आंत्रज्वर: साल्मोनेला टायफाय या नावाच्या व तत्सदृश जंतूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या तीव्र सांसर्गिक रोगाला आंत्रज्वर असे म्हणतात. यालाच संततज्वर, विषमज्वर, मधुरा, टायफॉइड फीव्हर व आंत्रिक सन्निपात अशीही नावे आहेत.

या रोगात संततज्वर, प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ), आंत्रशोथ (आतड्याचा सूजयुक्त दाह) ही प्रमुख लक्षणे असून लघ्वांत्रात (लहान आतड्यात) व्रणोत्पत्ती आणि आंत्रबंधातील (आतडे उदराच्या पश्चमित्तीला बांधणाऱ्या) तंतुमय दुहेरी थरातील, लसीका-ग्रंथि-वृद्धी (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहांकडून म्हणजे ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असलेला द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या म्हणजे लसीकवाहिन्यांच्या मार्गावरील ग्रंथींची वाढ) ह्या प्रमुख विकृती दिसतात.

साल्मोनेला टायफाय हे जंतू पाणी आणि अन्न यांबरोबर पोटात जाऊन लघ्वांत्रातील लसीका -वाहिन्यांच्या द्वारे सर्व शरीरभर पसरतात. या दृष्टीने या रोगाला जंतुरक्तता असेही म्हणता येईल. या जंतूंची लघ्वांत्रातील लसीका क्षेत्रे, आंत्रबंधातील लसीका-ग्रंथी, प्लीहा, यकृत, पित्ताशय वगैरे ठिकाणी विशेष वाढ होते. आंत्र, वृक्क (मूत्रपिंड), यकृत वगैरे अंतस्यांतून (उदराच्या पोकळींतील इंद्रियांतून) हे जंतू शरीराबाहेर पडतात.

संप्राप्ती: सा. टायफाय हा लांबट आकाराचा, पक्ष्माभिकायुत (सूक्ष्म केस असलेला) जंतू असून त्याची लांबी सु. ३ मायक्रॉन (१ मायक्रॉन = ०·००१ मिमी.) आणि जाडी सु. ०·६ मायक्रॉन असते. या जंतूला बाहेरून पक्ष्माभिका (सूक्ष्म केस) असल्यामुळे तो गतिशील असतो. प्रयोगशाळेत नेहमी वापरण्यात येणाऱ्या माध्यमावर त्याची सहज वाढ होते. उकळत्या पाण्याइतक्या तापमानात हा जंतू ताबडतोब मरतो. ६० से. तापमानात तो १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. मात्र बर्फात तसेच साध्या व खाऱ्या पाण्यातही तो पुष्कळ वेळ जिवंत राहू शकतो. या जंतूच्या शरीरापासून आणि पक्ष्माभिकेपासून दोन वेगवेगळी प्रतिजने [→प्रतिजन]उत्पन्न होतात. त्यांना अनुक्रमे  आणि एच  प्रतिजने असे म्हणतात. या प्रतिजनांच्या साहाय्यानेच या रोगाचे निदान करण्याचा सुलभ उपाय शोधून काढण्यात आलेला आहे. एच प्रतिजने ही त्यातल्या त्यात अधिक प्रभावी असतात.

आंत्रज्वर सर्व देशांत आढळतो. विशेषतः  उष्णकटिबंधात त्याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसांत त्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसतो. सर्व वयांच्या लोकांमध्ये हा रोग होत असला तरी तरुणांत त्याचे प्रमाण अधिक असते.

एकदा हा रोग होऊन गेला म्हणजे बहुधा तो पुन्हा होत नाही. परंतु दोन-तीन वेळा हा रोग एकाच व्यक्तीला झाल्याची तुरळक उदाहरणे आहेत. अशक्तपणा, अतिश्रम वगैरे कारणांमुळे या रोगाचे प्रमाण अधिक असते. यात्रा, वसतिगृहे, खानावळी, युद्धजन्य परिस्थिती अशा ठिकाणी या रोगाचे प्रमाण अधिक दिसते, कारण त्या वेळी पुष्कळ लोक एकाच वेळी एकत्र येत असल्यामुळे संसर्ग होण्याचा अधिक संभव असतो. शिवाय अशा प्रसंगी स्वच्छतेबद्दल विशेष काळजी घेणे शक्य नसते. प्रतिबंधी लस टोचल्यामुळे या रोगापासून संरक्षण मिळू शकते, असे सिद्ध झालेले आहे.

