आतुर निदान :(१) आतुरविज्ञान :आतुर म्हणजे रोगी. रोग्याचे व रोगाचे विशेषज्ञान म्हणजे आतुरविज्ञान. रोगकारणे, त्यांचे परिणाम कोठे व कसे घडतात, त्यामुळे शरीरात दोष कसे उत्पन्न होतात, ते दोष रोगस्थानात कसे येतात व त्यांनी रोग कसा उत्पन्न होतो, त्याचे प्रकार इत्यादिकांबद्दलचे ज्ञान ते आतुरविज्ञान होय. या ज्ञानाला अनुसरून रोग, रोगाचे दोष यांच्या अवस्था निश्चित करणे याला आतुर निदान म्हणतात.

समाजात उत्तम आरोग्यसंपन्न व्यक्ती फार कमी, विरळाच असू शकते. मनुष्य आहारविहाराच्या मोहाने अपथ्यशील असतो. त्याचे अनिष्ट परिणाम शरीरावर होतात. तेच रोग होत. अशा रोगी जोडप्यांची संतती ही रोगी होते. रोग हे अल्पविकृतिरूपाने राहतात, कित्येक शरीरात दोषच रोग न करता शरीरात असतात. हे दोष मातापित्यांच्या आहारविहारापासून उत्पन्न होऊन बालकात जन्मतः येतात, त्यांना दोष-प्रकृती म्हणतात.

प्रत्यक्षात एखादा रोग न झालेल्या, आपणास निरोगी समजणाऱ्या पण दोषात्मक प्रकृती असलेल्या व्यक्ती समाजात फारच असतात. आपण रोगांच्या मूलभूत कारणांचा विचार करण्याच्या दृष्टीने अगदी निर्दोष निरोगी आरोग्यसंपन्न बलवान व्यक्ती उदाहरणादाखल घेऊन विचार करू. अशा व्यक्तींचे शारीर घटक विशुद्धतम असतात. अशा विशुद्धतम घटकांतून सुखाच्या सूक्ष्म संवेदना निर्माण होतात, त्यापासून उत्पन्न होणाऱ्या आनंदात ती व्यक्ती लीन झालेली असते, ती आत्मचिंतनात (समाधीत) गुंग असते. तरी आपले सर्व व्यवहार करीत असते, ती सुखी असते. आरोग्याला सुख म्हटले आहे. अशा व्यक्तीने शारीर घटक उत्तम प्रतीचे बनविणारा हितकर आहार मित प्रमाणात व भुकेच्या वेळी घेतला तर त्याच्या शारीर घटकांची प्रत अधिक सुधारत जाते व अंतःसुखही वाढत जाते, व तो योगी होऊन मोक्षाला जातो. अशा व्यक्तीची धी, धृती, स्मृती या निर्दोष बलवान होत जातात. विशुद्धतम होतात. त्याला शरीर व मन यांच्या गरजेला अनुरूप आहारविहारांचीच आकांक्षा उत्पन्न होते व त्याप्रमाणे मित प्रमाणात तो घेतो. पण मोहामुळे अननुरूप अशा आहारविहाराकडे मन जाते. येथे या क्षणीच अधःपातास सुरवात होते, विकाराचा भावी रोगाचा आरंभ होतो.

रोगाचे आदिकारण प्रज्ञापराध : शरीरास सम ठेवणाऱ्या म्हणजे त्यास जरूर असलेल्या म्हणजेच सम द्रव्याकडे मन जाणे हा शरीराचा स्वभाव आहे, प्रकृती आहे. या स्वाभाविक प्रवृत्तीत बदल होणे त्याचाच अर्थ बुद्धी (धी) भ्रष्ट झाली असा होतो. शारीर घटकांना अननुरूप असलेल्यांचे ते अनुरूप आहेत असे विषम ज्ञान झाले व त्याची आकांक्षा मोहाने निर्माण झाली तरीही नियमन करणाऱ्या धृतीने मनाचा निग्रह केला तर ठीकच. स्मृतीने हे अननुरूप आहे असे सांगितले व धृतीने ग्रहणास नकार दिला तर सावरले असे होईल पण स्मृतीने अननुरूप आहे असे ठरवूनही धृतीने मनाचा निग्रह केला नाही व त्या विरुद्ध द्रव्याचे ग्रहण केले तर त्या क्षणीच साक्षात् रोगकारण घडले, रोगबीज रोवले गेले, याला प्रज्ञेचा अपराध म्हणतात. हा प्रज्ञापराध रोगाचे आदी मूळ कारण आहे. धी, धृती व स्मृती या भ्रष्ट झाल्यामुळे जे अनुचित कर्म मानव करतो त्याला प्रज्ञापराध म्हणतात. यामुळे शरीरात दोष उत्पन्न होतात. हे रोगाचे आदी व अंत:कारण आहे.

रोगाचे दुसरे कारण कालार्थकर्मांचा हीनमिथ्यातियोग : मानवी शरीरावर काल, इंद्रियांचे विषय व कर्मेंद्रियांची कार्ये यांचा सतत परिणाम होत असतो. या तिहींचा शरीराशी येणारा संबंध त्याला योग म्हणतात. शारीर घटकांना परिपोषक अशा कालाचा (ऋतूचा) मित प्रमाणात शरीराशी संपर्क आला तर त्याला सम्यक्-सम योग म्हणतात. पण जरुरीपेक्षा कमी किंवा जास्त किंवा विकृत कालाचा संपर्क झाला तर त्याला क्रमाने हीन, अति वा मिथ्या योग म्हणतात. याप्रमाणेच इंद्रियांच्या रूप, रस इ. विषयांचा नेत्र, रसना इ. त्या त्या इंद्रियांशी हीन, अति किंवा मिथ्या योग होतो. कर्मेंद्रियांकडूनही हीन, अति वा मिथ्या कर्म घडते म्हणजे हीन, अति वा मिथ्या योगाने दोष निर्माण होऊन रोग होतात.

वर सांगितलेला काल, अर्थ व कर्म यांचा समयोग आरोग्य राखतो व निर्माण करितो. पण विषम योग रोग करितो. हे रोगाचे बाह्यकारण आहे. बहुधा प्रज्ञापराध हे ह्याचे मूल कारण असते. समयोग अतिशय दुर्लभ असतो. विषम योग सतत निर्माण होत असतात.


तिसरे अंत:कारण दोष :कालादिकांच्या हीनमिथ्यातियोगाने शरीरात शरीराला अनुपयुक्त अशी द्रव्ये येतात किंवा निर्माण होतात. यांना दोष म्हणतात. शरीरात दोष जेथे जेथे असतात तेथे तेथे शरीराला शल्यरूप होतात, म्हणून शरीराला नकोसे होतात. म्हणून त्यांचा स्पर्शही नकोसा होतो. तो दुःखस्पर्श दुःखदर्शक चिन्हांनी व्यक्त होतो. दोष हे रोगांचे सन्निकृष्ट कारण होते. दोषांची पहिली दोन्ही कारणे बंद झाली नाहीत व ती घडतच राहिली तर पुढील आमरणान्त अवस्था निर्माण होतात.

दोषांच्या रोगपूर्वावस्था :बाह्य कारणांचा ज्या शरीरावयवांशी पुनःपुनः संपर्क येतो तेथेच दोषांचा संचय होतो. विषम अन्नपान व ऋतूंचा अनिष्ट परिणाम कोष्ठावर होऊन तेथील त्या त्या दोषस्थानात दोष संचय होतो. कारणे बंद झाली की शरीर दोषांना पचवून विषमावस्था नाहीशी करून साम्यावस्था निर्माण करिते. पण कारणे चालूच राहतात त्यामुळे संचय, प्रकोप, प्रसर व स्थानसंश्रय (पूर्वरूपे) या रोगाच्या पूर्वावस्था होऊन रोग उत्पन्न होतो. दोषांच्या रोगोत्तरावस्था – त्यांच्या पुढील अवस्था म्हणजे भेद (उपद्रव) असाध्यावस्था, रिष्टावस्था (मरण पूर्वावस्था) या उत्पन्न होऊन अखेर मनुष्य पंचत्वाला प्राप्त होतो, मरतो.

रोग :लोक (बाह्यसृष्टी) व पुरुष यांच्या झगड्यात पुरुषशरीराच्या एका विशिष्ट विभागावर (अवयवावर) बाह्यसृष्टीचे पूर्ण यशस्वी आक्रमण म्हणजे रोग होय. दोष हे बाह्यसृष्टीचे घटक, शरीराच्या नित्य सन्निध असणारे आक्रमकस्वभावी शत्रू होत. संचयादी अवस्था म्हणजे शरीराचा विशिष्ट प्रदेश ताब्यात घेण्याकरिता सुरू झालेल्या दोषांच्या आक्रमणाच्या अवस्था होत. रोगोत्तर मरणान्त अवस्था म्हणजे पुरुषशरीरातील सर्व अवयवांचा ताबा घेऊन पुरुषाला (आत्म्याला) तेथून घालवून ते पंचमहाभूतात्मक शरीर आत्मसात करण्याच्या दोषांच्या आक्रमक विजयी अवस्था होत.

चिन्हे : दोष आणि शरीराचे धातूपधातू अवयव व घटक यांच्या लढ्यात दोषांनी केलेल्या आक्रमणाचे स्वरूप चिन्हांनी व्यक्त होते. ते थांबविण्याकरिता दोषांना घालवण्याकरिता काय मदत पाहिजे व दोषांना मदत करणारे कोण, ते नको, असे व्यक्त करणारी शरीराची भाषा म्हणजे चिन्हे होत. या चिन्हांवरूनच संचयादी मरणान्त निरनिराळ्या अवस्था व स्वास्थ्य समजते.

निज व आगंतुक रोग :प्रज्ञापराधाने वरीलप्रमाणे दोषजन्य म्हणजे निज रोग होतात तसेच आगंतुक रोगही होतात.

चिन्हे ही रुग्ण पुरुषाची भाषा असते तिच्याने दोष, त्यांचे स्थान (अवयव, धातूपधातू इ.), दोषवाढीचा आहारविहार नको म्हणून त्यांची अनिच्छा, द्वेष, दोषनाश होण्याकरिता कोणत्या आहारविहाराची आवश्यकता आहे त्यांची मागणी, दोषांचे शमन करायचे की काढून टाकावयाचे हा आदेश इत्यादी सर्व कळते.

