दोषधातुमलविज्ञान(आयुर्वेद). दोषधातुमल हे शरीराचे नित्य मूल–घटक आहेत. प्रत्यंगांच्या घटनाविघटनात्मक अवस्थेत त्यांचे कार्य असते. जन्मापासून मरणापर्यंत दोषधातुमल विशिष्ट प्रमाणात शरीरात असतात. रोग आणि आरोग्य दोन्ही दोषादींवरच अवलंबून आहे.

संयोग (उत्पत्ती), पचन आणि वियोजन इ. व्यापारांनी शरीर सुस्थितीत ठेवणाऱ्या घटकांना दोष म्हणण्याचे कारण त्यांचा स्वभाव, स्वतः दुष्ट झाल्यावर धातुमलादींना दुष्ट करण्याचा असतो.

शरीर विंशतिगुणात्मक असल्याने जे वीस गुण शरीराधार असतात, तेच न्यूनाधिक झाल्यास शरीरास हानिकारक होतात, दोष होतात. वीस गुणांचे (गुणाधार द्रव्यांचे) सामान्यतः कमीत कमी तीन गट पडतात म्हणून संक्षेपतः दोष तीनच आहेत. त्यांना वात, पित्त, कफ अशा संज्ञा आहेत. सुश्रुताचार्यांनी रक्तासही चौथा दोष मानला आहे. त्रिदोषांच्या परस्परमिश्रणाने दोषांचे ६३ भेद होतात.

दोष : स्वरूप : दोष पांचभौतिक द्रव्ये असून ती गुर्वादी गुणांची रजतमादी दोषयुक्त असतात. संयोजनादी विशिष्ट कर्मे त्यांची आहेत. ते स्वभावोपरम म्हणजे स्वभावतःच कारणाशिवाय, नाश पावणारे आहेत. पण जर दोषोत्पत्तीची कारणे घडत राहिली, तर स्वभावोपरम न होता चिकित्सेची गरज असते.

विशिष्ट दोषांचे विशिष्ट प्रमुखस्थान असले, तरी प्रत्येक दोष सर्वशरीरव्यापी आहे.

प्रकार : प्राकृतदोष (किंवा प्रकृति-आरंभक दोष)– शुक्रार्तवसंयोगाच्या वेळी उत्कटत्वाने असणारा.

वैकृत दोष– जन्मानंतर आहारविहाराने उत्पन्न होणारा. त्यांचे पुन्हा अविकृत किंवा सम दोष व विकृत वा विषम दोष असे अवस्थेनुसार प्रकार पडतात. अविकृत दोषच विकृत दोषांचे बीजभूत दोष असतात. अविकृत दोषांना त्रिधातू असे म्हणतात. त्यांचेही सारदोष किंवा प्रसादरूप दोष असे स्वरूप असते. प्राकृत दोषांनी ते जर सम प्रमाणात असले, तर समप्रकृतिशरीर निर्माण होते आणि विषम प्रमाणात असता विषमदोषप्रकृतिशरीर निर्माण होते. म्हणजे वातप्रकृती इ. होते (कोष्टक क्र. ३ पहा).

 

अग्नी : प्रत्येक दोषास स्वतःचा अग्नी असतो, त्याचे अंश कायाग्नीत असतात.

 

उत्पत्ती : पांचभौतिक आहाराचे पचन होत असताना विशिष्ट अवस्थेत व आशयात विशिष्ट दोषांची उत्पत्ती होते. आमाशयात कफ, पित्ताशयात पित्त व पक्काशयात वात अशी क्रमशः उत्पत्ती अवस्थापाकाने होते. अन्नरसाच्या अंतिम पचनानंतर जठराग्नीच्या समतेच्या योगाने होणारा निष्ठापाक सम असतो व तो सम धातू निर्माण करतो व सम नसेल, तर दोष निर्माण होतात. षड्‌रसात्मक आहारातील मधुराम्ललवणरस कफोत्पत्ती करतात. अम्ल, लवण आणि तिखट पित्तोत्पत्ती करतात. कटू, तुरट व तिखट वातोत्पत्ती करतात. आहाररसाच्या किट्टभागापासून दोषोत्पत्ती होते.

 

प्रमाण : पित्त ५ अंजली, कफ ६ अंजली हे प्रमाण दोष समस्थितीत असताना असते. वायू अमूर्त असल्याने त्याचे प्रमाण मोजता येत नाही. चिन्हांवरून तो ओळखला जातो. आत्मा, इंद्रिय व मन यांची प्रसन्नता दोषांची साम्यावस्थादर्शक असते. साम्यवस्थेतील प्रमाण व्यक्तिपरत्वे व एकाच व्यक्तीतही देशकालदिपरत्वे भिन्न असते. ज्या गुणाच्या आहारविहाराविषयी स्वाभाविक इच्छा निर्माण होईल, त्या दोषाचा क्षय झाला असे असते. दोषाच्या विषमतेची इच्छा–द्वेष ही गमके आहेत. वय, दिवस, रात्र भुक्तांश यांच्या आदि, मध्य आणि अन्त या ३ वेळी दोषांचे प्रमाण अधिक किंवा कमी होते. देशांच्या जांगलानूपसारधारण प्रकारांनुरूप दोषप्रमाण बदलते.

 

परिणाम : दोषस्थितीचा परिणाम अग्नीवर होतो. सम दोषांनी सम वायूच्या उत्कटत्वाने विषमाग्नी, पित्ताधिक्यामुळे तीक्ष्णाग्नी व कफाच्या उत्कटत्वाने तीक्ष्णाग्नी व मंदाग्नी होतो.


वातदोष : त्रिदोषांमध्ये वायू श्रेष्ठ होय. इतर दोषांची कार्ये वायूवर अवलंबून असतात. तो स्वतंत्र आहे. अव्यक्त व कर्मानुमेय आहे. वायवीय आणि आकाशीय गुणाधिक्यवान पांचभौतिक द्रव्य आहे. बाहेरील वायूचे अंतस्थ वायूस साहाय्य होते.

 

स्थाने: सर्व शरीर– (व्यापी असल्याने) परंतु पक्काशय कटी, सक्‌थी (मांडी), क्षोत्र, अस्थी व त्वचा ही त्याची प्रमुख स्थाने आहेत.

 

गुण : चल, रूक्ष, लघू, शीत, खर, सूक्ष्म, योगवाही, विशद, दारूण.

 

कर्मे : योगवाहित्वामुळे पित्तसंयोगाने दाहकर व कफसंयोगाने शीतकर आहे. कर्मे असंख्य आहेत. थोडक्यात प्रमुख पुढीलप्रमाणे : सर्व शरीर धारण करणे. सर्व शरीरक्रियांचा प्रवर्तक, चालक व नियंत्रक. शरीरपरमाणूंचे संयोजन व वियोजन. सर्व स्थूल व सूक्ष्म स्रोतसांची निर्मिती. गर्भाच्या विविध प्रकारच्या आकृती निर्मिणे व गर्भ एक वा अनेक करणे. शरीरेंद्रियसत्त्वात्मसंयोगरूपआयू टिकविणे वा नाहीसे करणे ( उत्पत्ती-स्थिती-विनाश-कारण). दोषांचे शोषण करणे. धातुसाम्य, धातुबलदान, धातुरचना, धातुवहन, धातूंना स्थैर्य व बल प्राप्त व्हावे म्हणून योग्य घटकांचा पुरवठा करणे धातूंची झीज भरून काढणे, धातूंच्या त्याज्य घटकांना मलायनांकडे नेणे, रक्तधातूला प्राणवायूचा पुरवठा करून विशुद्ध करणे. सर्व धातूंकडे रक्त पुरविणे, शारीरिक व मानसिक वेगप्रवर्तन धारण करणे. अग्निप्रदीपन. सर्व इंद्रियांना प्रेरक, इंद्रियार्थवाहक, मनःकार्यप्रवर्तक, नियंत्रक इंद्रियार्थ, इंद्रिये, मन, आत्मा यांचा ज्ञानोत्पत्तीसाठी संयोग करणे. श्रोत्रेंद्रिय व स्पर्शेंद्रिय यांचे मूल कारण असणे. वाक्‌प्रवृत्ती करणे. सुखदुःखाची अनुभूती करणे, उत्साह व इंद्रियांचे आपल्या कार्यात कौशल्य उत्पन्न करणे.

