ओज : (आयुर्वेद). अन्नपानादी शरीरात गेल्यानंतर तो शरीरातून निघून जाईपर्यंत त्याचे सतत पचन होत रहाते. या पचनाने ह्या द्रवाची प्रत उत्तरोत्तर सुधारली जाते, या नियमाने धातूंच्या पचनाने उत्तरोत्तर श्रेष्ठ धातू निर्माण होतात व त्याच धातूंचे श्रेष्ठ असे तेजस्वी अंश निर्माण होतात. सर्व धातूंचे जे श्रेष्ठ तेज म्हणजे उत्तम प्रतीचे घटक ते ओज होय. सर्व शारीरिक व मानसिक क्रिया ओजामुळे घडतात. त्यांत ओज खर्च होते. त्या अधिक झाल्याने त्याचा अधिक खर्च होतो. वांती, अतिसारादी विकार किंवा औषधाने वांती, रेच अधिक झाले तरी त्यांनी ओजाचा क्षय होतो. याचे प्रमाण नेहमी अर्धांजली असते. अपद ओज हे कफाच्या गुणांचे असते. त्याचे गुण उत्कृष्ट प्रतीचे असतात ते गोड, थंड, स्‍निग्‍ध, स्थिर, गुरू, मृदू, गुळगुळीत, बुळबुळीत, घट्ट व प्रसन्न असते. दुसरे परश्रेष्ठ ओज असते. ते हृदयातच असते ते अक्षय असते. प्रमाण आठ बिंदू. ते शुद्ध पिवळसर लाल रंगाचे असते ते किंचित कमी झाले तरी मनुष्य मरतो.

जोशी, वेणीमाधवशास्त्री