किरणोत्सर्ग काही महिन्यांनी शून्य होतो. हे दाणे शरीरात कायम राहतात परंतु रुग्णावर त्यांचा विपरीत परिणाम होत नाही. तथापि विमानतळावरील सुरक्षादर्शकातून जाताना कधीकधी यांच्यामुळे धोकासूचक घंटा वाजू शकते. [प्रारण चिकित्सा].

बाह्य शलाका चिकित्सा : या चिकित्सेत क्ष-किरणांच्या उच्च ऊर्जावान एक किंवा अनेक शलाका कर्करोगाच्या गाठीवर बाहेरून सोडतात (टाकतात). क्ष-किरणांतील ऊर्जा गाठीमधील कोशिकेमध्ये संक्रमित होऊन तिच्यातील डीएनए या न्यूक्लिइक अम्लाचा आणि पर्यायाने संपूर्ण रोगग्रस्त कोशिकेचा नाश होतो. तिच्या सभोवतालच्या सामान्य कोशिकांना अपाय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. स्तन, अन्नमार्ग, मेंदू, गळा, फुप्फुसे, अष्ठीला ग्रंथी इ. अवयवांच्या कर्करोगांच्या चिकित्सेत ही उपचार पद्धती उपयुक्त ठरते.

छायाचित्राच्या अनुरोधाने केलेले क्ष-किरण उपचार : (स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी) . एक मिलिमीटर एवढी अचूकता असलेल्या या पद्धतीत कर्करोगग्रस्त भागावर सुनिश्चित क्ष-किरणांनी उपचार करतात. या पद्धतीत क्ष-किरणांची अत्युच्च मात्रा वापरतात. त्यामुळे इतर पद्धतींशी तुलना करता या पद्धतीने अल्पकाळात यश प्राप्त होते. या पद्धतीच्या अचूकतेमुळे इतर सामान्य कोशिकांची होऊ शकणारी हानी टाळता येते. या कारणांमुळे मेंदूतील कर्करोगाच्या गाठींचा नाश करण्यासाठी या पद्धतीचा सर्वाधिक वापर होतो. ही पद्धती पुढील विविध तंत्रविद्यांवर अवलंबून आहे. (१) त्रिमितीय चित्रणाने कर्करोगाच्या गाठीचे स्थान अचूकपणे ठरविता येते. सीटी स्कॅन, एमआरआय [मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन; ⟶ वैद्यकीय प्रतिमादर्शन], पेट पॉझिट्रॉन स्कॅन (पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन एमिशन टोमोग्राफी; पॉझिट्रॉन उत्सर्जन छेददर्शन) इ. पद्धतींनी त्रिमितीय चित्रण करतात. (२) रुग्णाचे अवयव काळजीपूर्वक एका स्थितीत जखडून ठेवतात. उच्च दाबाचे (क्षमतेचे) क्ष-किरण एका शलाकेतून प्रेषित करतात.

सामान्यतः ही एका दिवसाची उपचार पद्धती आहे. कधीकधी सु. २.५ सेंमी.पेक्षा जास्त व्यापाच्या गाठीवर अनेकदा वेगवेगळ्या दिशांतून; परंतु क्ष-किरणाची मात्रा कमी प्रमाणात देऊन उपचार करतात. त्यामुळे शेजारी असलेल्या सामान्य कोशिकांवर कमी परिणाम होतो व पद्धतीची सुरक्षितता वाढते. हिला खंडित (फ्रॅक्शनेटेड) रेडिओ चिकित्सा म्हणतात. सामान्य शस्त्रक्रियांचा पर्याय म्हणूनही ही पद्धती वापरतात. शस्त्रक्रियांचा भार वा ताण सहन करू न शकणारे रुग्ण तसेच ज्या गाठीपर्यंत पोहोचणे कठीण असून ज्या महत्त्वाच्या अवयवांच्या लगत आहेत, अशा वेळेला हीच पद्धती वापरतात. मेंदूमध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांच्या गाठी (आर्टेरिओव्हिनस मालफॉर्मेशन; रोहिणीविकृतनिर्मिती), तसेच कवटीच्या तळाशी असलेल्या गाठी, डोळ्याच्या खोबणीतील गाठी यांच्यासाठी ही पद्धती हा पहिला पर्याय आहे. 