 

अशा रीतीने वायूची कार्ये परस्परविरोधी पण शरीराला धारक आहेत.

 

वाताचे प्रकार, स्थान, कर्मे : प्राणवायू : प्रमुख स्थान शिर असून जिव्हा, मुख, नासा, कंठ व उर या ठिकाणी संचार करतो. बुद्धी, हृदय, इंद्रिये व मन यांचे धारण करणे, थुंकणे, शिंकणे, ढेकर देणे, श्वास आत घेणे, जीवन चालविणे, अन्न आमाशयात घेणे. इंद्रियांचे अर्थ मनाकडे नेणे.

उदान वायू : प्रमुख स्थान उर (फुप्फुस), नाक, नाभी, गळा, कंठ ही संचारस्थाने. वाक्‌प्रवृत्ती, कर्मासाठी प्रयत्न करविणे, उत्साह व बल देणे, स्मृती, बुद्धी, धृती, मनोबोध इ. उत्पन्न करणे. स्त्रोतसांचे प्रीणन (तृप्ती) करणे.

व्यान वायू : हृदय हे प्रमुख स्थान असून तो सर्व शरीरभर अत्यंत वेगाने संचार करतो. वस्तू खाली नेणे, वर उचलणे, पापण्यांची उघडझाप करणे, शरीरातील सर्व प्रकारच्या क्रिया करविणे. हृदयाचे निमिलीन व विकसन, सर्व धातूंना रस पुरविणे, रक्त विस्त्रावण करणे, त्वचेवाटे स्वेद बाहेर नेणे, स्त्रोतसांची शुद्धी करणे, अन्नाचा आस्वाद घेणे, पचनानंतरच्या सारकिट्टविभजनास मदत करणे, जांभई देणे, गर्भाशयात शुक्र नेणे, ही त्याची कर्मे आहेत.


समान वायू : प्रमुख स्थान कायाग्नीच्या जवळ असून संचारस्थान सर्व कोष्ठ आहे. स्वेदवह, अग्निवह, दोषवह, अंबुवह, रसवह, शुक्रार्तववह स्त्रोतसे हीदेखील त्याची स्थाने आहेत. अग्नी प्रदीप्त करणे, अन्न ग्रहणीत घेऊन त्याचे पचन करविणे, रसदोषमूत्रपुरिषस्वेदविवेचनपृथक्करण-करणे व त्यांच्या स्त्रोतसात नेऊन सोडणे, ही त्याची कर्मे आहेत.

अपान वायू : पक्काशय हे प्रमुख स्थान. गुद, कटी, बस्ती, मेढ (शिश्न), वृषण, मांड्या, वंक्षणसंधी ही संचारस्थाने आहेत. शुक्र, आर्तव, पुरीष (विष्ठा), मुत्र, गर्भ यांना योग्य कालपर्यंत त्यांच्या आशयात धारण करून योग्य वेळी त्यांना बाहेर काढणे, ही त्यांची कार्ये आहेत.

पित्तदोष : पित्त हे पांचभौतिक द्रव्य आहे. अग्नी व जल या महाभूतांचे आधिक्य त्यात असते. जल अग्निसाहाय्यक असून त्यास तैजसच म्हणतात.

गुण : ईषत् स्निग्ध, तीक्ष्ण, उष्ण, लघू, विस्त्र, सर व द्रव आहे. अपक्क पित्त निळे पण पक्क पित्त निळी लाल झाक असलेले पिवळ्या रंगाचे असते. विदग्धावस्थेत अम्ल आणि पक्कावस्थेत तिखट व कडू असते.

कार्ये : शरीरात असलेल्या द्रव्यांचे पचन करणे. उष्णता उत्पन्न करणे, शरीर उष्ण राखणे, तहान व भूक निर्माण करणे, शरीर कोरडे करणे, रुची उत्पन्न करणे, शरीर मृदू तेजस्वी व प्रभायुक्त राखणे. ही सर्व शारीरिक कार्ये करणे. वाचलेले किंवा ऐकलेले चांगले पाठ होणे, स्मरणात राहणे, विचारांत निश्चितता ठेवणे, धैर्य, शौर्य, पराक्रम व मनःप्रसाद निर्माण करणे, अंतर्दृष्टी प्राप्त होणे ही मानसिक कार्ये होत.

स्थाने : पित्त सर्व शरीरव्यापी आहे. तथापि नामी, आमाशय, स्वेद, लसीका, रस, रक्त, यकृत प्लीहा, हृदय, दृष्टी व त्वचा ही विशेष स्थाने होत.

पित्तप्रकार, स्थान, कार्ये : ग्रहणीतील पाचक पित्त सर्व अन्नाचे पचन करते. इतर पित्तांना बल देते. आमाशायाश्रयी रंजक पित्त रसधातूस रंग देऊन रक्तत्व आणते. हृदयस्थ साधक पित्त बुद्धी, मेधा अभिमान इ. निर्माण करते व धर्मार्थकाममोक्षसाधनास उपयुक्त होते. दृष्टीस्य आलोचक पित्त रूपाचे ग्रहण व पचन करते. त्वचेतील भ्राजक पित्त अभ्यंगादींना पचविते आणि दीप्तिमान ठेवते.

पित्त व अग्नी: पित्तासच अग्नी अशी संज्ञा शास्त्रात आहे. कारण दोघांचे कार्य पचन करणे हेच आहे. अग्नी पित्तातच असतो. स्वतंत्रपणे प्रत्यक्ष उपलब्ध होत नाही. कार्यतः दोघांत अभेद असला, तरी निदानचिकित्सेच्या दृष्टीकोनातून पित्त व अग्नी निरनिराळी आहेत. पित्तशामक तूप अग्निवर्धक आहे व पित्तवृद्धीने पित्तज अग्निमांद्य होते.

अग्नी : बाहेरून घेतलेला आहार मूळ स्वरूपात शरीराची वाढ करू शकत नाही. त्याचे पचन म्हणजे-द्रव्यान्तर-गुणान्तर-(रूपान्तर) शरीराकडून व्हावे लागते. हे कार्य करणारे शरीरातील द्रव्य म्हणजे अग्नी होय. अग्नी हे परमेश्वराचे शरीरातील रूप होय. अग्नी असतो पण प्रत्यक्षात दिसत नाही. पचन कार्यावरून तो अनुमेय आहे. जठरात असणारा जाठराग्नी-कायाग्नी-पाचकाग्नी-प्राण, अपान, समान या तीन वायूंच्या साहाय्याने कार्य करतो. प्रामुख्याने समान वायू सुस्थितीत असता अग्नी प्रज्वलित असतो.


परमाणुभेदाने शरीराचे घटक अपरिसंख्येय आहेत. त्या प्रत्येक परमाणूत स्वतंत्र अग्नी असतो. त्या प्रत्येकाच्या ठिकाणी पचन चालू असते. आहाररसातून आपणास योग्य असे पदार्थ ते परमाणू घेतात व आपल्या अग्नीने त्यांचे स्वस्वरूपात परिणमन करतात. या दृष्टीने अग्नीही अपरिसंख्येय आहेत. परंतु सर्वांचे समुच्चयात्मक स्वरूप असा कायाग्नी, जातिबोधक पांचभौतिक अग्नी व विशिष्ट असे ७ धात्वग्नी याप्रमाणे अग्नीचे १३ प्रकार आहेत. सर्वात महत्त्वाचा कायाग्नी असून त्यावर इतर अग्नींचे बल अवलंबून असते. जाठराग्नी वृद्ध झाला म्हणजे इतर १२ अग्नी वृद्ध होतात व त्याची क्षीणता झाली म्हणजे इतरांचा क्षय होतो. इतरत्र असणारे कायाग्नीचेच अंश असतात.

कायाग्नी सर्वपच म्हणजे सर्व प्रकारचे अन्न पचवितो. इतर अग्नी फक्त आपआपलेच घटक पचवितात. शरीराचे धातू, बल, वर्ण, ओज, इंद्रिये, आरोग्य, अनारोग्य हे सर्व अग्निमूल आहे. अग्नीवरच देहस्थिती अवलंबून असते.