शूलाने वात, दाहाने पित्त, कंडूने कफदोष सांगितला जातो. ज्या स्थानात हे चिन्ह असेल त्यावरून दोषाचे स्थान व्यक्त होते. थंड, उष्ण, स्‍निग्ध, जड इत्यादींपैकी ज्या गुणाच्या अधिक सेवनाने दोष उत्पन्न झाला असेल त्या गुणाच्या द्रव्याची वा पदार्थाचीही अनिच्छा वा द्वेष उत्पन्न होतो व दोष-नाशक अशा गुणांच्या द्रव्यांची म्हणजे वरील गुणक्रमाला अनुसरून उष्ण, थंड, रूक्ष, लघू इ. गुणांच्या पदार्थांची इच्छा उत्पन्न होते. खाज हे चिन्ह तेथला दोष  खाजवून, खरडून काढणे जरूर आहे, असा आदेश ते चिन्ह देते, म्हणजे दोष काढणे जरूर आहे, दोष कफात्मक आहे, कफाचे उदरातले स्थान आमाशय आहे, तेथे कफ होऊन त्वचेवर आला आहे म्हणून (घाम इत्यादींनी) आमाशयाकडे त्याची गती निर्माण करून वांतीचे औषध देऊन तो काढून टाकावा लागतो पण प्रथम अनिच्छा, द्वेष व चिन्हस्वभाव यांवरून कारणद्रव्ये समजावून घेऊन ती बंद केली तर, शिवाय इच्छा असलेले विपरीत गुणी पदार्थ दिले तर, दोष शरीरातच पचवून शमवून कमी करता येतात. याप्रमाणे अनेक सूक्ष्म अर्थाच्याही छटा पुरुष (देह) व्यक्त करीत असतो, ते उपचारांचे नैसर्गिक मार्गदर्शन असते. तज्ञाला ते होते. या चिन्हांच्या अर्थावरून रोगाच्या अवस्था व उपचारांचे मार्गदर्शन समजते.

शरीरात प्रस्थापित झाल्यामुळे होणारे दोषांच्या गुणकर्माचे दर्शन व पुरुषाची भाषा चिन्हांनी व्यक्त होते, त्यांचे ज्ञान म्हणजे आतुर विज्ञान होय.

जोशी, वेणीमाधवशास्त्री


(२) आतुर निदान: रोग्याचा वृत्तान्त. रोग्यास रोग विविध कारणांनी होतात. कारणमूलक वर्गीकरण पुढीलप्रमाणे.

(अ) आदिबल-प्रवृत्त व्याधी : गर्भधारणेच्या पूर्वी पुरुष अथवा स्त्रीबीजामध्ये विकृती असल्यामुळे गर्भावस्थेमध्ये अगर प्रसूतीनंतर बालकाला होणारे प्रमेह, कुष्ठ, मूळव्याध वगैरे व्याधी यांस आदिबल प्रवृत्त म्हणतात. मनुष्यबीजामध्ये प्रत्येक अंगप्रत्यंग निर्माण करणारे बीजभाग असतात. ज्या अंगप्रत्यंगाचा बीजभाग विकृत होतो त्या बीजभागापासून निर्माण होणाऱ्या अंगप्रत्यंगामध्ये विकृती म्हणजे आदिबल प्रवृत्त रोग निर्माण होतो. उदा., प्रमेही मातेच्या अथवा पित्याच्या बीजामध्ये मूत्रवहस्रोत निर्माण करणारा बीजभाग दुष्ट असल्यामुळे संतानामध्ये प्रमेहाची पूर्वतयारी होऊन राहते. संतान जन्माला आल्याबरोबर ताबडतोब अशा प्रकारचा आदिबल प्रवृत्त व्याधी होतोच असे नाही. परंतु अपथ्यकारक आहारविहाराने अशा संतानामध्ये तत्काल आदिबल प्रवृत्त व्याधी निर्माण होतो. बीजदोष नसलेल्या व्यक्तीमध्ये तेवढाच अपथ्य आहारविहार व्याधी निर्माण करण्यास समर्थ होत नाही. आदिबल प्रवृत्ती ही वंशपरंपरेने चालत येते. आदिबल प्रवृत्त व्याधी मातृज व पितृज भेदाने दोन प्रकारचे असतात.

(आ) जन्मबल-प्रवृत्त व्याधी : गर्भारपणी, प्रसूती होऊन बालकाचा जन्म होईपर्यंत, मातेने केलेल्या अहित आहाराविहारामुळे गर्भावर अनिष्ट परिणाम झाल्यामुळे होणाऱ्या व्याधीला जन्मबल-प्रवृत्त व्याधी म्हणतात. मुकेपणा, गेंगाणेपणा, आवाळू, गर्मी वगैरे जन्मबल-प्रवृत्त व्याधी होत. विकृतआहारजन्य रसकृत व दौहृदापकारजनित म्हणजे डोहाळे न पुरविल्यामुळे होणारे असे त्यांचे दोन भेद होतात. मातेने गर्भारपणी मधुररसाचे अतिसेवन केल्यामुळे अतिस्थौल्य, प्रमेह, मूकता वगैरे व्याधी किंवा अम्‍ल रसाचे अतिसेवन केल्यामुळे  बालकामध्ये होणारे अम्‍लपित्त तथा त्वचा व डोळ्यांचे रोग लवण रसाचा अति उपयोग केल्यामुळे वळ्या, पांढरे केस वा टक्कल असे रोग तिखट रसाच्या अति उपयोगाने दुर्बलता, अल्प शुक्रता, वांझपण कडू रसातियोगामुळे शोष, दुर्बलता कषायरसातियोगामुळे पोटफुगी, उदावर्त वगैरे रोग हे रसकृत जन्मबल-प्रवृत्त होत. चवथ्या महिन्यात गर्भाचे हृदय व्यक्त झाल्यामुळे गर्भाच्या परिपोषक द्रव्यांच्या इच्छाआकांक्षा मातेच्या द्वारा व्यक्त होतात. या निर्माण होणाऱ्या विशेष इच्छा, आकांक्षांना दौहृद वा डोहाळे असे म्हणतात. गर्भिणीमध्ये निर्माण झालेल्या या विविध प्रकारच्या इच्छा, युक्तीने, शक्यतो पूर्ण केल्या पाहिजेत. त्या पूर्ण न केल्यास श्रद्धाविघात अथवा मानसिक आघातामुळे गर्भावर दुष्परिणाम होऊन निरनिराळे रोग निर्माण होतात. त्यांना दौहृदापचारजनित जन्मबल-प्रवृत्त व्याधी असे म्हणतात.

(इ) दोषबल-प्रवृत्त व्याधी : वात, पित्त, कफ हे शारीरिक दोष अथवा रज व तम हे मानसिक दोष यांची मुख्यत्वेकरून विकृती झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींना दोषबल-प्रवृत्त व्याधी असे म्हणतात. या व्याख्येवरून व्याधीमध्ये होणारे उपद्रव अथवा पूर्वरूप त्याचप्रमाणे एका व्याधीपासून निर्माण होणारा दुसरा व्याधी हे सर्व दोषबल-प्रवृत्तच होत. त्याचप्रमाणे मिथ्या (अयोग्य) आहार व आचारामुळे होणारे स्वतंत्र व्याधीही दोषबल-प्रवृत्त आहेत.

(ई) संघातबल-प्रवृत्त व्याधी : शस्त्रकृत व व्यालकृत असे संघातबल-प्रवृत्त व्याधींचे दोन भेद होतात. बलवान व्यक्तीबरोबर युद्ध करणे, अचानक मार लागणे, पडणे किंवा हिंस्र पशू वगैरेंचे आक्रमण यांमुळे झालेल्या व्याधींना संघातबल-प्रवृत्त व्याधी असे म्हणतात.

(उ) कालबल-प्रवृत्त व्याधी : शीत अथवा उष्ण हवा अथवा वृष्टी वगैरेंमुळे दोषांचा प्रकोप होऊन उत्पन्न होणाऱ्या जाड्य, दाह, कंप, ज्वर, व्रण वगैरे व्याधींना कालबल-प्रवृत्त व्याधी असे म्हणतात. कालबल-प्रवृत्त व्याधींचे व्यापन्नऋतुकृत व अव्यापन्नऋतुकृत असे दोन भेद होतात. थंडीच्या दिवसांत अगर अन्य ऋतूंमध्ये अधिक थंडी पडल्यामुळे, उष्णकालामध्ये अगर अन्य ऋतूंमध्ये अधिक उष्णता वाढल्यामुळे त्याचप्रमाणे अधिक पावसामुळे दोषांचा प्रकोप होऊन व्याधी निर्माण होतात. या व्याधींचे कारण ऋतुमान तीव्र होणे वा न्यून होणे वा बिघडणे म्हणजेच ऋतुव्यापत् होय. यांना व्यापन्नऋतुकृत व्याधी असे म्हणतात. ऋतुव्यापत् नसूनही त्या त्या ऋतूंतील स्वाभाविक उष्णता, शैत्य अथवा पाऊस वगैरेंमुळे शरीरावर जो अनिष्ट परिणाम होतो व या कालस्वभावामुळे वातादी दोषांचा संचय प्रकोप वगैरेंमुळे जे व्याधी निर्माण होतात त्यांना अव्यापन्नऋतुकृत असे म्हणतात.

(ऊ) दैवबल-प्रवृत्त व्याधी : दैविक शक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या रोगांना दैवबल-प्रवृत्त व्याधी असे म्हणतात. देवता, सिद्ध, ऋषी यांच्या अपमानामुळे किंवा शापामुळे तसेच अथर्ववेदातील मंत्रप्रयोगामुळे या व्याधी होतात. औपसर्गिक (सांसर्गिक) रोग्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क झाल्यामुळे होणाऱ्या व्याधींचाही समावेश दैवबल-प्रवृत्त व्याधिवर्गातच होतो. कारणानुसार दैवबल-प्रवृत्त व्याधींचे विद्युत् व उल्कापातामुळे होणारे व पिशाचामुळे होणारे असे दोन प्रकार होतात. उत्पत्तींच्या प्रकाराप्रमाणे यांचे संसर्गज व आकस्मिक असे दोन भेद पडतात.

(ए) स्वभावबल-प्रवृत्त : प्राकृतिक नियमानुसार होणारे भूक, तहान, झोप, म्हातारपण, मृत्यू वगैरे स्वभावबल-प्रवृत्त व्याधी आहेत. यांचे कालकृत व अकालकृत असे दोन भेद होतात. स्वस्थवृत्ताच्या नियमाप्रमाणे आहारविहार वगैरेंचे पालन करूनही योग्य वेळी होणारे भूक, तहान, निद्रा, मरण वगैरे कालकृत स्वभावबल-प्रवृत्त व्याधी आहेत. यथाविधी आहारविहारांचे पालन न केल्यामुळे दोषांची विकृती होऊन अयोग्य वेळी लागणारी भूक, तहान, झोप, अथवा अकाली येणारा मृत्यू हे सर्व अकालज होत.


मार्गानुसार रोगांचे भेद : शाखा, मर्मास्थिसंधी आणि कोष्ठ असे तीन रोगमार्ग आहेत. यांच्या विकृतीमुळे होणाऱ्या रोगांना त्या त्या रोगमार्गाचे नाव दिले जाते.

