मधुमेह : कार्बोहायड्रेट या अन्नघटकाच्या चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमधील) विकृतीमुळे मूत्रातून बरेचसे ग्‍लुकोज उत्सर्जित होत असलेल्या रोगाला मधुमेह (गोड अथवा मधुर मूत्रोत्सर्जन) म्हणतात. केवळ या एकाच लक्षणावरून जरी या रोगाला हे नाव दिले गेले असले, तरी प्रत्यक्षात तो काही लक्षणसमूहांचा बनलेला असतो. या लक्षणांमध्ये प्रामुख्याने रक्तातील ग्‍लुकोजाच्या पातळीतील वाढ (अतिग्‍लुकोजरक्तता), केशवाहिन्यांचे (सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणाऱ्या अतिसूक्ष्म वाहिन्यांचे) काठिण्य, अविशिष्ट प्रकारचा रोहिणीविलेपीविकार (मोठ्या व मध्यम आकारमानाच्या रोहिण्यांतील सर्वात आतील स्तरात वसा-स्‍निग्धपदार्थ-व तत्सम पदार्थ आणि कोलेस्टेरॉल यांची पुटे साचल्याने उद्‌भवणारा विकार), ⇨ अग्‍निपिंडातील ⇨ इन्शुलीन उत्पादक बीटा कोशिकांची अकार्यक्षमता व तंत्रिकाविकृती (मज्‍जाविकृती) यांचा समावेश होतो; तसेच रोगोत्पादनाशी आनुवंशिक व परिसरीय अशा दोन्ही कारणांचा संबंध असतो.

इतिहास : ईजिप्त, चीन व भारत या देशांमध्ये मधुमेह या रोगाची कल्पना प्राचीन काळापासून असावी. इ.स.पू. सोळाव्या शतकात लिहिलेल्या ‘एबर्स पपायरस’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या वैद्यकीय कागदपत्रात मधुमेहाच्या लक्षणांचा उल्लेख सापडतो. सुश्रुत (इ.स.पू. पाचवे शतक ) व चरक (इ.स. दुसरे शतक ) या भारतीय प्राचीन वैद्यांना या रोगाच्या आज ज्ञात असलेल्या अनेक पैलूंविषयी माहिती होती. त्यांनी स्थूलता व मधुमेह यांच्या संबंधाचा, तसेच हा विकार एका पिढीतून दुसरीत ‘बीजा’ द्वारे प्रेषित होण्याचाही उल्लेख केला होता. इ. स. १००० च्या सुमारास अरबी वैद्य इव्‌न सीना (अँव्हिसेना) यांनी मधुमेही रुग्णाचे मूत्र गोड असल्याचा आणि मधुमेह व कोथ (शरीराचा एखादा भाग मृत होऊन तो सडू लागणे) यांचा संबंध असल्याचा उल्लेख केला होता. टॉमस विलिस (१६२१–७५) हे मधुमेहातील मूत्राच्या गोडीचा निर्देश करणारे पहिले यूरोपीय वैद्य होते व त्यांनी मधुमेहाचे रोगवर्णनही केले होते. यामुळे या रोगाला पूर्वी ‘विलिस रोग’ असे नाव दिले गेले होते. शंभर वर्षानंतर १७७५ च्या सुमारास डॉडसन यांनी ही गोडी शर्करेमुळे प्राप्त होते आणि ही शर्करा वृक्कनिर्मित (मूत्रपिंडनिर्मित) नसून वृक्के फक्त तिच्या उत्सर्जनाचे कार्य करतात, असे दाखविले.

इ. स. पहिल्या शतकात अँरिटीअस व सेल्सस यांनी ‘निनाल’ (सायफन) या अर्थाचा मोठ्या प्रमाणातील मूत्रोत्सर्जन दर्शविणारा ग्रीक शब्द प्रथम वापरला. त्यापासून इंग्रजी भाषेतील ‘डायाबेटिस’ हा शब्द तयार झाला. लॅटिन भाषेतील ‘मध’ या अर्थाच्या ‘मेलिटस’ या शब्दाची जोड देऊन या रोगाचे इंग्रजी नाव ‘डायाबेटिस मेलिटस’ तयार झाले.

क्लोद बेर्नार (१८१३–७८) या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांनी १८५० मध्ये ग्‍लुकोजाची रक्तातील अती वाढ व मधुमेह यांचा संबंध प्रथम दाखविला. १८६९ मध्ये पाउल लांगरहान्स (१८४७–८८) यांनी अग्‍निपिंडातील विशिष्ट कोशिका पुंजांचे (पेशींच्या पुंजांचे) वर्णन केले होते व या इन्‍शुलीननिर्मितीशी संबंधित असलेल्या पुंजांना ‘लांगरहान्स द्वीपके’ असे नाव देण्यात आले. ओस्कार मिंको व्हस्की (१८५८–१९३१) आणि जोसेफ फोन मेरींग (१८४९–१९१०) या शास्त्रज्ञांनी शस्त्रक्रियेने प्राण्यातील अग्‍निपिंड काढून टाकून प्रायोगिक मधुमेह निर्माण केला होता. ई. एल्. ओपी या विकृतिवैज्ञानिकांनी १९०७ साली लांगरहान्स द्वीपकांतील कोशिकांचा अभ्यास करून त्यांचा मधुमेहाशी संबंध असल्याचे दाखवून दिले. १९२१ मध्ये ⇨ सर फ्रेडरिक ग्रांट बँटिंग व ⇨ चार्ल्‌स हर्बर्ट बेस्ट या शास्त्रज्ञांनी अग्‍निपिंडापासून इन्शुलीन मिळविले आणि १९२२ मध्ये ए. ए. फ्लेचर यांनी मधुमेहावरील उपचारात त्याचा प्रथम उपयोग केला. सल्फोनामाइड औषधांचा रक्तातील ग्‍लुकोजाची पातळी कमी करण्याचा गुणधर्म जांबोन या शास्त्रज्ञांच्या लक्षात १९४२ मध्ये आकस्मिक रीत्या आला. १९५५ मध्ये फ्रँक व फुक्स या शास्त्रज्ञांनी कारब्युटामाइड या सल्फोनामाइडाचा हा गुणधर्म एका संसर्गजन्य रुग्णाच्या उपचारामध्ये पाहिला व त्यानंतर अनेक सल्फॉनिल यूरिया गटातील तोंडाने गोळीच्या रूपात घ्यावयाच्या मधुमेहरोधी औषधांचा उपयोग सुरू झाला. १९५७ मध्ये उंगर यांनी बायग्वानिडे मधुमेहात वापरली व ती परिणामकारक असून धोकारहित असल्याचे दाखवून दिले.

प्रादुर्भाव : मधुमेहाचे निश्चित निदान ठरवणारी पुष्कळशी प्रमाणे आजच्या काळात त्याज्य ठरल्यामुळे प्रादुर्भावाचा अंदाज करणे कठीण बनले आहे. सर्वसाधारणपणे नेहमी आढळणाऱ्या रोगांपैकी तो एक असून जगातील त्याचे प्रमाण वाढत आहे. (१) जगातील मधुमेहींची संख्या ६ कोटी असावी, असा अंदाज आहे. विकसनशील व विकसित देशांतून वाढत्या आयुर्मर्यादेबरोबर मधुमेहाचे प्रमाणही वाढत आहे. याला वाढत्या वयाबरोबर शरीराची कमी होणारी ग्‍लुकोजसह्यता हे कारण आहे. पाश्चात्त्य देशांतून व्यक्त मधुमेहाचे प्रमाण लोकसंख्येच्या १.२%आढळले आहे. भारतातील नागरी रहिवाशांत ते १.५% आणि ग्रामीण भागात ०.५% आढळते. १९६६ मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार भारतातील रुग्णालयीन लोकसंख्येपैकी १.१% मधुमेही असल्याचे आढळले होते. दक्षिणभारतात बहुतांश लोकांचा आहार प्रामुख्याने तांदूळ असल्यामुळे तिथे मधुमेह अधिक आढळतात. अलीकडील एका पहाणीनुसार भारतातील १५ ते ३० वर्षे वयोगटातील मधुमेहींचा बालवयातील प्रथिन अपपोषणाशी संबंध असल्याचे आढळले आहे. केरळ राज्यात या प्रकारच्या मधुमेहाचा अग्‍निपिंडशोथाशी (अग्‍निपिंडाच्या दाहयुक्त सुजेशी) व अग्‍निपिंडरसवाहिनीतील अश्मरीशी (सामान्यत: कॅल्शियम फॉस्फेटासारखे खनिज द्रव्य एकत्र गोळा होऊन तयार होणाऱ्या खड्याशी) संबंध असल्याचे आढळले आहे. रुग्णालयीन पाहणीनुसार भारतातील काही शहरांमधील रुग्णालयांतील एकूण रुग्णापैकी मधुमेहींचे प्रमाण पुढीलप्रमाणे आढळले आहे : पाँडिचेरी ०.७%,हुबळी २.२%,लखनौ २.३%, दिल्ली २.२६%,मुंबई २.६%, हैदराबाद ४.१२%, त्रिवेंद्रम ८.७% आणि मद्रास ११.३%. पारशी, सिंधी व ख्रिश्चन या अधिक वसायुक्त (स्‍निग्ध पदार्थयुक्त) अन्न सेवन करणाऱ्या अल्पसंख्यांक जमातींतून मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे. ज्यूलोकांतही मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे.

संप्राप्ती : मधुमेह हा एक लक्षण समूह असल्यामुळे विविध कारणे मिळून तो उत्पन्न होत असावा. त्याच्या संप्राप्तीविषयी अजून पुष्कळशी माहिती अज्ञात असून बहुधा कोणतेही निश्चित कारण सांगता येत नाही. तथापि दोन निश्चित कारणांचा संबंध ज्ञात झाला आहे : (१) आनुवंशिकता व (२) अतिपोषण (स्थूलता).

आनुवंशिकता : आनुवंशिकतेचा व मधुमेहाचा संबंध असल्याचे प्राचीन काळापासून ज्ञात असावे. या विषयाचा सखोल अभ्यास झाला असून एकूण माहितीबद्दल अजूनही मोठे मतभेद शिल्लक आहेत. मधुमेही रोग्यांच्या जवळच्या नातलगांत हा रोग उद्‌भवण्याचे प्रमाण अधिक आढळते. कोणत्याही एका जन्मदात्याकडून (माता किंवा पिता) रोग अपत्यात प्रेषित होतो. माता व पिता दोघेही मधुमेही असल्यास अपत्यात तो उद्‌भवण्याची शक्यता जवळजवळ ५०% असते. मधुमेही मातेच्या एकयुग्मजीय (एकाच अंडापासून तयार झालेल्या ) जुळ्यामध्ये मधुमेह उद्‌भवण्याची शक्यता अधिक असते. अशा जुळ्यापैकी दोन्ही अपत्यांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर मधुमेह उद्‌भवण्याची शक्यता अधिक असते व या प्रकाराला ‘मिलाफी’ रोगोत्पत्ती म्हणतात. जुळ्यापैकी एकासच मधुमेह झाल्यास त्या प्रकाराला ‘विसंगत’ रोगोत्पत्ती म्हणतात. जनुक निर्मित [आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्या एककांमुळे निर्माण झालेल्या; → आनुवंशिकी; जीन] इतर काही विकृतींमध्ये पुष्कळ वेळा मधुमेहही आढळतो. जननिक वाहक स्वत: मधुमेही न होता, अपत्यामध्ये रोगकर प्रवृत्ती प्रेषित करू शकतो. बालमधुमेहातील तीव्र प्रारंभाला जननिक कारणे असल्याचे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या–पेशींच्या–समूहाच्या ) तपासणीवरून समजू शकते. मधुमेही व मधुमेह-प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या रक्तरसात अल्ब्युमीन या प्रथिनाला बद्ध असलेले इन्शुलीन-प्रतिरोधक द्रव्य असल्याचे व्हॉलेन्स, ओवेन व लिली या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे.

विकृत कार्बोहायड्रेट चयापचय आनुवंशिक व जन्मजात असला, तरी मधुमेहाची सुरुवात स्थूलता, सूक्ष्मजंतुसंसर्ग, यकृत विकृती, तीव्र कावीळ, स्टेरॉइडांचा चिकित्सात्मक उपयोग या कारणांतून होऊ शकते. या गोष्टी शारीरिक ताण निर्माण करणाऱ्या आहेत.

स्थूलता : मधुमेही रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्ण स्थूल असतात. खादाडपणामुळे अग्‍निपिंडातील लांगरहान्स द्वीपकांतील कोशिकांवर ताण पडतो. हा ताण मधुमेहाची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीत मधुमेहाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरतो. दोन जागतिक युद्धांच्या वेळी अन्न नियंत्रणामुळे पोषणावर परिणाम होऊन मधुमेहाचा प्रादुर्भाव व मृत्युप्रमाण कमी झाल्याचे आढळले होते. अन्न प्रकारातील बदल, अन्नाचे अतिशुद्धीकरण, नागरीकरण, वाहन सुविधा व शारीरिक श्रमांचा अभाव हे मधुमेहाच्या प्रादुर्भाव वाढीस कारणीभूत आहेत. [⟶ स्थूलता ].

मधुमेह कोणत्याही वयात उद्‌भवू शकतो परंतु ८० % रुग्ण पन्नाशीच्या वरचे असतात. पाश्चात्त्य देशांत ५५ ते ६५ वर्षे वयोगटातील रोगी सर्वाधिक आढळतात. भारतात ही वयोमर्यादा ४५ ते ५५ दरम्यान आहे. बालवयीन (वयाच्या पंधराव्या वर्षापूर्वी होणारा मधुमेह) क्वचित आढळतो आणि त्याचे प्रमाण १ ते ४% च आहे. मध्यमवयीन रूग्णांत स्त्रियांचे प्रमाण अधिक दिसते. गर्भारपण व बहुप्रसवता रोगोत्पादनास हातभार लावतात.

काही ⇨ अंत:स्रावी ग्रंथी (ज्यांचा उत्तेजक स्राव–हॉर्मोन–वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तात मिसळतो अशा ग्रंथी)व मधुमेह यांचा संबंध असावा. विशालांगता (हाडांची व मऊ ऊतकांची अपसामान्य वाढ होणे) ही ⇨ पोष ग्रंथीची विकृती बहुधा मधुमेहासह आढळते. पोष ग्रंथीचे मधुमेहोत्पादक हॉर्मोन (वृद्धी हॉर्मोन) लांगरहान्स द्विपकांतील कोशिकांवर दुष्परिणाम करते. कधी-कधी पोष ग्रंथीच्या स्रावाची न्यूनता मधुमेहात सुधारणा करीत असल्याचेही आढळते. ⇨ अवटू ग्रंथीच्या स्रावाचे आधिक्य आणि न्यूनता हे दोन्ही ग्‍लुकोज चयापचयावर परिणाम करतात. ⇨ अधिवृक्‍क ग्रंथीची हॉर्मोने प्रायोगिक व मानवी मधुमेहावर परिणाम करतात.

वर्गीकरण : मधुमेहाचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी करता येते.संप्राप्तीनुरूप (१) प्रमुख मधुमेह व (२) दुय्यम मधुमेह असे वर्ग पाडतात. लक्षणानुरूप वर्गीकरणात (१) मधुमेह प्रवृत्तिकर (मधुमेहाचा संभव असणारी) : रक्तातील नेहमीची ग्‍लुकोज पातळी ५५–९० मिग्रॅ./डेसीलिटर असणारी प्राकृतिक अवस्था; ही संज्ञा बहुतकरून रोग उद्‌भवलेल्या व्यक्तीची पूर्वावस्था दर्शक म्हणून वापरतात; (२) सुप्त अथवा रासायनिक मधुमेह : ग्‍लुकोज पातळीतील अपसामान्य वाढ असून लक्षणविरहित अवस्था; (३) व्यक्त मधुमेह : अपसामान्य ग्‍लुकोज वाढ असून लक्षणे असलेली अवस्था हे तीन वर्ग येतात. वयोपरत्वे (१) बालमधुमेह : पंधराव्या वर्षापूर्वी उद्‌भवणारा परंतु त्यापूर्वी कोणत्याही वयात उद्‌भवू शकणारा (२) प्रौढ अथवा पक्वतापश्च मधुमेह : सर्वसाधारणपणे चाळीशीनंतर उद्‌भवणारा असे दोन वर्ग होतात. उपचारांवरून केलेल्या वर्गीकरणात (१) इन्शुलिनावलंबी आणि (२) इन्शुलिन-अनावलंबी असे दोन प्रकार पडतात. येथे संप्राप्तीनुरूप वर्गीकरण दिले आहे.

