सल्फा औषधे : संक्रमणजन्य रोगांच्या उपचारासाठी उपयोगात आणलेल्या मानवनिर्मित औषधांपैकी एक महत्त्वाचा गट म्हणून सल्फा औषधांकडे पाहता येईल. ⇨पॉल अर्लिक यांच्या प्रेरणेने सूक्ष्मजीवांवर मात करणाऱ्या द्रव्यांचा जो शोध विसाव्या शतकाच्या प्रारंभी सुरू   झाला त्यातून सल्फा औषधांची निर्मिती झाली. एककोशिकीय परोपजीवी ( एकपेशी असलेल्या व दुसऱ्या जीवांवर जगणाऱ्या ) प्राण्यांच्या अभ्यासासाठी ‘रंजकद्रव्यांची ऊतकांमधील ( समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांतील ) जैव रेणूंबद्दल आसक्ती ’ हा गुणधर्म उपयोगी पडतो हे अर्लिक व ⇨ गेरहार्ट डोमाक यांना १८८२ मध्ये लक्षात आले होते. त्याचाच आधार घेऊन अशा प्राण्यांवर ( उदा., मलेरिया आणि ट्रिपॅनोसोमा यांचे सूक्ष्मजीव ) मारक परिणाम घडविणारी रंजकद्रव्ये शोधत असताना डोमाक यांना प्रॉन्टोसील हे सल्फा द्रव्य मिळाले. लाल रंगाचा हा पदार्थ वस्त्रोदयोगामधील रंजक-द्रव्यांपैकी एक असल्यामुळे त्याची चाचणी प्रथम आदिजीवांमध्ये आणि नंतर उंदरांमधील स्ट्रेप्टोकॉकस संक्रमणात त्यांनी केली. स्ट्रेप्टोकॉकसापासून संरक्षण देण्यास ते समर्थ असल्याचे १९३५ मध्ये प्रथम लक्षात आले. थोडयाच दिवसांत प्रॉन्टोसिलाची जंतुरोधीक्षमता शरीरातील त्याच्या विघटनामुळे निर्माण होणाऱ्या सल्फानिलामाइड या पांढऱ्या शुभ पदार्थांवर अवलंबून असते, हेही लक्षात आले.

रासायनिक संरचना व जंतुरोधी क्रियेचे स्वरूप : सल्फानिलामाइडाच्या रेणूची संरचना अशी असते :

सल्फानिलामाइड 

या रेणूतील SO.NH2  या गटाला सल्फोनामाइड म्हणतात. त्यामुळे सर्व सल्फा औषधे ‘ सल्फोनामाइड ’ औषधे म्हणून ओळखली जातात. येथील नायट्रोजनाला (N 1) जोडलेल्या हायड्रोजन अणूच्या ऐवजी अन्य रासायनिक गटांची स्थापना करून विविध प्रकारची हजारो द्रव्ये १९३५ नंतर तयार केली गेली. त्यांतील पन्नास – साठ रेणूंचा टिकाव औषधशास्त्रीय आणि विषवैज्ञानिक चाचण्यांमध्ये लागू शकला. प्रत्यक्ष सल्फानिलामाइड हा रेणू १९०८ मध्येच पाऊल गेल्मो यांनी संश्लेषित केला होता. या विविध रेणूंच्या संरचनेवर त्यांची जलविद्राव्यता ( पाण्यात विरघळण्याची क्षमता ), अन्नमार्गातून संरक्तात होऊ शकणारे अभिशोषण, चयापचय ( शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी ) व उत्सर्जन तसेच विषाक्तता अवलंबून असते.

बेंझीन वलयाला गंधकाच्या ( सल्फराच्या ) अणूची थेट जोडणी आणि त्याच्या विरूद्घ टोकाला (पॅरा-स्थानी) ॲमिनोगटाची ( N 4 नायट्रोजन ) उपस्थिती ही दोन वैशिष्टये सल्फा औषधांमध्ये असून ती जंतुरोधक कियेसाठी अत्यावश्यक असतात. पॅरा-ॲमिनो हा गट मुक्त असावा लागतो. प्रॉन्टोसिलाच्या रेणूत तो मुक्त नसून त्याला = NC6H5NH2 असा गट जोडलेला असतो. त्यामुळे त्याला रंग प्राप्त होतो पण जंतुरोधक क्रिया नसते. शरीरात गेल्यावर विघटनाने हा गट अलग होऊन सल्फानिलामाइड मुक्त झाल्यावरच जंतुरोधक क्रिया घडू लागते.