कफदोष: कफ हे पांचभौतिक द्रव्य असून पृथ्वी आणि जल या महाभूतांच्या आधिक्याने निर्माण होते. त्याचे गुण व कर्मे आप्य द्रव्याप्रमाणेच असतात. ‘क’ = जल व जलाप्रमाणे फल देणारा तो कफ. श्लेष्मा, बलास, सोम असेही त्यास म्हणतात. स्निग्धपणामुळे शरीरपरमाणूंना एकत्र चिकटवून ठेवून बल देणारा असा पदार्थ, हे त्यामुळे कळते.

गुण : स्निग्ध, शीत, गुरू, मंद, श्लक्ष्ण, मृत्सन, स्थिर, सार, सांद्र, मधुर इत्यादी.

स्थाने: कफ सर्व शरीरव्यापी असूनही विशेषतः उरःस्थान, कंठ, शिर, क्लोम, संधी, आमाशाय, रसधातू मेदोधातू, नाक, जीभ इत्यादी. उर हे प्रमुख आश्रयस्थान असून आमाशय हे उत्पत्तिस्थान आहे.

कर्मे: विसर्ग : बल देणे, संधी इत्यादींना धट्ट चिकटवून स्थैर्य देणे. स्नेहन, रोपण करणे ही शारीर कर्मे होत. क्षमा, गौरव, वृषता, धृती, तृप्ती, उत्साह, अलौल्यज्ञानोत्पत्ती करणे इ. मानसिक कर्मे होत.

प्रकार व त्यानुसार कर्मे : बोधक : जिभेच्या ठिकाणी असून षड्रसांचे ज्ञान देतो. क्लेदक : आमाशयात असतो. घट्ट व कठीण अशा अन्नास भिजवून सैल करतो.

अवलंबक : उरःस्थान. अन्नाच्या अत्यंत सार भागापासून स्ववीर्याने हृदयाच्या कार्यास बलदायक राहून जलीय गुणकर्मांनी बल देणे.

तर्पक : शिरस्थ इंद्रियांची स्नेहन व संतर्पण या कर्मांनी झीज भरून काढून त्यांना कार्यक्षम ठेवणे.

श्लेषक : सर्व संधींमध्ये राहून त्यांच्या घटकांना परस्परांशी घट्ट चिकटवून धरून त्यांच्यात घर्षण होऊ न देणे.


याप्रमाणे दोघांची स्वतंत्र स्थाने व कर्मे आहेत. दोष धातूंच्या आश्रयाने राहतात. वायू अस्थीत, पित्त रक्तात व कफ रस, मांस, मेद, मज्जा, शुक्र या धातूंत असतो.

रक्तदोष: वात, पित्त आणि कफ हेच खरे दोष आहेत. म्हणून त्रिदोष असेच म्हणतात. सुश्रुताचार्य रक्तास चौथा दोष मानतात.

वातादि दोषांना दोष ही संज्ञा देण्याचे कारण त्यांच्या दुष्टीची विशिष्ट कारणे असून ते दुष्ट झाले असता विशिष्ट लक्षणे होतात व दूष्यांना म्हणजे रसादि धातूंना ते दुष्ट करतात. यामुळे विशिष्ट विकार होतात. हे विकार व त्यांची चिकित्सा यांचा शास्त्रात स्वतंत्र विचार आहे.

रक्तास दोष मानण्याची कारणे दर्शविताना प्रामुख्याने हीच कारणे सांगता येतात. रक्तदुष्टीची विशिष्ट कारणे, लक्षणे, विकार व चिकित्सा यांचा शास्त्रात स्वतंत्र विचार आहे.

कित्येक विकारांत वातपित्तकफांची चिकित्सा करूनही रोग्यास बरे वाटत नाही. अशा वेळी उपवास, विरेचन व रक्तस्राव करणे अशी रक्ताची, रक्तविकारांची स्वतंत्र चिकित्सा केली असता रोग प्रशम पावतो.

शरीराच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तीनही अवस्थांत वातपित्तकफाप्रमाणेच रक्ताचेही कार्य आढळते.

वरील कारणांमुळे रक्तासही चौथा दोष मानावा असे वाटणे सर्वस्वी चूक नाही. शरीरात सर्वत्र प्रत्यक्ष रक्तच दिसते व त्याच्या सुस्थितीवर शरीराचे सर्व व्यापार चालतात. असे असले तरी शास्त्रीय दृष्ट्या रक्ताला चौथा दोष म्हणता येत नाही. कारण दोष हे स्वतः दुष्ट होऊन धातुमलांना दुष्ट करतात. वातादि दोष दुष्ट झाल्याशिवाय रक्ताची विकृती होत नाही. रक्तदुष्टीची कारणे पित्तास दुष्ट करूनच रक्ताची दुष्टी करतात. इतर दोषदुष्टीने रक्त दुष्ट होते (रक्त दूष्य आहे). त्रिदोष ‘प्रकृत्यारंभक’ आहेत. त्याप्रमाणे रक्त नाही. यामुळे रक्तास दोषत्व प्राप्त होत नाही. आयुर्वेदात धातुप्रदोषज विकार आहेत. पण त्याचा अर्थ धातूंना दोषत्व आहे, असे नाही. केवळ त्या धातूंचे विकार असा त्याचा अर्थ आहे. चिमट्याने हात भाजला असा वाक्यप्रयोग आपण करतो, त्या वेळी अग्निसंतप्त चिमट्यावर आपण अग्नीचा उपचार करतो. औपचारिक भाषा वापरतो. वास्तविक चिमटा शीत आहे. पण अग्नीमुळे तापल्यावर तो हात भाजण्यास कारणीभूत होतो. तद्वत त्रिदोषदुष्ट धातू विकारांना कारण होतात. यासाठी रक्तास चौथा दोष न मानता वातपित्तकफासच दोष ही संज्ञा दिलेली आहे. रक्त दोष नसून दूष्यच आहे.

आहाररस : पांचभौतिक आहारावर कायाग्नीचा संस्कार होऊन उत्पन्न झालेल्या सारभागाला आहाररस म्हणतात. रसादि धातूंचे मूळ स्वरूप व त्यांचा पोषक असा आहाररस असतो. अत्यंत सारवान, प्रसन्न व सूक्ष्म असे त्याचे स्वरूप असते.

अंतःकोष्ठातून समान वायूच्या मार्फत आहाररस रसायनीमधून शोषला जातो. नंतर हृदयाभिमुख रसवाहिन्यांमार्फत तो हृदयात येतो. हे त्याचे प्रमुख स्थान आहे. हृदयस्थ व्यानामुळे या रसाचे विक्षेपण सर्व शरीरभर होते. त्यामुळे सर्व धातूंचे पोषण होते. याप्रमाणे हा रस सर्व शरीरात व्यापून राहून शरीराचे धारण करतो.


आहाररसातील जे प्रभावी घटक विशिष्ट धातू आणि इंद्रियादींचे पोषक असतात, ते साक्षात हृदयामार्फतच त्या त्या इंद्रियाकडे पोहोचविले जातात. परंतु जे असे नसतात, त्यांना अधिक पचनाची आवश्यकता असल्याने त्यांचे यकृतामध्ये पचन होऊन तेथील मलधराकलेत त्यातील मलांचे पृथक्करण झाल्यानंतरच हृदयाकडे तो रस जातो आणि तेथून धातू इंद्रियांकडे जातो.

आहाररस सोळाव्या वर्षापर्यंत धातुप्रीणनाचे, तिसाव्या वर्षापर्यंत त्यांची वृद्धी करण्याचे, चाळीसाव्या वर्षापर्यंत त्यांना पूर्णावस्थेत नेण्याचे कार्य करतो. या क्रियांना धारण म्हणतात. पुढील काळात फक्त पोषण होते, वृद्धी होत नाही. हे यापन (पोषण) कार्य होय. ७० वर्षापर्यंत ते चालते. त्यापुढे पोषणापेक्षाही धातुघटकांची झीज जास्त असते म्हणून धातुक्षय होतो. वार्धक्य येते. जरापक शरीराचे आहाररस प्रीणन करू शकत नाही.

याप्रमाणे आहाररस वर्धन, धारण, यापन अशी विवध कार्ये आयुष्यभर करतो. याला अदृष्ट किंवा दैव हेच कारण असते.