प्रमुख मधुमेह : या प्रकाराला ‘जननिक’ व ‘अज्ञातहेतुक’ अशी दुसरीही नावे आहेत. याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (अ) वाढत्या वयात प्रारंभ होणारा : (१) कीटोन अम्‍लरक्ततेची (किटोनाच्या आधिक्यामुळे रक्तातील बायकार्बोनेटाचे प्रमाण कमी होऊन अम्‍लाचे प्रमाण वाढण्याची) प्रवृत्ती असलेला, (२) कीटोन अम्‍लरक्तता प्रतिरोधी. (आ) प्रौढवयीन अथवा पक्वतापश्च : (१) स्थूल शरीर, (२) कृश शरीर.

दुय्यम मधुमेह : (अ) अग्‍निपिंडजन्य : (१) कॅल्सिभवनयुक्त (कॅल्शियम लवणे ऊतकातील पदार्थात साचल्याने कठिनीकरण झालेल्या अवस्थेने युक्त) अग्‍निपिंडशोथ व अग्‍निपिंड अश्मरी, (२) रक्तस्रावयुक्त व पुनरावर्तित (पुन्हा पुन्हा उद्‌भवणाऱ्या) प्रकारचा अग्‍निपिंडशोथ. (३) लोह चयापचयजन्य विकृती, (४) अग्‍निपिंडाचा कर्करोग, (५) अग्‍निपिंडोच्छेदन (शस्त्रक्रियेने अग्‍निपिंड काढून टाकणे). (आ) विशालांगता. (इ) अतिकॉर्टिसोन उत्पादकता : (१) कुशिंग लक्षणसमूह (एच्. डब्ल्यू. कुशिंग या अमेरिकन शस्त्रक्रिया तज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारा लक्षणसमूह; अधिवृक्क ग्रंथी बाह्यकाची विकृती), (२) कॉन लक्षणसमूह [डब्ल्यू. जे. कॉन या अमेरिकन वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा लक्षणसमूह; अधिवृक्क ग्रंथी बाह्यकाची अतिअल्डोस्टेरॉन उत्पादक विकृती; → अधिवृक्क ग्रंथी]. (ई) अतिग्‍लुकागॉनरक्तता : यात अग्‍निपिंडाच्या ग्‍लुकागॉन नावाच्या हॉर्मोनाच्या रक्तातील प्रमाण वाढते. ते अतिप्रभावी असून अल्पमात्रेतही रक्तातील ग्‍लुकोज पातळी बरीच वाढविते. (उ) अवटू-आधिक्य : अवटू ग्रंथीच्या स्रावाचे आधिक्य [अत्यवटुत्व; → अवटू ग्रंथी]. (ऊ) औषधनिर्मित (चिकित्साप्रेरित) : (१) कॉर्टिकोस्टेरॉइडे, (२) थायाझाइडे, (३) तोंडाने घ्यावयाची संततिप्रतिबंधक औषधे, (४) डायझोक्साइड (अतिरक्तदाबावरील एक औषध).

आ. १. पावलातील मधुमेहजन्य कोथ : पायाच्या आंगठ्यातील ऊतकनाश.

लक्षणे : मधुमेह असल्याचे पुढील निरनिराळ्या प्रकारांनी लक्षात येण्याची शक्यता असते : (१) नोकरीकरिता, आयुर्विम्याकरिता किंवा इतर कारणांकरिता शरीर तपासणीचा भाग म्हणून मूत्र तपासणीत मूत्रात साखर असल्याचे समजते. बहुधा हा प्रकार लक्षणविरहित मधुमेह प्रवृत्तिकरही असतो. (२) अतितृष्णा, बहुमूत्रता, नैश-बहुमूत्रता (रात्री अनेक वेळा लघवी होणे) ही लक्षणे होतात. (३) काही रुग्ण थकवा ल स्‍नायुदौर्बल्य अशी तक्रार करतात. (४) काही रुग्ण अतिक्षुधा व वजनात वाढ होत असल्याचे सांगतात. (५) योनिमार्गाचा तीव्र कंडू किंवा शिश्‍नमणीशोथ, निकट दृष्टी (लघुदृष्टिदोष), अपसंवेदना (विकृत वा विपर्यस्त स्वरूपाची संवेदना होणे), हातपाय दुखणे व नपुंसकत्व ही मधुमेहाच्या चिरसंमत लक्षणांपैकी काही असून रोगी त्यांपैकी काहींबद्दल तक्रार करतो. (६) कधीकधी अतिरक्तदाब, जालपटल विकृती [→ नेत्रवैद्यक] व शुबेद्धी यांसारख्या गंभीर उपद्रवामुळे मूळच्या मधुमेहाकडे लक्ष ओढले जाते.

आ. २. ऊरुचतु : शिर स्नायूचा (डोक्यासारखे चार भाग असलेल्या मांडीतील स्नायूचा) अपकर्ष.

काही शारीरिक लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : शारीरिक शुष्कता, त्वचेखालील वसानाश व स्‍नायूंची झीज यांमुळे वजन कमी झाल्याचे लक्षात येते. इन्शुलीन-अनावलंबी प्रकारात कधी कधी तंत्रिका विकृती प्रथम लक्षात येते. चिरकारी (दीर्घकालीन) मधुमेही रुग्णामध्ये काचबिंदू (डोळ्यातील पुढच्या पोकळीतील द्रव पदार्थाचा दाब वाढल्याने होणारा विकार), निकट दृष्टी, जालपटल विकृती ही डोळ्यासंबंधीची लक्षणे आढळतात. नेत्रपरीक्षकातून तपासल्यास जालपटलात छोटे छोटे रोहिणी विस्फार, रक्तस्राव व पांढुरके नि:स्राव (स्रावरूपाने बाहेर येऊन साचलेले पदार्थ) दिसतात.

कधीकधी जालपटल वियुक्ती [जालपटलाचा प्रमुख भाग मध्यपटलापासून अलग होणे; → नेत्रवैद्यक] व अंधत्वही येते. पायातील रक्तवाहिन्यांमध्ये अंतर्रोधजन्य विकृती उत्पन्न होते. चाळीशीच्या वरील रुग्णांमध्ये पावलातील कोथ इतरांपेक्षा वीस पटींनी अधिक आढळतो. वृक्क, मस्तिष्क (मेंदू) व हृदय यांच्या रोहिणीविलेपी विकृतीमुळे या अवयवांवरील दुष्परिणामाची लक्षणे उद्‌भवतात. तंत्रिकाविकृतीमुळे संवेदी तंत्रात (संस्थेत) विशेषकरून पायातील संवेदी तंत्रात बिघाड उत्पन्न होतात. हातातील पहिल्या अस्थ्यंतर (लगतच्या अस्थींमधील) स्नायूची झीज हे मधुमेहाच्या तंत्रिकाविकृतीचे विशेष लक्षण असते.

मधुमेहात ५०–६०% रूग्णांत नपुंसकत्व हे एक कायम स्वरूपाचे लक्षण असते.

                 कोष्टक क्र. १. मधुमेहाच्या दोन प्रमुख प्रकारांतील लक्षणांची वैशिष्ट्ये

                                                                                                                                                                प्रकार
         लक्षण बालवयीन (इन्शुलीनावर अवलंबून राहावे लागणारा) प्रौढवयीन (इन्शुलीन अनावलंबी)
एकूण प्रमाण १० पेक्षा कमी ९० पेक्षा जास्त
लक्षणे सुरू होण्याचे वय बहुधा १५ वर्षाखाली बहुधा चाळीशीनंतर
लक्षणांची सुरूवात तीव्र किंवा अल्पतीव्र मंद व सौम्य
मोसमी परिणाम हिवाळी परिणाम नाही.
चयापचयजन्य कीटोन
अम्‍लरक्तता नेहमी उद्‌भवते क्वचित संभव
स्थूलता सहसा नाही बहुधा आढळते
रक्तातील इन्शुलीन कमी अनिश्चित
कौटुंबिक इतिहास सहसा दर्शक नसतो नेहमी दर्शक आढळतो.
अग्निपिंडातील बीटा कोशिका संख्या कमी अनिश्चित
लांगरहान्स द्वीपकांत शोथ सुरूवातीस आढळतो आढळत नाही
द्वीपक कोशिका प्रतिपिंडे असतात नसतात
तोंडाने घ्यावयाच्या मधुमेहरोधी औषधांचा परिणाम निरूपयोगी उपयुक्त

[प्रितिपिंडे : संभाव्य हानिकारक बाह्य पदार्थ शरीरात शिरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रक्तद्रवात तयार होणारी विशिष्ट प्रथिने.]

विकृतिविज्ञान : ओस्कार मिंकोव्हस्की या शास्त्रज्ञांनी १८८९ मध्ये कुत्र्यावर अग्निपिंडोच्छेदन शस्त्रक्रिया करून प्रायोगिक मधुमेहाचा अभ्यास केला. पाउल लांगरहान्स यांनी अग्निपिंडातील विशिष्ट कोशिका समूहांचे वर्णन केले. बँटिंग व बेस्ट यांनी १९२१ मध्ये इन्शुलिनाचा शोध लावला. मधुमेहासंबंधीच्या या कार्यानंतरच्या त्या काळात मधुमेहाच्या विकृतीचे कारण सरळ व सोपे होते. इन्शुलिनाच्या न्यूनतेमुळे ऊतककोशिकांची ग्‍लुकोज वापरण्याची क्षमता कमी होऊन ग्‍लुकोज रक्तात साचते व ते मुत्रातून उत्सर्जित होते. हा सोपा विचार पुरेसा वाटला होता. ग्‍लुकोजाच्या ऑक्सिडीकरणात [→ ऑक्सिडीभवन] व्यत्यय आल्यामुळे चयापचय स्थगित होतो व परिणामी कीटोन अम्लरक्तता निर्माण होते. वरील कारणपरंपरा अतिशय सोपी दिसली, तरी ती जटिल (गुंतागुंतीची) असल्याचे अग्निपिंड ऊतकाच्या सूक्ष्मदर्शकीय अभ्यासानंतर लक्षात आले. २५% मधुमेही रोग्यांच्या अग्निपिंडातील ऊतकाच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीनंतर, विशेषेकरून लांगरहान्स द्वीपकांतील कोशिकांचा अभ्यास केल्यानंतर, प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाखालीही त्या निरोगी असल्याचे आढळले. त्यानंतर बराचप्रायोगिक अभ्यास केला गेला व इतर काही हॉर्मोने मधुमेहाशी संबंधित असल्याचे समजले. वृद्धी हॉर्मोन, ग्‍लुकागॉन व ग्‍लुकोकॉर्टिकॉइडे (उदा., कॉर्टिसोल) यांचा मधुमेहाशी संबंध असल्याचे प्रयोगांती आढळले आहे. प्रत्यक्षात विकलांगता, कुशिंग लक्षणसमूह व ग्‍लुकागॉनोमा (अग्निपिंडात क्वचित उद्‌भवणारे अर्बुद म्हणजे नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणारी गाठ) या विकृतींमध्ये मधुमेहही आढळतो.

रक्तातील ग्‍लुकोजाची पातळी ५५–९० मिग्रॅ./डेसीलि. ठेवण्याकरिता शरीरातील समस्थिती यंत्रणेचा सतत वापर होत असतो. याकरिता ग्‍लुकोज पातळी वाढविण्याऱ्या पोष ग्रंथीतील व अधिवृक्क ग्रंथीतील हॉर्मोने, इन्शुलीन-प्रतिरोधके आणि पातळी कमी करणारे इन्शुलीन यांमधील निरनिराळ्या अन्योन्यक्रिया भाग घेत असतात.

इन्शुलीनाच्या क्रियाशीलतेसंबंधी काही सिद्धांत मांडले आहेत. त्यांपैकी इन्शुलीन ग्‍लुकोज चयापचयात प्रत्यक्ष भाग न घेता फक्त कोशिकाभित्तीतून ग्‍लुकोज आत शिरण्यास मदत करते, हा प्रचलित आहे. इन्शुलीन लांगरहान्स द्वीपकांतील बीटा कोशिकांत प्राक्-इन्शुलीन स्वरूपात प्रथम तयार होते व त्याचे इन्शुलिनात रूपांतर होते. कोष्टक क्र. २ मध्ये इन्शुलीन बिघाड स्थाने व स्वरूप दर्शविली आहेत.

                                          कोष्टक क्र. २. अतिग्‍लुकोजरक्तता उत्पादक इन्शुलीन बिघाड स्थाने 

स्थान इन्शुलीन बिघाड प्रकार
बीटा कोशिका (१) प्राक्-इन्शुलिनाचे दोषयुक्त संश्लेषण,

(२) प्राक्-इन्शुलिनाच्या रुपांतरणात दोष,

(३) इन्शुलीन मुक्ततेतील बिघाड,

(४) इन्शुलिनाची अपसामान्य रचना

रुधिराभिसरण (१) अपसामान्य बंधन

(२) रक्तवाहिनी भित्तीची इन्शुलिनासंबंधी अपसामान्य पारगम्यता.

यकृत (१) अतिशय अपकृष्ट बनविणे अथवा गुणहीन करणे,

(२) अतिबद्ध करणे.

लक्ष्य कोशिका (१)सदोष भित्तिग्राहक,

(२) अडिनिल सायक्‍लेज यंत्रणा दोष (हॉर्मोने कोशिका-कार्यावर नियंत्रण ठेवताना अडिनिल सायक्‍लेज निर्माण होते).

(३) काही एंझाइमांतील (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करण्याऱ्या प्रथिनांतील) दोष.

वरील कोणत्याही कारणामुळे उत्पन्न झालेली इन्शुलीनन्यूनता तीन प्रमुख परिणाम करते : शरीरकोशिकांच्या ग्‍लुकोज वापरात घट येऊन रक्तात ग्‍लुकोज पातळी ३०० ते १,२०० मिग्रॅ./१०० मिली. एवढी वाढविणे; (२) शरीरातील वसा संचयातील वसा उपयोगात आणून वसा चयापचयात बिघाड उत्पन्न करणे, रक्तवाहिनीभित्तीत वसा निरपेक्ष करून (साठवून) रोहिणीविलेपी विकार उत्पन्न करणे आणि (३) ऊतकातील प्रथिन संचय कमी झाल्यामुळे प्रथिन उपचय (लहान रेणूंपासून मोठे रेणू तयार करण्याची क्रिया) करणे.

निदान : मधुमेहाच्या निदानाकरिता १९७९ मध्ये पुढील निकष ठरविण्यात आले: चिरसंमत लक्षणे व रक्तरसातील ग्‍लुकोज पातळी २०० मिग्रॅ./डेसीलि. पेक्षा जास्त असणे. (२) उपाशी अवस्थेतील नीला रक्तरसातील ग्‍लुकोज पातळी १४० मिग्रॅ/डेसीलि. पेक्षा दोन वेळा अधिक आढळणे. (३) ७५ ग्रॅ. ग्‍लुकोज तोंडाने दिल्यानंतर १ आणि २ तासांनी नीला रक्तरसातील ग्‍लुकोज पातळी २०० मिग्रॅ./डेसीलि. पेक्षा जास्त आढळणे (ग्‍लुकोजसह्यता परीक्षा). (४) दोन तासांनंतरच्या तपासणीत जर पातळी १४० ते २०० मिग्रॅ. च्या दरम्यान आढळली आणि तत्पूर्वीच्या कोणत्याही एका तपासणीत ती २०० मिग्रॅ. एवढी किंवा अधिक आढळली, तर त्याला ‘विकृत ग्‍लुकोजसह्यता’ म्हणतात. असे रोगी उपाशी असतानाही त्यांच्यात अतिग्‍लुकोजरक्तता उत्पन्न होण्याचा धोका असतो.

निदानात एकसूत्रीपणा येण्याच्या दृष्टीने जागतिक संघटनेने निकष क्र. २ व ३ सर्वसंमत मानावे, असे ठरविले आहे. ग्‍लुकोजसह्यता परीक्षा पाहिजे तेवढी काळजीपूर्वक केली जात नाही व अयोग्य परीक्षा पूर्णपणे निरूपयोगी ठरते. ही परीक्षा करण्यापूर्वी दोन-तीन दिवस अगोदर भरपूर कार्बोहायड्रेटे असलेला आहार द्यावा लागतो. दहा ते सोळा तासांच्या उपवासानंतर सकाळी नीलेतून रक्त घेण्यापूर्वी ७५ ग्रॅ. ग्‍लुकोज ३०० मिलि. पाण्यातून पिण्यास देतात. त्यानंतर १/२, १, १/आणि २ तासांच्या अंतराअंतरांनी ४ वेळा नीलेतून रक्त तपासणीसाठी घेतात. तपासणी काळात रुग्णाने पूर्ण विश्रांती घेण्याची, कोणतेही औषध घेण्याची आणि तंबाखू न ओढण्याची खबरदारी घ्यावी लागते. नुकत्याच मोठ्या आजारातून बरे झालेल्या, शस्त्रक्रिया झालेल्या किंवा नुकतीच प्रसूती झालेल्या स्त्री रुग्णामध्ये ही परीक्षा करू नये. ब्रिटिश डायाबेटिक असोसिएशन व जागतिक आरोग्य संघटना यांनी १९६४ आणि १९६५ मध्ये ग्‍लुकोजसह्यता परीक्षेचे ठरविलेले निकष अनुक्रमे कोष्टक क्र.३ व ४ मध्ये दिले आहेत.