क्ष-किरणांचे धोके : प्रत्येक जिवंत कोशिकेवर (पेशीवर) क्ष-किरणांचा परिणाम होतो व त्यामुळे अखेरीस कोशिका मरू शकते. कोशिकेतून आरपार जाताना कोशिकेतील डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल) या जननिक द्रव्यात बदल होतात. त्यामुळे कोशिकेच्या दैनंदिन कार्यपद्धतीवर परिणाम होतो. यामुळे क्ष-किरणांचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. काळजी न घेतल्यास रक्ताचे विकार, जन्मजात दोष, वंध्यत्व यांसारखे विकार होतात. याशिवाय रोगप्रतिकारक्षमता कमी होणे, अकाली वृद्धत्व येणे, प्रजननाकरिता असलेल्या ऊतकांत बदल घडून येणे असेही परिणाम क्ष-किरणांनी होऊ शकतात. शिवाय क्ष-किरणांचा परिणाम वर्धिष्णू स्वरूपाचा असतो, म्हणजे छोट्या छोट्या मात्रांचे एकत्रीकरण होते आणि एका वर्षाची अशी मात्रा ही एका वेळी दिलेल्या मोठ्या मात्रेप्रमाणे असते.

कर्करोग : वय, राहणीमान, जनुके इ. कारणांवर क्ष-किरणांमुळेकर्करोग होण्याची शक्यता अवलंबून असते. तत्त्वतः क्ष-किरणांमुळे भविष्यात कर्करोग उद्भवण्याची शक्यता असली, तरी देखील हे प्रमाण न्यूनतम असते. उदा., ब्रिटनमध्ये हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने केलेल्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या अवयवांच्या क्ष-किरण तपासणीमुळे कर्करोगाची शक्यता पुढीलप्रमाणे आढळते : (१) छाती, दात, हात किंवा पाय यांची क्ष-किरण परीक्षा वा तपासणी सलग दोन आठवडे केल्यास कर्करोगाची शक्यता दहा लाखात फक्त एक एवढी अत्यल्प असते. (२) कवटीची किंवा मानेची क्ष-किरण परीक्षा दोन आठवडे सतत केली असता कर्करोगाची शक्यता लाखात एक एवढी अल्प असते. (३) स्तनांची क्ष-किरण परीक्षा म्हणजे मॅमोग्राफी, पोट अथवा कंबर यांची परीक्षा यांना क्ष-किरण जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे दोन आठवड्यांच्या अशा परीक्षेनंतर कर्करोगाचे प्रमाण वरीलपेक्षा थोडे वाढते म्हणजे दहा हजारात एक एवढी शक्यता असते. (४) बेरियम मील (बेरियम अशन) किंवा बेरियम बस्ती (एनिमा) अशा क्ष-किरण चिकित्सांमध्ये कर्करोगाची शक्यता खूप वाढून ती हजारात एक एवढी होते.

गर्भारपण : गर्भारपणाच्या काळात क्ष-किरणांच्या चिकित्सेमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्ष-किरणांच्या मात्रेचा उदरातील गर्भावर फारसा परिणाम होत नाही. तरी देखील काळजी घेण्याच्या दृष्टीने गर्भवतीच्या उदराची क्ष-किरण चिकित्सा शक्यतो करीत नाहीत. बऱ्याच वेळा याला पर्याय म्हणून श्राव्यातीत (अल्ट्रासाउंड) चिकित्सा वापरतात. शक्यतो स्त्रियांना क्ष-किरण चिकित्सेअगोदर मासिक पाळीची तारीख विचारतात. कारण गर्भवतींच्या बाबतीत क्ष-किरण चिकित्सा टाळतात. मात्र, क्ष-किरण चिकित्सेनंतर ती गर्भार असल्याचे लक्षात आले, तर काळजी करण्याचे कारण नसते. कारण थोड्या काळाकरिता दिलेले अगदी शक्तिशाली (तीव्र) क्ष-किरण देखील गर्भास अपाय करीत नाहीत.

