मुखालेप :(आयुर्वेद). तोंडावर त्वचेमध्ये काही दोष असले, विषाचा स्पर्श झाला असेल किंवा वर्ण चांगला करावयाचा असेल, तर हा विधियुक्त करावा. त्याने अकाली केस पिकणे, सुरकुत्या पडणे, वांग, दृष्टी कमी होणे, नीलिका रोग नाहीसे होतात. मुखालेप नित्य सेवन करणाऱ्याची दृष्टी बलवान होते, चेहरा चिकण व उत्साही आनंदी आणि कमळासारखा सुंदर दिसतो. हा लेप सुकताच ओला करून काढून टाकावा व अभ्यंग करावा. मुखालेप लावण्यास अयोग्य व्यक्ती : रात्री जागरण केलेले, अजीर्ण झालेले, ज्यांच्या नाकात औषध घातलेले आहे असे आणि अरूची, हनुग्रह, पडसे झालेले लोक यांनी मुखालेप करू नये. ऋतुभेदपरत्वे मुखालेपासाठी उपयुक्त द्रव्ये : हेमंत ऋतूत बोराच्या आठळीतील गर, अडूळशाचे मूळ, लोध्र व पांढरे सरसू शिशिर ऋतूत रिंगणी मूळ, काळे तीळ, तुषरहित यव व दारूहळदीची साल वसंत ऋतूत दर्भाचे मूळ, चंदन, वाळा, बडीशेप, शिरीष व तांदूळ ग्रीष्म ऋतूत निळे कमळ, तांबडे कमळ, दूर्वा, चंदन व पांढरे कमळ.

जोशी, वेणीमाधवशास्त्री