एकौषधिकल्प व अनेकौषधिकल्प : (आयुर्वेद). रोगाला कारण होणारा आहार-विहार नाना प्रकारचा असतो. त्यात वैविध्य फार असते, त्यामुळे अनेक रोग्यांवर रोगाचे स्थूल स्वरूप जरी सारखे दिसले तरी चिन्हांच्या अनेक सूक्ष्म सूक्ष्म छटा त्यात असतात, त्याचे अनिष्ट परिणाम निरनिराळ्या रोग्यांत निरनिराळ्या धातू, उपधातू, अवयव, इंद्रिये इत्यादींवर झालेले दिसतात. शिवाय औषध योजना करताना या चिन्हांबरोबर प्रकृती, काल इत्यादींचा विचारही करावाच लागतो. अनेकविध कारणांचे अनेकविध सूक्ष्म परिणाम लक्षात घेऊन तदनुरूप एक औषध निवडणे फार मोठ्या सूक्ष्म बुध्दीच्या विचारवंत वैद्यालाच शक्य आहे असे वैद्य विरळाच असावयाचे. त्यांचा उपयोग सर्व जनतेला अशक्य आहे, तेव्हा सामान्य विचारवंत वैद्याला वापरता येतील अशी औषधेच तयार केली, तर रोगहरण कार्याचे क्षेत्र पुष्कळच विस्तृत होते.

एकाच विकाराच्या नाशक अनेक वनस्पती पाहिल्या तर त्यांपैकी दोन वनस्पतीही गुणकर्म दृष्टीने तंतोतंत सारख्या असू शकत नाहीत, त्या एकसारख्या दिसणाऱ्या वनस्पतींमध्येही कार्यवैशिष्ट्य असते. नाना प्रकारच्या रोगकारणांच्या वैशिष्ट्यांमुळे रोगस्वरूपातही खूप निरनिराळ्या छटा निर्माण होतात, तकाशक द्रव्यांच्या अपेक्षाही शरीराला असतात, शरीर त्या अनेक द्रव्यांचा लाभ व्हावा म्हणून आसुसलेले असते. रोगकारणांची विविध वैशिष्ट्ये, रोगस्वरूपातल्या नानाविध छटा व तकाशक शरीरापेक्षा एका द्रव्याची निवड करून त्याचा चिकित्सेत उपयोग करणे सर्वथा अशक्य आहे. म्हणून तो विकार नष्ट करणाऱ्या उपलब्ध होतील तितक्या परस्परांशी अविरोधी वनस्पती एकत्र करून योग्य कल्प करून द्याव्यात.

चिकित्सा दोष : या चिकित्सेत एक दोष आहे. न घडलेल्या कारणानुरूप अनिर्मित रोगछटानाशक वनस्पतीही सेवनात येतात. अनुरूप अनेक वनस्पतींचे स्वागत शरीर वेगाने करीत असल्यामुळे त्यांच्या बरोबर उदासीन पण तद्रोगनाशक वनस्पती पचवून आत्मसात करण्याने बाधा होत नाही. हेतु-व्याधिविपरीत द्रव्यांबरोबर केवळ व्याधिविपरीत द्रव्ये शरीराला पचवावी लागतील. यात चिकित्सेस वैगुण्य येण्याचे काही कारण नाही.

जोशी, वेणीमाधवशास्त्री