गर्भवती स्त्रिया व वाढ होत असलेली मुले यांचा खास विचार करावा लागतो. त्यांना क्ष-किरणाद्वारे होणाऱ्या हानीच्या दृष्टीने विशेषतः रक्ताच्या कर्करोगाच्या दृष्टीने या व्यक्तींची रोगप्रवृत्ती वा ग्रहणशीलता उच्च असते. गर्भाचे अनावश्यक उद्भासन होऊ नये म्हणून इंटरनॅशनल कमिशन ऑन रेडिओलॉजिकल प्रोटेक्शन (आंतरराष्ट्रीय क्ष-किरण वैद्यकीय संरक्षण विषयक आयोग) या आयोगाने पुढील शिफारस केली आहे. गर्भधारणाक्षम काळात स्त्रीच्या श्रोणीय व उदरीय भागांवरील क्ष-किरणांच्या उद्भासनावर पाळी सुरू झाल्यानंतरच्या दहा दिवसांच्या कालावधीची मर्यादा असायला हवी. या काळात स्त्रीच्या बाबतीत गैरवाजवी जोखीम न पत्करता असे उद्भासन करणे शक्य असते. क्ष-किरणांद्वारे सातत्याने छायाचित्रणे करून त्यातून क्ष-किरण चलच्चित्र तयार होते व त्याद्वारे रुग्णाच्या अवयवांची होणारी हालचाल स्पष्टपणे दिसते. या क्ष-किरण परीक्षेला फ्ल्युओरोस्कोपी म्हणतात. या तपासणीत रुग्णाला दर मिनिटाला १० राँटगेनपेक्षा अधिक त्वरेने उद्भासनाची मात्रा द्यायची नसते.

क्ष-किरणांपासून होणारा अपाय टाळण्यासाठी क्ष-किरण चिकित्सा गरजेपुरतीच मर्यादित ठेवतात. तसेच क्ष-किरण शिशाला भेदून पलीकडे जाऊ शकत नसल्याने शिसे भरलेले अवरोधक कपडे (ॲप्रन-मलवस्त्र, हातमोजे) अथवा विशिष्ट भाग झाकणारी उपकरणे वापरतात. 

क्ष-किरण वैद्यकाशी निगडित कर्मचारी : शरीरक्रियावैज्ञानिक, दंतवैद्य, वैद्यकीय व औद्योगिक क्ष-किरण तंत्रज्ञ आणि संशोधक यांचा क्ष-किरण वैद्यकाशी संबंध येतो. अशा कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य माणसापेक्षा क्ष-किरणांच्या काहीशा उच्चतर मात्रेला सामोरे जावे लागते, अशी अपेक्षा असून ती त्यांची व्यावसायिक जोखीम असते. जर या क्ष-किरणाच्या मात्रेत काहीशी (थोडी) वाढ झाल्याने कोणते तरी लक्षात येण्याजोगे नुकसान यामुळे होईल अशी अपेक्षा नसते. प्रारणाच्या (क्ष-किरणांच्या) जीववैज्ञानिक परिणामांविषयीच्या अनेक अनिश्चितता तसेच व्यक्तीच्या शरीरातील विविध अवयवांना मिळणाऱ्या क्ष-किरणांच्या मात्रेचे मापन अचूकपणे करण्यातील अक्षमता यांच्यामुळे यातील रुढिप्रियतेचे (पारंपरिकतेचे) समर्थन केले जाते. क्ष-किरणाचे उद्भासन कितीही कमी असले, तरी त्याने हानी पोहोचण्याची शक्यता असते, हे सर्वसाधारणपणे मान्य झालेले मत आहे. क्ष-किरणांचे सरासरीने होणारे उद्भासन प्रत्यक्षात कमीत कमी राहील, यासाठी पुष्कळ प्रयत्न केले जातात. उदा., अगदी आवश्यक तेव्हाच व किमान वेळ फ्ल्युओरोस्कोपी वापरतात.

वैद्यकीय व दंतवैद्यकीय रुग्ण : या रुग्णांचा गट विचारात घेतला, तर त्यांना जास्तीत जास्त क्ष-किरण उद्भासनाला सामोरे जावे लागते. यासाठी विशिष्ट क्ष-किरण उद्भासन मर्यादा निर्धारित केलेली नाही. कोणत्याही रुग्णाला क्ष-किरणांच्या उद्भासनाची किती आवश्यकता आहे, हा व्यावसायिक निर्णयाचा प्रश्न असल्याचे मानतात. शरीरक्रियावैज्ञानिक व दंतवैद्य यांनी अनावश्यक क्ष-किरण चित्रण करू नये आणि निदानीय दृष्टीने कुतूहलाचा विषय असलेल्या शरीराच्या भागावरच क्ष-किरणांचे उद्भासन करावे, असा आग्रह असतो. अनावश्यक क्ष-किरणांपासून डोळे व जननग्रंथी यांचे संरक्षण होण्यासाठी संरक्षक यंत्रणा वापरण्याची विशेष काळजी ते घेतात.