धातुविज्ञान: शरीराच्या धारण करणाऱ्या घटकांना धातू म्हणतात. ते सात असून उत्पत्तीनुसार त्यांची क्रमवार नावे पुढीलप्रमाणे आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. यांना दूष्य अशीही संज्ञा आहे. प्रत्येक धातूचे स्वतःचे स्त्रोतस असून त्यात धातू राहतात. परिणाम आपद्यमान धातू स्त्रोतसातून वाहतात. रस-शुक्र यांसारखे द्रव धातू परिणत अवस्थेतूनही स्त्रोतसातून वाहतात. रस हृदय व रसवहसिरांमध्ये, रक्त यकृत-प्लीहेत, रक्तवहसिरांमध्ये व सरक्तमेदात असते. मांस हाडांच्या वर सिरा स्नायूंनी बांधलेले असते. मेद उदरात व त्वचेखाली असतो. मज्जा हाडांच्या पोकळीत असते. शुक्र शुक्रधराकला, वृषण, फलकोष यांत असते.

धातूंची कार्ये: प्रत्येक धातूचे श्रेष्ठ किंवा प्रधान कर्म व गौण कर्म असते. रसधातूंचे प्रीणन हे श्रेष्ठकर्म, रक्तपुष्टी करणे हे गौण. रक्ताचे जीवन हे प्रधान कर्म. मांसपुष्टी, वर्ण प्रसन्न राखणे, बल, सुख, दीर्घायुष्य देणे, स्पर्शज्ञान संशयरहित करविणे, इंद्रियांची प्रसन्नता राखणे, अग्निकार्य सुव्यवस्थित चालू ठेवणे, ही रक्ताची गौण कर्मे आहेत.

मांसधातू-हाडावर लेपन करून शरीराला विशिष्ट आकार देणे हे प्रधान कर्म. इतर कर्मे म्हणजे संधींना बल देणे, मेदपुष्टी करणे मेदधातू-स्नेहन, अस्थिपोषण, शरीर दृढ पण लवचिक करणे स्वेद, क्लेद इ. बाहेर टाकणे. अस्थी-देह धारण, मज्जापुष्टी करणे. मज्जाहाडाची पोकळी भरणे, प्रीती, स्नेहन,बलदान, शुक्रपुष्टी, गर्भोत्पती करणे, धैर्य, प्रीती, देहबल, जीवन, बीजोत्पत्ती, ओज व इंद्रीय द्रव्ये यांची निर्मिती करणे.

धातुस्वरूप : रसधातू हा श्वेत, स्निग्ध, शीत, द्रव, गुरू, प्रसन्न, सौम्य, सूक्ष्म गतिमान असून आप्य आहे. रक्तधातू अविकृत असता इंद्रगोप किडा, तप्त सुवर्ण, लाल कमळ, आळत्साचा रस, मेंढीचे रक्त किंवा सशाचे रक्त यांच्या रंगाप्रमाणे लाल असतो. फार घट्ट किंवा पातळ नसून कपड्यास त्याचे डाग पडत नाहीत. स्निग्ध, गुरू, मधुर लवण रसाचा, अशीतोष्ण व विस्त्रगंधी असा रक्त धातू असतो. स्पंदन व लघुता हे गुण त्यात असतात. याप्रमाणे पांचही महाभूतांचे गुण त्यात असतात. रक्त सौम्याग्नेय दोन्ही आहे. मांसधातू मृदू, शीत, स्निग्ध, मधुर, श्लक्ष्ण, स्थिर व पार्थिव आहे. मेद मृदू, द्रव, शीत, स्निग्ध, व श्वेत, जलपृथिव्यात्मक असतो. अस्थी स्थिर कठीण व बळकट असतो. आतून पोकळ असून त्यात मज्जा असते. तो पृथ्वी-अनिलात्मक आहे. मज्जा स्निग्ध, मृदू, रक्त किंवा श्वेत असते. शुक्र सौम्य पिच्छिल, गुरू मधुगंधी, सौम्य व घृत, मध किंवा तिळ तैलाप्रमाणे दिसणारे असते.

धातूंचे प्रमाण : पोष्य रस ९, रक्त ८ मांस, मेद, मज्जा १ शुक्र १/२ अंजली असते. पोषक धातूंचे परिमाण अनिश्चित असते. प्रतिशरीरात भिन्नभिन्न असते. एकाच शरीरातही भिन्नभिन्न काली भिन्न असते.


धातुप्राप्ती : आहाराचे संपूर्ण पचन होऊन प्रथम सार असा आहाररस तयार होतो. त्याच्या सारभागातील सार असा रसधातू प्रथम तयार होतो. रसापासून सारतर असे रक्त, रक्तापासून त्याच्यापेक्षा सारतर मांस, त्यापासून मेद, मेदापासून अस्थी, अस्थीपासून मज्जा व मज्जेपासून शुक्र निर्माण होते. याप्रमाणे आहाररसाच्या सारभागात अव्यक्त स्वरूपात असलेले सर्व धातू क्रमशः व्यक्त होतात.

परिणती काल : आहारापासून क्रमशः धातूत्पत्ती होऊन शुक्रोत्पत्ती होण्यासाठी लागणारा जो काल त्याला परिणती काल म्हणतात. आहारद्रव्याच्या योग्यतेप्रमाणे २४ तासांनंतर किंवा ६ दिवसांनी किंवा महिन्याने शुक्रोत्पत्ती होते.

धात्वग्नी व धातुपोषण : आहारापासून परंपरारूप पद्धतीने धातूत्पत्ती होत असताना एका धातूचे पचन होऊन दुसरा धातू उत्पन्न होतो. त्या त्या धातुघटकाला त्या त्या धातूचा अग्नी पचवितो. त्या अग्नीला धात्वग्नी म्हणतात. या पचन व्यवहारात धातूपासून उपधातू व धातूचे मलही निर्माण होतात. हे धात्वग्नी कायाग्नीचेच अंश असतात व त्या अग्नीवरच अवलंबून असतात. धात्वग्नी प्रदीप्त असला, तर धातू सम प्रमाणात राहतात. धातुपरंपरा कायम रहाते.

धातुसारासारत्व : धातुसार म्हणजे विशुद्धतर धातू होय. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील सप्तधातूंमध्ये सारभूत भागाच्या द्रव्यताः व गुणतः प्रमाणानुसार त्या त्या धातूचे उत्कृष्टसारत्व, मध्यसारत्व किंवा कनिष्ठसारत्व संभवते. ज्या धातूचे सारत्व अधिक त्या धातूचा सारवान तो पुरुष म्हटला जातो. उदा., रससार, रक्तसार इ. एकाच पुरुषाच्या ठिकाणी एकाहून अधिक धातू सारवान असू शकतात. कमी सारवान किंवा असार धातुशरीरे असतात. आयुष्य व सौभाग्य या दृष्टीने सत्वसार श्रेष्ठतम, शुक्रसारत्व हे प्रधानतम व रससारत्व हे कमी प्रधान होय. द्रव्यतः सारत्व म्हणजे परिणत धातुघटकावरून व गुणतः म्हणजे परिणत धातूच्या विशिष्ट गुणांचे धातुसारासारत्वानुसार शरीर विशिष्ट बांध्याचे आणि विशिष्ट आवडी-निवडीचे, स्वभावाचे व सामाजिक स्थानादियुक्त असते.

धातुसारलक्षणे : रससार किंवा त्वक्सार : द्रव्यत: – त्वचा अत्यंत नितळ, तेजस्वी. त्वचेवरील लोम स्निग्ध, गुळगुळीत, मऊ, थोडे, न गळणारे, सुकुमार असे असतात. गुणत: – रससार स्त्री-पुरुषांना नेहमी ऐश्वर्य, सुख ही प्राप्त होतात. ते बुद्धमान व विद्यावान असतात. त्यांना आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते.

रक्तसार : द्रव्यत: – कान, नाक, डोळे, मुख, जिव्हा, ओठ, तळहात, तळपाय, नख, कपाळ, मेदू हे अवयव स्निग्ध, तांबडे, प्रसन्न, तेजस्वी असतात. गुणत:- सुकुमारत्व, फार बल नसणे, उष्णता सहन न होणे, फार कष्ट सहन न होणे, मेधावी असणे.

