हॅर्शी, ॲल्फ्रेड डे : (४ डिसेंबर १९०८–२२ मे १९९७). अमेरिकन जीवशास्त्रज्ञ. त्यांना सूक्ष्मजंतुभक्षींच्या (सूक्ष्मजंतूस संसर्ग करणाऱ्या विषाणूंच्या) संशोधनाबद्दल मॅक्स डेलब्य्रूक आणि साल्व्हाथॉर एडवर्ड लूर्या यांच्यासमवेत १९६९ सालचे शरीरक्रियाविज्ञान अथवा वैद्यक या विषयातील नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.

ॲल्फ्रेड डे हॅर्शी

हॅर्शी यांचा जन्म ओवोसो (मिशिगन) येथे झाला. त्यांनी रसायनशास्त्र विषयात मिशिगन स्टेट कॉलेजमधून (आता मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी) पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९३४). नंतर त्यांनी सेंट लूइस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथे प्राध्यापक म्हणून कामास सुरुवात केली. त्यांनी १९५० मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाचा राजीनामा दिल्यानंतर कार्नेगी इन्स्टिट्यूशन ऑफ वॉशिंग्टन या संस्थेच्या जेनेटिक्स रिसर्च युनिटमध्ये संशोधनास प्रारंभ केला. ते जेनेटिक्स रिसर्च युनिटचे संचालक होते (१९६३–७४).

इ. स. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला हॅर्शी, डेलब्य्रूक व लूर्या यांनी सूक्ष्मजंतुभक्षींच्या संशोधनाविषयी माहितीच्या देवाण-घेवाणीस सुरुवात केली. हॅर्शी व लूर्या यांनी स्वतंत्रपणे काम करून असे दाखविले की, सूक्ष्मजंतुभक्षी आणि आश्रय सूक्ष्मजंतू या दोघांत उत्स्फूर्त उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांत आकस्मिक बदल होण्याची क्रिया) घडते. पुढच्याच वर्षी हॅर्शी व डेलब्य्रूक यांनी स्वतंत्रपणे सूक्ष्मजंतुभक्षींमधील जननिक पुनःसंयोग प्रक्रियेची उपस्थिती दाखवून दिली. जननिक पुनःसंयोग म्हणजे एकाच सूक्ष्मजंतू कोशिकेमध्ये विविध प्रकारचे सूक्ष्मजंतुभक्षी राहू शकतात आणि त्यांच्यात जननिक द्रव्याचे आदान-प्रदान होते किंवा एकत्रीकरण होते.

भक्षिकण [प्रथिन व डीऑक्सि-रिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) समप्रमाणात असलेले कोशिकाबाह्य घटक] आश्रय सूक्ष्मजंतू कोशिकेला संसर्ग करताना डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल हे आनुवंशिक द्रव्य कोशिकेमध्ये जाते आणि त्याचा प्रथिन भाग कोशिकेबाहेर राहतो, असा शोध हॅर्शी व मार्था चेस यांनी १९५२मध्ये लावला.

हॅर्शी यांनी सूक्ष्मजंतुभक्षीस सूक्ष्मजंतूपासून वेगळे करून न्यूक्लिइक अम्ल आत गेले आहे किंवा नाही हे पाहणे शक्य असल्याचे दाखविले. या न्यूक्लिइक अम्लामुळेच नवीन सूक्ष्मजंतुभक्षी व्हायरसांची उत्पत्ती होते व प्रथिनापेक्षा न्यूक्लिइक अम्ल हेच जननिक द्रव्य असल्याचा महत्त्वपूर्ण शोध त्यांनी लावला.

हॅर्शी यांना १९५९ मध्ये अमेरिकन आरोग्य संघटनेकडून लास्कर पारितोषिक आणि १९६५ मध्ये राष्ट्रीय विज्ञान मंडळाचा किंबलर आनुवंशिकता सन्मान मिळाला.

हॅर्शी यांचे स्योसेट (न्यूयॉर्क) येथे निधन झाले.

जगताप, राजेंद्र