चयापचयी प्रक्रियांमधील पॅरा-ॲमिनो बेंझॉइक ॲसिड (अम्ल) ( H2NC6H5COOH अशी संरचना असलेल्या ) या जैवरसायनाशी सल्फोनामाइड द्रव्यांचे साम्य असते. सूक्ष्मजीवांच्या शरीरात या रसायनाचे रूपांतर फॉलिक अम्लात होऊन त्यामुळे प्यूरीन द्रव्यांची आणि त्यांपासून होणारी डीएनए म्हणजे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल जनुकद्रव्यांची निर्मिती सुरळीत राहण्यास मदत होते. सल्फोनामाइड औषधे या प्रक्रियेत स्पर्धात्मक विरोध करून सूक्ष्मजीवांची वाढ (गुणनामुळे अनेक जीव तयार होण्याची प्रक्रिया ) थांबवितात. संक्रमणकारी जंतूंच्या परिसरात मृत ऊतकांमुळे किंवा पू झाल्यामुळे पॅरा-बेंझॉइक अम्लाचे प्रमाण अधिक असल्यास स्पर्धात्मक विरोधावर मात करून सूक्ष्मजंतूंची वाढ सुरू राहते. त्यामुळे जखमा स्वच्छ ठेवणे आवश्यक ठरते. सल्फा औषधे जंतूंची केवळ वाढ थांबवितात, त्यांचा नाश करण्यास ती असमर्थ असतात रूग्णाची प्रतिरक्षायंत्रणा ( रोगप्रतिकारक्षमता ) हे कार्य करते. तिचे कार्य पूर्ण होईपर्यंत जंतूंची वाढ थांबवून नैसर्गिक प्रतिकारशक्तीला साह्य करणे  सल्फा औषधांमुळे सुकर होते. ज्या कोशिकांमध्ये फॉलिक अम्ल निर्माण करण्याची आवश्यकता नसते ( कारण वनस्पतिजन्य फॉलिक अम्ल वापरण्यास त्या समर्थ असतात. उदा., सस्तन प्राण्यांच्या म्हणजे रूग्णाच्या ऊतकांतील कोशिका) त्यांच्यावर सल्फा औषधांचा काहीही परिणाम होत नाही.

प्रारंभीच्या काळात ज्या संक्रमणांवर सल्फा औषधे अत्यंत प्रभावशाली उपचार म्हणून उपयोगी ठरली, त्यांपैकी अनेकांमध्ये हळूहळू ती निष्प्रभ होत आहेत असे आढळले. पॅरा-ॲमिनो बेंझॉइक अम्लाच्या चयापचयासाठी सल्फाच्या रोधक परिणामांपासून मुक्त अशी एंझाइमे या जंतूंमध्ये निर्माण झाली असावीत किंवा पर्यायी मार्गांनी फॉलिक अम्लाची निर्मिती होत असावी. यांशिवाय इतरही अनेक प्रकारांनी सल्फा औषधांना निष्प्रभ करणारे सूक्ष्मजंतू आढळले आहेत. या सर्व घटनांचा परिणाम आणि १९४० नंतर पेनिसिलिनासारख्या अधिक प्रभावशाली अशा प्रतिजैविक  ( अँटिबायॉटिक ) द्रव्यांची उपलब्धता यांमुळे सल्फा औषधांच्या उपयोगांवर मर्यादा पडत गेल्या.