मांससार : द्रव्यत: – शंख, कपाळ, हनूखालील भाग, डोळ्याचा खालचा भाग, मान, खांदे, पोट, कुशी, तळवे हे सर्व पुष्ट असतात. हातापायांची बोटे मांसल असल्याने त्यांच्यात फटी नसतात. सांधे स्थिर व मांसपूर्ण असतात. गुणत: – क्षमा, बल, अंतःकरणाचा सरळपणा, लालचीपणा नसणे, धनवत्ता, विद्या, आरोग्य व दीर्घायुष्य हे भाव असतात.

मेदसार : स्निग्ध मेदामुळे वर्ण, स्वर, नेत्र, केश, लोम, नख, दंत, ओष्ठ, मूत्र, पुरीष इ. सर्व ठिकाणी विशेषेकरून स्नेह असतो. शरीर मोठे असते. गुणत: – सुकुमारत्व, धन, ऐश्वर्य असणे व ऐश्वऱ्याचा उपयोग दानाने दुसऱ्याला करून देण्याचा सरळ स्वभाव असणे.


अस्थिसार : द्रव्यत: – घोटे, गुडघे, हात, हनु, सांधे, डोके ही सर्व मोठी व बळकट असतात. शरीर गुणत: बळकट असते. शरीराप्रमाणे मनही अत्यंत खंबीर, उत्साही व सतत क्रियावान असते.

मज्जासार : द्रव्यत: – शरीर सडपातळ, स्निग्ध व भरदार आवाज, डोळे मोठे व गोल, अवयव मृदू पण बलवान, संधी मोठे व गोल. गुणत: – दीर्घायुष्य, बल, संपत्ती, विद्या, भरपूर अपत्य व सन्मान भरपूर. प्रेमळपणा अधिक.

शुक्रसार : द्रव्यत: – दिसायला शांत, तेजस्वी, दुधाळ डोळे, दात कुंदकळ्यांप्रमाणे शुभ्र, एकसारखे, एकमेकांस चिकटलेले, बळकट व स्निग्ध असतात. गोड, प्रसन्न, स्निग्ध आवाज, कुल्ले मोठे व भरदार. गुणत: बलाधिक्य, सुख, ऐश्वर्य, आरोग्य, संपत्ती, मानसन्मान, प्रभूतसंतती यांनी युक्तता. स्त्रियांना आवडणारे व स्त्रियांचा भरपूर उपभोग घेणारे (स्त्रीशुक्रसार असेल तर ती पुरुषांना आवडते व पुरुषकामी असते).

धातुअसारत्व: धातुसारत्वाच्या लक्षणांच्या विपरीत लक्षणे असार धातुत्वाची असतात.

धातुपरिपोषण न्याय : (१) क्षीरदधिन्याय किंवा सर्वांश-परिणाम न्याय: संपूर्ण दुधाचे दही बनते, त्याप्रमाणे संपूर्ण रसाचे रक्त, संपूर्ण रक्ताचे मांस इ. क्रमाने शुक्रोत्पत्ती होणे. हा न्याय आहारद्रव्यनिष्ठ असतो.

(२) खलेकपोतन्याय: द्रव्याच्या योग्यतेनुसार, आहाररसातून घेतलेल्या त्या द्रव्यापासून तो धातू एकदम बनणे. उदा., दूध घेतल्याबरोबर ताबडतोब शुक्रोत्पत्ती इत्यादी. हा सुद्धा द्रव्यनिष्ठच न्याय होय.

(३) केदारकुल्यान्याय: तळ्यातील पाणी ज्याप्रमाणे क्रमाक्रमाने वाफ्यांना पाटामार्फत दिले जाते, तद्वत् आहाररस क्रमाक्रमाने धातुपोषण करतो. हा न्याय शरीरनिष्ठ असतो.

धातुप्रकार: पोषक-पोष्य, स्थूल-सूक्ष्म, प्रसादभूत-मलभूत, स्थिर-चल, परिणाम आपद्यमान व परिणत, सारधातू-असारधातू व प्रसाद धातूचे शुद्ध, विशुद्ध, विशुद्धतर, विशुद्वतम असे व सारासारत्वाचे प्रवर, मध्यम व असर असे प्रकार होतात.

धातुप्रमाण : समधातू प्रकृतीत असणारे प्रमाण हे धातूंचे सम प्रमाण समजले जाते. प्रसन्नत्मेंद्रिय मनत्व निर्माण करणारे प्रमाण हे सम प्रमाण होय.

धातू व दोष यांचे आश्रयाश्रयी संबंध : धातुवृद्धी झाली तर आश्रयी दोषांची वृद्धी होते. धातू क्षीण झाला तर दोष क्षीण होतो. यास अपवाद फक्त अस्थिधातू. अस्थिवृद्धीमुळे वातक्षीण होतो व अस्थिक्षीणतेने वातवृद्धी होते.


आर्तव : स्रीदेहातील शुक्रास आर्तव म्हणतात. स्रीबीजे अन्तःफल कोशात निर्माण होतात. बाल्यावस्थेतून मुलगी बारा पूर्ण झाल्यावर आर्तवाची व्यक्तता निर्माण होते. व्यक्ततेचा काल आला म्हणजे स्रीदेहात एकदम फरक पडतो. मुलीची शरीरयष्टी बदलून स्रीत्व प्राप्त होते. कटी विस्तृत होते. नितंब मोठे होतात. स्तनांची वृद्धी होते. कामवासना निर्माण होते. स्रीदेहातील मातृबीजांना आर्तव म्हणतात. स्रीबीज पूर्ण झाले याचे लक्षण रजःस्त्राव सुरू होतो. तो वयाच्या बाराव्या वर्षापासून पन्नासाव्या वर्षापर्यंत असतो. स्रीबीजांचे गर्भोत्पतीचे कारण होण्याचा सामान्यतः हा काल असतो. मासिक रजःस्राव सुरू झाल्यापासून सर्वसाधारापणे १६ दिवसांपर्यंत बीज कोशातून आर्तववहस्त्रोतसांमार्फत गर्भाशयात जातात. या काळास ऋतुकाल असे म्हणतात. ऋतुकालात स्रीबीजे निर्माण होतात म्हणून त्यांना आर्तव म्हणतात. या काळात रजःस्रावाबरोबर स्रीबीजे कित्येक वेळा बाहेर जातात. कित्येक वेळा रजःस्रावानंतर गर्भाशयात १६ दिवसांपर्यंत असतात. या काळात पुरुष बीजाशी संयोग झाला तर गर्भोत्पत्ती होते. कित्येक वेळा रजःस्राव न होताही गर्भाशयात स्रीबीजे किंवा आर्तव असते. त्या वेळी स्त्रीचे मुख प्रसन्न व पुष्ट दिसते. पुरुषाशी प्रिय कथा करते. बाहु, स्तन, श्रोणी, मांड्या, कुल्ले यांत स्फुरण होते. यावरून हा काल ओळखता येतो. गर्भसंभव होण्यासाठी प्रायः एकच स्रीबीज पितृबीजाशी संयुक्त झालेले असते. कित्येक वेळा दोन बीजांचा भिन्न मिन्न स्थळी भिन्न भिन्न पुरूषांशी संयोग झाला, तर एकाच वेळी दोन गर्भ जन्माला येतात या कित्येक वेळी वायूमळे शुक्रार्तवसंयोगाचे विभजन होऊन एकापेक्षा अधिक गर्भ जन्मतात. गर्भबीजात शुक्राच्या बाहुल्याने पुरुषगर्भ आणि आर्तव बाहुल्याने स्त्रीगर्भ जन्मास येतो. गर्भधारणा झाली म्हणजे आर्तववह-स्रोतसे रुद्व होतात. या काळात मातृबीजे निर्माण होण्याचे कार्य बंद असते. प्रसूतीनंतर दीड महिन्याने किंवा अधिक कालानंतर अन्तःफल पुन्हा बीजोत्पत्ती करण्यास समर्थ होतात व तन्निगर्शक मासिक रजःस्राव सुरू होतो.

स्रीबीजे अतिसूक्ष्म असल्यामुळे आर्तव दिसत नाही. ते किंचित काळसर व गंध नसलेले असते, असे वाग्भटांनी वर्णन केले आहे.

ओज : सप्तधातूंचे अत्यंत विशुद्ध, प्रसन्न व गुणवान असे जे स्वरूप असते त्यास ओज असे म्हणतात.

प्रकार : ओज ‘पर’ (श्रेष्ठ) व ‘अपर’ अशा दोन प्रकारचे आहे.