सामान्य व्यक्ती : प्राण्यांवरील प्रयोगांवरून पुढील गोष्ट सूचित झाली आहे. सामान्य (प्राकृत) व्यक्तींवरील क्ष-किरणांचे सरासरी एकूण उद्भासन अगदी कमी मर्यादांमध्ये ठेवणे इष्ट असते. त्यामुळे सामान्यपणे घडणाऱ्या विशिष्ट अनिष्ट जननिक बदलांत होणारी वाढ टाळता येते. या बदलांची परिणती पुढील विकृतनिर्मितीमध्ये होऊ शकते. उदा., खंड तालू, खंडौष्ठ, वक्रपाद, विशिष्ट हृदयविकार, गर्भस्राव किंवा मूल मेलेले जन्मणे.

क्ष-किरण वैद्यकाशी संबंधित म्हणता येतील अशा व्यक्तींच्या संख्येत बरीच वाढ होत असल्याने व बहुतेकांचे एकदा वा अनेकदा वैद्यकीयवा दंतवैद्यकीय क्ष-किरण उद्भासन होत असल्याने क्ष-किरण स्रोतांलगत राहत असणाऱ्या किंवा काम करत असणाऱ्या व्यक्तींवर चुकार क्षकिरणांचे होणारे अप्रस्तुत (बाह्य) उद्भासन किमान ठेवायला हवे.

एखाद्या व्यक्तीचे विनिर्दिष्ट मर्यादेत अनेक वेळा क्ष-किरण उद्भासन झालेले असले, तरी या व्यक्तीवर किंवा तिच्या वंशजांवर त्याचा विपरीत परिणाम होईलच असे मानण्याचे कोणतेही आवश्यक कारण नाही, हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. कारण क्ष-किरणांच्या एका उद्भासनामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या काळात किंवा तिच्या वंशजांमध्ये हानी होण्याचा प्रत्यय येण्याची संभाव्यता फक्त वाढते. तथापि, जर असंख्य व्यक्तींचे जादा उद्भासन अखंडपणे होत राहिले, तर अनेक पिढ्यांच्या काळात अनेक अनिष्ट जननिक बदलांच्या संख्येत सावकाशपणे व महत्त्वपूर्ण वाढ होईल, असे मानता येते. 


क्ष-किरण धोक्याचे नियमन : वैद्यकीय किंवा औद्योगिक क्ष-किरण धोक्यांचे समाधानकारक नियमन करताना पुढील तीन घटकांचा संबंध येतो : (१) क्ष-किरण नलिकेच्या स्थानिक संरक्षक सामग्रीसह संबंधित साधनसामग्रीचा अभिकल्प (आराखडा) योग्य हवा (२) आवश्यक संरचनात्मक संरक्षक यंत्रणेसह साधनसामग्रीच्या अधिष्ठापनेत (उभारणीत) काळजी घेणे आणि (३) साधनसामग्रीचा योग्य वापर.

अभिकल्प : नॅशनल कौन्सिल ऑन रेडिएशन प्रोटेक्शन आणि अमेरिकन स्टँडर्ड्स ॲसोसिएशन सेफ्टी कोड फॉर इंडस्ट्रियल ॲव्हरिज या संस्थांनी अभिकल्पासाठी विशिष्ट मानके ठरविली आहेत. ही मानके प्रमुख क्ष-किरण उत्पादक पाळतात. संरक्षक नलिका कोश (प्रावरण) व पूरक सामग्री क्ष-किरण धोक्याच्या नियमनाच्या बाबतीत पुरेसे विनिर्देश असतात. क्ष-किरणांच्या संभाव्य प्रासंगिक स्रोतांच्या बाबतीत प्रमुख उत्पादक संभाव्य धोक्यांच्या बाबतीत जागरूक असतात व बहुधा पुरेशी काळजी घेतात. अशा सामग्रीतून मोठ्या प्रमाणात क्ष-किरणांचे उत्सर्जन होत नसल्याची खात्री करून घेण्यासाठी अशा सामग्रीची अधूनमधून तपासणी करणे गरजेचे असते.

उभारणी : याविषयीची मानकेही व्यापकपणे स्वीकारली आहेत. क्ष-किरण नलिका संरक्षित केलेली असली, तरी रुग्णातून क्ष-किरण शलाका बाहेर पडल्यावरही ती संरक्षित करण्याची काळजी घेतात. व्यक्ती, परीक्षा करावयाची वस्तू, जमिनी वा भिंती यांपासून विखुरले जाणारे क्ष-किरण संरक्षित करण्याची काळजी घेतात. क्ष-किरण विवर्तन घटकांसारख्या क्ष-किरणाच्या सापेक्षतः कमी विद्युत् दाबाच्या स्रोतांचा अपवाद वगळता इतर सामग्री संरक्षित खोलीत ठेवतात. ती चालविणारा कर्मचारी खोलीबाहेर किंवा खोलीतील संरक्षित कक्षात असतो. नियामकांची मांडणी अशी करतात की, चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण होते.