शाखानुसारी रोग : रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्‍जा व शुक्र हे धातू व त्वचा यांना शाखा असे संबोधिले जाते. यालाच बाह्यरोगमार्ग असेही म्हणतात. रक्त वगैरेच्या दुष्टीमुळे होणारे ग्रंथी (गाठ), पिडका (फोड), अलजी, अपची (जुनी गंडमाळा), चर्मकील (चामखीळ), अधिमांस, मषक (मस), कुष्ठ, विसर्प (धावरे), शोथ (सूज), विद्रधी (गळू), वगैरे रोगांना बहिर्मार्गाश्रित अथवा शाखाश्रित असे म्हणतात. बाह्यरोगमार्गामध्ये रक्तादी धातूंबरोबर रसाचा उल्लेख न करता त्वचेचा उल्लेख शास्त्रकारांनी केला आहे. अर्थात याचा अर्थ बाह्यरोगामार्गामध्ये केवळ त्वचाश्रित रसाचाच अंतर्भाव करावा असा आहे. केवळ रसाचाच उल्लेख बाह्यरोगमार्गामध्ये केला गेला असता तर रसाचे मुख्य स्थान हृदय असल्यामुळे हृदयाश्रित विकृतीचाही समावेश शाखाश्रित रोगांमध्ये करावा लागला असता. परंतु तसे न करता हृदयाश्रित विकृतीचा समावेश मध्यमरोगमार्गात करावयाचा आहे.

मर्मास्थिसंध्यनुसारी रोग : हृदय, बस्ती, शिर वगैरे मुख्य मर्मे, अस्थींचे संधी त्याचप्रमाणे दोन अथवा अधिक अस्थींना जोडून संधी निर्माण करणारे तसेच हालचालीला कारणीभूत असे स्‍नायू, कंडरा (स्‍नायूंचे दोर) वगैरेंना मध्यमरोगमार्ग असे म्हणतात. यांच्या विकृतीमुळे होणारे रोग मर्मास्थिसंध्यनुसारी अथवा मध्यममार्गानुसारी रोग होत. पक्षाघात (अर्धांगवात), अपतानक (धनुर्वात), अर्दित (तोंड वाकडे होणे), शोष, राजयक्ष्मा, अस्थिसंधिशूल, गुदभ्रंश तसेच हृदय, बस्ती व शिरोगत रोग वगैरे मध्यममार्गानुसारी रोग होत.

कोष्ठानुसारी रोग : मुखापासून गुदापर्यंत अखंड असलेल्या नळीसारख्या पोकळ अवयवाला महास्रोत अथवा कोष्ठ असे म्हणतात. हाच आभ्यंतर रोगमार्ग होय. महास्रोत व तत्संबंधी असलेल्या यकृत, प्‍लीहा वगैरे अवयवांच्या विकृतीमुळे होणाऱ्या ज्वर, अतिसार, वांती, अतितीव्र अजीर्ण, विसूचिका (शूळ वांती अतिसारयुक्त तीव्र अजीर्ण), खोकला, श्वास, आनाह (पोटफुगी), प्‍लीहा, गुल्म, अर्श, विद्रधी वगैरे रोगांना आभ्यंतर मार्गानुसारी अथवा कोष्ठानुसारी रोग असे म्हणतात. यकृत अथवा प्‍लीहेमध्ये रक्तदुष्टी होऊन होणाऱ्या रोगांना सुद्धा बाह्यमार्गाश्रित समजले जात नाही. कोष्ठस्थ विकृतीमुळे निर्माण झालेले असल्यामुळे त्यांचा आभ्यंतर रोगमार्गातच समावेश केला जातो.

आगंतुक, शारीरिक, मानसिक व स्वाभाविक व्याधी: अभिघातामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधीला आगंतुक असे म्हणतात. हा अभिघात सविष किंवा निर्विष प्राण्यांचे नख, दंत वगैरेमुळे किंवा अभिचार, अभिशाप, अभिषङ्‍ग, बंधन, रज्‍जू, विद्युत्, अग्‍नी व क्षार यांमुळे होतो व दाह, शस्त्र, भूतोपसर्ग यांमुळेही होतो. बाह्य कारणांमुळे आगंतुक व्याधी प्रथम उत्पन्न होतो. नंतर वात, पित्त, कफ यांचे वैषम्य निर्माण होते आगंतुक व्याधींमध्ये प्रथम दोष वैषम्य नसते.

विरुद्ध आहार अथवा विहारामुळे वात, पित्त, कफ विषम होऊन त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या ज्वर, अतिसार, अम्‍लपित्त वगैरे व्याधींना शारीरिक व्याधी असे म्हणतात. आगंतुक व्याधींमध्ये आगंतुक अथवा निजव्याधींचा अनुबंध होतो. त्याचप्रमाणे निजव्याधींमध्ये निजव्याधीचा अथवा आगंतुक व्याधीचा अनुबंध असू शकतो.

शारीरिक व्याधींचे दोषांच्या प्राधान्याप्रमाणे एकदोषज, द्विदोषज व त्रिदोषज असे तीन भेद पडतात. द्विदोषज व्याधीला संसर्गज व त्रिदोषज व्याधीला सान्निपातिक असेही म्हणतात.

रज आणि तम या मानसिक दोषांमुळे उत्पन्न होणाऱ्या क्रोध, शोक, हर्ष, विषाद, ईर्ष्या, अभ्यसूया, दैन्य, मात्सर्य, काम, लोभ वगैरे व्याधींना मानसिक व्याधी असे म्हणतात. हे व्याधी इष्ट वस्तू न मिळाल्यामुळे किंवा एकदम कल्पनेपेक्षा अधिक प्रमाणात मिळाल्यामुळे अथवा अनिष्ट वस्तू अचानक मिळाल्यामुळे निर्माण होतात.

स्वाभाविक व्याधी : वर दिलेले स्वभावबल-प्रवृत्त व्याधी.


अनुबंध्य अनुबंध : स्वतंत्र व्याधीला अनुबंध्य व्याधी असे म्हणतात. हा व्याधी आपल्या विशिष्ट कारणांनी निर्माण होणारा, लक्षणे स्पष्ट असणारा, त्याचप्रमाणे चिकित्सेने कमी होणारा असा असतो. स्वतंत्र व्याधीची विशिष्ट प्रकारची संप्राप्ती असते व विशेष प्रकारचा स्वभाव असतो. उदा., स्वतंत्र ज्वरव्याधी आमाशय समुत्थ, आशुकारी, आमावस्था, पच्यमानावस्था, पक्वावस्था या तीन अवस्थांमधून जाणारा व म्हणून क्रमाने लंघन, लंघन पाचन वा पाचन शमन अशा चिकित्सेने बरा होणारा असा असतो. याला प्रधान व्याधीही म्हणतात.

परतंत्र व्याधीला अनुबंध असे म्हणतात. या व्याधीला स्वतंत्र कारणे, संप्राप्ती व चिकित्सा नसते. स्वतंत्र व्याधीच्या कारणांनी व स्वतंत्र व्याधीच्या संप्राप्तीमध्येच परतंत्र व्याधी  निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे स्वतंत्र व्याधीच्या चिकित्सेनेच तो परतंत्र व्याधी बरा होतो. राजयक्ष्मा या व्याधीमध्ये होणारा ज्वर राजयक्ष्म्याच्या कारणामुळे राजयक्ष्म्याची संप्राप्ती घडत असतानाच निर्माण होतो व राजयक्ष्म्याची चिकित्सा करूनच बरा होतो. म्हणून राजयक्ष्म्यामध्ये होणारा ज्वर हा परतंत्र अथवा अनुबंध होय. या व्याधीला अप्रधान व्याधी असेही म्हणतात.

आमाशय समुत्थ व पक्वाशय समुत्थ व्याधी : अन्नपाचनाच्या दृष्टीने महास्रोतसाचे मुख्य दोन भाग पडतात. अपरिपक्व अथवा अर्धपरिपक्व अन्नाच्या आशयाला आमाशय अंशी संज्ञा आहे. आमाशय या संज्ञेत चरकांच्या मताने आमाशय व पच्यमानाशय या दोन्ही अवयवांचा समावेश होतो. या आमाशयामध्ये मूळ विकृती होऊन निर्माण होणाऱ्या व्याधींना आमाशय समुत्थ व्याधी असे म्हणतात. आमाशय हे प्रामुख्याने कफाचे स्थान आहे व पच्यमानाशय हे प्रामुख्याने पित्ताचे स्थान आहे. म्हणून आमाशय समुत्थ व्याधी प्रामुख्याने कफप्रधान, पित्तप्रधान, अथवा कफपित्तप्रधान असतात.

आमाशय व पच्यमानाशय सोडून शेष महास्रोतसाच्या भागाला पक्वाशय असे म्हणतात. पक्वाशयामध्ये मूळ विकृती होऊन उत्पन्न झालेल्या व्याधीला पक्वाशय समुत्थ व्याधी म्हटले जाते. पक्वाशय हे प्रामुख्याने वाताचे स्थान असल्यामुळे पक्वाशय समुत्थ व्याधी हे प्रामुख्याने वातप्रधान व्याधी असतात.

संतर्पणोत्थ व अपतर्पणोत्थ व्याधी : स्‍निग्ध, मधुर, गुरू, पिच्छिल असे पदार्थ, नवीन अन्न, आनूप व वारिज प्राण्यांचे मांस, दुधाचे व गुळ-साखर वगैरेंचे बनविलेले पदार्थ, दिवसा झोप, व्यायाम न घेण्याकडे प्रवृत्ती वगैरे कारणांमुळे शरीराचे अतिसंतर्पण होऊन उत्पन्न होणाऱ्या अतिस्थौल्य, गुरुगात्रता, प्रमेह, कुष्ठ, कंडू, आमदोषज व्याधी, शोथ, क्लैब्य वगैरे व्याधी संतर्पणोत्थ व्याधी होत.

रूक्ष, कटू, लघू अशा प्रकारचे अन्न, अतिश्रम, जागरण, मद्यपान, चिंता, शोक वगैरे कारणांमुळे शरीराचे अपतर्पण होऊन ओजक्षय, बलक्षय, वर्णक्षय, शुक्र-मांस इ. धातूंचा क्षय, अग्‍निक्षय, ज्वर, कास, पार्श्वशूल, विण्मुत्रग्रह, जङ्‍घेत, ऊरुत व त्रिकप्रदेशी शूल, पर्व, अस्थी व संधी यांमध्ये भेद होत असल्यासारखी वेदना, ऊर्ध्ववात अथवा अन्य वात असे व्याधी होतात. या व्याधींना अपतर्पणोत्थ व्याधी  असे म्हणतात.