पर ओज प्रथम मातापित्यांच्या शुक्रशोणिताचे ‘सार’ असते. गर्भोत्पत्तीनंतर ते ‘गर्भरस’ म्हणून गर्भाचे पोषण करते व गर्भहृदय तयार झाले म्हणजे त्यात प्रवेश करून तेथेच अष्टबिंदुप्रमाणात स्थिर राहते. त्याला वृद्धी, क्षीणता, व्यापत्ती नसतात.

अपर ओज हे धातूसाररूपी असते. शरीरतील प्रत्येक धातूतील सार, सारतर भाग या ओजात असतो. याचे प्रमाण १/२ अंजली इतके असते. वृद्धी, क्षीण होते. हृदयात असूनही रक्ताबरोबर सर्व शरीर चर असते.

कार्य : शरीरातील सर्व शारीर मानसक्रिया करण्यासाठी ओजाची आवश्यकता आहे. देहात असणारे सर्व पदार्थ ओजापासून निर्माण होतात. बल, वर्ण, स्वर, पुष्टी, इंद्रयांची पाटवता, आयुष्य, आनंद ही सर्व ओजावर अवलंबून आहेत.

ओजवृद्धिलक्षणे: अपर ओज वृद्ध झाले, तर तुष्टी, पुष्टी व बलशालित्व निर्माण होते.


इतरांना ओजसंज्ञा : ओजास ‘बल’ असे म्हणतात. प्राकृत सार कफास ‘बल’ म्हणतात.

प्रसन्न रससारासही ओज म्हणतात, ‘जीवरक्तासही’ ओज संज्ञा आहे. अग्नीसही ओज संज्ञा देतात. अग्नी हे ओजकारण आहे [⟶ ओज].

अब्धातू : आप: म्हणजे पाणी. आपल्या शरीरधातूत सर्वात जास्त प्रमाण पाण्याचे आहे. दोन तृतीयांश प्रमाणात शरीर जलमय आहे. पृथ्वीप्रमाणेच शरीरातही असे असते. कफ व पित्त हे दोन जलप्रधान आहेत. रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र हे धातूही जलप्रधानच आहेत. जलाचे जास्त प्रमाण मांस व मेदात असते. त्वचाही रससार असल्याने त्वचेतही पाणी अधिक प्रमाणात असते. रस व रक्तातही पाण्याचेच प्रमाण अधिक आहे.

बालवयात कफाचे म्हणजे पाण्याचे प्रमाण अधिक असते. वृद्धावस्थेत ते कमी होत जाते.

आहाररस रसधातू, रक्त, मांस, मेद, मज्जा, कफ, पित्त, मुत्र, पुरीष, शुक्र, ओज या सर्वांत पाणी असते. नुसते पाणीही स्वतःच्या १० ओंजळी इतक्या प्रमाणात असते. धातूंतील पाणी कमीजास्त असते. साक्षात पाणी पिण्याने व जलीय अन्न खाण्याने, द्रव अन्न खाण्याने पाण्याचे प्रमाण वाढते मूत्रस्वेदपुरीषमल अधिक प्रमाणात बाहेर गेल्याने ते कमी होते.

पचन : कायाग्नीने प्रथम पचन केल्यानंतर भौतिक अग्नीपैकी जलमहाभूताचा अग्नी जलाचे पचन करतो. द्रव्यातील इतर महाभूतांचे पृथक्करण करून त्यातील जल कायाग्नी वेगळे करतो व त्या जलास आहाररसरूपी करण्याचे म्हणजे शरीरोपयोगी जल करण्याचे कार्य भौतिक अग्नी करतो. त्यानंतर त्या त्या धातूचा अग्नी त्यास त्या त्या धातूतील जलस्वरूप देतो. उदा., रसाग्नी रसधातूतील जलांश, रक्ताग्नी रक्तधातूतील, मेदाग्नी मेदोधातूतील याप्रमाणे मूळ जल रस, रक्त, क्लेद अशा भिन्न स्वरूपांत पहावयास मिळते. जे जल शरीरास नको आहे त मूत्र स्वेद रूपाने बाहेर टाकले जाते.

कर्म : शरीरात अब्धातू सोमगुणाचे कार्य करतो. कफाचे कार्य करतो. शीतवीर्यात्मक कार्य होते. ल्हादन, जीवन, रक्तपित्तप्रसादन ही कार्ये होतात. पचनासाठी क्लेद आवश्यक लागतो. त्यासाठी उपयोग होतो. अन्नसंघात विल्लिन्न (ओले) करण्याचे क्लेदक कफाचे कार्य त्यामुळेच होते.

उपधातू : धातूंपासून निर्माण होणारी व शरीराच्या धारणास मदत करणारी जी द्रव्ये त्यांना उपधातू म्हणतात. धात्वग्नींकडून उपधातू उत्पन्न होतात. उपधातू अन्य धातू (त्या शरीरातील) निर्माण करीत नाही.

रसापासून स्तन्य व रज, रक्तापासून कंडरा व सिरा, मांसापासून वसा व त्वचा, मेदापासून स्नायू, सिरा याप्रमाणे उपधातू आहेत.

कार्य: स्तन्य-स्तनपुष्टी करणे, बालकांचे पोषण, रज-गर्भोत्पत्तीला मदत करणे. वसा-स्नेहन करणे.


स्तन्य: स्तन्य म्हणजे दूध. हा स्रीदेहात उत्पन्न होणारा रसधातूचा एक उपधातू आहे परंतु त्याचे कार्य त्या देहास नसून अन्य देहासाठी अपत्यपोषणासाठी असते.

मातेच्या स्तन या बहिर्मुख स्रोतसातून ते स्रवते. बालकाच्या वाढीसाठीच ते स्त्रीशरीरात निर्माण झालेले असल्यामुळे बालकाच्या वाढीप्रमाणे व गरजेप्रमाणे स्तन्य निर्माण होत असते.

स्तन्याची निर्मिती प्रमुख्याने रसधातूच्या पोषणावर अवलंबून असते. रसवर्धक आहाराने ते वाढते. शोक, क्रोध, लंघन यामुळे कमी होते.

प्रसूतीनंतर गर्भपोषणार्थ रसधातू पाठविणे बंद झाल्यामुळे गर्भाशयांकडील स्रोतसे संकुचित होतात व स्तनाकडील स्तन्यवह स्रोतसे विस्तृत होतात. गर्भ बाहेर पडणे व अपरा बाहेर पडणे यांमुळे स्तन्यस्राव अधिक जोराचा सुरू होतो. शारीरिक परिस्थितीप्रमाणे मानसिक स्थितीही स्तन्योत्पत्तीस जबाबदार असते. मानसिक स्थिती अनुकूल असल्याखेरीज पान्हा फुटत नाही. मातेच्या अंतःकरण्यात वात्सल्याची जरूरी आहे. अपत्यदर्शन, स्मरण व अपत्याच्या मुखाचा स्तनास जोरदार स्पर्श यांवर स्तन्योत्पत्ती व जोराने पान्हा फुटणे अवलंबून असते.

रसधातू सौम्य आहे व तज्जन्य स्तन्यही सौम्य आहे. बालकाचे सर्व धातूपोषण करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. ज्या आईच्या बीजापासून मूल जन्माला आले त्याच आईच्या रसापासून स्तन्य निर्माण होत असल्यामुळे ते मुलाच्या धातूंशी अगदी जवळचे असते. सात्म्य असते. सात्म्य असल्यामुळे बालकाच्या अग्नीलाही पचविण्यास सुलभ असते. म्हणून ते त्याच्या अग्नीचेही रक्षण करते व त्याचे आरोग्य टिकविते.

जे अपत्याचे पोषण उत्कृष्ट तऱ्हेने करते व त्याचे आरोग्य राखते ते स्तन्य शुद्ध होय. तथापि शुद्ध स्तन्याचे वर्ण, गंध, रस व स्पर्श प्राकृतिक असतात व ते पाण्यात टाकले असता तात्काळ पाण्याशी मिश्र होते.

रज : रज हा रस धातूचा उपधातू आहे. स्त्रीदेहात दर महिन्यास योनीवाटे जो रक्तस्त्राव होतो त्याला रज असे म्हणतात. वयाच्या बाराव्या वर्षापासून सामान्यतः पन्नासाव्या वर्षापर्यंत दर महिन्याला ३ ते ५ दिवस हा स्राव वाहत असतो.