एखाद्या विशिष्ट उभारणीसाठीची संरचनात्मक संरक्षक यंत्रणा पुढील गोष्टींवर अवलंबून असते : सामग्रीचा प्रकार व विद्युतीय क्षमता, वापराचा आवाका व पद्धत आणि जवळच्या भागात असणाऱ्या व्यक्ती. उदा., त्याच व्यक्ती नेहमी जेथे नसतात अशा व्हरांड्यांपेक्षा निवासी क्षेत्रांसाठी अधिक जास्त संरक्षणाची गरज असते.

साधनसामग्रीचा योग्य वापर : फक्त योग्य प्रशिक्षणाद्वारे क्ष-किरण सामग्रीचा सुरक्षितपणे वापर करता येतो. याची जबाबदारी मालकाची किंवा सामग्री ताब्यात असणाऱ्याची असते. शिवाय पुरेशा प्रशिक्षित तंत्रज्ञांची भरती करण्यास प्रोत्साहन देतात. यासाठी शिक्षण, प्रशिक्षण व प्रमाणपत्र संपादन याची आवश्यकता असते. क्ष-किरण सामग्री वापरताना ती वापरणारा, जवळ काम करीत असलेला कर्मचारी व शेजारी यांच्या संरक्षणाची काळजी घेतात. काचेच्या खिडक्या वा उघडी दारे यांतून विखुरलेले क्ष-किरण पुष्कळ अंतर सरळ रेषेत जातात व त्यांच्या मार्गातील व्यक्तींवर जादा क्ष-किरण पडतात.

क्ष-किरण शलाकेमुळे निदानाच्या दृष्टीने गरजेची असलेली क्षेत्रेच उद्भासित झाली पाहिजेत. उदा., दंतवैद्यकीय क्ष-किरण शलाका चेहऱ्याच्या लहान क्षेत्रावर पडली पाहिजे तर छातीसाठी वापरावयाच्या क्ष-किरणांमुळे फक्त फुप्फुसाचे क्षेत्र उद्भासित झाले पाहिजे. छातीचे क्ष-किरण चित्रण करताना निष्काळजी किंवा अप्रशिक्षित कर्मचारी रुग्णाच्या जननेंद्रियांवर किंवा डोळ्यांवर अनावश्यक क्ष-किरण पडू देतो. अमेरिकेत केलेल्या अनेक सर्वेक्षणांतून एकाच वैद्यकीय निदानासाठी वापरण्यात आलेली क्ष-किरणांची मात्रा खूप भिन्न असल्याचे दिसून आले असून हा भेद तीनशे पटीपर्यंत आढळला. तो सामग्री व तंत्र यांवर अवलंबून असल्याचे लक्षात आले. जवळजवळ बहुतेक वेळा क्ष-किरणांच्या कमी मात्रेमुळे क्ष-किरणचित्रविषयक पुष्कळच अधिक माहिती मिळाली. पशुवैद्यकात क्ष-किरण सामग्री वापरताना बुजलेल्या नाराज पशूची हालचाल थांबविण्यासाठी त्याला पकडून ठेवतात. यांमुळे पशुवैद्य व त्याचे सहकारी यांच्यावर क्ष-किरण जास्त प्रमाणात पडू शकतात.

क्ष-किरण निर्मितीचे साधन बंद केल्यावर लगेचच सर्व म्हणजे थेट व विखुरलेले असे दोन्ही प्रकारचे क्ष-किरण थांबतात व अवशिष्ट क्ष-किरण नसतात, याविषयी बरेचदा अगदी क्ष-किरणविषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांतही गैरसमज आहेत. क्ष-किरण संरक्षक हातमोजे, झगा इ. सामग्रीची वारंवार चाचणी घेऊन नकळत कर्मचाऱ्यावर क्ष-किरण पडत नाहीत ना, याची काळजीपूर्वक तपासणी करावी लागते. रक्ताची नियमितपणे तपासणी केल्यास क्ष-किरणांची जादा मात्रा लक्षात येते. त्यामुळे त्याचे कारण शोधून त्याची पुनरावृत्ती टाळता येते. तसेच गरजेनुसार जादा मात्रेच्या परिणामांवर उपचार करता येतात.

