दोष : (त्रिदोष). शरीराला दूषित करणारे शरीरातील घटक. शरीराला त्याचे कार्य चालविण्याला पाहिजे तितक्याच प्रमाणात हे घटक असले, तर ते शरीराचे मित्र–आत्मघटक–धातू म्हणूनच समजले जातात पण शरीराच्या गरजेपेक्षा कमी किंवा जास्त झाले की, ते शरीराचे अमित्र–शत्रु–दोष होतात. गरजेइतके म्हणजे सम व कमीजास्त म्हणजे विषम दोष होत. सम दोष शरीर वाढवितात व विषम दोष शरीर विकृत करतात, शरीरात रोग उत्पन्न करतात. विकृत दोष कमी किंवा जास्त असतात. जास्त असतात तेव्हा ते शरीरात शरीराचे अघटक असतात. ते शरीराचे अमित्र होत असतात, ते शरीरात शल्यरूप होतात. त्याला बोचतात. रूजा–वेदना–रोग करतात. कमी होतात तेव्हा शरीराला त्यांची गरज भासते. त्यांची मागणी होते. ही मागणी इच्छा ही शरीराला स्वस्थ राहू देत नाही, अस्वास्थ्य–रोग निर्माण होतात. शरीराचे हे दोष नावाचे घटक स्वतः विषम म्हणजे दुष्ट होतात व इतर शरीर घटकांना धातूंना दूषित करतात. हा त्यांचा स्वभाव आहे. हे समावस्थेत शरीराचे धारक–धातू असले, तरी ते विषमावस्थेत जेव्हा दुष्ट होतात तेव्हा ते शरीराला–धातूंनाही दूषित करतात. म्हणून त्यांना दोष नाव दिले आहे.

शरीर व भोवतालची सृष्टी यांत मूल गुण वीस असतात. शरीर नित्य झिजते, त्यामुळे ते गुण अर्थात गुणवान द्रव्येही झिजतात. शरीर ती बाहेर काढून टाकते. त्यामुळे शरीरात त्यांची उणीव होते. ती उणीव शरीराला जाणवते. ती भरून काढण्याचा ते प्रयत्न करते. त्या गुणाचा पदार्थ घेण्याची मागणी करते. ही मागणी म्हणजे तो पदार्थ घेण्याची इच्छा. तो पदार्थ घेताना गरजेइतकाच तो घेतला, तर तृप्ती होते व शरीर निरोगी रहाते. जास्त घेतला, तर पोट जड होते ते ताणले जाते, तो पदार्थ नकोसा होतो, शरीरात तो जास्त झाल्याचे शरीर दाखवते, बजावते. त्या द्रव्याचे अधिक घटक शरीरात आत्मसात न झाल्याने तो शारीर घटकांखेरीज अन्य–बाहेरून आलेला–बाह्य घटक असे शरीर लगेच व्यक्त करते, सांगते. तो बाह्य घटक जेथे असतो तेथे शल्य होतो, सलतो. तो निर्दोष शरीरात दोष उत्पन्न झालेला असतो, शरीरातला तो दोष असतो. त्याला शास्त्रकारही दोषच म्हणतात.

शरीराला थंड, उष्ण, गुरू, लघू अशा परस्परविपरीत वीस गुणांची नित्य गरज असते. थंड द्रव्ये हवीत तशीच उष्ण द्रव्येही हवीत, गुरू हवीत लघूही हवीत. तशी २० गुणांची द्रव्ये १० जोड्या नित्य हव्यात. ही द्रव्ये गरजेइतकी घेतली गेली की शरीर, आत्मा, इंद्रिये सदा प्रसन्न असतात. शरीर स्वस्थ–निरोगी असते. पण ही द्रव्ये कमीजास्त झाली की ते अस्वस्थ, रोगी होते.

शरीरात गरजेइतकी थंड व उष्ण द्रव्ये न घेता थंड घटकच अधिक प्रमाणात घेतले, तर गरजेपेक्षा अधिक झालेले घटक आपल्या थंड गुणाचे अस्तित्व दाखवतात. शरीराला ते शल्य म्हणून बोचतात व शरीर थंड घटक जास्त झाले म्हणून ते दुःखरूपाने व्यक्त करते. जेथे ते घटक असतील तो अवयव थंड वाटेल. आतूनही थंड दुःख जाणवेल. थंड पदार्थ नको म्हणून शरीर त्याचा द्वेष निर्माण करते. अशा वेळी थंड वर्ज्य केल्याने थंड दुःख हळूहळू कमी होते. पण थंडाचा द्वेष चालू असतानाही त्याचे सेवनही चालूच ठेवले, तर थंड दोष वाढतो, ते दुःख अधिक होते व थंड नाशाकरिता थंड विपरीत उष्ण गुणाची इच्छा उत्पन्न होते. उष्ण घेतल्याने थंड दोष नष्ट होतो.

