स्वभावोपरम व चिकित्सा : ( आयुर्वेद ). नाशकारण-निरपेक्ष नाश होणे, आपोआप स्वभावतः नाश होणे म्हणजे स्वभावोपरम होय. विश्वात जे जे द्रव्य उत्पन्न झालेले आहे, त्याच्या उत्पत्तीला कारण असते परंतु त्याच्या नाशाला कारणाची आवश्यकता नाही. नाश हा आपोआप होतो. जसे नित्यग कालाच्या शीघ्रत्वामुळे आपोआपच तो नष्ट होतो, त्याच्या नाशाचे कारण नाही. म्हणून त्या कारणाचे ज्ञान होत नाही.
रोग म्हणजे धातुवैषम्य होणे. धातुवैषम्य हे तज्जनक कारणांनी झाले असल्यास त्याचा विनाश हा आपोआप होईल. त्याकरिता अन्य कारणांची आवश्यकता नाही परंतु धातुसाम्य निर्माण करावयाचे असले, तर धातु- वैषम्यकर कारणांचा त्याग करून धातुसाम्यकर कारणांचे सेवन केले पाहिजे. धातूंचे वैषम्य कसे उत्पन्न होणार नाही ( त्यागाने ) व सम धातूंचा अनुबंध ( सातत्याने उत्पत्ती ) व्हावा याकरिता चिकित्सा करावी लागते.
विषमत्व निर्माण करणाऱ्या कारणांचा त्याग व समत्व निर्माण करणाऱ्यांचे सेवन केल्याने सातत्याने विषमत्वाची होणारी निर्मिती बंद होते व धातू सम होतात.
पहा : आतुरचिकित्सा.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
“