या रोगाचा संसर्ग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे होऊ शकतो. एखाद्या रोग्याची शुश्रूषा करताना त्याच्या मलमूत्राशी संबंध येण्याचा अधिक संभव असल्यामुळे प्रत्यक्ष संसर्ग होऊ शकतो. अन्न, पाणी, दूध, फळे, भाज्या वगैरे दूषित असल्यास आणि त्या स्वच्छ न धुता अथवा न उकळता खाण्यात आल्यास हा रोग अप्रत्यक्षपणे होऊ शकतो. रोग होऊन गेलेल्यांपैकी काही व्यक्तींच्या मलमूत्रातून रोगजंतू बाहेर पडून त्यांच्या संसर्गामुळेही हा रोग होऊ शकतो. कित्येक वेळा रोग होऊन गेल्याचे पूर्ववृत्त नसूनही काही व्यक्तींच्या मलमूत्रात हे जंतू आढळतात. अशा व्यक्तींनावाहक अशी संज्ञा असून अशा वाहकांमार्फत रोगाचा फैलाव होऊ शकतो.

विकृती: लघ्वांत्रातील लसीकांमधून जंतूंचा प्रवेश शरीरात होतो. तेथून ते जंतू यकृत, प्लीहा आणि आंत्रबंधातील लसीका ग्रंथीमध्ये जाऊन तेथे त्यांचे प्रजनन (वाढ व प्रजोत्पत्ती) होत राहते. या कालाला परिपाककाल (जंतूंचा शरीरात प्रवेश झाल्यापासून प्रत्यक्ष रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतचा काळ) असे म्हणतात. प्रजनन होऊन जंतू रक्तात येऊ लागले म्हणजे रोग लक्षणे दिसू लागतात.

या रोगातील मुख्य विकृती लघ्वांत्रातील लसीका क्षेत्रात (पेयर क्षेत्रात) दिसते. त्या ठिकाणी शोथ (दाहयुक्त सूज) उत्पन्न होऊन श्लेष्मावरणाचा (आतड्याच्या आतील बाजूस अस्तरासारख्या असणाऱ्या बुळबुळीत आवरणाचा) नाश झाल्यामुळे व्रण तयार होतात. हे व्रण लांबट आकाराचे असून त्यांच्या कडांपेक्षा तळ अधिक रुंद असतो. व्रणाच्या तळाशी लघ्वांत्रातील स्नायूचा थर असतो. क्वचित मग अधिक खोल जाऊन

आंत्रज्वराचा आलेख. (अ) पहिजे जवळजवळ ५ दिवस : रोज अधिक चढून कमी उतरणारा (सोपान) ताप. (आ) ६ ते १० व्या दिवसापर्यंत : चढलेलाच रहाणारा ताप. (इ) १० ते १४ व्या दिवसापर्यंत : थोडा उतरलेला ताप. (इ) १४ ते २१ व्या दिवसापर्यंत : क्रमशः २१ व्या दिवशी प्राकृतिक होणारा ताप. (तापाचे आकडे फॅरेनहाइटमध्ये)

त्यामुळे आंत्रभेदही होऊ शकतो. आंत्रबंधातील लसीका-ग्रंथी आणि प्लीहा सुजून मोठ्या होतात. यकृत, हृद्‌स्‍नायू वगैरे ठिकाणीही या जंतूंच्या विषामुळे विकृती उत्पन्न होऊन त्यांची कार्ये नीट चालत नाहीत.