रसधातू सौम्य असला तरी तज्जन्य रज मात्र आग्नेय आहे. कारण स्रीशरीरातील मलिन पित्त व उष्णता या स्रवावाटे बाहेर पडते.

जे रज सशाच्या रक्ताप्रमाणे लाल किंवा लाक्षारसाप्रमाणे आरक्त असते आणि जे स्वच्छ पांढऱ्या वस्राला लावले व वस्र वाळवून पुन्हा पाण्याने धुतले असता त्या वस्राला डाग पडत नाही, ते रज शुद्ध स्वरूपाचे असते.

रजःस्राव करणे हे अपान वायूचे कार्य आहे. व्यान वायू त्याला साहाय्यक असतो. रजःस्रावाचे प्रमाण ४ अंजली इतके असते.


या स्रावाने रक्तधातूची शुद्धी होते. त्यामुळे रक्तज विकार होत नाहीत. गर्भाशयाची शुद्धी होते. त्यामुळे गर्भधारणा होण्यास व गर्भ स्थिर होण्यास योग्य अशी भूमी तयार होते.

दोन मासिक पाळ्यांच्या मधल्या काळात रसधातूपासून हा उपधातू तयार होत राहतो. तो रसात मिसळतो. इतर धातूंचेही मल त्यात येतात. हे मल गर्भाशयातील स्रोतसांकडून घेतले जातात व त्यांना रजोरूप देऊन गर्भाशयातून योनीवाटे बाहेर पडतात.

रसाच्या उपधातू असल्यामूळे रसवृद्धीमुळे रजोवृद्धीला मदत होते व रसक्षयाने रजःक्षीणता होते. गर्भधारणा झाल्यावर रजोवहस्रोतसांचा मार्ग गर्भाने रूद्ध होतो व मग रजाची गर्भाशयात अपरा किंवा वार निर्माण होते व काही भाग स्तनांना पुष्ट करतो.

प्रसूतीनंतर मूल आईच्या अंगावर स्तनपान करीत असल्यामुळे स्तनाकडील स्रोतसे अधिक विस्तृत व कार्यकारी असतात. रसाचा विनियोग स्तन्याकडे अधिक होत असल्यामुळे रजाच्या पोषणास तो कमी पडतो व प्रसूतीनंतर गर्भाशय, योनी, अन्तःफल हे अवयव पूर्ववत कार्यकारी नसतात तोपर्यंत रजःस्राव होत नाही. त्यांचे व्यापार पूर्ववत झाले म्हणजे रजःप्रवृत्ती सुरू होते.

रज व आर्तव हे दोन्ही विशिष्ट कालातच गर्भशयात येत असल्याने त्या दोघांनाही आर्तव अशी संज्ञा असली तरी आर्तव म्हणजे स्त्रीशुक्र, स्त्रीबीजे व रज म्हणजे रसधातूचा रक्तसदृश गर्भाशयातून दरमहा स्त्रवणारा उरधातू होय.

मल : शरीराला मलिन करणाऱ्या घटकाला मल म्हणतात. मलाचे प्रकार: अन्नमल, धातुमल.

अन्नमलप्रकार : घन-पुरीष व द्रव-सूत्र.

धातूमल : रसाचा कफ, रक्ताचा पित्त, मांसाचा खमल (कर्णादी बहिस्त्रोतसांतील मल), मेदाचा स्वेद, अस्थीचा नख व केश, मज्जेचा पुरीष त्वचा व नेत्र यांतील स्नेह. शुक्राला मल नाही. धातूंचे घारण कार्य संपल्यावर किंवा विकारात त्यांचे पचन होऊन परिपक्क झाले म्हणजे ते मलरूप होतात.

कार्य : पुरीष-वायू व अग्नी यांचे धारण करणे. मूत्र-अन्नाच्या पचनातील त्याज्य क्लेद वाहून नेणे. स्वेद त्वचेत क्लेद धारण करणे व लोम स्थिती ठेवणे. रसमल कफ-संधींत घर्षण क्रिया होऊ न देणे. रक्तमल पित्त-पुरीष रंजन व पुरीषात सरत्व आणणे. खमल-बहिर्मुख स्त्रोतसांचे स्वास्थ्य कायम ठेवणे. नख-अंगुलीचे रक्षण करणे. मज्जामल-स्नेहन करणे. प्रमाण-मूत्र ४ अंजली.


अन्नपचन : चतुर्विध व षड्सात्मक आहार समोर येताच गंधादी ज्ञानेंद्रियांद्वारा घेतलेल्या गंधादींचे पचन होते. मुखात बोधक कफामार्फत रसज्ञान होते. आमाशयातील क्लेदक कफामुळे अन्न शिथिल, मृदू व एकजीव होते. त्यातील पार्थिव व जलीय घटकांपासून मधुर कफाची उत्पत्ती होऊन अन्नास अधिक मधुरता येते. आमाशयातील पित्ताने अम्लत्व येते. रक्तोपयोगी घटकांचे रंजन करण्याचे कार्य होते. समान वायूमार्फत ते ग्रहणीत पोहोचताच त्यात तेथील अच्छपित्त, पाचकपित्त मिसळते व त्याचे पचन करते. कायाग्नीतील पाचक पित्तातील सर्व दोषधातूपधातू इत्यादींच्या व अग्नीच्या अंशांनी त्या त्या घटकाचे पचन होऊन तद्तद् शरीरावयवोपयोग आहाररस बनतो. समानाकडून अन्न पुढे नेले जाते व घमनीच्या साहाय्याने समानाकडून सारकिट्ट पृथक्करण होते. सारभागाचे शोषण होते व किट्टभागाचे मलधराकलेकडून पक्काशयात मलांचे विभजन होते. मूत्र, पुरीष इ. तयार होतात.

अन्नपचनात अवस्थापक व निष्ठापाक यांनी तयार झालेला सारभाग आहाररससार हृदयाकडे नेला जातो. आहाररसाच्या किट्ट भागापासून दोषोत्पत्ती होते. आहाररससार पुन्हा पांचभौतिक अग्नींकडून पचविला जाऊन त्या त्या शारीर घटकांकडे पोहोचविले जातात. त्यांच्यावर धात्वग्नीची क्रिया होऊन प्रत्येक धातू बनतो व धातुमल, उपधातू उत्पन्न होतात. इंद्रियपोषक द्रव्ये निर्माण होतात. ती त्या त्या इंद्रियाकडे जाऊन पोषण करतात. सर्व धातूंचे सारतर द्रव्य ओज तयार होते.

सर्व धात्वग्नी, वायू, स्त्रोतस प्राकृत असता पचन हे कालाप्रमाणे अव्याहत चालू असते. हे पचन आहारद्रव्यनिष्ठ व शारीरावस्थानिष्ठ असे दोन प्रकारांचे असते.

अन्नपचनोपयोगी पदार्थ: (१) ऊष्मा (पित्त), (२) वायू, (३) क्लेद (कफ व जल), (४) स्नेह, (५) काल, (६) समयोग. त्यांपैकी ऊष्मा पचन करतो. वायू अन्नाला अग्निस्थानाजवळ नेतो किंवा अग्नीला अन्नाजवळ आणतो, अग्नी प्रदीप्त करतो. क्लेद शैथिल्य निर्माण करतो. स्नेहामुळे मृदुता येते. काल पर्याप्ती म्हणजे पाकनिष्पत्ती करतो. आहाराचा समयोग पचन व धातुसात्म्य निर्माण करतो. सर्वांत कालाला महत्त्व आहे. साधारणपणे पचनास आठ तास लागतात.

पचनाचे परिणाम : योग्य पचनामुळे बलवर्णसुखवृद्धी सतत होत राहते. सर्वधातुवृद्धिसातत्य राहते व उत्साह कायम टिकतो.