कोष्टक क्र. ३. ब्रिटिश डायाबेटिक असोसिएशनचे ग्‍लुकोजसह्यता परीक्षेचे निकष, १९६४. 

निदान रक्तातील ग्‍लुकोजाची सर्वोच्च पातळी (मिग्रॅ./डेसीलि.) दोन तासांनंतरची रक्तातील ग्‍लुकोज पातळी (मिग्रॅ./डेसीलि.)
असंदिग्ध अथवा निश्चित मधुमेह > २२० > १५०
प्राकृतिक अथवा निरोगी < १६० < १२०
अनिश्चित १६० ते २२० १२० ते १५०

सर्वच मधुमेहींमध्ये ग्‍लुकोज मूत्रात असेलच असे नाही, तसेच प्रत्येक ग्‍लुकोजमेही मधुमेही असतोच असेही नाही. या दुसऱ्या प्रकाराला ‘मधुमेहहीन शर्करामेह’ म्हणतात. अतिग्‍लुकोजरक्तता नसताना मूत्रामध्ये ग्‍लुकोज असण्याला‘वृक्क ग्‍लुकोजमेह’ म्हणतात. कोणत्याही प्रकारची साखर (लॅक्टोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज इ.) मूत्रातून उत्सर्जित होण्याला शर्करामेह म्हणतात. मूत्रातील शर्करा प्रकार ओळखण्याकरिता निरनिराळ्या परीक्षा उपलब्ध आहेत.

कोष्टक क्र. ४. जागतिक आरोग्य संघटनेचे ग्‍लुकोजसह्यता परीक्षेचे निकष, १९६५. 

ग्‍लुकोजाची पातळी (१०० मिलि. मध्ये) 

तपासणीकरिता घेतलेला रक्ताचा नमुना प्राकृतिक वा निरोगी

(मिग्रॅ.)

मधुमेही

(मिग्रॅ.)

नीला रक्त < ११० > १३०
केशवाहिनी रक्त < १२० > १४०
रक्तरस < १३५ > १५५

बेनेडिक्ट विद्राव (एस्. आर्. बेनेडिक्ट या अमेरिकन वैद्यांनी मूत्रातील शर्करा ओळखण्यासाठी योजिलेला विद्राव) वापरून केलेली मूत्रपरीक्षा सर्व प्रकारच्या शर्करामेहांत व्यक्त मिळते (निळ्या कॉपर सल्फेटाचे लाल क्यूप्रस ऑक्साइडात रूपांतर होते). मूत्रातील क्षपणकारक [→ क्षपण] पदार्थ ओळखण्याकरिता अलीकडे क्‍लिनिटेस्ट या एकस्व (पेटंट) नावाखाली रसायनात बुडवून तयार केलेल्या कागदी पट्‌ट्या मिळतात. मात्र या परिक्षेत तो क्षपणकारक पदार्थ ग्‍लुकोजच आहे हे अनिश्चित असते. याशिवाय अस्पिरीन, सॅलिसिलेटे, क्‍लोरल हायड्रेट, अस्कॉर्बिक अम्‍ल (क जीवनसत्व) यांच्या सेवनामुळे खोटा व्यक्त परिणाम मिळण्याची शक्यता असते. गर्भार व स्तनपान करणारे मूल असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत मूत्रातील लॅक्टोज असाच परिणाम करते.

उपद्रव : मधुमेहातील उपद्रव शरीराच्या कोणत्याही भागात उद्‌भवू शकतात. मधुमेही रूग्णांना संसर्गजन्यरोग होण्याचा इतरांपेक्षा अधिक धोका असतो.स्टॅफिलोकॉकस वंशांतील सूक्ष्मजंतूंमुळे होणारे त्वचा रोग, मणिकवक रोग [कॅन्डिडा या वंशातील बुरशीसारख्या हरितद्रव्यविरहित वनस्पतींमुळे होणारा रोग; → कवकसंसर्ग रोग], क्षयरोग, मूत्रोत्सर्जन तंत्राचे संसर्गजन्य रोग (पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात) मधुमेही रुग्णांत आढळतात. इतर रूग्णापेक्षा मधुमेही रुग्णांतील संसर्ग अधिक गंभीर स्वरूपाचा असतो. उपद्रवांचे वर्गीकरण खाली दिले आहे.

अ) तीव्र व अल्पतीव्र : (१) चयापचयात्मक : कीटोन अम्‍लरक्तता, अतिग्‍लुकोजरक्तताजन्य बेशुद्धी, लॅक्टिक अम्‍लरक्तता; (२) संसर्गजन्य : सूक्ष्मजंतूजन्य व कवकजन्य त्वचा रोग, श्लेष्मकला (आतडे, श्वासनाल इ. नलिकाकार पोकळ्यांचे बुळबुळीत पातळ अस्तर), मऊ ऊतके, अस्थी, मूत्रमार्ग व फुफ्फुसे यांचे रोग.

(आ) चिरकारी : (१) तंत्रिका विकृती : बहुतंत्रिका विकृती, एक-तंत्रिका विकृती, तंत्रिकामूल विकृती, स्नायू अपकर्ष; स्वायत्त तंत्रिका विकृती [→ तंत्रिका तंत्र]. (२) वाहिनी विकृती : बृहत् वाहिनी-हृद्‌रोहिणी रोग, मस्तिष्क रोहिणी रोग; सूक्ष्म वाहिनीजालपटल विकृती, वृक्क विकृती.

(इ) गर्भिणी व गर्भासंबंधी विकृती, इतर त्वचा रोग, डोळ्याच्या इतर विकृती आणि मधुमेही पाऊल.

काही प्रमुख उपद्रवांविषयी येथे माहिती दिली आहे.

मधुमेहजन्य कीटोन अम्लरक्तता : वसाम्लांच्या चयापचयातून निर्माण होणाऱ्या काही अम्ल पदार्थांना (उदा., हायड्रॉक्सिब्युटिरिक अम्ल, असिटिक अम्ल) कीटोन पदार्थ अथवा कीटोने म्हणतात.अल्प प्रमाणातील कीटोन यकृतात निर्माण होतात व त्यांचा ऊर्जा उत्पादनात इंधनासारखा उपयोग केला जातो. परिसरीय ऊतकातील वापर कमी झाल्यामुळे कीटोन संचय वाढतो. कीटोन ही तीव्र अम्ले असल्यामुळे रासायनिक प्रक्रियेने रक्तरसातील बायकार्बोनेटे व कारबॉनिक अम्ल यांमधील गुणोत्तर कमी होते आणि बायकार्बोनेटाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी होते. या अवस्थेला कीटोनरक्तता अथवा कीटोन अम्लरक्तता म्हणतात. इतर काही लक्षणांबरोबर बेशुद्धी हे प्रमुख लक्षण असते. मधुमेही रूग्णामध्ये अल्पग्लुकोजरक्ततेमुळेही बेशुद्धी येण्याचा संभव असतो.

अतिग्लुकोजरक्तताजन्य बेशुद्धी : (अथवा अतितर्षणजन्य बेशुद्धी अथवा कीटो नविरहित बेशुद्धी). मधुमेही रुग्णातील रोग बराच काळपर्यंत अज्ञात राहिल्यामुळे किंवा समजूनही दुर्लक्षित झाल्यामुळे ही विकृती बहुधा वयस्कर मधुमेहींमध्ये उद्भवते. कार्बोहायड्रेटे भरपूर प्रमाणात असलेले अन्नसेवन, अपुरे जलपान, मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या) औषधांचा वापर, कॉर्टिकोस्टेरॉइडांचा वापर आणि इतर कोणत्याही कारणामुळे (उदा., अतिसार) झालेले निर्जलीकरण कारणीभूत असते. रक्तरसाची स्फटिकाभ पदार्थाबद्दलची तर्षणता [→ तर्षण] वाढलेली असते. रक्तातील ग्लुकोज पातळी अतिशय वाढलेली ८०० ते २,४०० मिग्रॅ./डेसीलि. असते. रक्तातील यूरियाचे प्रमाण ९० मिग्रॅ./डेसीलि. (प्राकृतिक १५–४० मिग्रॅ./डेसीलि.) एवढे वाढते. हे प्रमाण यापेक्षा अधिक असल्यास फलानुमान (रोगाच्या संभाव्य परिणामासंबंधीचे अनुमान) गंभीर असते.

लॅक्टिक अम्लरक्तता : सार्वदेहिक किंवा स्थानीय स्वरूपाच्या ऊतक ऑक्सि जनन्यूनतेमुळे रक्तरसातील लॅक्टेटांचे प्रमाण वाढते. लॅक्टिक अम्लाचे ऑक्सिडीकरण व ग्लुकोजामध्ये रूपांतरण यकृतात होते.तसेच काही प्रमाणात वृक्कातही होते. अती उत्पादन व यकृत कार्यदोषामुळे कमी नाश झाल्याने लॅक्टिक अम्लरक्तता उत्पन्न होते. कुसमॉल श्वसन व बेशुद्धी ही लक्षणे (मूत्रात असिटोन उपस्थित असल्याने उद्भवणारी आणि आडोल्फ कुसमॉल या जर्मन वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणारी लक्षणे) आढळतात. मृत्युप्रमाण ८०% पेक्षा अधिक असते.

सूक्ष्मजंतुसंसर्ग : मधुमेही रूग्णामध्ये संसर्गजन्य रोगांचे प्रमाण अधिक असते, तसेच झालेला रोग लवकर बरा न होण्याकडे प्रवृत्ती असते. अनियंत्रित मधुमेहातील रूधिराभिसरण दोष, तंत्रिका पोषणज बिघाड, अतिग्लुकोजरक्तता व भक्षिकोशिकांच्या (सूक्ष्मजंतूंचे भक्षण करून त्यांचा नाश करणाऱ्या कोशिकांच्या) सूक्ष्मजंतुनाशक कार्याची कमतरता या गोष्टी रोगकाल वाढविण्यास कारणीभूत असतात. गळू, संसर्गित जखमा व फोड अधिक बळावतात. ⇨ काळपुळी व कोथ उल्लेखनीय आहेत. मधुमेहीमध्ये क्षयरोग व स्त्री रूग्णांमध्ये योनिमार्गाचा मणिकवकसंसर्ग नेहमी आढळतात.

तंत्रिका विकृती : परिसरीयतंत्रिका, स्वायत्त तंत्रिका, तंत्रिका मूल आणि तंत्रिकांची टोके या ठिकाणी विकृती उद्भवते. सर्वसाधारणपणे १० ते ८०% रूग्णांमध्ये अशा प्रकारचा उपद्रव संभवतो. संवेदी, प्रेरक किंवा स्वायत्त तंत्रिका यांच्या कार्यासंबंधीची लक्षणे उद्भवतात. तिसरी, सहावी किंवा सातवी या मस्तिष्क तंत्रिकांच्या बिघाडामुळे अधिपक्ष्मपात (पापणी खालीच लवलेली राहणे), तिरळेपणा, आननपक्षाघात (चेहऱ्याचा पक्षाघात) यांसारखी लक्षणे उदभवतात. स्वायत्त तंत्रिका विकृती ३५ ते ५५ वर्षे वयाच्या पुरूषांत नपुंसकत्वास कारणीभूत असते.

हृदय व हृदरोहिणी विकृती : पाश्चात देशांतून रक्तवाहिनीविकृतीमुळे येणाऱ्यामृत्यूंचे प्रमाण ८०% आढळते. भारतात सुखवस्तू वर्गात ते ५०% आहे. रोहिणीविलेपी विकाराचे मधुमेह पुरूषांतील

प्रमाण १.५ ते २ व स्त्रियांतील २.५ ते ३ पटींनी अधिक आढळते. या विकृतीचे निश्चित कारण अजून अज्ञात आहे.

परिसरीय रोहिण्यांची विकृती : गुडघ्याखाली रोहिण्यांची विकृती हे मधुमेहाचे वैशिष्ट्य आहे. टांगेतील (तंगडीतील) रोहिण्या व पावलातील रोहिण्या (विशेषेकरून बोटांतील लहान रोहिण्या) दोन्हीवर दुष्परिणाम घडून आलेले आढळतात. मधुमेहाचे वैशिष्ट्य असलेला आणखी एक उपद्रव मधुमेही पाऊल म्हणून ओळखला जातो. सुक्ष्मजंतुंसंसर्ग, स्थानीय अरक्तता आणि तंत्रिका विकृती पावलातील विकृतीस कारणीभूत असतात. यांपैकी गंभीर प्रकारात कोथ उत्पन्न होतो व त्याकरिता पुष्कळ वेळा अवयवच्छेदन शस्त्रक्रिया करावी लागते. रोहिणीजन्य विकृत पावलाला नाडीहीन पाऊल व तंत्रिकाजन्य विकृतीला वेदनारहित पाऊल म्हणतात. मधुमेही रुग्णांना (विशेषकरून वृद्धांना) पायांची विशेष काळजी घेणे, दररोज पाय धुणे, कोरडे करणे व योग्य ती पावडर लावणे हे शिकवले पाहिजे. पावलांच्या बेचक्यांतील त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण त्या ठिकाणी कवकसंसर्गाची नेहमी भीती असते.

त्वचा विकृती : पायाच्या नडगीवरील व पावलाच्या पृष्ठभागावरील त्वचेत कठीण, चमकणारे छोटे छोटे उंचवटे प्रथम तयार होतात व नंतर त्यांच्या मध्यभागी अपकर्ष होऊन तो भाग पिवळसर बनतो. कधी कधी त्या ठिकाणी व्रण उत्पन्न होतो व असा व्रण सहसा बरा होत नाही. याशिवाय पूतिता (पू साचणे), अरक्तता, दाब आणि अंत:क्षेपणाने (इंजेक्शनाने) इन्शुलिन दिले जाते त्या ठिकाणी त्वचेत विकृती उत्पन्न होऊ शकते. इन्शुलीन अंत:क्षेपणजन्य विकृतीला ‘वसाकष्टपोषण’ म्हणतात.

डोळ्यातील विकृती : (अ) दृष्टीतील बदल : अस्पष्ट, अंधुक दिसणे व निकट दृष्टी हे बदल उपचार न केलेल्या मधुमेहीमध्ये नेहमी आढळतात. एकाएकी उदभवणारी निकट दृष्टीची तक्रार मधुमेहाचे निदर्शक असू शकते. इन्शुलीन उपचाराच्या सुरूवातीस काही दिवस रोगी दृष्टीदोष वाढल्याची तक्रार करतो. चार आठवड्यानंतर अशा रूग्णांनी नेश्रपरीक्षा करून घेणे इष्ट असते.

(आ) काचबिंदू : अनियंत्रित बालवयीन मधुमेहात काचबिंदू उत्पन्न होतो. इतर वयस्कर व्यक्तींपेक्षा मधुमेही प्रौढांमध्ये काचबिंदूचे प्रमाण अधिक असते. कधी कधी योग्य उपचारानंतर काचबिंदू पूर्णपणे नाहीसा झाल्याचेही आढळते. [→ काचबिंदू].

(इ) जालपटल विकृती : रोग्यातील मधुमेहाचा काळ जसजसा वाढतो तसतशी या विकृतीची शक्यता वाढत जाते. पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ रोग असलेल्यांपैकी बहुतांश रोग्यांत ही विकृती आढळते. विकसनशील देशांमध्ये अर्जित अंधत्वास मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे. १९५२ मध्ये पोष ग्रंथिस्राव न्यूनता व मधुमेहातील जालपटल विकृती यांचा संबंध लक्षात आला. त्यानुरूप काही उपचार करण्यात आले परंतु अजूनही ते प्रायोगिक अवस्थेत आहेत.

वृक्क विकृती : मधुमेहाच्या पुष्कळ रुग्णांमध्ये मूत्र तपासणीत प्रथिनमेह आढळतो. मूत्राशयशोथ, वृक्कशोथ, मूत्रद्रोणशोथ, हृदनिष्फलता, वृक्करोहिणीविलेपी विकार इ. कारणांमुळे मूत्रातून प्रथिने उत्सर्जित होतात. १९३४ मध्ये पॉल किमेलस्टील व क्लिफर्ड विल्सन या शास्त्रज्ञांनी मधुमेहामध्ये वृक्कातील केशिकागुच्छात विकृती असल्याचे दाखविले होते व त्यावरून या लक्षणसमूहाला ‘किमेलस्टील-विल्सन लक्षणसमूह’ म्हणतात. ही विकृती पुरूषांपेक्षा अधिक वेळा स्त्रियांत आढळते. रोगांचे उत्तम नियंत्रण विकृतीस काही काळ प्रतिबंध करते; परंतु एकदा सुरू झाल्यानंतर ती वाढतच जाते. सर्वसाधारणपणे दहा वर्षाच्या आत वृक्कविफलतेमुळे, हृदनिष्फळतेमुळे किंवा मस्तिष्क रक्तस्रावामुळे रोगी दगावतो.