रसादी धातुप्रदोषज व्याधी : प्रकुपित वायू, पित्त, कफ हे दोष एकेक दोनदोन अथवा तिन्ही ज्या वेळी रसधातूमध्ये जातात त्यावेळी रसप्रदोषज व्याधी निर्माण होतात. अश्रद्धा, अरुची, आस्यवैरस्य, अरसज्ञता, हल्लास, गौरव, तंद्रा, अंगमर्द, ज्वर, तम, पांडुत्व, स्रोतोरोध, क्लैब्य, अंगसाद, कृशांङ्‍गता, अग्‍निनाश, अकालवलिपलित वगैरे रसप्रदोषज व्याधी आहेत. रक्तगत प्रकुपित दोषांमुळे कुष्ठ, विसर्प, पिडका, रक्तपित्त, रक्तप्रदर, गुदपाक, लिंगपाक, मुखपाक, प्लिहा, गुल्म, विद्रधी, नीलिका, कामला, व्यङ्‍ग, पिप्लव, तिलकालक, दद्रू, चर्मदल, श्वित्र (कोड), पामा (खरुज), कोठ (कुष्ठ) वगैरे व्याधी निर्माण होतात. मांसगत प्रकुपित दोषांमुळे अधिमांस, अर्बुद, कील, गलशालूक, गलशुंडिका, पूतिमांस, अलजी, गलगंड, गंडमाला, उपजिव्हिका वगैरे व्याधी होतात. मेदोगत प्रकुपित दोषांमुळे अतिस्थौल्य, मेदोज गाठी अथवा प्रमेह होतात. अस्थिगत प्रकुपित दोषांमुळे, हाडावर हाड, दातांवर दात येणे, दंतभेद, अस्थिभेद, दंतशूल अस्थिशूल, विवर्णता, केश, लोम, श्मश्रू व नख यांची विकृती हे व्याधी होतात. मज्‍जागत प्रकुपित दोषांमुळे बोटांच्या पेऱ्यात वेदना भ्रम, मूर्च्छा, अंधेरे, पसरट खवडे वगैरे व्याधी होतात. शुक्रगत दोषांमुळे नपुंसकत्व, अहर्षण, अल्पायू व विरूप प्रजा निर्माण होणे, स्त्रियांमध्ये गर्भस्राव अथवा गर्भपात होणे वगैरे व्याधी निर्माण होतात.

दृष्टापराधज, पूर्वापराधज, संकरज व्याधी : ऐहिक अथवा लौकिक अशा स्पष्ट समजणाऱ्या लघू, रूक्ष, उष्ण, स्‍निग्ध वगैरे कारणांमुळे दोषांचा प्रकोप होऊन होणाऱ्या व्याधीला दृष्टापराधज व्याधी असे म्हटले जाते. पूर्वजन्मकृत अपराधामुळे रूक्ष, लघू, उष्ण, शीत वगैरे कारणांशिवाय जो व्याधी निर्माण होतो त्याला पूर्वापराधज असे म्हणतात. दृष्टापराधज व पूर्वापराधज असा मिश्रित व्याधी संकरज अथवा दोषकर्मज होय. हा व्याधी अल्प कारणांनी निर्माण होऊन सुद्धा महारंभक असतो. अर्थात पूर्वरूपे, लक्षणे वगैरे बलवान असतात.


मृदू व दारुण : ज्या व्याधींची कारणे अल्प व दुर्बल असतात, लक्षणे, पूर्वरूपे वगैरे अल्प व दुर्बल असतात असा व्याधी मृदू समजला जातो. ज्या व्याधीची कारणे बलवान, पूर्वरूपे, लक्षणे वगैरेंही पुष्कळ आणि व्यक्त व बलवान असतात व जो उपद्रवयुक्त असतो तो व्याधी दारुण समजला जातो.

साध्य व असाध्य : जो व्याधी योग्य उपचाराने बरा होऊ शकतो त्याला साध्य व्याधी असे म्हणतात. सुखसाध्य व कष्टसाध्य असे साध्य व्याधींचे दोन प्रकार होतात. तरुण व्यक्तींमध्ये मर्मस्थानी नसलेला, दूष्य, देश, प्रकृती व ऋतू यांच्याशी असमान असलेला व ज्या व्याधीची कारणे, पूर्वरूपे, लक्षणे अल्प असतील व ज्याच्यामध्ये उपद्रव नसतील, जो एकदोषज व एकमार्गज असतो, तसेच ग्रहमान अनुकूल असतील असा नवीन व्याधी जितेंद्रिय व सर्वौषधे सहन करू शकणाऱ्या व्यक्तीमध्ये वैद्य परिचारक व औषधे योग्य असल्यास सुखसाध्य होतो. साध्य व्याधीसुद्धा खालील प्रकारच्या व्यक्तींमध्ये दुश्चिकित्स्य होतो.

धर्मानुकूल कर्मकांड करणाऱ्यांना अनेक वेळा स्‍नानादी कर्म करावे लागत असल्यामुळे, राजा सुकुमार व स्वेच्छानुसार वर्तन करणारा असल्यामुळे, स्त्री लज्‍जेमुळे वेगावरोध करीत असल्याने व कोमल देह असल्यामुळे, बाल, सुकुमार, वृद्ध, क्षीणधातू यांच्यामध्ये विरेचनादी क्रिया करणे शक्य नसल्यामुळे, भित्र्या व्यक्तींमध्ये अल्पसत्व असते म्हणून चिकित्सा सहन करण्याची शक्ती नसल्यामुळे तो चिकित्सेला त्रासदायक होतो.

शस्त्र, क्षार, अग्‍निकर्म वगैरे चिकित्सेने साध्य होणारा अथवा अन्य फार मोठ्या उपचाराने व प्रयासाने साध्य होणारा व फार काळाने साध्य होणारा व्याधी कष्टसाध्य म्हटला जातो. या व्याधीमध्ये सुखसाध्य व तद्विपरीत लक्षणांचा संकर असतो. उदा., रोगी तरुण परंतु अजितेंद्रिय, जितेंद्रिय रोगी परंतु व्याधी मर्मस्थानात, सर्वौषधसह देह परंतु वृद्ध. साध्यत्वाची लक्षणे अधिक व तद्विपरीत लक्षणे अल्प असतील तर कृच्छ्रसाध्य, साध्यत्वाची व तद्विपरीत लक्षणे समसमान असतील तर कृच्छ्रतर व विपरीत लक्षणे अधिक असतील तर कृच्छ्रतम व्याधी म्हटला जातो. असाध्य व्याधीचे याप्य व प्रत्याख्येय असे दोन भेद होतात. साध्यत्वाच्या विपरीत अनेक लक्षणे असूनसुद्धा नित्य पथ्य अथवा औषधाने कमी होतो परंतु पूर्णपणे बरा होत नाही अशा व्याधीला याप्य असे म्हणतात. असा व्याधी थोड्याशा कारणाने वाढतो व अशा प्रकारे जीवनाच्या अंतापर्यंत टिकून राहतो. प्रत्याख्येय जो उपचारांनी निश्चितपणे बरा होण्यासारखा नाही तो.

आशुकारी व चिरकारी : ज्या व्याधीचा शरीराच्या दोषधातुमलांवर फार लवकर अनिष्ट परिणाम होतो तो आशुकारी व्याधी होय. आशुकारी व्याधीचा संप्राप्तिकाल अल्प असतो. आशुकारी व्याधी लवकर उत्पन्न होतो व लवकर बराही होतो. अतिसार, शूल वगैरे व्याधी आशुकारी होत. याच्या उलट चिरकारी व्याधीचा शरीरधातूंवर हळूहळू अनिष्ट परिणाम होतो, त्यांचा संप्राप्तिकाल दीर्घ असतो. तो व्याधी बरा होण्यासही फार वेळ लागतो. कुष्ठ, प्रमेह, उदर वगैरे व्याधी चिरकारी होत. दोषांमध्ये वायू आशुकारी म्हणून बहुधा आशुकारी व्याधींमध्ये मुख्य दोष वायू असतो.

आठ महारोग : वातव्याधी, मूतखडा, कुष्ठ, प्रमेह, उदर, भगंदर, मूळव्याध व ग्रहणी या आठ रोगांना महारोग असे म्हटले जाते. या रोगांमध्ये यत्‍नपूर्वक व सावधानीने चिकित्सा करावी लागते.

नानात्मज विकार : केवळ वात अथवा कफ अथवा पित्तापासून होणाऱ्या रोगांना वातज, पित्तज व कफज नानात्मज विकार असे म्हणतात. वातज नानात्मज विकार ८०, पित्तज नानात्मज विकार ४० व कफज नानात्मज विकार २० आहेत.

नानात्मज वातविकार : (१) नखभेद (२) विपादिका (पायाला भेगा पडणे) (३) पादशूल (४) पादभ्रंश (५) पादसुप्तता (६) वातखुड्डता (७) गुल्फग्रंथी (८) पिंडिकोद्वेष्टन (९) गृध्रसी (घोट्यापासून पाठीपर्यंत होणारी वेदना  (१०) जानुभेद (११) जानुविश्लेष (१२) ऊरुस्तंभ (मांड्या जखडणे) (१३) ऊरुसाद (१४) पाङ्‍गुल्य (१५) गुद भ्रंश (१६) गुदार्ती (१७) वृषणोत्क्षेय (१८) शेफस्तंभ (१९) वङ्‍क्षणानाह (२०) श्रोणिभेद (२१) विङ्भेद (२२) उदावर्त (उलटे पोट फुगणे) (२३) खज्‍जता (लंगडेपणा) (२४) कुब्‌जता (२५) वामनत्व (२६) त्रिकग्रह (२७) पृष्ठगृह (२८) पार्श्वविमर्द (२९) उदरावेष्ट (३०) हृन्मोह (३१) हृद्रव (हृदयात धडधड) (३२) वक्षोद्धर्ष (३३) बाहुशोष (३४) वक्षोपरोध (३५) ग्रीवास्तंभ (३६) मन्यास्तंभ (३७) कंठोध्वंस (ठसका) (३८) हनुभेद (३९) ओष्ठभेद (४०) अगंधज्ञता (४१) दंतभेद (४२) दंतशैथिल्य (४३) मूकता (४४) वाक्संङ्‍ग (४५) कषायास्यता (४६) मुखशोष (४७) अरसज्ञता (४८) घ्राणनाश (४९) कर्णशूल (५०) अशब्द श्रवण (५१) उच्चश्रुती (५२) बाधिर्य (५३) वर्त्मस्तंभ (५४) वर्त्मसंकोच (५५) तिमिर (दृष्टिक्षय) (५६) अक्षिशूल (५७) अक्षिव्युदास (५८) भव्युदास (५९) शंखभेद (६०) ललाट भेद (६१) शिरोरुक् (६२) केशभूमिस्फुटन (६३) अर्दित (६४) एकांगवात (६५) सर्वांगवात (६६) पक्षवध (६७) आक्षेपक (६८) दंडक (६९) ग्‍लानी (७०) भ्रम (७१) वेपथू (७२) जृंभा (७३) हिक्का (७४) विषाद (७५) अतिप्रलाप (७६) रौक्ष्य (७७) पारुष्य (७८) श्यावारुणावभासता (७९) अस्वप्‍न (८०) अनवस्थित चित्तत्व.


नानात्मज पित्तविकार : (१) दाह व दाहाचे पुढील प्रकार (२) ओष (३) प्‍लोष (४) दवथू (५) धूमक (६) विदाह (७) अंतर्दाह (८) अंसदाह (९) अम्‍लक (१०) ऊष्माधिक्य (११) अतिस्वेद (१२) अंगगंध (१३) अंगावदरण (१४) शोणितक्लेद (१५) मांसक्लेद (१६) त्वक्‌दाह (१७) त्वगवदरण (१८) चर्मदलन              (१९) रक्तकोठ (२०) रक्तविस्फोट (२१) रक्तपित्त (२२) रक्तमंडल (२३) हरितत्व (२४) हारिद्रत्व (२५) नीलिका (२३) कक्षा  (२७) कामला (२८) तिक्तास्यता (२९) लोहित गंधास्यता (३०) पूतिमुखता (३१) तृष्णाधिक्य (३२) अतृप्ती (३३) आस्याविपाक (३४) गलपाक (३५) अक्षिपाक (३६) गुदपाक (३७) मेढ्रपाक      (३८) जीवादान (३९) तमःप्रवेश (अंधेरी) (४०) हरितहारिद्र नेत्रमूत्रवर्तत्स्व.