लक्षणे : ३ दिवसांपासून २० – २२ दिवसांच्या परिपाककालानंतर रोग्याला अस्वस्थता, शिरःशूल (तीव्र डोकेदुखी), क्षुधानाश आणि सर्वांगात वेदना ही लक्षणे दिसू लागतात. हळूहळू ज्वर येऊन तो वाढत जातो. पहिल्या आठवड्यात ज्वर ३६·७ से. (९८·०६ फॅ.) पासून वाढत वाढत सु. ३९·५ से. (१०३·१ फॅ.) इतका वाढतो. अतितीव्र प्रकारात तो ४०·५ से. (१०४·९ फॅ.) पर्यंतही चढतो. सकाळी ज्वर एखादा अंश कमी परंतु संध्याकाळी १·५ ते २ पर्यंत चढत जाऊन दुसऱ्या आठवड्यात सारखाच ३९ ते ४० से. इतका सतत राहतो. त्वचा कोरडी आणि उष्ण, दाट साखा असलेली व कोरडी जीभ, थोडी फुगवटी असलेले पोट, अतिसार किंवा मलावरोध वगैरे लक्षणे या काळात दिसून येतात. प्लीहा हाताला मोठी व अगदी मऊ उशी लागते. या प्राथमिक अवस्थेत विशेष लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्वराच्या मानाने नाडी अगदी संथ चालत असते. तापमानाच्या अनुरोधाने मूत्राचे प्रमाण कमी असून मूत्र लाल रंगाचे असते. पहिल्या आठवड्याच्या अखेरीअखेरीस क्वचित मान, छाती, पोट व तोंड या ठिकाणी बारीकबारीक लाल उत्स्फोट (पुरळ) दिसू लागतात.

दुसऱ्या आठवड्यात लक्षणांचा जोर असतो. ज्वर सारखाच ३८ ते ४० से. पर्यंत राहतो डोके दुखते, सारखी तहान लागते. तीव्र प्रकारात वात, बडबड, बेशुद्धी वगैरे लक्षणे दिसतात. बहुधा या आठवड्यात अतिसार होतो. दर वेळेला थोडाथोडा पिवळट हिरवट रंगाचा दुर्गंधियुक्त मळ पडतो. पोट फुगलेले असून प्लीहा बरीच वाढलेली असते. नाडी पहिल्या आठवड्यापेक्षा जलद चालते. खोकला, दम वगैरे लक्षणेही थोडीबहुत दिसू लागतात. तीव्र प्रकारातील आंत्रज्वरावस्था या आठवड्यातच दिसते. या अवस्थेत रोगी बेशुद्ध, उताणा झोपलेला असून एकसारखी असंबद्ध बडबड करीत असतो. हाताचे चाळे सारखे चालू असतात. रोग या आठवड्यात मारक होऊ शकतो. बेशुद्धीची तीव्रता वाढत जाऊन हृदयस्‍नायू अशक्त बनतात व त्यामुळे किंवा आंत्रभेद वा आंत्रातून रक्तस्राव होऊन रोग्याला मरण येणे शक्य असते.

तिसऱ्या आठवड्यात ताप हळूहळू कमीकमी होत जातो. रोग्याची बेशुद्धी आणि गुंगी कमी होत जाते. जीभ हळूहळू स्वच्छ होऊ लागते. रोग्याला थोडीथोडी भूक लागू लागते. क्वचित प्रसंगी या तिसऱ्या आठवड्यात आंत्रज्वरावस्था येते परंतु साधारण प्रकारात तिसरा आठवडा म्हणजे सुधारणेचा आठवडा ठरून सु. २० – २५ दिवसांनी ज्वर पुरा नाहीसा होतो. पुढे हळूहळू रोगी प्राकृतावस्थेला येतो. ह्या काळामध्ये रोग्याला विशेष जपण्याची जरूरी असते. रोगी अशक्त असल्यामुळे चालणे, हालचाल करणे व आहार यांबद्दल विशेष काळजी घ्यावी लागते. काही रोग्यांमध्ये आंत्रज्वर उलटण्याची भीती असते. आधीच अशक्त झालेल्या रोग्यामध्ये ज्वर उलटला तर तो विशेष चिंताजनक ठरतो.

उपद्रव : आंत्रज्वरावस्थेचे वर्णन वर केलेच आहे. याशिवाय मारक उपद्रव म्हणजे लघ्वांत्रातील व्रणामधून रक्तस्राव होणे. कित्येक वेळा हा रक्तस्त्राव फार मोठ्या प्रमाणात झाला तर तो मारक ठरतो. आंत्रभेद हा दुसरा मारक उपद्रव आहे. भेद झाल्याबरोबर शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करून आंत्राला पडलेले भोक शिवून टाकणे हा एकच उपाय आहे. भेद झाल्यानंतर अधिक वेळ गेला तर पर्युदरशोथाची (पोटातील इंद्रियांवरील आवरणाला येणाऱ्या सुजेची) सर्व लक्षणे दिसतात.