मधुमेह व विशिष्ट शारीरिक अवस्था : काही विशिष्ट शारीरिक अवस्थांमध्ये मधुमेहाच्या रूग्णावर विशेष परिणाम होतात. त्यांपैकी (१) गर्भारपण, (२) शस्त्रक्रिया आणि (३) बालवय यांसंबंधी माहिती येथे दिली आहे.

गर्भारपण : इन्शुलिनाच्या शोधामुळे मधुमेही स्त्रियांना मुले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वी बहुतांश मधुमेही स्त्रियांना अनार्तव (मासिक स्रावाचा संपूर्ण अभाव) व वंध्यत्व (वांझपणा) यातच जीवन जगावे लागे. गर्भाशयांतर्गत गर्भमृत्यूचे प्रमाण इतर स्त्रियांपेक्षा मधुमेही स्त्रियांत दुप्पट आहे आणि नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण तीन ते चार पटींनी अधिक आहे. मधुमेही स्त्रिला गर्भारपणात कीटोन अम्लरक्तता, जालपटल विकृती, वृक्क विकृती यांचा नेहमी धोका असतो. याशिवाय गर्भहेतूक विषरक्तता आणि अती उल्बोदकता (गर्भाभोवतील संरक्षक द्रव–उल्बद्रव–नेहमीपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर असणे) मधुमेही स्त्रियांत अधिक संभवतात. गर्भाचे आकारमान व वजन बरेच वाढण्याची शक्यता असते. नवजात अर्भक मंद व कमी हालचाल करणारे असते. मुलाच्या बुद्धीची वाढ अल्पविकसित असते. मुलामध्ये जन्मत:च अल्पग्लुकोजरक्ततेचा संभव असतो. मधुमेही स्त्रियांनी प्रसूतीकरिता प्रसूतिगृहातच दाखल होणे इष्ट असते. १९५० पर्यंत प्रसूती उपद्रव, गर्भाशयांतर्गत मृत्यू व नवजात अर्भक मृत्यू यांचे एकूण प्रमाण ४०% होते.

शस्त्रक्रिया : एके काळी मधुमेही रूग्णातील शस्त्रक्रिया अतिशय धोकादायक समजली जाई. आता कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया मधुमेही रूग्णामध्ये करता येते. मात्र मधुमेहाची जाणीव ठेवून शस्त्रक्रियेची पूर्वतयारी काळजीपूर्वक करावी लागते. मधुमेही रूग्णावर नियोजित व तातडीची अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. शस्त्रक्रियेमुळे मधुमेही रुग्णाच्या चयापचयावर ताण पडतो प्रत्येक वेळी रोगाचे गांभीर्य व शस्त्रक्रिया प्रकार विचारात घ्यावयास हवा. नियोजित शस्त्रक्रियेपूर्वी काही दिवस अगोदर रूग्णाने रूग्णालयात दाखल होणे हितावह असते. भूल देते वेळी अल्पग्लुकोज रक्ततेचा नेहमी धोका असतो.

बालवयातील मधुमेह : मधुमेहाचे बालवयातील प्रमाण अत्यल्प असले, तरी जेव्हा तो उदभवतो तेव्हा नेहमी गंभीर स्वरूपाचा आणि इन्शुलिनाची आवश्यकता असलेलाच असतो. इन्शुलीन मात्रा व लहान मुलाचा आहार यांची सांगड घालणे अवघड असते. मुलाचे वाढते वय लक्षात घेऊन पोषणज आहार-योजना आखावी लागते. मुलामध्ये खाद्यपदार्थांच्या आवडी-निवडी अनिश्चित असतात. स्थूलता येऊ न देणे आणि इन्शुलीनजन्य अल्पग्लुकोजरक्तता धोका टाळणे यांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. मुलाला शक्यतो गोड पदार्थ देण्याचे टाळावे; परंतु त्याच वेळी त्याला वेगवेगळेपणाची जाणीव होऊ देऊ नये. लहान मुलांतील इन्शुलीन मात्रा अनिश्चित असते. कारण त्यांच्यांमध्ये भावना व खेळातील आवडी-निवडी अकस्मात बदलत असतात. सर्वसाधारणपणे स्थिर मधुमेही मुलाकरिता ब्रिटिश डायाबेटिक असोसिएशन खास सहली आयोजित करते. सहल नियंत्रकांना रोगाबद्दलची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. मुलातील कोणत्याही मधुमेहजन्य उपद्रवाकरिता त्याला रूग्णालयात ठेवणेच योग्य असते.

उपचार : मधुमेह पूर्णपणे बरा करणारा इलाज आजपर्यंत सापडलेला नाही. तरीदेखील योग्य उपचारांनी मधुमेही रूग्णाला उपद्रवविरहित क्रियाशील जीवन जगणे शक्य झाले आहे. संपूर्ण प्राकृतिक जीवन जगणे, नेहमी लक्षणविरहित असणे, निरोगी राहणे, चयापचयात्मक स्थिती नेहमी संतुलित ठेवणे, उपद्रव टाळणे या गोष्टी ज्या उपचाराने होऊ शकतात तो मधुमेहाचा आदर्श उपचार असे म्हणता येईल. येथे वाहिनीविकृती बहुधा चयापचयात्मक बिघाडामुळेउत्पन्न होतात, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. चयापचय बिघाडाचे प्रमुख रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण वाढते हे असल्यामुळे मधुमेहावर उपचार करणाऱ्या प्रत्येक वैद्याने ही गोष्ट लक्षात ठेवून उपाययोजना करावयास हवी. उपचारांचा उद्देश पुढील गोष्टी साधणे हा असावा : (१) मधुमेहाची लक्षणे घालविणे परंतु अल्पग्लुकोजरक्तता निर्माण न होऊ देणे, (२) अल्पग्लुकोजरक्तता किंवा अतिग्लुकोजरक्तता उदभवल्यास ताबडतोब इलाज करणे आणि (३) शरीराचे वजन योग्य प्रमाणात ठेवणे.

कोणत्याही उपचारामध्ये रूग्णाचे सहकार्य आवश्यक असते परंतु मधुमेही रूग्णाच्या सहकार्यावर उपचारांचे यशापयश अवलंबून असते. मधुमेहातील पथ्यापथ्य नियमांचे पालन करणे, रूग्णाची स्वशिस्त व दृढ हेतू हा उपचारांचा प्रमुख भाग असतो. वैद्य फक्त सूचना करू शकतो. याकरिता प्रत्येक रूग्णाला रोगाबद्दल व उपचाराबद्दल शक्य तेवढे ज्ञान देणे वैद्याचे कर्तव्य ठरते. त्याकरिता वेळ खर्ची घालून रूग्णाला दैनंदिन उपचार स्वत: सांभाळता येतील एवढी आवश्यक माहिती असावयासच हवी. सर्वसाधारण मधुमेही रूग्ण रोग असल्याचे समजताच चिंताग्रस्त बनतो. रोगाबद्दलची माहिती त्याची चिंता दूर करून सहकार्य मिळविण्यास मदत करते. प्रत्येक मधुमेही रूग्णास स्वत:चे मूत्र ग्लुकोज व असिटोन यांकरिता तपासता आले पाहिजे. पाश्चात्त्य देशांतून स्वत:च्या रक्तातील ग्लुकोज पातळी तपासण्याच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

मधुमेहावरील उपचारांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते : (१) स्थूल रूग्णावरील फक्त आहार नियंत्रण उपचार, (२) तोंडाने घ्यावयाची मधुमेह-प्रतिरोधी औषधे, (३) इन्शुलीन उपचार, (४) उपद्रवांवरील उपचार. मधुमेहातील वर वर्णन केलेल्या उपद्रवांपैकी बहुतेक उपद्रव गंभीर असल्यामुळे व रूग्णास त्याकरिता रूग्णालयात दाखल करावे लागत असल्यामुळे त्यांच्यावरील उपचारांची माहिती प्रस्तुत नोंदीत दिलेली नाही.

स्थूल रूग्णावरील आहार नियंत्रण उपचार : सर्व प्रकारच्या मधुमेही रूग्णांमध्ये रोगनियंत्रण समाधानकारक होण्याकरिता आहार बंधने पाळावीच लागतात. स्थूल रूग्ण बहुधा चाळिशीच्या वरचे सौम्य मधुमेही व लक्षणविरहित असतात. काही लक्षणे असल्यास ती केवळ आहार नियंत्रणाने नाहीशी होऊ शकतात.

कोणत्याही आहार-योजना करण्यापूर्वी रूग्णाचा चोवीस तासांचा जीवनक्रम व संपूर्ण आहार यांविषयी पूर्ण कल्पना असावयास हवी. त्यानंतरच त्याला लागणाऱ्या दैनंदिन ऊर्जेचा (कॅलरींचा) विचार करता येतो. आहार पोषणदृष्ट्या योग्य असून वय, लिंग, वजन, श्रम, व्यवसाय व परिस्थिती या गोष्टी लक्षात घेऊन योजावा लागतो. अर्थातच या सर्व गोष्टींत विभिन्नता असल्यामुळे आहार वैयक्तिक गरजेनुसार असणे अपरिहार्य ठरते. सर्वसाधारणपणे रूग्णांची विभागणी पुढील तीन गटांत करता येते : (१) स्थूल मध्यमवयीन किंवा वयस्कर रूग्ण–दररोज १,०००–१६०० कॅलरी, (२) वयस्कर परंतु योग्य वजन असलेला–दररोज १,४००–१,८०० कॅलरी आणि (३) तरूण श्रमिक मधुमेही–दररोज १,८००–३,००० कॅलरी. सर्वसाधारण माणसाचे त्याच्या उंचीस योग्य असे आदर्श वजन किती असावे याची माहिती ‘स्थूलता’ या नोंदीत दिली आहे. एकूण कॅलरी ठरविल्यानंतर त्यांची प्रमुख अन्नघटकांत म्हणजे कार्बोहायड्रेटे, प्रथिने व वसा यांमध्ये विभागणी करणे. ‘आहार व आहारशास्त्र’ या नोंदीत अन्नघटकांविषयी माहिती दिलेली आहे. प्रत्येक मधुमेही रूग्णास अन्नघटकांसंबंधी आवश्यक असणारी माहिती कोष्टक क्र. ५ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. ५. भारतात नेहमी उपयोगात असणाऱ्या अन्नपदार्थांतील अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (कॅलरींमध्ये). 

कच्‍चा अन्नपदार्थ (१०० ग्रॅ.) प्रथिने

%

वसा

%

कार्बोहायड्रेटे

%

एकूण

कॅलरी

तांदूळ ६.९ ०.४ ७९.२ ३४८
कणिक १२.१ १.७ ७२.२ ३५३
बाजरी ११.६ ५.० ६७.१ ३६०
मसूर डाळ २५.१ ०.७ ५९.७ ३४६
मका (कोरडा) ११.१ ३.६ ६६.२ ३४२
फुटाणे (टरफलविरहित) २२.५ ५.२ ५८.९ ३७३
वाटाणे (सुके) १९.७ १.१ ५६.६ ३१५
सोयाबीन ४३.२ १९.५ २०.९ ४३२
बदाम १८.६ ५४.१ १९.६ ५९०
काजू २१.२ ४६.९ २२.३ ५९६
शेंगदाणे २६.७ ४०.१ २०.३ ५४९
नारळ ४.५ ४१.६ १३.० ४४४
केळ १.३ ०.२ ३६.४ १५३
अंजीर १.३ ०.२ १७.१ ७५
पेरू १.५ ०.२ १४.५ ६६
जांभूळ ०.७ ०.१ १९.७ ८३
आंबा (पिकलेला) ०.६ ०.१ ११.८ ५०
पीच (सप्ताळू) १.५ ०.२ ७.६ ३८
अननस ०.६ ०.१ १२.० ५०
पपई ०.५ ०.१ ९.५ ४०
अंडे १३.३ १३.३ १७३
मांस १८.५ १३.३ १९४
डुकराचे मांस १८.७ ४.४ ११४
कोंबडी २५.९ ०.६ १०९
मासा २२.६ ०.६ ९१
दूध, गाईचे ३.३ ३.६ ४.८ ६५
दूध, म्हशीचे ४.३ ८.८ ५.१ ११७
दही २.९ २.९ ३.३ ५१
ताक ०.८ १.१ ०.५ १५
चीज २४.१ २५.१ ६.३ ३४८
मलईविरहित दूध

भुकटी

३८.० ०.१ ५१.० ३५७
मलईविरहित दूध २.५ ०.१ ४.६ २९

कोष्टक क्र.६. मध्ये भाज्यांतील कार्बोहायड्रेटांचे प्रमाण दिले आहे.

                                         कोष्टक क्र. ६. भाज्यांतील कार्बोहायड्रेटांचे प्रमाण

३% पेक्षा कमी कार्बोहायड्रेटे असलेल्या भाज्या ६% पेक्षा जास्त कार्बोहायड्रेटे असलेल्या भाज्या
सालीट कोबी
काकडी फुलकोबी (फुलवर)
पडवळ कोहळा
दुध्या भोपळा श्रावण घेवडा (फरसबी)
टोमॅटो वांगी
मुळा (पांढरा) कांदा
मुळा (गुलाबी) वाटाणा (हिरवा)
मिरी (हिरवी) गाजर
पालक बटाटा

आहारातील कार्बोहायड्रेट घटकांचे प्रमाण एकूण ऊर्जेपैकी ४०% ऊर्जा मिळण्यापुरते असावे म्हणजेच दैनंदिन गरज १,८०० कॅलरी असली, तर ७२० कॅलरी कार्बोहाड्रेटांपासून मिळाव्यात.

पुष्कळ रूग्णांना आहार घटकांचे वजन करणे शक्य नसते किंवा जमत नाही. अशा रूग्णांना एडिंबरो (ब्रिटन) येथील रॉयल इन्फर्मरीच्या आहार विभागाने सुचविलेली अन्नपदार्थांची खालील वर्गवारी उपयुक्त ठरते.

(१) अजिबात वर्ज्य करण्याचे पदार्थ : साखर, ग्‍लुकोज, जाम, मार्मालेड, मध, साखरपाक, हवाबंद डब्यातील फळे, गोड गोळ्या, चॉकोलेट, ओव्हलटाइनसारखे साखरयुक्त पदार्थ, केक, गोड बिस्किटे.

(२) माफक प्रमाणात सेवन करण्याचे पदार्थ : पाव (तपकिरी वा पांढरा), बटाटे, वाटाणे, ओटची लापशी, ताजी किंवा सुकी फळे, दूध.

(३) हवे तेवढे सेवन करावयाचे पदार्थ : सर्व प्रकारचे मांस, मासे, अंडी, चीज, लिंबूरस, मांसार्क, चहा किंवा कॉफी, सर्व भाज्या, मसाले, मीठ, मोहरी, मिरी.

स्थूल मधुमेहावरील उपचार प्रामुख्याने स्थूलपणा घालवण्याकरिता असतो. योग्य वजन होईपर्यंत उपचार चालू ठेवावे लागतात. आहारातील सवलतीमुळे पुन्हा वजन वाढताच लक्षणे पुन्हा सुरू होण्याचा धोका असतो. वजन कमी न होणाऱ्या रूग्णावर आहार शिवाय विशिष्ट औषधयोजनाही करावी लागते.

तोंडाने घ्यावयाची मधुमेह-प्रतिरोधी औषधे : आदर्श मधुमेह-प्रतिरोधी तोंडाने घ्यावयाचे औषध तोंडाने घेऊनही परिणामकारक, विषबाधारहित व मधुमेहातील चयापचयात्मक बिघाड सुधारणारे असावे. अजूनही हे सर्व गुण असलेले औषध सापडले नसले, तरी सध्या उपलब्ध असलेली औषधे निवडक मधुमेहींकरिता गुणकारी ठरली आहेत. ही औषधे दोन प्रमुख गटांत विभागता येतात : (१) सल्फॉनिल यूरिया आणि (२) बायग्वानाइडे. ही औषधे अग्निपिंडातील लांगरहान्स द्वीपकांतील कोशिकांवर परिणाम करून इन्शुलिनाचे स्रवण वाढवितात आणि यकृतातील ग्‍लुकोजाचे उत्पादन कमी करतात. सल्फॉनिल यूरीया औषधे त्यांच्या पूर्ण परिणामाकरिता साधारणपणे पंधरवडा घेतात. ही औषधे प्रथिनबद्ध असल्यामुळे सॅलिसिलेटे, प्रोबेनेसीड, फिनिलब्यूटाझोन यांसारखी औषधे या बद्धतेवर परिणाम करतात. क्‍लोरप्रोमॅझीन हे औषध त्यांना प्रतिरोध करते.