नानात्मज कफविकार : (१) तृप्ती (२) तंद्रा (३) निद्राधिक्य (४) स्तैमित्य (५) गुरुगात्रता (६) आलस्य (७) मुखमाधुर्य (८) मुखस्राव (९) श्लेष्मोद्गीरण (१०) मलाधिक्य (११) बलासक (अति तीव्र अजीर्ण) (१२) अपक्ती (१३) हृदयोपलेप (१४) कंठोपलेप (१५) धमनी प्रतिचय (१६) गलगंड (१७) अतिस्थौल्य (१८) शीताग्‍निता (१९) उदर्द (जाड गांधी) (२०) श्वेतावभासता (२१) श्वेतमूत्रनेत्रवर्तत्स्व.

रोगांचे संक्रमण व औपसर्गिक रोग : एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरणाऱ्या रोगांना औपसर्गिक रोग असे म्हटले जाते. एकत्र जेवणे अगर एकत्र झोपणे, दुसऱ्या व्यक्तीने वापरलेली वस्त्रे अगर फुले यांचा उपयोग करणे किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावयवांशी साक्षात संबंध तसेच निश्वास यांच्यामुळे औपसर्गिक रोगांचे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमण होते. कुष्ठ, ज्वर, नेत्राभिष्यंद, मसूरिका वगैरे रोग औपसर्गिक होत.

आम : जाठराग्‍नीच्या दौर्बल्यामुळे आद्य रसधातू अपरिपक्व स्थितीत आमाशयात येतो. त्याला आम असे म्हणतात. अतिकुपितदोषांचे मिश्रणालाही आम म्हणतात. आमाने युक्त दोषांना साम दोष त्याचप्रमाणे आमयुक्त दूष्यांना साम दूष्य असे म्हणतात. साम दोष-दूष्यांमुळे होणाऱ्या व्याधीला साम व्याधी असे म्हणतात. अन्नविष, मलसंचय, प्रथम दोषदुष्टी यांनाही काहींच्या मते आम म्हटले जाते. आम अविपक्व, असंयुक्त, दुर्गधियुक्त, अतिपिच्छिल व अंगसाद करणारा असतो. सामवाताची लक्षणे : वायू आमसंपृक्त झाल्यावर विबंध, अग्‍निसाद, तंद्रा, अन्नकूजन, अंगवेदना, अंगशोथ, अंगतोद, अंगग्रह, स्तैमित्य (ओले वस्त्र गुंडाळल्यासारखे वाटणे), गौरव, स्‍निग्धत्व, अरोचक, आलस्य, शैत्य, कटुरुक्षाभिलाषा, आघ्मान ही लक्षणे उत्पन्न करतो. अशा अवस्थेमध्ये स्नेहन वगैरे वातशमन चिकित्सेने व्याधिवृद्धी होते. सूर्योदयानंतर रात्री व आकाश मेघाच्छादित असताना व्याधीची वृद्धी होते. कटू रूक्ष द्रव्यांनी व्याधी शमतो.सामपित्ताची लक्षणे : आमसंपृक्त पित्त दुर्गंध, हरितवर्ण, श्याववर्ण, गुरुत्व, अम्‍लत्व, स्थिरत्व, अम्‍लोद्‍गार, कंठदाह, हृद्दाह, कटुकत्व, घनत्व ही लक्षणे उत्पन्न करते. सामकफाची लक्षणे :आमसंपृक्त कफ आविलत्व, तंतुमत्व, सत्यानत्व, दुर्गंधित्व, कंठप्रदेशात अडकणे, क्षुधानाश, उद्‍गाराभाव, प्रलेपत्व, पिच्छिलत्व ही लक्षणे निर्माण करतो.

दोषपाक व धातुपाक : सामदोषामुळे व्याधी उत्पन्न झाल्यानंतर व्याध्युत्पादक दोष व शरीर यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. संघर्षामध्ये शरीर बलवान ठरले तर दोषांचा पाक होऊन व्याधी बरा होतो. या स्थितीला दोषपाक असे म्हटले जाते. याउलट दोषशरीरसंघर्षामध्ये दोष बलवान ठरले तर शरीराचा नाश होतो. या अवस्थेला धातुपाक असे म्हटले जाते. दोषपाकाची लक्षणे :दोषप्रकृतिवैकृत्य (दोषचिन्हे शमणे), शरीर लघुता, इंद्रियांचे  विमलत्व, व्याधिबल कमी होणे वगैरे लक्षणे दोषपाकाची सूचक होत. धातुपाकाची लक्षणे : निद्रानाश, हृदय स्तब्धता, विष्टंभ, गौरव, अरुची, अरती, बलहानी वगैरे धातुपाकाची लक्षणे होत.

व्याधिज्ञानोपाय : व्याधी जाणण्याची पाच साधने आहेत. त्यांनाच व्याधिज्ञानोपाय असे म्हणतात. निदान, पूर्वरूप, लक्षण, उपशय व संप्राप्ती हे पाच सर्व मिळून अथवा एकेक स्वतंत्रपणे रोगविनिश्चयाला उपयोगी पडतात. या सर्वांना मिळून निदानपंचक असे म्हणतात.

निमित्त, हेतू, आयतन, प्रत्यय, उत्थान, कारण हे निदान या शब्दाचे पर्याय आहेत. निदान शब्दाचा व्युत्पत्यर्थ मूळ कारण, असा आहे. निदान हा शब्द निदानपंचक या अर्थानेही वापरला जातो. परंतु त्या वेळी निदान म्हणजे ज्ञापक निदान अर्थात रोगाचे ज्ञान करून देणारे निदान असा अर्थ होतो. निदान या शब्दाचा अर्थ ज्या वेळी रोगाचे कारण असा असतो त्या वेळी त्याला उत्पादक निदान असे म्हटले जाते. काही वेळी निदान हा शब्द रोगविनिश्चय या अर्थीही वापरला जातो. या ठिकाणी आपल्याला उत्पादक निदानाचाच  विचार करावयाचा आहे. ज्या कारणांमुळे दोषप्रकोप होऊन व्याधी निर्माण होऊ शकतो त्याला निदान असे म्हणतात. उत्पादन निदानाचे सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्यभिचारी व प्राधानिक असे चार प्रकार आहेत. सन्निकृष्ट म्हणजे अगदी जवळचे कारण होय. वात, पित्त, कफ हे दोष रोगाचे सन्निकृष्ट कारण होत. भिन्न भिन्न परिस्थितीमुळे अखेर दोषप्रकोप होऊनच व्याधी निर्माण होतो. विप्रकृष्ट निदान रोग निर्माण करण्यायोग्य असूनसुद्धा साहाय्यक परिस्थितीच्या अभावी रोग निर्माण न करता शरीरात स्थिर होऊन राहते अशा स्थितीत शरीरातून काढून न टाकल्यास साहाय्यक अनुकूल परिस्थिती मिळाल्यावर कालांतराने रोग उत्पन्न करते. उदा., वर्षा ऋतूमध्ये आहाराच्या अम्‍ल विपाकामुळे शरीरात पित्ताचा संचय होतो. परंतु वर्षाजन्य शैत्य पित्ताच्या उष्ण गुणाच्या विपरीत असल्यामुळे पित्त प्रकुपित होत नाही. शरद ऋतूमध्ये उष्णता अधिक असल्यामुळे वर्षा ऋतूमध्ये संचित पित्त शरद ऋतूमध्ये विरेचनाने निर्हरित न केल्यास प्रकुपित होऊन पित्त रोग निर्माण करते. व्यमिचारी निदान दुर्बल असल्यामुळे व्याधी उत्पन्न करण्याला असमर्थ ठरते, अथवा अल्प लक्षणयुक्त मृदू व्याधी निर्माण करते. कधी कधी व्यमिचारी निदान शरीरात चिरकालपर्यंत स्थिर राहते व योग्य परिस्थिती मिळाल्यावर रोग उत्पन्न करते. जे कारण व्यवायी, विकाशी आदी गुणांमुळे शरीरात शीघ्र पसरते व ओजाच्या गुणांच्या विपरीत गुणाचे असल्यामुळे ओजाच्या गुणांना क्षीण करून वातादी दोषांना प्रकुपित करते व व्याधी निर्माण करते त्याला प्राधानिक निदान असे म्हणतात. विष, मद्य वगैरे रोगकारणे या प्रकारात मोडतात.


दोषहेतू, व्याधिहेतू, दोषव्याधिहेतू : दोषांना प्रकुपित करणारा मधुर, अम्‍ल, स्‍निग्ध, रूक्ष, उष्ण, शीत वगैरे आहार अथवा व्यायाम, दिवास्वप्‍न, जागरण वगैरे विहार अथवा ऋतूंचा परिणाम तसेच क्रोध, शोक, चिंता हे सर्व दोषहेतू होत. या व अशा प्रकारच्या अन्य कारणांनी वातादी दोषांचा प्रकोप होतो म्हणून यांना दोषहेतू म्हणतात. ज्या निदानामुळे एखादा निश्चित व्याधी निर्माण होतो त्याला व्याधिहेतू असे म्हणतात. प्रकुपित दोष सर्व शरीरात संचार करीत असता ज्या ठिकाणी स्त्रोतोवैगुण्य असते त्या ठिकाणी स्थानसंश्रय करून व्याधी निर्माण करतात. अर्थात स्त्रोतोवैगुण्याप्रमाणे व्याधी निर्माण होतो म्हणून व्याधिहेतू हा सामान्यपणे स्त्रोतोवैगुण्य करणारा असतो. रजःकण, कार्पास सूत्र, कोळशाचे सूक्ष्म कण वगैरेंचा नासामार्गाने प्राणवहस्त्रोतसामध्ये वारंवार प्रवेश होत राहणे, अथवा अत्यधिक धूम्रपान वगैरे कारणांमुळे प्राणवहस्त्रोतस विगुण होते व नंतर दोषहेतूंमुळे दोषांचा प्रकोप होऊन विगुण प्राणवहस्रोतसांमध्ये स्थानसंश्रय होऊन तमक श्वास निर्माण होतो म्हणून रजःकणादी कारणे तमक श्वासाचे व्याधिहेतू होत. जे निदान दोषांना प्रकुपित करते व निश्चित व्याधीही निर्माण करते त्याला दोषव्याधिहेतू असे म्हणतात. दोषहेतू दोषांना प्रकुपित करतो, व्याधी निर्माण करतोच असे नाही. व्याधिहेतू व्याधी निर्माण करतो दोष प्रकुपित करतोच असे नाही. दोषव्याधिहेतू दोषांना तर प्रकुपित करतोच व व्याधीही निर्माण करतो. हत्ती, उंट, सायकल वगैरे वाहनांवर स्वारी करून खूप प्रवास केल्यामुळे वातरक्त नावाचा व्याधी निर्माण होतो. ही कारणे वातप्रकोपक असून वातरक्त या व्याधीला निर्माण करणारी असल्यामुळे दोषव्याधिहेतू या प्रकारात मोडतात.