निदान : शिरःशूल आणि आंत्रशोथ ही लक्षणे पुष्कळदा रोगाच्या सुरुवातीचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात. रोज चढत जाणारा ज्वर, संथ नाडी वगैरे लक्षणांचीही निदानास मदत होते. यांशिवाय पुढील गोष्टींमुळे निदान निश्चित करता येते : (१) रक्तपरीक्षा : पहिल्या काही दिवसांत रक्तातील श्वेतकोशिकांचे (पांढऱ्या पेशींचे) प्रमाण कमी असते, ही गोष्ट इतर सांसर्गिक रोग नाही हे निदान करण्यास उपयुक्त असते. पहिल्या आठवड्यात रक्तामध्येच जंतू असल्यामुळे त्यांचे शरीराबाहेर संवर्धन करता येते व त्यामुळे निदान निश्चित होऊ शकते. (२) मलपरीक्षा : मलामधील जंतूंचे संवर्धन करणे हे काही वेळा उपयुक्त ठरते. (३) मूत्रपरीक्षा : जंतुसंवर्धन आणि डाय-ॲझो विक्रिया (डाय ॲझोबेंझीन सल्फोनिक अम्ल व अमोनिया मूत्रात घातल्यास गुलाबी किंवा तांबडा रंग येणारी विक्रिया) या मूत्रपरीक्षांचा निदानास उपयोग होतो. (४) जंतुसमूहन परीक्षा : या परीक्षेला ‘विडाल परीक्षा’ अथवा ‘विडाल विक्रिया’ असे म्हणतात. या परीक्षेस रोग्याचा रक्तरस (सर्व रक्ताची गुठळी झाल्यावर राहिलेला पिवळसर व न गोठणारा कोशिका-विरहित द्रव) विविध प्रमाणात पातळ करून, त्यामध्ये आंत्रज्वर जंतू मिसळतात. रक्तरसात प्रतिपिंडे (प्रतिजनांना विरोध करणारे विशिष्ट पदार्थ) तयार झाली असल्यास आंत्रज्वर जंतूंचे समूहन (गठ्ठे बनणे) होते. १ : १२८ एवढ्या प्रमाणात रक्तरस पातळ केल्यावरही जर जंतूंचे समूहन झाले, तर आंत्रज्वराचे निदान पक्के होते. या परीक्षेमध्ये  आणि एच प्रतिजनांचा उपयोग केल्यास निदानास अधिकच मदत होते.

चिकित्सा: प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांपैकी क्लोरँफिनिकॉल हे औषध अत्यंत गुणकारी असून ते प्रचारात आल्यापासून आंत्रज्वराची भीती पुष्कळ कमी झाली आहे. हे औषध दर ३ ते ६ तासांनी देऊन ज्वर थांबल्यावर हळूहळू कमी करावे लागते, म्हणजे ज्वर उलटण्याची भीती राहत नाही.

रोग्याला हवेशीर खोलीत स्वस्थ निजवून ठेवावे. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास व श्रम होणार नाहीत अशी शुश्रूषेची व्यवस्था असावी. आहार शक्य तो दूध व इतर पेय पदार्थांचा असावा. रोज अंग पुसून घेणे, जरूर तर मलोत्सर्गासाठी बस्ती देणे वगैरे गोष्टींमुळे रोग्याला पुष्कळ आराम वाटतो. तसेच आहारात जीवनसत्त्वे (विशेषतः व जीवनसत्त्व) भरपूर प्रमाणात द्यावी लागतात.

प्रतिबंध: अन्न, पाणी, दूध, फळे, भाज्या स्वच्छ करून व उकळून घेतल्यास हा रोग होण्याचा संभव नाहीसा होतो. एखाद्या रोगग्रस्त प्रदेशात जाणे जरूर पडल्यास प्रतिबंधक लस टोचून घेणे इष्ट असते. या लशीचा प्रतिबंधक परिणाम ६ ते १२ महिने टिकतो. कित्येक लोक दर वर्षी लस टोचून घेण्याचा परिपाठ ठेवतात.

परांत्रज्वर : (पॅराटायफॉइड). साल्मोनेला पॅराटायफाय या जंतूच्या संसर्गामुळे हा रोग होतो. हा जंतू आंत्रज्वर-जंतूच्या जातीचाच असून त्यामुळे होणारी लक्षणे तशीच पण सौम्य असतात.[→परांत्रज्वर].

अभ्यंकर, श. ज.