अमेरिकेत या औषधांचा उपयोग करू नये असे एक मत तयार झाले आहे. या मताप्रमाणे या औषधांनी हृद्‌रोहिणी उपद्रवाचा धोका वाढतो. यूरोप व ब्रिटनमध्ये मात्र ती सर्रास वापरात आहेत. कोष्टक क्र. ७ मध्ये या औषधांची एकस्व नावे, मात्रा व क्रियाशीलता दिली आहे.

सल्फॉनिल यूरिया आणि बायग्वानाइडे कधीकधी मिळून वापरावी लागतात. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ग्रुप डायाबेटीक प्रोग्राम’ नावाच्या दीर्घकालीन अभ्यासानंतर या औषधांविषयी काही विरोधी मत प्रदर्शन केले गेले आहे. त्याचा मुख्य फायदा एवढाच की, वैद्यांचे लक्ष मधुमेहातील आहार नियंत्रण व नियमित व्यायाम या महत्त्वाच्या उपचारांकडे पुन्हा ओढले आहे.

इन्शुलीन उपचार : इन्शुलिनासंबंधीची प्राथमिक स्वरूपाची माहिती ‘इन्शुलीन’ या नोंदीत दिली आहे. इन्शुलीन तोंडाने घेता येत नाही कारण ते जठररसाने नाश पावते. इन्शुलिनावलंबी रूग्णावर इन्शुलीन व आहार नियंत्रण हे दोन्ही उपचार योजावे लागतात. या उपचाराचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

(अ) रूग्णाचे दैनंदिन जीवन शक्य तेवढे प्राकृतिक राहून त्याला सामान्य दैनंदिन व्यवहारात सहभागी होता आले पाहिजे. (आ) रूग्णास शक्य तेवढे लक्षणविरहित ठेवणे व कोणताही चयापचयात्मक उपद्रव न उद्‌भवण्याची काळजी घेणे. (इ) रक्तातील ग्‍लुकोजाची पातळी शक्यतेवढी प्राकृतिक ठेवणे. कोणतीही जैवरासायनिक अपसामान्यता ताबडतोब दुरूस्त करणे.

कोष्टक क्र. ७. मधुमेह-प्रतिरोधी तोंडाने घ्यावयाच्या औषधांची एकस्व नावे, मात्रा व क्रियाशिलता.

औषधाचे नाव                                दैनंदिन मात्रा
एकस्व नाव सर्वसाधारण जास्तीत जास्त क्रियाशीलता (तास)
सल्फॉनिक यूरिया गट १ ग्रॅ. एकदाच किंवा विभागून ३ ग्रॅ. विभागून ६-८
टॉलब्युटामाइड

(रॅस्टिनॉन)

क्‍लोरप्रोपॅमाइड

(डायाबीनीझ)

१००-२००

मिग्रॅ. एकदाच

५०० मिग्रॅ.

एकदाच

३६
ग्‍लायबेक्‍लामाइड

(डाओनिल)

२.५-१० मिग्रॅ.

एकदाच किंवा विभागून

२० मिग्रॅ.

विभागून

१२-१८
असिटोहेक्झामाइड ०.२५-१.० ग्रॅ.

एकदा किंवा

विभागून

१.५ ग्रॅ. विभागून १२-१८
ग्‍लायपिझाइड

बायग्वानाइडे

१० ग्रॅ. २० ग्रॅ. ६ पेक्षा जास्त
मेटफॉर्मिन

(ग्‍लुकोफेज)

०.५-१.० ग्रॅ. दोन किंवा तीन वेळा विभागून, जास्तीत जास्त ४,००० मिग्रॅ.
फेनफॉर्मिन २५-५० मिग्रॅ. दोन किंवा तीन वेळा, जास्तीत जास्त २०० मिग्रॅ.

कोष्टक क्र. ८. नेहमी वापरात असलेले इन्शुलिनीचे प्रकार

                                                                                                                                 क्रियाशीलता (तासांमध्ये)
प्रकार pHमूल्य दृश्य स्वरूप प्रभावास

प्रारंभ

प्रभाव

उच्‍चबिंदू

प्रभाव काल
जलद परिणामी
प्‍लेन आय. पी. ३.२ स्वच्छ
इन्शुलीन झिंक निलंबध (सस्पेन्शन) ७.२ गढूळ १४
मध्यम परिणामी
आयसोफेन (एन्. पी. एच.) बी. पी. ७.२ गढूळ १२ २४
आय्. पी. (लेंट) ७.२ गढूळ ६-८ २४
मंदव दीर्घकालीन परिणामी
पी. झेड. आय. आय्. पी. (फक्त प्‍लेनबरोबर मिश्रण करून वापरतात) ७.२ गढूळ १६ ३६
इन्शुलीन झिंक निलंबन, स्फटिकीय (अल्ट्रालेंट) ७.२ गढूळ १६ ३६

[pH मूल्य याच्या स्पष्टिकरणार्थ ‘पीएच मूल्य’ ही नोंद पहावी].

 

इन्शुलीन उपचार घेणाऱ्या प्रत्येक मधुमेही रूग्णास पुढील गोष्टींची संपूर्ण माहिती असावयास हवी : (१) वैद्यकीय सल्ल्यानुसार ठरविलेला दैनंदिन आहार समजला पाहिजे. (२) इन्शुलीन उपचाराकरिता लागणाऱ्या पिचकारी, सुया इ. उपकरणांची काळजी घेता येऊन स्वत: वापरावयास शिकले पाहिजे. (३) इन्शुलीन प्रभावी आहे किंवा नाही याचे ज्ञान असणे व दैनंदिन मात्रा ठरवता येणे. (४) मूत्रतपासणी कशी व केव्हा करावयाची व तिचा अर्थ समजला पाहिजे. (५) इन्शुलिनामुळे उद्‌भवू शकणाऱ्या अल्पग्‍लुकोजरक्ततेची माहिती असून ती कशी टाळावी व उद्‌भवल्यास तीवर ताबडतोब उपाययोजना करता आली पाहिजे. (६)शारीरिक श्रम व आहार बदल यांकरिता मात्रेत योग्य बदल करता आला पाहिजे. (७) इन्शुलिनाच्या अधिहृषतेची (अलर्जीची) कल्पना असणे. (८) अंत:क्षेपणाच्या जागी वसाकष्टपोषम होण्याची शक्यता लक्षात ठेवली पाहिजे.

सर्वच रुग्णांना इन्शुलिनाच्या ठराविक मात्रेमुळे गुण येतो असे नाही. काही रूग्णांना २०० एककापेक्षा जास्त मात्रा दररोज घ्यावी लागते. अशा रुग्णांना इन्शुलीन-प्रतिरोधक रूग्ण म्हणतात. इन्शुलीन-प्रतिरोध प्रमुख व दुय्यम अशा दोन प्रकारांचा असू शकतो. पहिल्या प्रकाराला‘अज्ञातहेतुक’ म्हणतात. यामध्ये रूग्णाच्या रक्तातील इन्शुलीनरोधी प्रतिपिंडे अतिशय वाढलेली असतात. दुय्यम प्रकारास तीव्र संसर्गजन्य रोग, यकृत रोग व काही अंत:स्रावी ग्रंथींचे रोग कारणीभूत असतात. कोष्टक क्र. ८ मध्ये नेहमी वापरात असणाऱ्या इन्शुलिनांची माहिती दिली आहे.

इन्शुलीन उपचाराची सुरूवात नेहमी वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावी, त्याकरिता पुष्कळ वेळा रूग्णास रूग्णालयात ठेवणे हितावह असते. त्यामुळे दैनंदिन मात्रा ठरवून देता येते. सौम्य व लक्षणविरहित मधुमेही रूग्णांना इन्शुलिनाची आवश्यकता असल्यास मात्रा बाह्योपचार विभागातही ठरवून देता येते.

आहारातील एकूण कार्बोहायड्रेटे व इन्शुलीन प्रकाराचा जवळचा संबंध असल्यामुळे त्याची दैनंदिन विभागणी कोष्टक क्र. ९ मध्ये सुचविली आहे.

कोष्टक क्र. ९. इन्शुलीन प्रकार व दैनंदिन आहारातील एकूण कार्बोहायड्रेटांची विभागणी

                                                                                              सर्वसाधारणपणे २०० ग्रॅम कार्बोहायड्रेटांची विभागणी
इन्शुलीन प्रकार मात्रेची वेळ न्याहरी मध्यसकाळ दुपारचे जेवण चहा रात्रीचे जेवण झोपते वेळी
विद्राव (विरघळणारे)
जलद परिणामी (दोनदा किंवा तीनदा) न्याहरीपूर्वी २० मिनिटे व रात्री जेवणापूर्वी ३० मिनिटे ६० १० ४० २० ६० १०
अल्प व मध्यम

परिणामी

न्याहरीपूर्वी २० मिनिटे ५० १० ४० ४० ५० १०
दीर्घकालीन परिणामी

(फक्त सकाळी)

न्याहरीपूर्वी २० मिनिटे ५०

किंवा५०

१०

२०

५०

६०

५०

३०

३०

३०

१०

१०

काही रुग्णांचा मधुमेह इन्शुलिनाची ठराविक मात्रा व आहारामुळे पुष्कळ दिवस नियंत्रित असतो. काहींना वेळोवेळी मात्रा ठरवावी लागते. नियंत्रण नाहीसे होऊन ग्‍लुकोजमेह होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत असतात : (१) पडसे, इन्फ्ल्यूएंझा, मूत्रमार्ग संसर्ग, फोड, अंत:क्षेपणजन्य विद्रधी )ऊतकाच्या विघटनामुळे निर्माण झालेल्या पोकळीत पू साचणे) किंवा क्षय यांसारखे रोग; (२) मात्रा मोजण्यातील चूक, दोषयुक्त पिचकारी, मात्रा न घेणे किंवा तंतुमय त्वचेत मात्रा टोचणे; (३) चिंता किंवा दैनंदिन जीवनातील बदल; (४) आहार नियमाचे उल्लंघन. इन्शुलीन घेणाऱ्या रूग्णात अल्पग्‍लुकोजरक्ततेस पुढील कारणे असू शकतात : (१) अतिशय मोठी मात्रा-मात्रा मोजण्यातील चूक; (२) एक वेळचे जेवण न घेणे; (३) सवय नसलेले अतिश्रम; (४) वरील २ व ३ कारणांचे एकत्रीकरण; (५) इन्शुलीनप्रकारातील बदल. नेहमीच्या गोवंशोत्पन्न (गाईच्या वंशातील जनावरापासून तयार केलेल्या) इन्शुलिनाऐवजी डुकरापासून बनविलेले इन्शुलीन वापरणे.

इन्शुलीन स्वत:च घेत असताना दीर्घकालीन इन्शुलिनाच्या एका विशेष परिणामाकडे रूग्णाचे लक्ष वेधणे जरूर आहे. सकाळी घेतलेल्या मात्रेमुळे रात्री झोपेत लक्षणविरहित अल्पग्‍लुकोजरक्तता निर्माण होते व ती जाणीवरहित असते. सकाळी मूत्र तपासताना प्रतिक्षितित ग्‍लुकोजमेहामुळे जादा साखर असल्याचे आढळते. त्यामुळे रूग्ण नेहमीपेक्षा जादा मात्रा घेण्याकडे प्रवृत्त होतो व हे दुष्टचक्र दररोज चालू राहते. या परिणामाला मायकेल सोमोग्यी (१८८३–१९७५) या शास्त्रज्ञांच्या नावावरून ‘सोमोग्यी परिणाम’ म्हणतात.

अलीकडे इन्शुलिनाचे काही नवे प्रकार उपलब्ध झाले आहेत.जुन्या प्रकारांपेक्षा ते अधिक शुद्ध आहेत (इलेटिन I व इलेटिन II हे प्रकार अनुक्रमे ९९.७% व ९९.९५% शुद्ध आहेत). ते टिकाऊ असून त्यांच्या बाबतीत प्रशीतनाची गरज नसते. बहुतेक सर्व प्रकार उदासीन असल्यामुळे अंत:क्षेपणाच्या जागी वसाकष्टपोषण सहसा होत नाही. हे प्रकार डुकरापासून बनविलेले असल्यामुळे अधिहृषतेचा धोका कमी असतो. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : (१) नुसो, (२) रॅपिटार्ड, (३) अक्ट्रापिड, (४) मोनोटार्ड व (५) ह्यूमिलीन. यांपैकी ह्यूमिलीन हे ‘मानवी इन्शुलीन’ म्हणूनही ओळखले जाते.एश्चेरिकिया कोलाय नावाच्या सूक्ष्मजंतूंचे संवर्धन करून आणि त्यावर पुन:संयोगित डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्‍लिइक अम्‍ल) तंत्र [→ रेणवीय जीवविज्ञान; न्यूक्‍लिइक अम्‍ले] वापरून हे इन्शुलीन मिळते. त्याची क्रियाशीलता मात्र इतर प्राणिजन्य इन्शुलिनांसारखीच आहे.

कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांतून प्रत्येक मिलि. मध्ये १०० एकक असलेले इन्शुलीन विकले जाते व ते १०० मिलि. कुप्यांतून मिळते. लहान मुले व कमी मात्रा लागणाऱ्या रूग्णांकरिता ४० एकक/मिलि. असलेले इन्शुलीनही मिळते. अमेरिकेत १०० एकक असलेल्या आवेष्टन बंद, ताबडतोब व एकदा वापरून टाकून द्यावयाच्या प्‍लॅस्टिकच्या पिचकाऱ्या मिळतात. वारंवार उकळून निर्जंतुक कराव्या लागणाऱ्या नेहमीच्या उपकरणापेक्षा त्या सोयीस्कर आणि प्रवासात बाळगण्यास सुलभ आहेत व त्या लोकप्रियही ठरल्या आहेत.

आ. ३. एकदाच वापरून टाकून द्यावयाची प्‍लॅस्टिकची इन्शुलीन पिचकारी : (१) सुईवरील झाकण. (२) एकक दर्शविणारा व ज्यात इन्शुलीन असते तो भाग, (३) पिचकारीच्या दट्ट्याचा दांडा, (४) दट्ट्यावरील झाकण.

फलानुमान : मधुमेहातील उपद्रव टाळण्याची मधुमेहाचे नियंत्रण करणाऱ्या उपचारांची क्षमता, हा एक विवाद्य विषय आहे. मधुमेहातील अतिग्‍लुकोजरक्ततेवर पूर्ण नियंत्रण करण्यात आज उपलब्ध असलेले इलाज अयशस्वी आहेत. जोपर्यंत इन्शुलीन योग्य मात्रेत पुरवण्यातील सुधारणा (उदा., इन्शुलीन पंप)किंवा लांगरहान्स कोशिकांचे रोपण (अकार्यक्षम कोशिकांच्या जागी तेच कार्य करणाऱ्या व अन्यत्र मिळविलेल्या कार्यक्षम कोशिका बसविण्याची क्रिया) यशस्वी ठरून मधुमेहाचे नियंत्रण शक्य होत नाही, तोपर्यंत हा महत्त्वाचा प्रश्न रेंगाळत पडणार आहे. बालवयात सुरू होणाऱ्या आणि इन्शुलिनावलंबी मधुमेही रूग्णामध्ये सूक्ष्मरक्तवाहिन्यांच्या विकृतीचा अधिक धोका असतो. स्थूल मधुमेहीमध्ये मध्यम व मोठ्या रोहिण्यांच्या विकृतीचा धोका असतो. नियंत्रण उत्तम असूनही मधुमेहामध्ये उपद्रव उद्‌भवतातच. या कारणामुळे या रोगाचे फलानुमान अनिश्चित असते. मधुमेहाची सुरूवात झाल्यानंतर दहा ते वीस वर्षांचा काळ बरे वाईट ठरवणारा असतो. एकदा या काळात कोणताही गंभीरउपद्रव उद्‌भवला नाही म्हणजे रोगी पूर्ण जीवन जगू शकेल, असे अनुमान करण्यास हरकत नाही. इन्शुलिनाच्या शोधानंतर फलानुमान थोडे सुधारले असले, तरी निरोगी माणसापेक्षा मधुमेही व्यक्तीची आयुर्मर्यादा कमीच असते. रूग्णाची बुद्धिमत्ता, उपद्रवांची जाणीव आणि जगण्याची जिद्द यांवर फलानुमान अवलंबून असते.

प्रतिबंधात्मक विचार : मधुमेह हा प्रामुख्याने अती खादाड व अल्प श्रमिक व्यक्तींत बहुतकरून आढळत असल्यामुळे आहार आणि शारीरिक श्रम यांकडे योग्य लक्ष पुरवणे आवश्यक ठरते. कार्बोहायड्रेटांच्या अतिसेवनामुळे अग्निपिंडातील इन्शुलीन उत्पादनक्षमतेवर ताण पडून उत्पादन कमी पडते म्हणून साखरेसारख्या शुद्ध कार्बोहाटड्रेटांचा वापर काळजीपूर्वक करावयास हवा. मधुमेहातील काही उपद्रव वसा अन्नघटकांशी संबंधित असतात. वसेचा अती वापर किंवा थोडक्यात प्रमाणापेक्षा जादा खाणे टाळावे.