देशपांडे, प्राजक्ता


पशुवैद्यकातील क्ष-किरण चिकित्सा : क्ष-किरण चिकित्सेचा पशुवैद्यकात वापर करणे अवघड काम असते. कारण निरनिराळ्या जातींचे पशू त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे पशुवैद्याशी हमखास सहकार्य करतील असे नसते. मानवी वैद्यकात रुग्णाला विशिष्ट वा प्रमाणभूत अंगस्थितीत ठेवून क्ष-किरण चित्र काढता येते आणि त्याची दुसऱ्या अंगस्थितीतील वा प्रमाणभूत अंगस्थितीतील चित्राशी तुलना करून खरे रोगनिदान करता येते. पशुवैद्यकातही प्रमाणभूत अंगस्थिती अवलंबिल्यास फायदा होऊ शकेल. उदा., अनुभवाने उपयुक्त ठरलेल्या अंगस्थिती वापरणे तसेच जखमी वा शुद्धीवर असलेल्या पशूंना काबूत ठेवणे यांसारखे उपाय लाभदायी ठरू शकतील.

ग्रे श्‍नेल्ले यांनी पशुवैद्यकीय क्ष-किरण चिकित्सेवरील पहिले पुस्तक लिहिले (१९४५). द अमेरिकन व्हेटर्नरी रेडिओलॉजिकल सोसायटीची पहिली सभा १९५४ मध्ये झाली. डब्ल्यू. डी. कार्लसन हे अमेरिकेतील पशुवैद्यकीय क्ष-किरण चिकित्सेतील अग्रणी होते. तेथे १९५७ साली एज्युकेटर्स इन व्हेटर्नरी रेडिओलॉजी आणि १९६० मध्ये अमेरिकन बोर्ड ऑफ व्हेटर्नरी रेडिऑलॉजिस्ट्स (१९६९ मध्ये हिचे नाव अमेरिकनकॉलेज ऑफ व्हेटर्नरी रेडिऑलॉजिस्ट्स असे झाले) या संस्था स्थापन झाल्या. भारतात हिस्सार पशुवैद्यक महाविद्यालयातील ए. के. भार्गव यांनी पशुवैद्यकीय क्ष-किरण चिकित्सेचा प्रचार व प्रसार केला. त्यासाठी १९७२ मध्ये या महाविद्यालयात मोठ्या जनावरांसाठी उपयुक्त असलेले क्ष-किरण यंत्र बसविण्यात आले.

पशुवैद्यकीय क्ष-किरण चिकित्सा मानवी क्ष-किरण चिकित्सेसारखी असून तिच्यात सहज वाहून नेता येणारी, हलविता येणारी व स्थिर प्रकारची साधने वापरतात. मुख्य साधनांव्यतिरिक्त क्ष-किरण चित्रण सुस्पष्ट करणारी, क्ष-किरणांची परिसीमा साधणारी, पशूंच्या विविध अंगस्थिती उपलब्ध करून देणारी तसेच अंधाऱ्या खोलीत वापरावयाची साहाय्यक साधनेही या चिकित्सेत वापरतात.

निरनिराळ्या पशूंना विवक्षित, परंतु विशिष्ट पद्धतीने काबूत ठेवण्यामध्येयेणाऱ्या अडचणी, क्ष-किरण चित्रणासाठीची यंत्रे व साधने तसेच क्ष-किरणविषयक धोके व जोखमी ही या चिकित्सेची वैशिष्ट्ये आहेत. अंधाऱ्या खोलीतील रोगी पशूच्या वेगवान हालचाली व शरीराचाअंतर्भाग प्रत्यक्ष पाहण्यासाठी क्ष-किरण पटलाऐवजी झिंक सल्फाइडाच्या स्फटिकांचा थर दिलेला विशिष्ट पडदा वापरतात. क्ष-किरण चित्रे घेणे आणि नंतर ती प्रगट करणे यांसाठी लागणारा वेळ व खर्च वाचविण्यासाठी हा पडदा वापरतात. शिवाय तांत्रिकदृष्ट्या ही अगदी साधी कार्यप्रणाली आहे. मात्र, पडद्यातून येणारे प्रकाशझोत कमी तीव्रतेचे असल्याने प्रतिमा अगदीच अस्पष्ट मिळते. ती स्पष्ट करणे विशेष अडचणीचे असल्याने प्रकाशझोत मोठ्या प्रमाणात जास्त वेळपर्यंत चालू ठेवावा लागतो. त्यामुळे जनावर काबूत ठेवणाऱ्या लोकांना कितीतरी पटींनी विकिरण सहन करावे लागते. यांपासून संरक्षण करण्यासाठी शिशाचे संरक्षक झगे, रबराचे हातमोजे यांसारखे कपडे वापरतात. हे कपडे योग्य प्रकारे सांभाळण्याची खबरदारी घेतात. तसेच शुद्धिहारके वापरून पशूला पूर्ण भूल देतात.