बाह्य व आभ्यंतर हेतू : भिन्न भिन्न प्रकारचा आहारविहार तसेच काल वगैरे रोगोत्पादक बाह्य कारणांना बाह्य हेतू असे म्हणतात. दोष दूष्य हे शरीरस्थ पदार्थ व्याधीचे कारण होतात. त्यांना शरीरस्थ, असल्यामुळे आभ्यंतर हेतू असे म्हणतात.

उत्पादक व व्यंजक हेतू : जे निदान दोषप्रकोप अथवा व्याधी निर्माण करते त्याला उत्पादक हेतू असे म्हणतात. शीतकालजन्य मधुरविपाक कफ निर्माण करतो म्हणून तो कफाचा उत्पादक हेतू होय. संचित दोषांना प्रकुपित करणारा तसेच उत्पन्न झालेल्या व्याधीला अधिक व्यक्त करणाऱ्या हेतूला व्यंजक हेतू असे म्हणतात. शरद ऋतूतील उष्णता ही वर्षा ऋतूतील संचित पित्ताचा तसेच शीतकाल आणि शीत पदार्थ हा तमक श्वासाचा व्यंजक हेतू होय.

रोगाचा हेतू रोग : काही रोगच स्वतः दुसऱ्या रोगाचे कारण होतात. यांना निदानार्थकारक रोग असे म्हणतात. प्रथम निरनिराळ्या कारणांमुळे निदानार्थकर रोग उत्पन्न होतात व नंतर ते दुसऱ्या रोगाचे कारण होतात. ज्वर संतापामुळे रक्तपित्त, पडशामुळे खोकला, खोकल्यामुळे क्षय वगैरे निदानार्थकरत्वाची उदाहरणे होत. दुसऱ्या रोगाला उत्पन्न केल्यानंतर कधी कधी निदानार्थकर रोग स्वतः बरा होऊन जातो अथवा कधी नवीन उत्पन्न केलेल्या रोगाबरोबर स्वतःही राहतो. अशा वेळी निदानार्थकर रोग व त्याच्यामुळे निर्माण झालेला रोग असा व्याधिसंकर एकाच रोग्यामध्ये दिसून येतो. उदा., खोकला रोगाला निर्माण करणारे पडसे खोकला उत्पन्न झाल्यावरही शिल्लक राहिल्यामुळे रोग्यामध्ये खोकला व पडसे असा व्याधिसंकर दिसतो.

व्याधिक्षम शरीर : शरीरामध्ये निरनिराळ्या कारणांमुळे व्याध्युत्पादप्रतिबंधकत्व निर्माण होते व त्यामुळे शरीर व्याधिक्षम होते. उत्तम व्याधिक्षम शरीरामध्ये बहुधा व्याधी निर्माणच होत नाही. परंतु उत्पादक निदान बलवान असल्यामुळे व्याधी निर्माण झालाच तर तो मृदू अथवा चिरकारी होईल. अतिस्थूल, अतिकृश, शिथिल मांसशोणित-अस्थियुक्त, दुर्बल, असात्म्य अशा आहाराने संवर्धित, अल्पाशी वा अल्पसत्त्वयुक्त शरीर व्याधीला अक्षम असते. अशा शरीरामध्ये व्याधी बलविरोधकत्व फार कमी असते. याच्या विपरीत नातिस्थूलकृश, सुनिविष्ट-मांस-शोणित-अस्थियुक्त, सात्म्य-आहारसंवर्धित, बलवान शरीर व मन व्याधिक्षम असते. शिवाय एखाद्या शरीरामध्ये विशिष्ट अपथ्यबलवैपरित्य अथवा विशिष्ट दोषबलवैपरित्य असू शकते व त्यामुळे त्या विशिष्ट अपथ्यापुरेसे अथवा दोषापुरेसे व्याधिक्षमत्व त्या शरीरामध्ये असते.

व्याधिज्ञानोपायांपैकी दुसरा ज्ञानोपाय पूर्वरूप हा आहे. भाविव्याधिबोधक लक्षणाला पूर्वरूप असे म्हणतात. दोषांचा स्थानसंश्रय झाल्यावर व व्याधीचे लक्षण व्यक्त होण्यापूर्वी पूर्वरूपे दिसून येतात व त्यांच्यामुळे पुढे होऊ घातलेल्या व्याधीचे ज्ञान होते. पूर्वरूपे दोन प्रकारची असतात. (१) सामान्य व (२) विशेष. सामान्य पूर्वरूपांमुळे भावी व्याधीबरोबरच भावी व्याधीमधील दोषप्राधान्याचेही ज्ञान होते. अरती, अंगमर्द वगैरे सामान्य पूर्वरूपांमुळे केवळ भावी ज्वराचे ज्ञान होते. परंतु नयनदाह, जृंभाधिक्य या विशिष्ट पूर्वरूपांमुळे क्रमशः भावी ज्वरांतील पित्त व वायू यांचेही ज्ञान होते.

लक्षणे : पाच व्याधिज्ञानोपायांपैकी तिसरा ज्ञानोपाय लक्षण हा होय. रोग्यामध्ये व्याधी व्यक्त झाल्यावर दिसणारी ती लक्षणे होत. लक्षणालाच संस्थान, व्यंजन, लिंग, चिन्ह अथवा आकृती असेही म्हणतात. लक्षण हा व्याधीचे ज्ञान करून घेण्याचा एक सरळ व महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येक व्याधीमध्ये लक्षणे ही असतातच. लक्षणांचेही प्रमुख तीन प्रकार होतात. (१) प्रत्यात्मलिंग (२) सामान्य लक्षण (३) विशेष लक्षण. प्रत्येक व्याधीमध्ये असणारे अव्यभिचारी लक्षण म्हणजेच प्रत्यात्मलिंग होय. प्रत्यात्म लक्षणाशिवाय व्याधी होऊच शकत नाही. या लक्षणावरून व्याधीची प्रकृती समजते. उदा., ज्वराचे प्रत्यात्म लक्षण संताप हे असल्यामुळे ज्वरव्याधीची प्रकृती पित्त हे निश्चित होते. साध्मान म्हणजे फुगीरपणासह उदरवृद्धी हे उदराचे प्रत्यात्म लक्षण आहे. त्यावरून उदरव्याधीची प्रकृती वायू आहे हे निश्चित होते. प्रत्यात्म लक्षण वर्ज्य करून त्या व्याधीमध्ये सामान्यपणे होणारी लक्षणे सामान्य लक्षणे म्हणून संबोधिली जातात. व्याधीची सर्वसामान्य लक्षणे त्या व्याधीच्या प्रत्येक रोग्यामध्ये असणे अनिवार्य नसते. सामान्य लक्षणांपैकी काही लक्षणे म्हणजे पुष्कळशी लक्षणे असतात अथवा अगदी थोडी असतात. सामान्य लक्षणांवरून त्या व्याधीचे होणारे वातज, पित्तज वगैरे भेद स्पष्ट होत नाहीत. केवळ व्याधिसामान्याचे ज्ञान होते. उदा., उदर व्याधीमध्ये होणारी दौर्बल्य, कार्श्य, दुर्बलाग्‍निता, शोथ, पुरीष व वायू यांचा संग, तृष्णा व शेवटी सर्व उदरामध्ये होणारा उदकप्रादुर्भाव ही सर्व उदर व्याधीची सामान्य लक्षणे आहेत. या लक्षणांवरून उदर या व्याधीचा प्रत्यात्म लक्षणावरून केलेला व्याधिविनिश्चय पक्का होतो. यांच्यापैकी सर्वच्या सर्व लक्षणे प्रत्येक उदराच्या रोग्यामध्ये असतातच, असे नाही व या लक्षणांवरून वातोदर, पित्तोदर वगैरे भेदाचा निर्णयही करता येत नाही. अशी ही व्याधीची सामान्य लक्षणे असतात. यांनाच व्याधि लक्षणे असेही म्हटले जाते. यांच्याशिवाय ज्या लक्षणांवरून व्याधीचे प्रकार स्पष्ट करता येतात अशी दोषसूचक लक्षणे असतात. त्यांना विशेष लक्षणे असे म्हणतात. उदराचे उष्णस्पर्शत्व, क्षिप्रपाकित्व या विशेष लक्षणांवरून पित्तोदराचे चिरपाकित्व, उदराचे शीतस्पर्शत्व व शोथाधिक्य यांवरून कफोदराचे निदान होऊ शकते. त्याचप्रमाणे ज्वरामध्ये तीक्ष्ण वेगज्वर, तिक्तास्यता ही पित्तज्वराची व विषम वेगज्वर, आस्यवैरस्य वगैरे वातज्वराची सूचक लक्षणे असतात. अशा प्रकारच्या लक्षणांना विशेष लक्षणे असे म्हणतात. ही लक्षणे दोषसूचक असल्यामुळे त्यांना दोषलक्षणे असेही म्हटले जाते. अशा प्रकारे व्याधीमध्ये दिसणारी सर्व लक्षणे ही ज्या वेळी स्वतंत्रपणे अन्य व्याधीच्या आश्रयाशिवाय निर्माण होतात त्या वेळी ती व्याधीच असतात. मात्र ही लक्षणे अन्य प्रधान व्याधीच्या आश्रयाने निर्माण होत असतील तर ती स्वतंत्र व्याधी नसून लक्षणेच समजावीत.


औषध, अन्न, विहार यांचा शरीराला सुखकर असा जो उपयोग त्याला उपशय असे म्हणतात. उपशय म्हणजेच सात्म्य होय. ज्या वेळी अन्य उपायांनी व्याधीचे ज्ञान होत नाही अशा वेळी त्या संभावित रोगाचे शमन करणारी औषधे, अन्न अथवा विहाररूप चिकित्सा करून पहाणे हा एक व्याधिज्ञानोपाय असतो. ज्या व्याधीची केलेली चिकित्सा व्याधिशमनाला अनुकूल पडली तोच व्याधी तो आहे असे समजून व्याधीची संपूर्ण चिकित्सा करता येते. केलेली चिकित्सा अनुकूल पडली नाही तर आणखी दुसऱ्या व्याधीचा उपशय मिळाल्यास तसे पाहून उपशयाने व्याधिविनिश्चय करता येतो. वातव्याधी व ऊरुस्तंभ यांचा व्यवच्छेद करता न आल्यास उपशय म्हणून नारायण तेल अथवा अन्य स्‍निग्ध वातशमन अशा औषधांचा अभ्यंग करून पाहिल्यावर वातव्याधीमध्ये उपशय मिळून वातव्याधी कमी व्हायला लागतो, पण ऊरुस्तंभ या व्याधीची वृद्धी होते. अशा प्रकारे उपशय अथवा अनुपशय याची व्याधिविनिश्चयाला मदत होते. उपशयाचे कोष्टक क्र. १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सहा प्रकार होतात.