मधुमेहाचे लवकर निदान त्याच्या नियंत्रणास उपयुक्त असते. याकरिता लक्षणे दिसून येण्यापूर्वीच प्रवृत्तिकर व्यक्तीतील जीवरासायनिक बदल सुप्त रोग लक्षात येण्यास उपयुक्त असतात. निम्म्याहून जास्त व्यक्तींना आपण मधुमेही आहेत याची जाणीवही नसते.

आ. ४. केमस्ट्रीप : रंगपटाशी कागदी पट्टी तपासून पाहताना : (१) रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण दर्शविणारा रंगपट, (२) कागदी पट्टी.

उपचारासंबंधीची काही आधुनिक साधने व माहिती : येथे उल्लेखिलेली साधने भारतात अजून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाहीत.अमेरिकेत या साधनांचा उपयोग करून रूग्णाने रोगावर स्वत:च नियंत्रण कसे करावे हे शिकविणारी मार्गदर्शक शिबिरे बाह्यरूग्ण विभागातून काही रूग्णालयांत घेण्यात येत आहेत. ‘डायाबेटिक सेल्फ केअर प्रोग्राम’ हा असा पाच दिवसांचा  शिक्षणक्रम असतो. स्वत: रक्तातील ग्‍लुकोज पातळी तपासणे, आहार व व्यायाम यांवर या शिक्षणक्रमात भर देण्यात येतो. पाच दिवसांच्या या शिक्षणक्रमाचे शुल्क सु. १३,००० रू. आहे.

स्वत:च्या रक्तातील ग्‍लुकोजाची पातळी तपासण्याकरिता खास बनविलेल्या, रसायन लावलेल्या कागदी पट्ट्या मिळतात. बोटास सुईने टोचून (निर्जंतुकतेची काळजी घेऊन) रक्ताचा थेंब या पट्टीवर ठेवून परीक्षा करता येते. या पट्ट्या ‘केमस्ट्रीप’ या एकस्व नावाने मिळतात. पट्टीवरील रंगातील बदल ग्‍लुकोज निदर्शक असतो आणि प्रमाण ओळखण्याकरिता सोबत तयार रंगपट मिळतो किंवा याकरिता एका इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तीचा उपयोग करण्यात येतो. काही प्रकारच्या कागदी पट्ट्या तपासण्याकरिता (डेक्स्ट्रोस्ट्रिक्स पट्ट्या) परावर्तनक्षमतामापक उपकरण मिळते. आणखी काही उपकरणांद्वारे (उदा., डेक्स्ट्रोसिस्टिम) रक्तातील ग्‍लुकोजाचे प्रमाण अंकदर्शकावर सुलभपणे स्पष्ट दिसते.

ही उपकरणे इन्शुलिनावलंबी रूग्णाकरिता विशेष उपयुक्त असतात. कोणतेही अपसामान्य लक्षण रक्तातील ग्‍लुकोज पातळीशी कितपत संबंधित आहे, हे रूग्ण स्वत: तपासू शकतो व योग्य खबरदारी घेऊ शकतो. केमस्ट्रिप पट्टीवरील रंगबदल स्थिर असतात. त्यामुळे वैद्य वा परिचारिकेस आठ दिवस साठविलेल्या पट्ट्या एकाच वेळी दाखविता येतात.

आ. ५. कमरपट्ट्यात अडकविण्याचा इन्शुलीन पंप

इन्शुलिनावलंबी रोग्याला जन्मभर इन्शुलीन टोचून घेणे आवश्यक असते. याशिवाय इन्शुलीन मात्रा एकाच वेळी वा दोन-तीन वेळाघेऊनही रक्तातील ग्‍लुकोजाच्या पातळीत होणारे चढ-उतार टाळता येत नाहीत. या चढ-उतारामुळे मधुमेहातील रक्तवाहिन्यांची विकृती उद्‌भवते.या गोष्टी टाळण्याकरिता इन्शुलीन सतत व योग्य प्रमाणात पुरविले जाण्याच्या उद्देशाने (नैसर्गिक पुरवठ्याप्रमाणे) शास्त्रज्ञांनी ‘इन्शुलीन पंप’ नावाचे उपकरण शोधिले आहे. आज अमेरिकेत पाच हजारांपेक्षा अधिक मधुमेही रूग्ण असा पंप वापरीत आहेत. तीन प्रकारचे पंप उपलब्ध आहेत : (१) ‘बायोस्टॅटर’ या नावाचा पंप रक्तातील ग्‍लुकोज प्रमाण मोजून त्याप्रमाणे योग्य तेवढी इन्शुलीन मात्रा पुरवतो. हे उपकरण वजनाने जड असून सुवाह्य नसल्यामुळे रूग्णालयात प्रसूती, शस्त्रक्रिया वगैरे कारणाकरिता अंथरूणावर असलेल्या रूग्णाकरिता वापरतात. (२) दुसऱ्या प्रकारचा पंप २.५ सेंमी. X ७.५ सेंमी. X १५ सेंमी. आकारमानाचा व सु. २८० ग्रॅ. वजनाचा असल्यामुळे सुवाह्य असून कमरपट्ट्यात अडकवून ठेवता येतो. त्वचेखाली कायम ठेवलेल्या सुईतून योग्य मात्रा पुरवली जाते. एका विशिष्ट बटनाचा वापर करून मात्रा जेवणापूर्वी वाढवता येते. (३) रोपण पंप (त्वचेखाली शरीरांतर्गत ठेवलेला पंप) हा इन्शुलिनाचा सतत पुरवठा करतो. संपलेला साठा दोन आठवड्यानंतर त्वचेखाली ठेविलेल्याकुपीत अंत:क्षेपणाचे पुन्हा पूर्ववत करता येतो. या उपकरणाचा व्यास फक्त ७.५ सेंमी. असतो.

अलीकडे लांगरहान्स द्वीपकांतील कोशिकांच्या अकार्यक्षमतेमुळे उद्‌भवणाऱ्या मधुमेही रूग्णांकरिता अशा निरोगी कोशिकांचेच रोपण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शरीर कोणत्याही बाह्य कोशिकांचा स्वीकार करीत नाही आणि त्या नाश पावतात. यावर मात करण्याकरिता जिवंत कोशिका अगदी सूक्ष्म कुपीत बंद करून अशा कुप्या शरीरात ठेवण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत. या कुपीची भित्ती अशी बनविली आहे की, तीमधून इन्शुलिनाचे रेणू बाहेर रक्तात मिसळू शकतात परंतु प्रतिरोधात्मक प्रतिपिंड रेणू किंवा प्रतिरक्षेसंबंधित (रोगप्रतिकारक्षमतेशी संबंधित) कोशिका आत शिरून कोशिकांचा नाश करू शकत नाहीत. हा प्रयोग उंदरांवर यशस्वी झाला आहे.

आ. ६. इन्शुलीन रोपण पंप

डायाबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया : मधुमेहाची कारणे व त्यांवरील उपचार यासंबंधीच्या माहितीचा सर्वसामान्य जनतेत प्रसार करणे, मधुमेहाचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने आखलेल्या योजनांचा पुरस्कार करणे या उद्देशाने मुंबई येथे ही संस्था १९५५ मध्ये आर्. व्ही. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली स्थापन झाली.या संस्थेच्या उभारणीस एस्. एस्. आजगावकर, एन्. जी. तळवलकर, जे. सी. पटेल वगैरे तज्ञांचे फार साहाय्य झाले.  ही संस्था इंटरनॅशनल डायाबेटिस फेडरेशनची सदस्य आहे. या संस्थेचे वैद्यकीय तज्ञांकरिता एक व सर्वसामान्य लोकांकरिता एक असे दोन विभाग आहेत.  यांतील दुसऱ्या विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे मधुमेही रूग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झालेली असून सर्वसामान्य जनतेत या रोगाला व त्यातून उद्‍भवणाऱ्या उपद्रवांना प्रतिबंध करण्याच्या जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे.  संस्थेतर्फे मधुमेही रूग्णांची  सवलतीच्या दरात तपासणी व औषधांची विक्री, वैद्यांसाठी प्रशिक्षण, रूग्णांसाठी  शिबिरे (यांत निरनिराळ्या तज्ञांची व्याख्याने आयोजित करून आहार आणि इन्शुलिनाची अंत:क्षेपणे यांसंबधी  मार्गदर्शन केले जाते)इ. उपक्रम केले जातात.  मधुमेहावरील संशोधन चिकित्सा व मधुमेहासंबंधीचे शिक्षण यांकरिता संस्थेची माहीम येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ डायाबेटिस ही संलग्‍न संस्था व रूग्णांची राहण्याची व्यवस्था असलेले सुसज्‍ज रूग्णालय आहे.  मधुमेहाच्या विविध बाबींवर तज्ञांनी लिहिलेले लेख संस्थेतर्फे मधुमेह या त्रैमासिकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येतात.

कुलकर्णी, श्यामकांत; भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन : मधु व मेह या दोन शब्दांनी मधुमेह शब्द तयार झाला आहे. मधु म्हणजे मधुर. मध, पाणी, साखर इ. होय. मेह म्हणजे लघवी, लघवी करणे. मेहन म्हणजे तेच. शिवाय शिस्‍न होय. प्रमेह म्हणजे प्रकर्षाने, प्रमाणाने अधिक लघवी होणे.

लघवी हे अन्नाचा शरीराच्या बाहेर टाकण्याचा द्रव असा मळ आहे. अन्नाचे पचन चांगले न होता त्यापासून शरीराचे पोषक पदार्थ तयार न होता मूत्ररूप मळ तयार होतात आणि ते शरीराला निरूपयोगी म्हणून अंतरात्म्याला शरीराच्या बाहेर फेकून द्यावे लागतात.

ते मल शरीरात नित्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढतात. सर्व शरीरभर पसरतात. त्यामुळे जे अवयव अशक्त असतील त्यांच्यात किंवा बलवान अवयवांमध्ये सुद्धा त्यांच्या सहनशक्तिपेक्षा अधिक प्रमाणात मलदोष संचित होतात. त्यामुळे तेथे ते सलू लागतात आणि निरनिराळ्या तर्‍हेची दु:खद चिन्हे निर्माण होतात.

सामान्य कारणे : व्यायाम न करणे, आळसात वेळ घालवणे, दिवसा झोप घेणे, तसेच शीतवीर्य, स्‍निग्ध, मधुर, मेदोवर्धक असे पातळ अन्न व पेय नेहमी  सेवन करणे आहेत. अशी दिनचर्या व खानपान ज्या मनुष्याचे असेल त्याला निश्चित रीतीने प्रमेह होणार असे समजावे. जो मनुष्य मधुर पदार्थ खूप प्रमाणात घेत असेल, तो मधुमेही होईल असे समजावे (सुश्रुत).

जड, स्‍निग्ध, आंबट, खारट हे अतिप्रमाणामध्ये खाण्याने, तसेच नव धान्याचे अन्न, खूप झोप घेणे, शास्त्रोक्त रीतीने रेचके, बस्ती वगैरेंनी शरीराचे शोधन न करणाऱ्या अशा स्थिरजीवनी व निश्चिन्त मनुष्याच्या शरीरात कफ व पित्त वाढतात, धातूपैकी मेद व मांस वाढतात.  त्यामुळे ओज सर्व शरीरभर अभिसरणाने पसरण्याचे स्थगित होऊन ते अंतरात्मा मूत्रमार्गाने बाहेर फेकून देतो.

ह्या अन्नपानामध्ये ज्या दोषाच्या आधिक्याचे अन्नपान असेल त्या त्या दोषाचे आधिक्य होऊन त्या त्या दोषाचा मधुमेह निर्माण होतो. ह्या सामान्य कारणापैकी  जी प्रत्यक्ष द्रव्ये उपयोगात आणायची त्यांचे गुणधर्म पाहताना ते कोणता दोष दूषित करतात-वाढवतात ते पाहून तो दोष व त्याचा एक उत्कट गुण आणि त्याबरोबर दुसरेही उत्कट गुण वाढून त्याप्रमाणे तो प्रमेह कोणता आहे ते ठरवावयाचे असते.

विशेष कारणे: कफज मेह : आहार कारणे : हायनक म्हणजे शाली जातीचा एक तांदूळ, यवनक नावाचा तांदूळ, चीनक म्हणजे चीनमधला तांदूळ, उद्दालक (जंगली कोद्रू), नैषध नावाचा तांदूळ इ. अनेक तांदळांपैकी नवे तांदूळ ह्यांचा आहारामध्ये अतिप्रमाण व अतिवेळा उपयोग करणे, तसेच नवे वाटाणे, उडीद ह्यांचे कढण तूप घालून वरीलप्रमाणे सेवन करणे, गावातील व जलभूयिष्ठ देशातील मांस तसेच भाज्या विशेषत: पालेभाज्या, तीळ, पिठूळ अन्न, दुधाचे पदार्थ, खिचडी, तांदळाचे पेयादि पदार्थ आणि उसाचे गूळ, साखर इ. पदार्थ, दूध, नवीन दारू, आदमुरे दही, गोड, पातळ व नवी द्रव्ये ह्यांचा आहारात अतिप्रमाणात आणि अतिवेळा उपयोग करणे ही महत्त्वाची आहार कारणे होत.

विहार कारणे : उद्‌वर्तन न करणे म्हणजे त्रिफला वगैरे न लावता स्‍नान करणे, घर्षण न करणे, व्यायाम न करणे, दीर्घ काळ झोप घेणे (दिवसासुद्धा), नेहमी आडवे पडून रहाणे, बसून रहाणे इ. जे जे कफदोष मेदोधातू व मूत्रमल अधिक प्रमाणात निर्माण करतील अशी कारणे नेहमी होणे हे कफज मेहाचे विशेष निदान (कारणे) होय.

पित्तज मेह : आहार कारणे : उष्ण, अम्‍ल, अम्‍लविपाकी, खारट, क्षार तिखट असे पित्त, मेद व मूत्रवर्धक भोजन अतिप्रमाणात व अतिवेळा सेवन करणे. तसेच कफपित्त आहाराचे विषम सेवन करणे (वरीलप्रमाणे).

विहार कारणे : अतितीक्ष्ण, उन्हाचे सेवन करणे, अग्‍निसन्निग्ध खूप काम करणे, अतिश्रम करणे ही विहार कारणे होत.

मानस कारणे : नेहमी सारखे संतापणे.

प्रकृती कारण : पित्तप्रकृती, विशेषत: शरीरात द्रवपित्त अधिक असणाऱ्या व्यक्तीला हा होतो.

वातज मेह : आहार कारणे : तुरट, तिखट, कडू, रुक्ष, लघू (हलके), थंड अशा द्रव पदार्थाचे आणि अनशन अतिप्रमाणात, अतिवेळा सेवन करणे.

विहार कारणे : (१) अती जागरण करणे; (२) अतिसंभोग, अतिव्यायाम करणे; (३) ओकारी, रेचक, एनिमा (औषधी) ही अतिप्रमाणात घेणे, तसेच नाकामध्ये तीव्र औषधे घालून शिराचे अतिविरेचन करणे,रक्तस्राव अधिक करणे; (४) मलमूत्र इत्यादींचे नेहमी अवरोध करणे; (५) मर्मस्थानी आघात होणे; (६) शरीराची नेहमी वेडीवाकडी हालचाल करणे आणि वेड्यावाकड्या स्थितीत बसण्याची खोड असणे.

मानस कारणे : उद्वेग, शोक उत्पन्न होईल अशी कारणे घडणे व मन त्या कारणांनी व्यथित राहणे. या कारणांनी प्रमेह निर्माण करणारा वात प्रकुपित होतो आणि वातज मेह व मधुमेह (वातज) निर्माण करतात.

संप्राप्ती : जेव्हा आहारामध्ये मूत्रमलवर्धक द्रव (मूत्रल) असे पदार्थ खाण्यात येतात; पण श्रमाने अग्‍नी वाढत नाही तेव्हा शरीरामध्ये ते न पचलेले घटक अधिक होतात, ते मूत्ररूप शरीरात संचार करतात. अंतरात्मा त्या मलांना मूत्रमार्गाने बाहेर घालवतो तेव्हा प्रमेह उत्पन्न होतो.

श्रमाने शरीराचे–मांसादि धातूचे शिथिलत्व नाहीसे होते. व्यायामाने विभक्त व घन गात्रे होतात. शरीरात सर्वात शिथिल धातू मेद आहे. त्या मेदाशी हे मूत्रमलदोष संयुक्त होऊन ते बस्तीकडे आणून अंतरात्मा बाहेर घालवतो.

