अनुपान : (आयुर्वेद). आहार सामान्यतः घन असतो तो घेतल्यावर पातळ द्रव्य पिण्याची आवश्यकता असते त्याला ‘अनुपान’ म्हणतात. पाणी सर्वांत श्रेष्ठ अनुपान आहे.

गुण :  ते रुची, तृप्ती, पुष्टी करते अन्न ओले करते पचनमार्गात पचनाकरिता खाली खाली नेते व पचनक्रियेस मदत करते अन्नाचे रुपांतर शरीरघटकांत करून शरीरात लवकर पसरविते शरीराची झीज भरून काढते आयुष्य, बल, उत्साह निर्माण करते.

काल : ते जेवणाचे आरंभी प्याल्याने कृशता, नंतर प्याल्याने स्थौल्य व मध्ये प्याल्याने सम शरीर करते. वातविकारी व्यक्तीने किंवा वातप्रकृती व्यक्तीने ते स्निग्धोष्ण, कफात्मक व्यक्तीने रुक्षोष्ण आणि पित्तदुष्ट व्यक्तीने गोड व थंड प्यावे. वर्ज्य—गवई, वक्ते, अध्यापक यांनी, तसेच उरःक्षत, खोकला, श्वास, उचकी, स्वरभेद, तोंडाला पाणी सुटणे व मानेच्या वरचे रोग झालेल्यांनी जेवनानंतर लगेच पाणी पिऊ नये. आहार-द्रव्यांना अनुसरून अनुपाने भिन्न असतात. उदा., पिष्ठान्न, मध, दही, खीर, मद्य, विष यांवर थंड पाणी उपयुक्त स्नेहांवर गरम पाणी वाल, मूग यांवर दूध, मांसरस उपयोगी. अनुपानाचा दुसरा अर्थ औषधाबरोबर घेणे म्हणजेच सहपान. सूतशेखर मोरावळ्यात किंवा दुधात घेणे मध, तूप, किंवा इतर योग्य अनुपानाबरोबर पारदभस्म घेणे यांत मोरावळा, दूध, मध, तूप ही सहपाने असूनही त्यांना अनुपान हाच शब्द रूढ झाला आहे. भस्मे, मात्रा इ. औषधे पार्थिव किंवा पार्थिव-द्रव्य-घटित असतात मानवी शरीराला ती वनस्पति-द्रव्यांपेक्षाही समानतेच्या दृष्टीने दूरची असतात प्राणिज, वनस्पतिज व पार्थिव द्रव्यांत पार्थिव सर्वांत दूरचे व प्राणिज सर्वांत जवळचे द्रव्य आहे. यामुळे शरीरात क्रमाने ह्यांचे स्वागत उशिरा वा लवकर होते. उशिरा, जितका काळ होतो तितका काळ, ते द्रव्य आमाशयावर प्रतिकूल कार्य करते म्हणून द्रव्याबरोबर अनुपान गेल्याचे ताबडतोब स्वागत होते व पचनालाही सुरूवात होते. म्हणून दूध, मध, तूप अशी शरीराला नित्य परिचित, सवयीची अशी द्रव्ये बहुधा अनुपानार्थ वापरावीत. अनुपाने दोष, रोग इत्यादींना अनुसरून वापरावीत.

जोशी, वेणीमाधवशास्त्री