औषध, अन्न, विहार यांचा व्याधीमध्ये सुखावह न होणारा असा जो, तो अनुपशय होय यालाच व्याध्यसात्म्य असे म्हणतात.

दुष्ट झालेले दोष शरीरात पसरून व्याधी निर्माण करतात त्याला संप्राप्ती असे म्हणतात. अर्थात दोषदुष्टीपासून व्याधिनिर्मितीपर्यंतच्या सर्व अवस्थांचा संप्राप्तीमध्ये समावेश होतो. संप्राप्तीचे जाती किंवा आगती असेही नाव आहे. सामान्यपणे संप्राप्तीच्या सहा अवस्था आढळून येतात.

दोषांची त्यांच्या स्थानांत होणारी वृद्धी म्हणजेच संचय होय. तिन्ही दोष सर्व शरीरव्यापी असले तरीसुद्धा पक्वाशय हे वाताचे प्रमुख स्थान, पच्यमानाशय हे पित्ताचे प्रमुख स्थान व आमाशय हे कफाचे प्रमुख स्थान होय. दोषसंचय करणाऱ्या कारणांनी या प्रमुख स्थानांमध्ये दोषांची जी वृद्धी होते त्याला संचय असे म्हणतात. संचयामध्ये दोषांची संहतिरूप वृद्धी होते. संचय कालपरिणामकृत अथवा प्रज्ञापराधजन्य मिथ्याहाराचारकृत असा दोन प्रकाराने होतो. ग्रीष्म ऋतूमध्ये वायूचा, शरद ऋतूमध्ये पित्ताचा वा शिशिर ऋतूमध्ये कफाचा स्वाभाविक संचय होतो. ग्रीष्म ऋतूमध्ये रूक्षता, लघुता व उष्णता असल्यामुळे वायूचा संचय होतो. स्‍निग्ध, गुरू वगैरे गुणांनी युक्त पदार्थ शीतयुक्त असतील तर कफाचा संचय होतो. शिशिर ऋतूमध्ये खाद्यपेय पदार्थ स्‍निग्ध मधुर गुरु असे असतात व कालकृत शैत्य असते म्हणून हा काळ कफसंचयाला योग्य होतो. अम्‍ल, तीक्ष्ण आदी गुण शीतयुक्त असल्याने पित्ताचा संचय होतो. वर्षा ऋतूमध्ये अम्‍ल विपाकी पदार्थ उपयोगात आल्यामुळे व वर्षाजन्य शैत्य असल्यामुळे पित्ताचा संचय होतो. अशा संचयाला कालकृत संचय असे म्हणतात. वातसंचयामुळे स्तब्धकोष्ठता वा पूर्णकोष्ठता, पित्तसंचयामुळे पीतावभासता, कफसंचयामुळे मंदोष्मता, अंगगौरव, आलस्य ही लक्षणे होतात. याशिवाय त्या त्या दोषांच्या संचयाला कारणभूत असलेल्या आहारविहाराचा द्वेष निर्माण होतो.

कोष्टक क्र. १ उपशयाचे प्रकार.

औषध

अन्न

विहार

१.

हेतुविपरीत

श्लेष्मप्रधान ज्वरात सुंठ पिंपळी वगैरे

वातज्वरात मांस रस

दिवास्वप्नजनिन श्लेष्म वृद्धीत रात्री जागरण करणे

२.

व्याधिविपरीत

अतिसारामध्ये पाठा, जायफळ, अफू वगैरे स्तंभन

अतिसारात मसूर यूष

उदावर्तात प्रवाहण

३.

हेतुव्याधिविपरीत

वातज शोथामध्ये दशमूल शोथघ्न वातनाशक

वातिक ग्रहणीत वातघ्न व ग्रहणीहर तक्र

दिवसा झोपण्याने उत्पन्न होणाऱ्या तंद्रा आदी विकारात रात्री जागरण करणे

४.

हेतुविपरीतार्थकारी

व्रणशोथामध्ये अगरू वगैरे उष्ण द्रव्यांचा लेप

व्रणशोथामध्ये उष्ण आमपाचन शिग्रू

वातोन्मादात चाबूक वगैरेंनी भय निर्माण करणे

५.

व्याधिविपरीतार्थकारी

छर्दिव्याधीमध्ये छर्दिकारक मदन फल

पित्तातीसारात अनुलोमन दूध

छर्दिव्याधीत घशात बोटे घालून उलटी करणे

६.

हेतुव्याधिविपरीतार्थकारी

स्थावर विषात जंगम विष व जंगम विषात स्थावर विष

मदात्ययात सम मद्यपान

व्यायामजन्य मूढ वातामध्ये पोहण्याचा व्यायाम


दोषांचा संचय व प्रकोप या दोन्ही अवस्था दोषवृद्धीच्याच आहेत. संचयावस्थेमध्ये दोष संहतिरूप असतात. संचयावस्थेपेक्षा प्रकोपावस्थेत वृद्धी अधिक असते, दोष उन्मार्गगामी होण्याच्या अवस्थेत असतात. प्रकोपावस्थेत दोषांची इतक्या प्रमाणात वृद्धी होते की, दोषप्रकोपक कारणे प्रकोपावस्थेनंतरही चालू राहिली तर आपल्या स्थानामध्ये न सामावल्यामुळे दोष सर्व शरीरात प्रसरण पावू लागतात. प्रकोपावस्थेत दोष विलयनरूप अवस्थेत असतात. प्रकोप दोन प्रकारे होतो. (१) चयपूर्वक प्रकोप (२) अचयपूर्वक प्रकोप. पूर्वीच्या ऋतूच्या नियमाचे पालन न केल्यामुळे संचित झालेल्या दोषाच्या पुढच्या ऋतूमध्ये होणारा प्रकोप चयपूर्वक प्रकोप होय. याला कालस्वभावज प्रकोप असेही म्हटले जाते. पूर्वीच्या ऋतूच्या आहारविहारादी नियमांचे पालन न केल्यामुळे तसेच विरुद्ध आहारविहार केल्यामुळे दोषांचा चय व प्रकोपादी अवस्था एकदम निर्माण होतात. या संचयादींना अकालकृत-आहारादिकृत म्हणावे. बलवान व्यक्तीबरोबर विग्रहामुळे होणारा वातप्रकोप, क्रोधामुळे पित्तप्रकोप, दिवास्वप्नामुळे होणारा कफप्रकोप ही याची शीघ्र दोषप्रकोपाची उदाहरणे आहेत. वातप्रकोपामुळे कोष्ठतोद, वायूचे कोष्ठसंचरण पित्त प्रकोपामुळे अम्‍लउद्‍गार, तृष्णा, परिदाह, कफप्रकोपामुळे अन्नद्वेष, हृदयोत्क्लेद वगैरे लक्षणे होतात.

प्रकोपामुळे दोषांची खूप वृद्धी झाल्यानंतर दोषांचा प्रसर होतो. संचयावस्थेमध्ये संहतिरूप (घट्ट) असलेले दोष प्रकोपावस्थेत विलयन होऊन प्रसरावस्थेत गतिमान होतात. ज्याप्रमाणे एखाद्या तलावात अतिशय वाढलेले पाणी तलावाचे बांध फोडून मर्यादा उल्लंघन करून इतस्ततः पसरते त्याप्रमाणे गतिमान झालेले दोष स्वस्थान सोडून सर्व शरीरभर पसरतात. वायू दोषांच्या प्रसराला कारणभूत होतो. दोष एकेक, दोन दोन, तीन तीन, अथवा रक्तासहित असे पंधरा प्रकारांनी प्रसर पावतात. (१) वात (२) पित्त (३) कफ (४) रक्त (५) वातपित्त (६) वातकफ (७) कफपित्त (८) वातरक्त (९) पित्तरक्त (१०) कफरक्त (११) वातपित्तरक्त (१२) वातकफरक्त (१३) पित्तकफरक्त (१४) वातपित्तकफरक्त (१५) वातपित्तकफ अशा प्रकारे संपूर्ण शरीरात, अर्ध्या शरीरात अथवा शरीराच्या एखाद्या अवयवविशेषात दोष प्रसर पावतात. प्रकुपित झालेले दोष जर हीनशक्ती असतील तर स्रोतसांमध्ये लीन होऊन राहतात. चिकित्सा केल्याशिवाय त्यांचे शमन होत नाही. चिकित्सा न झाल्याने व कालांतराने दोषप्रकोपणकारणे घडून आल्याने हे लीन दोष व्याधी निर्माण करतात. प्रकोपणकारणे मिळाली नाहीत अथवा चिकित्सा केली गेली नाही तर शरीरात ते दोष तसेच पडून राहतात. अशा पडून राहिलेल्या अवस्थेत हे दोष कोणतीही लक्षणे निर्माण करीत नाहीत. अशा अवस्थेत वायूने विमार्गगमन, आटोप वगैरे लक्षणे पित्ताने ओष, चोष, परिदाह, धूमायन वगैरे लक्षणे कफाने अरोचक, अविपाक, छर्दी वगैरे लक्षणे उत्पन्न होत नाहीत.

संचय, प्रकोप व प्रसर ह्या तीन अवस्थांमध्ये केवळ दोषांचीच लक्षणे दिसून येतात. भावी व्याधीची कल्पना प्रसरावस्थेत आलेल्या दोषांनीही येऊ शकत नाही. केवळ दोषप्रत्यनीक चिकित्सा केल्यावर या तिन्ही अवस्थांतील दोषांचे प्रशमन होते परंतु स्थानसंश्रयापासून व्याधीचाच प्रारंभ होतो. प्रसर पावलेले दोष हृदयात जाऊन तेथून रसवहस्रोतसांच्या मार्गाने शरीरात ज्या ठिकाणी स्रोतोवैगुण्य असेल त्या ठिकाणी स्थानसंश्रय करतात. अर्थात रोग निर्माण करण्यायोग्य अनुकूल परिस्थिती विगुण स्रोतसामध्ये मिळाल्यामुळे त्या ठिकाणी स्थिर होतात व व्याधी निर्माण करतात. अशा प्रकारे महास्रोतसांमध्ये दोषांनी स्थानसंश्रय केला तर गुल्म, अंतर्विद्रधी, अग्‍निमांद्य, अतिसार, ग्रहणी, प्रवाहिका, उदर वगैरे व्याधी निर्माण करतात. मूत्रवहस्रोतसांत स्थानसंश्रय करून प्रमेह, मूत्रकृच्छ्र, मूत्राघात वगैरे व्याधी उत्पन्न करतात. सर्व शरीरात दोषांचा स्थानसंश्रय झाल्यास ज्वर वगैरे सार्वदेहिक व्याधी निर्माण होतात. स्थानसंश्रयावस्थेत व्याधीची केवळ पूर्वरूपेच दिसून येतात.

स्थानसंश्रयानंतरच्या अवस्थेत व्याधी व्यक्त होतो. म्हणून या अवस्थेला व्यक्तावस्था म्हणतात. या अवस्थेत व्याधीची मुख्य लक्षणे उत्पन्न होऊन व्याधिजाती निश्चित होते. उदा., ज्वरामध्ये तापवृद्धी, अतिसारामध्ये द्रवमलप्रवृत्ती, उदरामध्ये उदरवृद्धी वगैरे.