आयुर्वेदीय चिकित्सा:आंत्रातील याचे विकृतिस्थान पित्तस्थानाचे व वातस्थानाचे संधिस्थान आहे, दुष्टीही वाताधिक किंवा पित्ताधिक असते. हा विषमज्वर नसून समज्वर आहे. हा ज्वर सातत्याने ७ किंवा १४ किंवा २१ दिवस राहणारा आहे. ज्वर सौम्य असला किंवा योग्य उपचार झाले तर तो ७ दिवसांतही उतरतो. अन्यथा पुढच्या मुदतीत उतरतो. उलटला तर ४२ दिवसही लागतात. ताप क्रमाने चढतो. नाडी तापमानाच्या प्रमाणापेक्षा कमी असते.

उपचार: अमावस्या असल्यास लंघन द्यावे व तहानेकरिता पाणी उकळून द्यावे वाताधिक्य असेल तर सुंठ व नागरमोथा घालून उकळलेले द्यावे पित्ताधिक्य असेल तर चंदन, वाळा व पित्तपापडा घालून उकळून थंड करून द्यावे. पक्वावस्था आल्यावर आमदोष पचल्यावर भाताचे वा गव्हाचे सवयीप्रमाणे पातळ पेजेपासून घनान्नापर्यंत क्रमाने अन्न द्यावे, वातभूयिष्ठ ज्वरात झोप येत नसेल तर आवळकाठी, सुंठ व खडीसाखर घालून पेज इ. द्यावे. तसेच जवाचे पीठ, पिंपळी व आवळकाठी घालून शिजविलेल्या पेजी द्याव्यात. तहान शमेल, झोप व घाम येण्यास मदत होईलमलावरोध असेल तर गरम ४ तोळे नारायण तेलाची पिचकारी देत जावी. यामुळे मळ व वात साफ होऊन बडबड इ. वाताचे उपद्रवही होणार नाहीत. पिंपळमूळ, गुळवेल व सुंठ यांचा काढा द्यावा किंवा लक्ष्मीनारायण रस १ गुंज आल्याच्या रसातून, तसाच सूतशेखर १ गुंज, आलटून पालटून तीन तीन वेळा द्यावा.

उपद्रव : बडबड असल्यास पिचकारी तसेच समीरपन्नग किंवा महावातविध्वंस आलेरस, विड्याच्या पानाचा रस व मध यांतून चाटवावा. थोडा पित्ताचा संबंध असल्यास सूतशेखर वरील अनुपानांतून द्यावा ज्वर निघाल्यावरही बडबड राहिली किंवा उत्पन्न झाली तर मळ व वाताचा संचय काढून टाकण्याकरिता कोमट नारायण तेलची पिचकारी देऊन वरील औषधे द्यावीत.

पित्तभूयिष्ठ ज्वरात वाताचा संबंध असल्यास नागरमोथा, इंद्रजव व सुंठ यांचा काढा द्यावा किंवा लक्ष्मीनारायण व सूतशेखर मोरावळ्यात ६ वेळा द्यावा. वाताचा संबंध नसल्यास मनुका, अनंतमूळ, नागरमोथा व चंदन यांचा काढा वा पेज खडीसाखर घालून द्यावी सूतशेखर, कामदुधा ही दूध, खडीसाखर वा मोरावळ्यात देत जावी. गुदमार्गाने रक्तस्राव होतो, तेव्हा मोचरससिद्ध दूध किंवा काळ्या तिळाची चटणी शेळीच्या दुधातून किंवा भाजलेल्या कांद्याचा रस थोड्या थोड्या वेळाने पाजावा. चंद्रकला, भौक्तिकभस्म, कामदुधा वरील द्रव्यांबरोबर किंवा शतावरी घृतातून वा अडुळसासिद्ध तुपातून द्यावी. काळी माती वरील द्रवात भिजवून पोटावर तिचा लेप द्यावा व दूध-तूप वा नारळाचे पाणी यांचा गुदद्वाराने थंड बस्ती द्यावा. काळ्या तिळाची चटणी, कांद्याचा रस, शेळीचे दूध यांचा अन्नातूनही उपयोग करावा.

नाडी अशक्य होत असेल तर लक्ष्मीविलास गुटी, षड्गुण गंधकजारित मल्लसिंदूर, महालक्ष्मीविलास रस वा हेमगर्भ यांपैकी योग्य ते आले, विड्याची पाने यांचा रस व मध यांतून चाटवावे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री