उष्णेच्छा दोन वेळी उत्पन्न होते : (१) थंड दोष काही प्रमाणात वाढल्यावर त्याच्या नाशाकरिता होते हे वर आपण पाहिले, (२) थंड पदार्थाचे सेवन शरीराच्या गरजेइतकेच केले जाते पण उष्ण पदार्थ कमी घेतले जात आहेत, अशा वेळी ते पदार्थ कमी पडतात म्हणून त्यांचा क्षय होतो म्हणून त्यांची इच्छा होते.

उष्ण दोष क्षयाच्या वेळी उष्णेच्छा होते. तेव्हा उष्ण दोषाचा क्षय म्हणून उष्णेच्छा की थंड दोषाची वृद्धी म्हणून उष्णेच्छा हे पाहिले पाहिजे.


उष्ण थंड दोषाप्रमाणेच गुरू लघू, स्निग्ध रूक्ष, मंद तीक्ष्ण, स्थिर सर, मृदू कठिण, विशद पिच्छिल, श्लक्ष्ण खर, सूक्ष्म स्थूल, सांद्र द्रव, असे एकूण वीस दोष होतात.

आपण जी द्रव्ये शरीरात पाठवितो ती केवळ एका गुणाची असत नाहीत. अनेक गुणांची असतात. ज्या गुणांची जनक महाभूते समान ती बहुधा एकत्र येण्याचा संभव अधिक असतो. त्या दृष्टीने पाहिले असता शीत (थंड), गुरू, स्निग्ध, मंद, स्थिर, मृदू, पिच्छिल, श्लक्ष्ण, स्थूल व सांद्र असे दहा गुण समान म्हणजे पृथ्वी आणि जल महाभूतजन्य आहेत. त्यामुळे या दहा गुणांचे एका द्रव्यात साहचर्य अधिक असते.

थंड, लघू, रूक्ष, कठिन, विशद, खर, सूक्ष्म या गुणांचे कारक वायू महाभूत असते. म्हणून यांचे साहचर्य अधिक दिसते व उण्ण, लघू, ईषत्, स्निग्ध, तीक्ष्ण, द्रव या गुणांचे जनक अग्नी महाभूत असते म्हणून हे गुण आधिक्याने, साहचर्याने एका द्रव्यात असतात.

असे गटागटाने शरीर गुणपोषण होत असते. ते गुण असेच गटागटाने शरीरात सम–विषम होतात. तीक्ष्ण वृद्ध होतात म्हणून दोषही तीन गटांत विभागले जातात. पहिला गुणांचा गट कफ, दुसरा वात आणि तिसरा पित्त. ‘त्रयो दोषः समासतः’ थोडक्यात तीन दोष समजावेत.

उष्ण गुणाबरोबर तीक्ष्णादी गुण असतात तेव्हा आपण पित्त वृद्धी वा पित्त क्षय म्हणतो. थंड गुण हा कफ व वात या दोहोंचा असतो. त्या थंड गुणाबरोबर रूक्ष, लघू इ. वात गुणांपैकी एक वा अनेक गुण असतील, तर वात व स्निग्ध, गुरू, इ. कफ गुणांपैकी एक वा अनेक गुण असतील, तर कफ दोष आहे असे समजावे. एकटाच असेल, तर शीत दोष सम समजून थंड समजून थंड पदार्थ वर्ज्य करून उष्ण गुणांचा उपयोग करून तो कमी करावा.

सारांश, या वीस गुणांपैकी एका वर्गातील एका किंवा अनेक गुणसमुच्चयांचे जे द्रव्य गरजेइतके असल्याने शरीराचे धारक धातू म्हणून कार्य करते व शरीराचे स्वास्थ्य राखते आणि जे द्रव्य अधिक झाल्याने शल्य होते व कमी झाल्याने न्यूनत्वही जाचते आणि शरीराला अस्वस्थ करते, ते द्रव्य दोष होय. जाचक गुणांवरून कफ, वात आणि पित्त यांपैकी कोणता दोष ते ठरवता येते. जाचक दोष एकेकटा किंवा मिश्रही असतो.

जोशी, वेणीमाधवशास्त्री