चयापचय आणि वर्गीकरण : सर्व सल्फा औषधे मर्यादित प्रमाणात पाण्यात विरघळू शकतात. त्यांचा उपयोग मुख्यत: मुखावाटे घेण्याच्या गोळ्यांच्या स्वरूपात केला जातो. क्वचित प्रसंगी सोडियम सल्फाडायाझिनासारखे जलविद्राव्य लवण नीलेतून अंत:क्षेपणाने (इंजेक्शनाने ) दिले जाते. सिल्व्हर सल्फाडायाझीन भाजण्याच्या जखमांवर बाहेरून लावण्यासाठी उपयुक्त असते. गोळीच्या रूपात घेतलेले सल्फा औषध लवकरच रक्तात शोषले जाते व वृक्कांवाटे (मूत्रपिंडावाटे ) लघवीतून उत्सर्जित होऊ लागते. मूत्राच्या अम्लतेमुळे सल्फा द्रव्याचे सूक्ष्म स्फटिक मूत्रपिंडात व मूत्रमार्गात होण्याची शक्यता पूर्वी लक्षात घ्यावी लागे. त्यासाठी मूत्रास अल्कधर्मी करणारी सोडियम सायट्रेटासारखी द्रव्ये आणि भरपूर पाणी पिणे हे उपाय असत. सध्या जी औषधे प्रचलित आहेत, त्यांच्या मात्रा कमी, जलविद्राव्यता अधिक आणि मात्रेची वारंवारता मर्यादित असल्यामुळे ही समस्या क्वचितच उद्‌भवते. यकृतात सल्फा औषधांचा काही अंश कमी विद्राव्य आणि जंतुरोधकतेत अकार्यक्षम अशा ॲसिटिलसल्फात रूपांतरित होतो. सर्व सल्फा द्रव्ये कमी-अधिक प्रमाणात रक्तातील अल्ब्युमीन प्रथिनांशी बद्घ होतात, त्यामुळे त्यांच्या उत्सर्जनास विलंब होऊन परिणाम दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.


चयापचयाच्या या वैशिष्टयांमुळे आणि संख्यात्मक विविधतांमुळे सल्फा औषधांचे पुढील स्थूल वर्ग पडतात : (१) मूत्रावाटे त्वरित उत्सर्जन होत असल्यामुळे रक्तातील पातळी टिकवून ठेवण्यासाठी दर चार ते सहा तासांनी मात्रा देणे आवश्यक असणारी द्रव्ये. पातळी कमी झाल्यास सूक्ष्मजंतूंची वाढ पुन्हा होऊ लागते. तसेच जंतूंची प्रतिरोधक शक्ती वाढण्यास मदत होते. या वर्गातील प्रारंभी वापरात असलेली बहुतेक सर्व औषधे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या उपयोगात असलेली फारच थोडी औषधे आहेत. उदा., सल्फामेथिझोल, सल्फासायटीन, सल्फा आयसोक्सॅझोल, सल्फाडायाझीन. (२) उत्सर्जन मंदगतीने झाल्यामुळे सुरूवातीस मोठी मात्रा देऊन नंतर दर बारा तासांनी लहान मात्रेने पातळी टिकविणे शक्य असलेली औषधे. उदा., सल्फामिथॉक्सॅझोल हे सर्वाधिक उपयोगात आहे. विशेषत: ट्रायमेथोप्रिम या जंतुरोधक ( सल्फा नसणाऱ्या ) द्रव्याबरोबर त्याचे मिश्रण प्रभावशाली असते. (३) प्रथिनबद्घतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे दीर्घकाळ परिणाम करणारी. उदा., सल्फाडॉक्सिनाची दर आठवडयास एक मात्रा देणे पुरेसे असते. या औषधाचे पायरिमेथॅमिनाबरोबर केलेले मिश्रण मलेरियाच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरले आहे. (४) पचनमार्गातून शोषण न झाल्यामुळे केवळ आंत्रविकारासाठी  ( आतड्याच्या विकारासाठी ) उपयुक्त औषधे. उदा., सल्फासॅलॅझीन हे बृहदांत्रदाहात ( मोठया आतड्याच्या दाहामध्ये ) वापरले जाते. (५) त्वचा, डोळे यांच्या विकारासाठी केवळ स्थानिक जंतुरोधक वापरण्याची औषधे. उदा., सल्फासेटॅमाइड, सिल्व्हर सल्फाडायाझीन, सल्फामायलॉन (माफेनिड ). मोठया प्रमाणात त्वचा भाजल्यामुळे झालेल्या जखमांवर या औषधांचा उपयोग करता येतो. डोळ्यांमध्ये खुपऱ्या झाल्यास ही औषधे वापरली जातात.