क्ष-किरण चिकित्सा करताना पुढील खबरदारी घेतात : पशू योग्य अंगस्थितीत ठेवण्यासाठी किमान दोन मदतनीस घेतात. सोळा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले व गर्भवती स्त्रिया मदतनीस म्हणून घेत नाहीत. मदतनिसांनी शिशाचे संरक्षक झगे, हातमोजे वापरणे गरजेचे असते. परीक्षेशी संबंधित अशा व्यक्तींना क्ष-किरण स्रोतांपासून दूर ठेवतात. गरजेनुसार पशूला भूल देतात. क्ष-किरणांचा झोत आवश्यक व योग्य क्षेत्रापुरता मर्यादित ठेवतात. त्यामुळे लगतच्या खोल्यांतील व्यक्तींवर क्ष-किरणांचा अनिष्ट परिणाम होत नाही. रोगी पशूविषयी त्याच्या मालकाकडून पूर्ण माहिती घेतात. या बाबतीत निष्काळजीपणामुळे क्ष-किरण चित्रणाची पुनरावृत्ती टाळता येते. क्ष-किरणाशी संबंध नसलेल्या लोकांना क्ष-किरण यंत्रापासून दूर ठेवतात.

पशुवैद्यकात क्ष-किरण चिकित्सेचा पुढीलप्रमाणे उपयोग होतो : रोगाचे निदान व खातरजमा करण्यासाठी हिचा वापर करतात. उपचाराची पद्धत व तंत्र ठरविण्यासाठी ही चिकित्सा वापरता येते. उदा., अस्थिभंग झाला आहे का, तो कसा झाला आहे, हे समजल्याने उपचार व दुरुस्ती करणे सोपे होते. पूर्वी लक्षात न आलेली लक्षणे क्ष-किरण चिकित्सेत लक्षात येऊ शकतात. उपचाराचे वेळापत्रक ठरवून त्याची उपयुक्तता पडताळून पाहण्यास मदत होते. शरीरशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने ही चिकित्सा उपयुक्त असून यामुळे सर्वसामान्य शरीररचना व आनुवंशिक आजार कळू शकतात. जनावरांचे वय ठरविण्यासाठी हिची मदत होते. शवविच्छेदन करताना अवयव तपासण्यासाठी क्ष-किरण चिकित्सा उपयुक्त ठरते. प्राण्याची जाती निश्चित करण्यासाठी हिची मदत होते. शरीरशास्त्राचे अध्यापन करताना ही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. पशुवैद्यकीय संशोधनात क्ष-किरण चिकित्सा उपयुक्त ठरू शकते. उदा., अस्थीच्या जखमा भरून येण्याच्या कामी व ऑस्टिओमेड्युलोग्राफीमध्ये.

