कॉर्टिसोन : अधिवृक्क ग्रंथीच्या (→अधिवृक्क ग्रंथी) बाह्यकापासून स्रवणाऱ्या अनेक हॉर्मोनांपैकी [वाहिनीरहित ग्रंथीपासून स्रवणाऱ्या व रक्तात एकदम मिसळणाऱ्या पदार्थांपासून, →हॉर्मोने] एका हॉर्मोनास कॉर्टिसोन म्हणतात.

 कॉर्टिसोनाचे रासायनिक सूत्र  C21H28O5 असे असून त्याची संरचना खालीलप्रमाणे आहे.

कॉर्टिसोनाशिवाय कॉर्टिसोल, कॉर्टिकोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन इ. हॉर्मोनेही अधिवृक्क ग्रंथीतून स्रवतात आणि त्या सर्वांना कॉर्टिकोस्टेरॉइडे असे म्हणतात [→स्टेरॉल व स्टेरॉइडे]. कॉर्टिकोस्टेरॉइडे संश्लेषणाने (कृत्रिम रित्या) बनविता येतात. डी-ऑक्सिकोलिक अम्लापासून मोठ्या प्रमाणात तयार करण्याची जुनी पद्धत अजूनही सुधारून वापरली जाते. या प्रक्रियेत काही वनस्पतींच्या अर्कांवर सूक्ष्मजंतूंची प्रक्रिया केली जाते. या अर्कांमध्ये स्टेरॉइडांचे पूर्वद्रव्ये (स्टेरॉइडे ज्याच्यापासून तयार होतात असे पदार्थ) असतात. १९५१ मध्ये कॉर्टिसोनाचे संपूर्ण संश्लेषण करण्यात यश आले.

 कॉर्टिसोनाचे स्फटिक रंगहीन असून त्याचा वितळबिंदू २१५ से. आहे. याच तापमानाला त्याचे अपघटन (लहान रेणूंत रूपांतर होतेे). बाजारात मिळणारे २१-मोनोऍसिटेट हे त्याचे रूप १४५ से. ला वितळते व त्याचे १५३ से. ला पुनर्स्फटिकीभवन होते व ते पुन्हा वितळते.

 कॉर्टिसोन व तत्सम संयुगे यांचा कार्बोहायड्रेट, प्रथिन आणि वसा (स्निग्ध पदार्थ) यांच्या चयापचयावर (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींवर) परिणाम होतो. ही सर्व संयुगे यकृतातील ग्लायकोजेनाचा साठा वाढवितात म्हणून त्यांना ग्लुकोकॉर्टिकॉइडे असेही म्हणतात. कॉर्टिसोन मूत्रपिंडावर परिणाम करते. त्यामुळे क्षार (अल्कली) व पाणी हे शरीराबाहेर टाकले न जाता त्यांचा शरीरात संचय होतो. अनेक रोगांमध्ये होणरा शोथ (दाहयुक्त सूज) कॉर्टिसोनामुळे थांबतो. या गुणधर्मामुळे ते एक प्रभावी औषध बनले आहे. अधिवृक्क ग्रंथीच्या स्रावाच्या न्यूनतेमुळे उत्पन्न होणाऱ्या रोगांवर (उदा., ऍडिसन रोग) कॉर्टिसोन एक प्रभावी व पर्यायी औषध आहे. संधिवात, विशिष्ट ऍलर्जी, दमा, डोळ्यांचे व त्वचेचे रोग इ. रोगांस कॉर्टिसोन उपयुक्त ठरले आहे. या रोगांची कारणे कॉर्टिसोन नाहीशी करू शकत नाही. पण त्यांमधील शोथांवर परिणाम करून रोगांचा जोर कमी करते. कॉर्टिसोन जितके प्रभावी औषध आहे तितकेच त्याचे दुष्परिणामही जोरदार असतात. ते फार काळ देत राहिल्यास रक्तदाब वाढणे, मधुमेहात तीव्रता वाढणे, सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या काही सांसर्गिक रोगांचा जोर वाढणे, लहान मुलांमध्ये वाढ रोखली जाणे इ. दुष्परिणाम आढळून येतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्याचा वापर करणे धोकायदायक असते.

 

मिठारी, भू. चिं. भालेराव, य. त्र्यं.