जंतुरोधक परिणामांचा वर्णपट व उपयोग : सल्फा औषधांचा उपयोग स्ट्रेप्टोस्टॅफिलो – न्यूमो – इ. प्रकारांच्या ‘कॉकस ’ ( गोलाणू ) जंतूंविरूद्ध करण्यात प्रारंभी जेवढे यश मिळाले तेवढे नंतर मिळेनासे झाले. पेनिसिलीन व इतर प्रतिजैविकांमुळे त्यांचा वापरही कमी झाला. तरीही कोणते औषध उपयुक्त ठरेल याची प्रयोगशाळेत आधी चाचणी केल्यास ( विवशता किंवा संवेदिता चाचणी ) अनेक संक्रमणांत ही औषधे उपयुक्त ठरतात. उदा., मेनिंगोकॉकस, गोनोकॉकस, शिगेला, एश्चेरिक्रिया कोलाय, क्लॅमिडीया, बूसेला, अँथॅक्स, प्लेग, पटकी  ( कॉलरा ) इत्यादी. प्रतिजैविकांचा उपयोग होत नसल्यास किंवा रूग्णाला त्यांची ⇨ ॲलर्जी असल्यास दुसऱ्या श्रेणीची निवड म्हणून ही औषधे अनेकदा दिली जातात. मुख्यत: श्वसनमार्गाची संक्रमणे, मूत्रमार्गाचे विकार, नेत्रविकार, गुप्तरोग, भाजल्याच्या जखमा यांसारख्या प्रसंगी सु. ५ ते ७ दिवस सल्फा औषधे सुरक्षितपणे वापरता येतात. अधिक दीर्घकाळ टिकणाऱ्या व गंभीर स्वरूपाच्या संक्रमणांत सहसा त्यांची निवड केली जात नाही.

अनिष्ट परिणाम : सल्फा औषधांच्या अतिरिक्त मात्रेमुळे किंवा आवश्यक मात्रा दीर्घकाळ घेतल्यामुळे मळमळणे, उलट्या होणे, जुलाब यांसारखे अनिष्ट परिणाम काही व्यक्तींमध्ये आढळून येतात. तसेच मूत्रमार्गाचा दाह, मूत्रात स्फटिकांची निर्मिती, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड यांसारख्या समस्या क्वचित प्रसंगी उद्भवतात. नव्या कमी मात्रेत परिणामकारक सल्फा द्रव्यांमुळे असे सर्व दुष्परिणाम आता कमी झाले आहेत.

या औषधांना अतिसंवेदनशील असणाऱ्या व्यक्तींमध्ये अल्प मात्रेतही ॲलर्जीच्या यंत्रणेतून कार्यान्वित होणाऱ्या प्रतिक्रिया आढळू शकतात. त्वचेवर पुरळ येणे, त्वचेची सालपटे निघाल्यासारखी स्थिती होणे, सूर्यप्रकाशात उघडी असणारी त्वचा जंबुपार किरणांमुळे सुजणे व लाल होणे, रक्तातील कोशिकांच्या निर्मितीत व्यत्यय आल्यामुळे श्वेतकोशिकांचे प्रमाण घटणे, तांबडया कोशिकांचे लयन (फुटणे) झाल्याने पांडुरोग यांसारख्या एखादया परिणामातून ही ॲलर्जी प्रकट होऊ शकते. औषधजन्य ज्वरही मूळच्या संक्रमणाचा नाश झाल्यानंतर दिसू लागतो. रूग्णाचा पूर्वेतिहास जाणून सल्फा औषधे टाळणे अत्यंत आवश्यक असते.

प्रथिनांशी बद्ध होण्याच्या गुणधर्मामुळे सल्फा औषधे इतर औषधांशी स्पर्धा करून त्यांची प्रथिनबद्धता कमी करू शकतात. अशी औषधे रक्तात मुक्त स्वरूपात अधिक प्रमाणात आल्याने त्यांच्या दृश्य परिणामात वाढ होऊ शकते व त्यांची मात्रा कमी करावी लागते. उदा., रक्तक्लथन-रोधक ( रक्त गोठण्यास विरोध करणारी ) औषधे व मधुमेहावरील औषधे (मुखाने घ्यावयाची ), थायाझाइड वर्गातील मूत्रवर्धक ( मूत्रल ) द्रव्ये.

या सर्व परिणामांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास सल्फा औषधे आजच्या प्रतिजैविकांच्या काळातही उपयुक्त ठरू शकतात.

पहा : रासायनी चिकित्सा.

संदर्भ : 1. Barar, F. S. K. Textbook of Pharmacology, New Delhi, 1994.

             2. Hardman J. G. Limbird, L. E. The Pharmacological Basis of Medicine, New York, 2001. 

             3. Satoskar,  R. S. Bhandarkar, S. D. Ainapure, S. S. Pharmacologyand Pharmacotherapeutics, Mumbai, 2001.

श्रोत्री, दि. शं.