पूर्वरूपे : ही मूत्रमलरूप द्रव्ये शरीरात जी  दु:खद चिन्हे उत्पन्न करतात ती चिन्हे पूर्वरूप होत. अंतरात्मा ही मलद्रव्ये निरनिराळ्या शरीराच्या बहिर्द्वारांतून बाहेर फेकण्याचा प्रयत्‍न करतो. तेव्हा त्या त्या बहिर्द्वारामध्ये ते ते मल अधिक प्रमाणात साचलेले वाटतात. सर्व शरीर मलसंचयामुळे स्वच्छ न वाटता मळकट वाटते. नाक, कान, डोळे, तोंड, दात ह्यांमध्ये अधिक मळ साचलेला आहे असे वाटते. त्वचेमध्ये हे मळ साचले, तर त्वचेचे स्पर्शज्ञान कमी होते.

हे मळ बाहेर काढले जावे, जास्त विरल व्हावे म्हणून अंतरात्मा तहान निर्माण करतो. तोंड, टाळू, गळा या ठिकाणी शोष निर्माण होतो. शरीराची दुसऱ्याला दुर्गंधी येते. हे मळ जेव्हा मेंदूमध्ये साचतात तेव्हा झोप जास्त येते व दिवसभर मनुष्य तंद्रेत असतो. केसही बिघडतात. केसांच्या जटा होतात व लघवीमध्ये सुद्धा गढूळपणा वगैरे दोष निर्माण होऊ लागतात.

ही पूर्वरूपे सर्व प्रमेहामध्ये होऊ शकतात. मधुमेहामध्ये तोंड, गळा, टाळू ह्यात गोडपणा निर्माण होतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंड गोड वाटते म्हणजे अंतरात्मा लाळेतूनसुद्धा शरीरात अधिक प्रमाणात झालेली साखर शरीराच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्‍न करतो. ह्या पूर्वरूपांमध्ये काहीही कामे करावी असे वाटत नाही. मनुष्य आळशी होतो.

पित्तभूयिष्ठ मेह असेल तर हातापायांची आग होते. वातभूयिष्ठ मेह असेल तर हात, पाय व शरीर ह्यांच्यावर स्पर्श कळण्याचे कमी होते, म्हणजे सुप्तता हे चिन्ह निर्माण होते.

पूर्वरूपांच्या शेवटी शेवटी जेव्हा प्रमेह विशेषत: मघुमेह सुरू व्हावयाच्या वेळेला शरीरावर आणि लघवीला मुंग्या येतात. कित्येक वेळी भुंगेही येतात. थोडक्यात मेही रोग्याला प्रारंभी वर दिलेली प्रमेहाच्या पूर्वरूपांपैकी किंवा सर्व पूर्वरूपे दिसू शकतात. ही पूर्वरूपे ज्याला होतात,वैद्याला दिसतात आणि किंचित अधिक प्रमाणात लघवीला होते त्याला प्रमेही म्हणावे. (सुश्रुत निदान ६/२२, २३).

मेह, प्रमेह व मधुमेह आणि यांचे पीटिकादि उपद्रव समजून घेताना अगोदर शरीराच्या व तत्संबंध अंतरात्म्याची प्रक्रिया समजून घेणे अत्यावश्यक असते.

शरीरात कोणताही पदार्थ घेतला की, अंतरात्मा त्याचे पचन करून घेऊन त्यांना मानवी शरीराच्या घटकांचे स्वरूप निर्माण करून धातुघटक (शारीर), मानस, आध्यात्मिक घटक तयार करून त्यांना शरीरातील क्षीण झालेल्या घटकांचे पोषण करण्याकरिता तयार करतो.

मळ : हे करीत असताना शरीरात घेतलेल्या पदार्थातील जी द्रव्ये वरील कार्याकरिता अयोग्य असतात, त्यांना योग्य बहिर्मार्गाने शरीराच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्‍न अंतरात्मा करीत असतो. फुप्फुसातून निश्वासाने वायुरूप मल, घाम व लघवी यांनी द्रवमल, तर गुदमार्गाने पुरीष आणि वात तसेच नाक, डोळे या मार्गानी अशाच तर्‍हेचे मळ तो बहिरात्म्याकडून फेकून देतो.

द्रव्ययोग्यता : आहारामध्ये रक्त, मांस हे पदार्थ घेतले, तर अंतरात्मा त्याचे पचन करून मानवी रक्तमांसांचे घटक बनवून त्यांना आत्मसात करून झिजलेल्या घटकांच्या जागी बसवतो. हे घटक पचवल्यानंतरही त्या शरीराच्या  दृष्टीने जे निरुपयोगी घटक (मल) त्याच्यात असतील तेही तो वरीलप्रमाणे शरीराच्या बाहेर फेकून देतो.

रोगोत्पत्ती : हे किंवा वनस्पति-धान्य इ. पदार्थ आहारात घेऊन वरीलप्रमाणे प्रक्रिया करून त्यांचा विनियोग करतो.

पण तेच पदार्थ शरीराच्या गरजेपेक्षा अधिक प्रमाणात घेतले किंवा ते पदार्थ विकृत, नासलेले-कुजलेले घेतले किंवा गरजेपेक्षा कमी पदार्थ घेतले किंवा योग्य विधीप्रमाणे घेतले नाही, तर वरील पचनादि व्यापार बिघडतात आणि त्याच्यापासून शरीराचे त्याला आत्मसात करता येतील व आपले घटक बनवता येतील असे घटक न बनता शरीरास बाधक घटक (दोष), तसेच शरीरात न ठेवता शरीराबाहेर घालवण्याच्या योग्यतेचे घटक (मळ) अधिक तयारहोतात व ते पदार्थ त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्या त्या शारीर धातूमध्ये, अवयवामध्ये, अंगोपांगात पसरतात व रोगाची पूर्वरूपे निर्माण करतात.

गुणमेह : कफज गुणमेह : हे दहा असतात. (१) उदकमेह : ज्या मेहामध्ये लघवी पाण्यासारखी होत असते त्यामध्ये स्वाभाविक लघवीचा पिवळेपणाही नाहीसा होतो आणि ती पाण्यासारखी पांढरी, थंड, स्वच्छ व पुष्कळ प्रमाणात आणि जिला लघवीचा स्वाभाविक वासही नाही अशी लघवी होते. (२) ईक्षुवालिका : ज्या लघवीमध्ये बुळबुळीतपणा, गढूळपणा दिसतो पण जी थंड असते (नेहमीपेक्षा) आणि जी अतिशय गोड असते म्हणजे उसाच्या रसासारखी असते त्या मेहास ईक्षुवालिका असे नाव आहे. यामध्ये कफाचे मधुर, शीत, पिच्छिल हे तीन गुण उत्कर्षाने वाढलेले असतात. (३) सान्द्रमेह : यामध्ये कफाचा सान्द्र गुण (घनत्व) वाढलेला असतो त्या कफज मेहाला सान्द्रमेह असे म्हणतात. मात्र ही सान्द्रता ताज्या लघवीत दिसत नाही. ती शिळी झाली म्हणजे ही सान्द्रता दिसून येते. याचा अर्थ बाहेरच्या हवेचा त्या लघवीवर जो परिणाम होतो, त्या परिणामाचे हे सान्द्रत्व असते. (४) शुक्लमेह : ज्या लघवीमध्ये पांढरे पीठ मिसळलेली अशी गढूळ लघवी ज्याला होते त्याला शुक्ल मेह म्हणजे पांढरा प्रमेह असे म्हणतात. (५) शुक्रमेह : शुक्र हे शरीरातील कफाचे अत्यंत शुद्ध, विकसित असे स्वरूप होय. ज्या लघवीमध्ये शुक्र मिश्र असते आणि असे नेहमी होते, त्या मेहाला शुक्रमेह असे म्हणतात. (६) शीतमेह : ज्या प्रमेहात शरीरात अतिशय गोड, थंड असा द्रव कफ विकृत होऊन प्रमेह होतो आणि ज्याला लघवीलासुद्धा अतिशय गोड, थंड व प्रमाणानेही पुष्कळ लघवीला होते त्याला शीतमेह असे म्हणतात. (७) सिकतामेह : ज्यामध्ये द्रव कफात पार्थिव घटक निर्माण होतात म्हणजे घन कफ विकृत होतो आणि सूक्ष्म असे मूर्त, अणुरूप कफाचे घटक शरीरात वाढतात आणि मूत्रामध्ये ते असतात त्या प्रमेहाला सिकतामेह असे म्हणतात. (८) शनैमेंह : कफाची गती पित्त व वात ह्या दोषांपेक्षा कमी असते म्हणजे तो मंद गती असतो. असे मंद गतीचे कफद्रव घटक शरीरात साचून मूत्राबरोबर बाहेर जातात, लघवी करतानासुद्धा लघवीचा वेग हळूहळू व मंद असा असतो, तसेच लघवी मोकळी न होता कष्टाने होते त्या प्रमेहाला शनैमेंह असे म्हणतात. (९) आलाल मेह : ज्या कफाचे बुळबुळीत, चिकट असे तंतुरूप घटक आधिक्याने दुष्ट होतात आणि लघवीमध्येसुद्धा असे बुळबुळीत, चिकट, तंतुयुक्त घटक दिसतात, लघवीच अशी दिसते त्या प्रमेहाला आलाल मेह असे म्हणतात. (१०) सान्द्रप्रसाद मेह : सान्द्रमेहापेक्षा यामध्ये थोडी कमी दुष्टी असते. त्या मेहाची लघवी सतत गढूळ असते, तर ह्या मेहाची लघवी काही वेळा गढूळ तर काही वेळा स्वच्छ असते. ह्या दहा कफ प्रमेहांमध्ये शीतमेह व ईक्षुवालिकामेह अशा दोन मेहांमध्ये व मधुमेहामध्ये लघवी गोड असते. किंबहुना मधुमेहापेक्षा ह्या दोन मेहांमध्ये लघवी खूपच गोड असते. अशा वेळी ह्यांनाही मधुमेह म्हणण्याचा घोटाळा होण्याचा संभव निश्चित आहे. त्यांमुळे चिकित्सेमधे भिन्नता येईल. ह्या दोन्ही मेहांमधे जरी कफ दुष्ट असला, तरी तो रस मांस अशा घातूंमधला कफ दुष्ट असतो.मधुमेहामध्ये शरीरातील सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम दर्जाचा कफ दुष्ट झालेला असतो. त्यामुळे चिकित्सेमधे फरक करावा लागतो. मधुमेहामध्येसुद्धा कफज मधुमेह व वातज मधुमेह असेही दोन प्रकार असतात. वातज मधुमेहाची चिकित्सा अतिशय खबरदारीने करावी लागते.

पित्तज मेह : हे पित्तज गुणमेह सहा असतात. (१) क्षारमेह : क्षाराचा वास, वर्ण, रस व स्पर्श जसा असतो, तसेच शरीरामध्ये क्षाररूप द्रव्य जरूरीपेक्षा जास्त होते त्यामुळे शरीरामध्ये मधूनमधून वा सततही पुष्कळ वेळा आग व उष्णता ही भासत असतात. लघवीसुद्धा गरम व जळजळीत होते. लघवी झाल्यानंतर मूत्रमार्गाची आग होत असते. (२) कालमेह : वस्तू जळाल्यानंतर जो कोळसा होतो त्याला मसी म्हणतात. शरीरामध्ये मसीसारखी द्रव्ये निर्माण होऊन शरीरात पसरतात आणि लघवीबरोबर बाहेर फेकली जातात. त्यामुळे लघवी काळसर वर्णाची, गरम गरम व खूप प्रमाणात होत असते. त्या मेहाला कालमेह असे म्हणतात. काल याचा अर्थ काळा असा आहे. पदार्थ जळताना बहुधा काळा होत जातो व त्याचा कोळसा होतो. जेव्हा कोळसाही खूप जळतो तेव्हा बहुधा राख (पांढऱ्या रंगाची ) होते. ही राख पाण्यात घालून विरवली व पाणी स्थिर ठेवले नंतर फक्त पाणी काढून घेतले व ते आटवले म्हणजे पाण्यात विरलेले द्रव्य आपल्याला मिळते. त्याला क्षार असे म्हणतात. काळा कोळसा व क्षार ह्यांमध्ये खूप अंतर आहे. कोळसा कमी दाहक व उष्ण आणि क्षार अतिदाहक व उष्ण असतो. (३) नीलमेह : तास पक्ष्याच्या निळ्या रंगासारखे पण आंबट लघवीला होते. त्याला नीलमेह म्हणतात. म्हणजे शरीरात आंबट रसाचे प्रमाण शरीराच्या गरजेपेक्षा खूप वाढलेले असते. पित्ताचा अम्ल गुण शरीरात फार वाढतो. (४) रक्तमेह : जेव्हा शरीरात खारट, उष्ण, दुर्गंधी हे गुण वाढून साक्षात लघवीमधून रक्त जाते आणि लघवी प्रमाणानेही अधिक होते त्या प्रमेहाला रक्तमेह असे म्हणतात. (५) मंजिष्ठमेह : मंजिष्ठासारखा लाल रंग, दुर्गंधी व पुष्कळ प्रमाणात शरीरात पित्त वाढून लघवीमध्ये वाहू लागते तेव्हा लघवी ही मंजिष्ठाच्या लालीइतकी लाल असते. त्याला मंजिष्ठमेह म्हणतात. (६) हारिद्रमेह : जेव्हा हळदीसारखा पिवळा रंग असलेले तिखट द्रव्य शरीरात अधिक होते व लघवीबरोबरही बाहेर जाते, लघवीला पिवळे व आग होते त्याला हारिद्रमेह असे म्हणतात. असे हे सहा पित्तज गुणमेह होत असतात.

वातज मेह : (१) वसामेह : जेव्हा शरीरामध्ये मांसधातूचे विघटन होऊन वात प्रकुपित होतो व शरीरात वाढलेल्या क्लेदाबरोबर हा मांसधातूचा उपधातू शरीरात सुटा, दोषरूप वाढतो आणि मूत्राबरोबर शरीराच्या बाहेर फेकला जातो तेव्हा त्याला वसामेह असे म्हणतात. (२) मज्‍जामेह : जेव्हा मज्‍जाधातू विघटन होऊन दोषरूपाने शरीरामध्ये वावरतो आणि मूत्रावाटे शरीराबाहेर फेकला जातो त्याला मज्‍जामेह म्हणतात. (३) लसीकामेह : वरीलप्रमाणेच मांस धातूचा लसीका हा उपधातू शरीरात जास्त होऊन दोषरूपाने लघवीवाटे बाहेर फेकला जातो तेव्हा त्याला लसीकामेह असे म्हणतात. (४) हस्तिमेह : लसीकामेह व हस्तिमेह हे एक होत. अशा वेळी लघवीला जे होते ते हळूहळू, वेगरहित असे होत असते. (५) मधुमेह : ज्या वेळी ओज हे द्रव्य शरीरात आत्मसात झालेले न रहाता तेही शरीरात दोषरूपाने अधिक होते व ते लघवीवाटे शरीराच्या बाहेर फेकले जाते तेव्हा त्याला ओजोमेह किंवा मधुमेह म्हणतात. ओज हे गोड असते, कफज मधुमेह व वातज मधुमेह हे दोन्ही भिन्न प्रकारचे असतात, हे लक्षात घ्यावे.

प्रमेहाचे दोषविशेष : (१) प्रमेहामधे दोष हे पक्व नसतात, अपरिपक्व असतात. (२) प्रमेहामधे केव्हाही एक दोष दुष्ट झालेला नसतो. (३) तिन्ही कारणदोषांत कफ अधिक असतो आणि तो द्रव असतो. (४) हे दोष मलदोष आहेत. मूत्रमलदोष आहेत.

दूष्यषिशेष : मेद, मांस, शरीरज क्लेद, शुक्र, शोणित (रक्त), वसा, मज्‍जा, लसीका, रस धातू, ओज इतके दूष्यविशेष आहेत. यांपैकी एक वा अनेक दूषित होतात. हे घटक विशेषत: मांस व मेद पुष्कळ प्रमाणात वाढतात आणि अतिशय ढिले-शिथिल असतात.

संसर्ग : ह्या द्रव व अबद्ध कफाबरोबर पित्त व वात जेव्हा प्रकुपित होतात तेव्हा त्या त्या दोषाचे प्रमेह निर्माण होतात.

साध्यासाध्यत्व : कफज  मेह साध्य असतात कारण दूष्य व दोष कफस्वभावी आहेत, म्हणून दूष्य व दोष यांची चिकित्सा एकच (समान) असते.

पित्तज प्रमेह औषधोपचार आहेत तोपर्यत ते त्रासदायक होत नाहीत. ते असाध्यच असतात कारण दूष्य कफस्वभावी व दोष पित्तस्वभावी असल्यानंतर दोघांची चिकित्सा करताना दूष्याला दूषित न करणारे दोषशामक शोधन असे उपचार करावे लागतात. ते योग्य तर्‍हेने जुळणे कठीण जाते.