पशुवैद्यकातील वैशिष्ट्यपूर्ण क्ष-किरण तंत्रे पुढीलप्रमाणे आहेत : (१) डॅक्रोसिस्टोर्‍हायनोग्राफी तंत्र नासिका-नेत्र वाहिनीच्या तपासणीसाठी उपयुक्त असून त्याद्वारे तिच्यात अडकलेले पदार्थ, असणारे अडथळे, जन्मजात दोष, आजार व बदल लक्षात येतात. (२) झायलोग्राफी तंत्रात जनावरांच्या लाला ग्रंथीचा क्ष-किरणांद्वारे अभ्यास करतात. पॅरोटीड ग्रंथी, स्टेन्सन ग्रंथी व लाला ग्रंथी यांच्यातील गळतींचे (स्रावांचे) निदान करण्यासाठी हे तंत्र उपयुक्त आहे. (३) ब्राँकोग्राफी तंत्रात पशूंच्या फुप्फुसादी श्वसनमार्गाचा क्ष-किरणांद्वारे अभ्यास करतात. एका वेळी एकाच फुप्फुसाची प्रतिमा काढतात. क्षयरोगादी रोगांच्या निदानासाठी हे तंत्र उपयुक्त आहे. (४) यूसोग्राफी तंत्रात पचनसंस्थेतील ग्रसिका (अन्ननलिका) या अवयवातील अडथळ्याचे क्ष-किरणाद्वारे निरीक्षण करतात. या तंत्रात बेरियम सल्फेट हे संयुग वापरून क्ष-किरण चित्रण करतात. ग्रसिकेतील अडथळे, पडदे चिकटणे, छिद्रे असणे व इतर आजारांच्या निदानासाठी हे तंत्र उपयुक्त आहे. (५) रॅडिक्युलोग्राफी हे तंत्र ट्रॉमॅटिक रेटिक्युलो पेरिकार्डायटिस (टीआरपी) या आजाराच्या निदानासाठी वापरतात. रवंथ करणाऱ्या (रोमंथी) मोठ्या प्राण्यांच्या आहारात अनावधानाने खिळे, तारा, चुका, सुया, प्लॅस्टिकचे तुकडे, चपला, दोरखंड इ. वस्तू त्यांच्या अमाशयाच्या जालिका या भागात [→ रवंथ करणे] जाऊन बसतात. यामुळे टीआरपी हा भयंकर आजार उद्भवतो. त्याच्या निदानासाठी हे तंत्र भारतात वापरले जाते व ते लोकप्रिय झाले आहे. याचबरोबर क्ष-किरण चिकित्सेत पुढील तपासण्याही करतात. पर्युदर (पेरिटोनियम) निरीक्षणासाठी पेरिटोनिओग्राफी, अशुद्ध रक्तवाहिनीच्या निरीक्षणासाठी व्हेनोग्राफी, हृद्रोहिणीच्या निरीक्षणासाठी अँजिओग्राफी, मांसाच्या निरीक्षणासाठी मायलोग्राफी, शुद्ध रक्तवाहिनीच्या निरीक्षणासाठी आर्टेरिओग्राफी व हाडांच्या निरीक्षणासाठी आर्थोग्राफी ही तंत्रे वापरतात. युरेथ्रोग्राफीद्वारे वृक्कांतील (मूत्रपिंडांतील) व मूत्रवाहिनीतील अडथळे, खडे (अश्मरी), आजार आणि बदल समजू शकतात.

क्ष-किरण परीक्षेसाठी जनावर पुढीलप्रमाणे तयार (सिद्ध) करतात : परीक्षेआधी किमान २४ तास जनावराला उपाशी ठेवतात व आधीच्या बारा तासांत त्याला पाणीही देत नाहीत. परीक्षण करावयाच्या इष्ट भागावर (अवयवावर) क्ष-किरण टाकतात व त्या भागाच्या मागे चित्रफीत धरता येईल अशा पद्धतीने जनावर उभे किंवा आडवे करतात; म्हणजे त्याची अंगस्थिती ठरवितात. बेरियम संयुग (बेरियम सल्फेट) वापरून करा-वयाच्या परीक्षणात १५ गेजच्या सुईने हे संयुग इच्छित ठिकाणी पोहोचेल अशा पद्धतीने त्याचे अंतःक्षेपण करतात.

अशा प्रकारे जनावरांतील अस्थिभंग व टीआरपी हा पोटाचा आजार यांसाठी क्ष-किरण तंत्रे सर्वाधिक वापरली जातात. त्याचबरोबर इतर अवयवांतील अडथळे, कर्करोग, सूज यांच्या निदानासाठी क्ष-किरण चिकित्सा वापरली जात आहे. तिचा वापर वाढत गेल्याने तिच्यात प्रगती होईल, तसेच निदान व उपचार अधिक अचूक होऊ शकतील.

देशपांडे, सु. रा.

पहा : अस्थिभंग; प्रारण चिकित्सा; प्रारण जीवविज्ञान; रोगनिदान; वैद्यक; वैद्यकीय प्रतिमादर्शन; क्ष-किरण.

संदर्भ : 1. Brown, J. G. X-rays and Their Applications, 1975.

         2. Cullinan, J. E. Cullinan, A. M. Illustrated Guide to X-ray Technics, 1980.

         3. Gofman, J. W. O’Connor, E. X-rays : Health Effects of Common Exams, 1985.

         4. Mallot, J. C. Fodor, J. The Art and Science of Medical Radiography, 1993.

         5. Morgan, A. J. X-ray Microanalysis for Biologists, 1985.

         6. Sinohara, K. Yada, K., Eds., X-ray Microscopy in Biology and Medicine, 1990.