मन : मन हे अत्यंत सूक्ष्म, अणुस्वरूपी असे द्रव्य आहे. मन हे अकरावे इंद्रिय आहे. ते उभयात्मक आहे. ज्ञानेंद्रिय व कर्मेद्रिय या दोहोंच्याही कर्मास मन आवश्यक असते. पण ते अतिंद्रिय आहे. इंद्रियगोचर नाही. मनाला सत्त्व, चेतस् अशी नावे आहेत. ज्ञानाचा भाव व अभाव वे मनाचे लक्षण आहे. मन हे हृदयात असून सर्व शरीरव्यापी आहे म्हणून सर्व शरीर हे मनवहस्त्रोतस आहे. प्रतिशरीरातील अनेक इंद्रियांशी निरनिराळ्या वेळी संयुक्त होणारे मन अनेक आहे असे भासते. पण तसे नाही. मन एकच आहे. इंद्रियार्थ इंद्रिय, मन व आत्मा यांच्या संयोगाने ज्ञान होते. ज्ञानेद्रियांशी संयुक्त होऊन ज्ञानोत्पत्ती व कर्मेद्रियांशी संयुक्त होऊन कर्माविषयी प्रेरणा उत्पन्न होते. सत्त्व हा मनाचा गुण आहे. रज व तम हे दोष आहेत.

कार्ये: प्राणवायू मनाचे धारण करतो. नियंत्रण करतो. स्वतःचे नियंत्रण मनच करते. ते एक मनःकार्य आहे. आणखी कार्ये पुढील आहेत. (१) एखाद्या गोष्टीचा कार्याकार्यविचार, (२) तिची उपपत्ती पाहणे, (३) भविष्याविषयी चिंतन, (४) विशिष्ट भावना धारण करून तिचे एकसारखे ध्यान, (५) तिच्या गुणदोषांचा विचार, (६) सुखदुःखादिकांचे ग्रहण, (७) इंद्रियांशिवाय केवळ स्वतःच सर्व विषयांचे ज्ञान ग्रहण करणे, (८) बाह्य इष्ट विषयाकडे प्रवृत्ती व अनिष्ट विषयापासून निवृत्ती, (९) तर्कवितर्क करणे, (१०) विचार करणे.

मनाचा अर्थ : ‘चिंत्यविषय’ हा मनोर्थ असतो. तो दोन प्रकारचा इंद्रियसापेक्ष व इंद्रियनिरपेक्ष. मनोबुद्धी-मनोर्थावर मनःकार्य झाले म्हणजे जो निश्चित विचार तयार होतो त्याला मनोबुद्धी म्हणतात.


मनःस्वास्थाचे कारण : मनोबुद्धीचा सम्यग्‌योग किंवा समयोग आरोग्यदायक व हीनमिथ्यातियोग मनाच्या विकृतीस कारण होय.

सत्त्वबल : बलावरून मनाचे तीन प्रकार पडतात. प्रवरसत्त्व-बलवान मन. मध्यसत्त्व-मध्यम बल. अवरसत्त्व-दुबळे मन.

सत्त्वसारत्व : सर्वसारात सत्त्वसार श्रेष्ठ होय. सर्वधातू सारत्वानंतरच प्रायः सत्त्वसारत्व निर्माण होणे शक्य असते. म्हणून अंतिम निष्ठा सत्त्वसारातच निर्माण होते. सत्त्वसार गुणतः असते. सत्त्वसारव्यक्ती सर्वांच्या कल्याणाविषयी झटते. भक्तिमान, उत्साही, दक्ष, धैर्यशील, समरांगणात पराक्रम गाजवणारी, कोणत्याही प्रकारचा विषाद अंतःकरणात नसणारी, प्रखर स्मरणशक्तीची, त्रिकालदर्शी, स्थिबुद्धीची, तीक्षण व खोल बुद्धिवान, शुचिर्भूत क्रियाशील व कृतज्ञ असते.

आत्मा : विश्वातील नवद्रव्यांपैकी आत्मा हे द्रव्य प्रत्येक शरीरात असते. आत्म्याच्या अस्तित्वामुळे सचेतनत्व असते. आत्मा स्वतः निर्गुण असला, तरी शरीर संयोगामुळे गुणवान होतो. आत्म्याशिवाय शरीर जड असते. सुखदुःख, इच्छा, द्वेष, प्राणापानगती, उन्मेषनिमेष, बुद्धी, मनाचे संकल्प-विकल्प-विचारणा, स्मृती, स्मृतिविज्ञान, शब्दादी विषयोपलब्धी हे गुण शरीरी आत्म्याच्या ठिकाणी येतात. आत्म्याच्या वियोगाने शरीर पंचत्वाप्रत म्हणजे केवळ जड पंचमहाभूते शिल्लक राहतात. आत्मा मनास चेतना देणारा आहे. म्हणून बुद्धिज्ञान निर्माण होतात.

इंद्रिये, मन, बुद्धी, आत्मा : आयुर्वेदात इंद्रिये पांचभौतिक आहेत. आहारातील इंद्रियपोषक इंद्रियाग्नीमार्फत इंद्रिये घेतात. प्रत्येक ज्ञानेद्रिय एक एक महाभूताच्या आधिक्याने निर्माण होते. त्या इंद्रियाचा जो गुण तोच त्या इंद्रियाचा विषय होय. त्याचे ग्रहण त्याच इंद्रियामार्फत होते. त्याचा अभावही त्याच इंद्रियामार्फत ग्रहण केला जातो. रूपाचे अथवा अंधाराचे दोघांचे ग्रहण तैजस अशा चक्षुरिंद्रियाकडून होते. इंद्रिये मनोयुक्त असतील तरच आपल्या अर्थाचे ग्रहण करतात. मन नसेल तर इंद्रिय आणि इंद्रियार्थ असूनही ज्ञानोत्पत्ती होत नाही. अर्थग्रहणानंतर मनाची चिंतनादिकार्ये होतात व मनोबुद्धी निर्माण होऊन मनाच्या गुणानुसार आणि दोषानुसार प्रवृत्ती निर्माण होतात. इंद्रियार्थाविषयी विशिष्ट अर्थ आहे असे जे ज्ञान त्यास तर्दींद्रियबुद्धी म्हणतात. उदा., रूपबुद्धी.

              कोष्टक क्र.. दोषादिप्रकारदर्शनसारिणी

दोष 

धातू 

मल 

अग्नी 

ओज 

अन्नपचन 

इंद्रिये 

मन 

बुद्धी 

आत्मा 

वायु, पित्त, कफ. 

रस,रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. 

अन्नमल, धातुमल. 

कायाग्नी, पांचभोतिकाग्नी, धात्वग्नी. 

पर ओज, अपर ओज. 

स्थूल (कोष्ठस्थ), सूक्ष्मपचन. 

ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये. 

एक 

इंद्रियबुद्धी, मनोबुद्धी. 

एक

मन शुद्ध असता सत्त्वगुणी सात्त्विक बुद्धी निर्माण होते. रजोगुणामुळे रागात्मक व तमोगुणामुळे विषादात्मक बुद्धी निर्माण होते.


सत्त्वबुद्धी म्हणजेच सत्यबुद्धी. जगाचे सत्य व निश्चयात्मक ज्ञान. या बुद्धीलाच विद्या, सिद्धी, मती, मेधा, प्रज्ञा असे म्हणतात. आत्म्याच्या ठिकाणी अहंकार निर्माण न होता महामोहरूपी अतिबलवान तमोगुणाचा भेद होऊन ह्या विश्वापासून आत्मा निराळा आहे. तो सुखदुःखादी फलभोक्तां नसून केवल स्वरूपाचा आहे आणि इंद्रियार्थ तज्जातीयत्वामुळे इंद्रियाच्या ठिकाणी येतात. हा स्वाभाव आहे. अशी चराचर वस्तूस्वभाव जाणणारी स्थितप्रज्ञबुद्धी निर्माण होऊन तो निःस्पृह होतो. त्यास त्याची पूर्वीची कैवल्यगती प्राप्त होते. मोक्ष मिळतो. चैतन्यमय, सत्य, चिरंतन आनंदमय स्थितीच केवळ शिल्लक रहाते. मानवी जोवनाचे अंतिम ध्येय सिद्ध होते.

                                कोष्टक क्र. २. दोषप्रकारदर्शकसारिणी

वायु 

पित्त 

कफ 

रक्? 

प्राण 

पाचक 

क्लेदक 

शुद्ध 

उदान 

रंजन 

अवलंबक 

विशुद्ध 

व्यान 

साधक 

बोधक 

जीवरक्त 

समान 

आलोचक 

तर्पक 

अपान 

भ्राजक 

श्लेषक 

 

पहा : शारीर, आयुर्वेदीय.

करमरकर, श्री. कृ.