वातज प्रमेह असाध्य असतात कारण त्यांमध्ये शरीर सारखे क्षीण होत असते आणि त्यांवर करावयाचे उपचार अगदी परस्परविरुद्ध असतात कारण कफनाशक उपचार वात वाढवतात व वातशामक उपचार कफ वाढवतात त्यामुळे ते असाध्य असतात.

निरीक्षणत: असाध्यत्व दर्शन : जो रोगी चालण्याचा कंटाळा करतो, स्वस्थ असण्यात त्याला तात्पुरते बरे वाटते, आळस करतो, बसणे आवडते, बसण्यापेक्षा आडवे होणे आवडते आणि नुसते आडवे पडण्यापेक्षा झोप घेणे आवडते असा रोगी उपचार केले नाही, तर असाध्यच समजावा.

असाध्य मधुमेह : प्रथम वीस प्रमेहांपैकी एखादा प्रमेह होऊन नंतर त्याचे पर्यवसान मधुमेहात झाले, तर तो मधुमेह असाध्य होतो. ज्या मेहात व प्रमेहात पीडका निर्माण होतात तो असाध्य होतो.

मधुमेह वा प्रमेह हे शोधनात्मक विकार आहेत. शोधनाने शरीरबल क्षीण होते त्यामुळे स्वरूपत:च त्यावर निदान परिवर्जन करून योग्य चिकित्सा झाली नाही, तर तो असाध्य होऊ शकतो.

पूर्वरूपांसह रोग असणे : ज्या प्रमेहामध्ये पूर्वरूपे नाहीशी न होताना पूर्वरूपे कायम रहातात तो प्रमेह असाध्य समजावा कारण त्या प्रमेहाचे दोष वेगाने चढत्या भाजणीमध्येच असतात. वाढतच असतात. जर ते ताबडतोब कमी करण्याचा प्रयत्‍न झाला नाही, तर तो प्रमेह असाध्य होतो.

हे साध्यासाध्यत्व केवळ व्यावहारिक वनस्पत्यौषधींच्या चिकित्सेच्या द्दष्टीने सांगितले आहे. रसौषधींची योग्य चिकित्सा झाली, तर बहुतेक प्रमेह साध्य होऊ शकतात. त्या द्दष्टीने प्रयत्‍न होणे अत्यावश्यक आहे.

सदृश रोग : प्रमेहासारखा दिसणारा-भासणारा असा एक मूत्रविकार (रक्तपित्त) हा अधोग रक्तपित्ताचा एक प्रकार आहे. गुदमार्गाने व मूत्रमार्गाने रक्तस्राव होत असतो. मूत्रमार्गाने रक्तस्राव होतो त्याला रक्तमेह किंवा मंजिष्ठमेह किंवा हारिद्रमेह समजून तशा चिकित्सा केली जाण्याचा संभव असतो म्हणून त्याचे भिन्न निश्चित निदान होणे आवश्यक असते. अशा वेळी प्रमेहाची पूर्वरूपे आहेत काय, होती काय, हे निश्चितपणे पहाणे अत्यावश्यक असते. हा विकार रक्तपित्त आहे की प्रमेह आहे, हे निश्चित निदान करून चिकित्सा करावी.

मूत्रमार्गज रक्तपित्ताची लक्षणे : पिवळ्या वर्णाची रक्तमिश्र लघवी होते. त्याकरिता रक्तपित्ताचीच चिकित्सा होणे अत्यावश्यक आहे. रक्तमेहादींची चिकित्सा करताना कफनाश व पित्तनाश दोहोंना साधारण चिकित्सा करावी लागते. या रक्तपित्तावर वातशामक, पित्तनाशक, रक्तस्तंभक अशी चिकित्सा करावी लागते.

उपद्रव : तहान : प्रमेहात तहान जोराची लागणे हा उपद्रव आहे. लघवी जास्त होण्याने तहान लागणे स्वाभाविक आहे; पण तहानेचा उपद्रव होणे हा प्रमेहाचा उपद्रवच ठरतो. प्रमेह व मधुमेह हे द्रवक्लेद वृद्धीमुळे होतात. अशा स्थितीत अंतरात्म्याने जोराची तहान या स्वरूपात पुन्हा पाण्याची मागणी करणे, हे शरीराला अत्यंत त्रासदायक होते.

अतिसार : वास्तविक प्रमेहामध्ये मूत्रमार्गाने शरीरातील पाणी अधिक प्रमाणात शरीराच्या बाहेर घालवले जाते म्हणजे शरीराचे शोधन होते त्यामुळे अशक्तताही येते. वास्तविक प्रमेही रोग्याला सामान्य रेचक दिले, तरी रेच न होण्याची प्रवृत्ती शरीरात निर्माण झालेली असते. अशा स्थितीत अंतरात्म्याला दोष अतिसार निर्माण करून गुदमार्गानेही घालवण्याची आपत्ती येते. शरीरात दोष इतके साचतात की, ते दोष गुदमार्गानेही बाहेर घालवणे शरीराला अत्यावश्यक असते म्हणून अतिसार निर्माण केला जातो. आता शरीराच्या दोन्ही अधोमार्गानी शरीरातील द्रव बाहेर घालवण्याचे कार्य अंतरात्म्याने सुरू केले आहे. तेव्हा अशा स्थितीत ते टिकणे कठीण आहे म्हणून अतिसार हा प्रमेहाचा उपद्रव आहे.

ज्वर : प्रमेह शोधन स्वरूपाचा रोग आहे. ज्वर हा दोषपाचनात्मक विकार आहे. शोधनाने (कारणे घडू दिली नाहीत तर) तो रोग निसर्गत: बरे होण्याला हरकत नाही. जेव्हा ज्वर निर्माण होतो तेव्हा अंतरात्म्याला शोधनाबरोबर प्रमेहकर दोषांच्या ज्वररूपाने पाचनही करण्याचा दुर्दैवी प्रसंग निर्माण होतो म्हणजे शरीरात दोष फारच वाढले आहेत, असे दिसते म्हणून तो उपद्रव ठरतो.

दाह : प्रमेहामध्ये मुख्य रोगात्म दोष द्रवकफ आहे. असे असताना पित्ताचा तीक्ष्ण गुण वाढून दाह उत्पन्न होणे हे चिकित्सेच्या द्दष्टिने अगदी जटिल होत असते. असा तो उपद्रव आहे.

अरोचक : शरीरात विशेषत: रसनेन्द्रियामध्ये कफघटक (मेहकर) इतके संचित होतात की , कोणताही पदार्थ तोंडात घेतला असताना त्याची रुची लागत नाही अनिष्ठ लागतो.

अंतरात्म्याने हे एक चिकित्सेला उपयुक्त असे चिन्ह निर्माण केले आहे म्हणजे बहिरात्म्याने कोणताही पदार्थ विशेषत: कफस्वभावी पदार्थ सेवन करू नये त्यामुळे शरीरीत साचलेले प्रमेहकर कफघटक पचन करण्याला अवसर मिळतो. हा आदेश पाळला , तर मधुमेहकर कमी होईल.

अविपाक : हेही चिन्ह कफाच्या शरीरातील अतिसंचयाचे दर्शक आहे. कफघटक आमाशय, ग्रहणी यांमध्ये खूप संचित झाल्यामुळे, पचन प्रक्रिया बिघडल्यामुळे पचन चांगले होत नाही याचे ते दर्शक आहे. हेही चिन्ह चिकित्सेला उपकारक, सूचक आहे.

दौर्बल्य : शरीर धांतूचे ह्या द्रवकफघटकांनी पोषण न होता सर्व शरीर घटकांना दोषरूपी  शत्रूंना प्रतिकार करीत जगावे लागते. ह्या दोन्ही कारणांमुळे ते दुबळे होतात आणि त्याचे दर्शक हे चिन्ह आहे.

पीटिका : हे उपद्रव कमी झाले नाहीत व आहारादिकांनी दोष अधिकच वाढले आणि त्या प्रमाणात ते शरीराच्या बाहेर काढले गेले नाहीत, तर शरीरात ठिकठिकाणी त्यांचा संचय करावा लागतो. त्यामुळे शरीरात गाठीसारख्या पीटिका निर्माण होतात.

चिकित्सा : प्रमेही तपासल्यानंतर त्याचे वर्गीकरण करावे : (१) स्थूल व बलवान असा एक रोगी आणि (२) कृश व दुर्बल असा एक रोगी. कृश रोग्याला धातुपौष्टिक योग्य द्रव्ये देऊन त्याचा प्रमेह नाहीसा करावा. पचन व पुष्टी यांकडे चिकित्सकाने लक्ष देऊन योग्य उपचार करावे. बलवान रोग्याच्या शरीरात दोषही पुष्कळ असतील, तर नुसते दोष शमवीत राहू नये, तर त्यांची शुद्धी करावी. कफजाला वमन, पित्तजाला रेचक द्यावे. प्रमेही मनुष्याला विरेचक सहसा लागू पडत नाही म्हणून प्रमेहाला योग्य असे सिद्ध स्‍नेह देऊन रोग्याला स्‍निग्ध करून योग्य रेचक द्यावे आणि योग्य शुद्धी झाली की, पुन्हा पौष्टिक अन्न, पान, औषधादि इतर उपचार करावे.

सारांश प्रमेहाची मुख्य चिकित्सा शरीर पुष्ट व बलवान करणे ही आहे.

सशमन-शामक चिकित्सा : ज्याला शोधन देणे योग्य होणार नाही अशा शिथिल, दुर्बल रोग्याला शामक चिकित्सा करावी.

वर्ज्य गोष्टी : नवे धान्य वगैरे जी कारणांमध्ये सांगितलेली आहार, पान द्रव्ये आहेत ती वर्ज्य करावीत. ह्याला निदानपरिवर्जन असे म्हणतात. ही प्राथमिक अत्यंत महत्त्वाची चिकित्सा होय.

प्रमेही मनुष्याला जव (सातू) हे धान्य अगदी जवळचा मित्र आहे. घेतलेले जव वगैरे अन्न नीट पचावे म्हणून गाय, घोडा, गाढव, हरिण, हंस यांना धान्य खायला घालून त्यांच्या शौचामध्ये जे धान्य मिळेल ते धान्य उपयोगात आणावे.

कर्म चिकित्सा : व्यायाम : प्रमेह, मधुमेह यांमध्ये द्रवकफ सर्व शरीर व्यापून असतो. त्यामुळे गुरुत्व, शिथिलत्व, निरुत्साह, असहिष्णुता, आळस इ. दोषांनी शरीर त्रस्त झालेले असते व त्यामुळे शरीराला अशक्तताही वाटते. हे सर्व दोष व्यायाम केल्याने नाहीसे होतात. शरीर स्थिर, द्दढ, सुविभक्त स्‍नायूंचे, पुष्ट व उत्तम पचनशक्ती असलेले होते म्हणून व्यायाम अत्यावश्यक आहे. व्यायामाने शरीरातील द्रव घटक कमी होतात, शरीरात उष्णता निर्माण होते. ही उष्णता पित्तज मेह करणारी नसते.

आहार : ह्याचा वैद्य निराळ्या रीतीने उपयोग करून घेऊ शकतात. तृणधान्य, जव इ. आहार्य द्रव्यांना वरील प्राण्यांचे उपलब्ध होईल ते मूत्र, शेणाचा रस किंवा शेण यांमध्ये ही धान्ये भिजत घालायची, पुन्हा वाळवायची, पुन्हा भिजत घालायची. अशी मूत्रातील व शेणातील पित्ताची, क्षाराची भावना त्या धान्याला देऊन ते धान्य आहारात ठेवावे.

आहार घेताना प्रत्येक घास चावून चावून, लाळ मिसळून मिसळून तोंडातच त्याचे पहिले पचन उत्कृष्ट करून आमांशयातील पचनक्रियेला मदत करणारे असे देऊन त्या अन्नाचे मेहकारी दोष न बनता शरीरपोषक असे धातुघटक बनून व्यायामाने जी अंतरात्म्याची अन्नाची मागणी होते ती योग्य रीतीने पुरवावी.

भाजके अन्न : अग्‍नी अगदीच कमी असेल, तर सर्वधान्ये, आहार्य पदार्थ भाजून त्यांचा उपयोग आहारात करावा.  ताज्या लाह्या त्या दृष्टीने उपयुक्त होऊ शकतात.

घर्षण : ओटीपोट, वरचे पोट, कंबर व पोटाची पाठ ह्यांचे दररोज लोकर, रेशीम वा टेरीकॉट ह्यांनी घर्षण करावे.  त्यायोगे बस्ती (मूत्राशय) व पचन संस्था याचे त्यातील दोष नाहीसे होऊन पोषण व कार्यकर्तृत्व वाढेल.

सर्व शरीराचे घर्षण केल्यास व्यायामी शरीराला वा अव्यायामी शरीराला त्यातील द्रवत्व इ. दोष नाहीसे होतात.  मुख्य बस्तीचे सामर्थ्यही वाढवले पाहिजे व ते घर्षणाने वाढते.

वरील जी वस्त्रे घ्यायला सांगितली आहेत त्यांनी वीज निर्माण होते व ती वीज शरीरातील घटकांत शिरून तेथून रोगकर घटक काढून अभिसरणामध्ये आणून त्या त्या धातूंना, अवयवांना निर्मल व निर्दोष करतात. ही वीज शरीराच्या धमनीकार्याला (मेंदू व सर्व मज्‍जासंस्था) उत्तेजित करते.

वर जे आहारविहार सांगितले आहेत ते तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या देखरेखीखाली करावेत किंवा त्यांचा उपयोग सुरू केल्यानंतर ते शरीराला मानवत आहेत याची खात्री झाली म्हणजे सेवन चालू ठेवावे, अन्यथा वर्ज्य करावे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री

पशूंतील मधुमेह : मधुमेह ही विकृती पशूंमध्ये क्वचितच आढळून येते; परंतु तिची कारणमीमांसा मनुष्यमात्रातील मधुमेहाप्रमाणेच आहे.  पशूंमध्ये तात्पुरता मधुमेह कार्बोहायड्रेट्युक्त खाद्य मोठ्या प्रमाणावर खाण्यात आल्यास, विषबाधेचे काही प्रकार किंवा यकृतामध्ये बिघाड झाल्यास आढळून येतो परंतु रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढून तिचा विनियोग पोषणासाठी न होता (अग्‍निपिंडामध्ये इन्शुलीन कमी प्रमाणात अगर मुळीच तयार न झाल्याने) ती मूत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागणे ही विकृती पाळीव पशूंमध्ये कुत्र्याशिवाय इतर प्राण्यांत क्वचितच दिसून येते. कार्बोहायड्रेटांच्या चयापचयातील दोषामुळे हे घडते. अतितहान, मूत्राचे प्रमाण वाढणे व त्यात शर्करा आढळणे, खाणे चांगले असूनही कृश होत जाणे, एका अगर दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू ही लक्षणे कुत्र्यांमध्ये येतात. गायीगुरांमध्ये ही विकृती आढळून आलेली आहे.गायीगुरांतील मधुमेहाचे निदान करते वेळी रक्तशर्करेचे वाढलेले प्रमाण आणि ग्‍लुकोजसह्यता परीक्षा घेणे आवश्यक असते.

नियमित कालांतराने इन्शुलिनाची अंत:क्षेपणे देत राहाणे हा एकच उपचार या विकारावर उपयोगी पडतो.

दीक्षित, श्री. गं.

पहा : अग्‍निपिंड; इन्शुलिन; पोष ग्रंथि.

संदर्भ : 1. Ajgaonkar, S. S.; Ajgaonkar, V. S. A Guide for the Diabetic, Bombay, 1962.

2. Berkow, R. and others, Ed., The Merck Manual of Diagnosis and Therapy, Rahway, N. J., 1982.

3. Blood, D. C.; Henderson, J. A. Vererinary Medicine, London, 1973.

4. Cono, H. F., Ed., Current Therapy 1983, Philadelphia, 1983.

5. Davies, I. J. T. Postgraduate Medicine, Singapore, 1983.

6. Geevarghese, P. J. Handbook for Diabetics, Bombay, 1976.

7. Krupp, M. A.; Chatton, M. J., Ed., Current Medical Diagnosis and Treatment, Singapore, 1983.

8. Miller, W. C.; West, G. P. Black’s Veterinary Dicsionary, London, 1962.

9. Petersdorf, R. G. and others, Ed., Harrion’s Principles of Internal Medicine, Singapore, 1983.

10. Scott, R. B. Ed., Price’s Textbook of hthe Practice of Medicine, Oxford, 1978.

11. Vakil, R. J., Ed., Textbook of Medicine, Bombay, 1969.

12. William, R. H., Ed., Diabetes, New York, 1960.