व्याधी व्यक्त झाल्यानंतर त्याची लक्षणे अधिक व्यक्त होऊन वातिक, पैत्तिक वगैरे भेद या अवस्थेमध्ये निश्चित होतात. व्यक्तावस्थेमध्ये व्याधीचे निश्चित ज्ञान होते व भेदामध्ये व्याधिभेदाचे निश्चित ज्ञान होते अथवा आम, पक्व, जीर्ण वगैरे अवस्थांचे ज्ञान होते. या अवस्थांमध्ये चिकित्सा न केल्यास व्याधी दीर्घकालानुबंधी अथवा असाध्य होतो.

संप्राप्तीचे भेद : (१) व्याधीचे निरनिराळे भेद स्पष्ट करणारी  संप्राप्ती संख्यासंप्राप्ती होय. आठ प्रकारचे ज्वर, पाच प्रकारचे कास वगैरे संख्यासंप्राप्तीची उदाहरणे आहेत. (२) एकापेक्षा अधिक दोष असलेल्या व्याधींमध्ये दोषांची अंशांशकल्पना सांगणारी विकल्पसंप्राप्ती होय. अंशांशकल्पनेमुळे किती प्रमाणात वात, पित्त आणि कफ हे दोष प्रकुंपित झाले आहेत याचे ज्ञान होते. (३) एकाच रोग्यामध्ये एकापेक्षा अधिक व्याधी असल्यास त्यांच्यापैकी स्वतंत्र व्याधी कोणता व परतंत्र व्याधी कोणता याचे ज्ञान प्राधान्यसंप्राप्तीमुळे होते. स्वतंत्र व्याधीची चिकित्सा केल्यानंतर परतंत्रव्याधी फारच बलवान नसेल तर विशेष चिकित्सा न करता शमन पावतो. (४) हेतू, पूर्वरूप, लक्षण ही सर्वच्या सर्व असणे हे रोगाच्या बलवत्तेचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे हेतू, पूर्वरूप वगैरे कमी प्रमाणात असल्यास व्याधी दुर्बल असल्याचे निश्चित होते. अशा प्रकारे व्याधीच्या बलाचे ज्या संप्राप्तीमुळे ज्ञान होते ती बलसंप्राप्ती होय. (५) दिवस, रात्र, ऋतू अथवा भोजनकाल यांच्या विशिष्ट भागांमध्ये वात, पित्त, कफ यांची वृद्धी होत असल्यामुळे त्या विशिष्ट कालामध्ये वृद्धी होत असलेल्या रोगाच्या दोषप्राधान्याचे ज्ञान कालसंप्राप्तीमुळे होते.


कोष्टक क्र. २. कालमानानुसार दोषांमध्ये होणारी वृद्धी.

काल

कफवृद्धी

पित्तवृद्धी

वातवृद्धी

दिवस

आदी

मध्य

अंत

रात्र

आदी

मध्य

अंत

ऋतू

वसंत

शरद

वर्षा

भोजन

आदी

मध्य

अंत

व्याधिपरीक्षा : सुश्रुताचार्यांनी श्रवण, दर्शन, स्पर्शन, घ्राण आणि रसना या पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा व प्रश्नद्वारा अशी षड्‌विध व्याधिपरीक्षा वर्णिली आहे. दर्शन, स्पर्शन व प्रश्न अशी त्रिविध परीक्षाही अन्यस्थानी वर्णित आहे. नाडी, मूत्र, मल, जिव्हा, आकृती वगैरेंद्वारा अष्टविध परीक्षा योगरत्‍नाकरात वर्णन केली आहे. प्रकृती, विकृती, सार, संहनन, प्रमाण, सात्म्य, सत्त्व, आहारशक्ती, व्यायामशक्ती व वय यांच्याद्वारा दशविध परीक्षा चरकाचार्यांनी वर्णिली आहे. या सर्व परीक्षांचा अंतर्भाव चरकाचार्यांनी वर्णन केलेल्या आप्तोपदेश, अनुमान व प्रत्यक्ष या त्रिविध परीक्षेत होतो.

आप्त पुरुषांच्या वाक्याला आप्तोपदेश असे म्हणतात. तप व ज्ञानबलाने रज व तमभाव निवृत्त होऊन त्यांना त्रिकालाचे व अगदी यथार्थ असे ज्ञान होते अशा पुरुषांना आप्त अशी संज्ञा आहे. आप्तवाक्य हे निस्संशय सत्य असते. आयुर्वेदाचे ऋषिप्रणीत आर्षग्रंथ हे याप्रमाणे आप्तोपदेश होत. या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या सिद्धांतांच्या अविरुद्ध अन्य ज्ञानाचाही आप्तोपदेशातच अंतर्भाव होतो. म्हणून अशा प्रकारचे अन्यग्रंथ अथवा आयुर्वेदाचे शिक्षक हेही आप्तांमध्येच गणले जातात. या आप्तोपदेशामुळे भिन्न भिन्न रोगांची कारणे, लक्षणे, पूर्वरूप, उपद्रव, अरिष्ट (मरणदर्शक चिन्हे), साध्यासाध्यता, चिकित्सा, पथ्यापथ्य वगैरे विषयांचे ज्ञान होते.

प्रश्नपरीक्षा : स्वतः रोगी अथवा रोग्याचे नातेवाईक हेही एक प्रकारे आप्तच असतात. कारण चिकित्सकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन ते रोगासंबंधीची विविध प्रकारची माहिती चिकित्सकाला करून देतात. अशा प्रकारे ही परीक्षा प्रश्नाने होत असल्यामुळे तिला प्रश्नपरीक्षा असे म्हणतात. देश, काल, जाती, सात्म्य, व्याधीची कारणे, वेदना, बल, जाठराग्‍नी, मलांची प्रवृत्ती, कालप्रकर्ष वगैरे गोष्टी प्रश्नपरीक्षेने जाणावयाच्या असतात.

जांगल (रूक्ष), आनूप (आर्द्र) व साधारण असा तीन प्रकारचा देश असतो. जांगल देश अल्पजल, अल्पवृक्ष व पर्वतयुक्त असल्यामुळे वातप्रधान असतो. म्हणून या प्रदेशात प्रामुख्याने वातव्याधी होतात. या प्रदेशातील व्यक्तीही वातप्रधान असतात. प्रचुर जलवृक्ष असून ऊन कमी असलेला असा आनूप प्रदेश कफप्रधान असतो. या प्रदेशात जन्मलेल्या व्यक्ती कफप्रधान असतात व कफप्रधान व्याधी या प्रदेशात आधिक्याने होतात. साधारण देशामध्ये आनूप व जांगल या दोन्हींची मिश्रलक्षणे असून दोषसमता असते. म्हणून प्रश्नपरीक्षेने रोग्याचा जन्मदेश, संवर्धन देश व व्याध्युत्तिदेश विचारला जातो. देश या शब्दाचा दुसरा अर्थ देहदेश असाही होतो. देहदेश म्हणजे शरीरातील निरनिराळी स्थाने होत. शिर, ऊर, उदर, त्वचा वगैरे शरीरातील स्थानातील कोणच्या स्थानामध्ये व्याधी आहे हे प्रश्नपरीक्षेने विचारावे लागते. शिर हे प्राणवायूचे स्थान आहे म्हणून शिरस्थ विकृतीचा प्राणवायूशी संबंध असू शकतो. उरःप्रदेश कफाचे व प्राणवहस्रोतसांचे स्थान आहे. त्वचेमध्ये स्पर्शनेंद्रिय असते. अशा प्रकारे व्याधींमध्ये देहदेश प्रश्नपरीक्षेने आणला जातो.

वर्षा, शरद वगैरे ऋतू बाल्य, यौवन, वार्धक्य या अवस्था रोगांच्या साम, पच्यमान, निराम, जीर्ण वगैरे अवस्था रोगोत्पत्ती अथवा वृद्धिकाल वगैरे गोष्टींचा काल या शब्दात अंतर्भाव होतो. प्रश्नपरीक्षेने अशा प्रकारच्या कालाचे ज्ञान झाल्यामुळे व्याधीतील दोषप्राधान्य अथवा निरनिराळ्या अवस्थांचे ज्ञान होऊन चिकित्सा सुकर होते.


ब्राह्मण, क्षत्रिय वगैरेंना जाती असे म्हणतात. जातीवरून तो करीत असलेल्या व्यवसायाचे ज्ञान होते. विशिष्ट व्यवसायामध्ये विशिष्ट प्रकारच्या व्याधी प्रामुख्याने होतात. अत्यंत अल्पश्रम करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्थौल्य, प्रमेह वगैरे व्याधी उत्पन्न होण्याची शक्यता अधिक असते. गिरणी कामगार किंवा अन्य अतिश्रम करणाऱ्या व्यक्तीमध्ये राजयक्ष्मा किंवा कापसाचे कण, धुळीचे कण वगैरे द्वारा प्राणवहस्रोतसांचा नेहमी क्षोम झाल्यामुळे कास, तमकश्वास वगैरे व्याधी त्याचप्रमाणे मोटार ड्रायव्हरांमध्ये उरःक्षत, हृद्रोग कोळी लोकांमध्ये नेहमी पाण्यात काम करीत असल्यामुळे आमवात होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे प्रश्नपरीक्षेने झालेले जातीचे ज्ञान व्याधिपरीक्षेला उपयोगी पडते.

ज्याचा उपयोग शरीराला सुखावह होतो त्याला सात्म्य म्हणतात. आहार, विहार व व्यसन असे तीन प्रकारचे सात्म्य सामान्यतः असते. सात्म्य परीक्षेने व्याधी, व्याधीची साध्यासाध्यता किंवा चिकित्सा स्पष्ट होते. उदा., मद्यसात्म्य असलेल्या व्यक्तीला मद्यजन्य पित्तप्रकोपामुळे पित्तोदर, पित्तप्रधान पक्षाघात, पित्त व रक्ताचे स्थान असलेल्या यकृताची दुष्टी वगैरे होण्याची शक्यता असते. दूध, घृत हे पदार्थ सात्म्य असलेल्या व्यक्ती बलवान असल्यामुळे व्याधी सहन करणाऱ्या असतात. म्हणून बलवान व्याधीसुद्धा अशा व्यक्तीमध्ये सुखसाध्य होतो.

प्रश्नपरीक्षेने कारणांचे ज्ञान झाले म्हणजे व्याधिविनिश्चय व चिकित्सा सुकर होते. कोणत्या कारणांमुळे कोणत्या दोषांचा प्रकोप झाला आहे हे प्रश्नपरीक्षेने निश्चित करता येते.

वेदना कोणत्या प्रकारच्या व कोणत्या स्थानांत आहेत हे प्रश्नपरीक्षेने निश्चित होते. बलवान रोगी व्याधी सहन करू शकतो व अशा व्यक्तीमध्ये व्याधी सुखसाध्य होतो. बलाचे ज्ञान प्रश्नाने होऊ शकते. शरीराच्या जवळजवळ सर्व क्रिया अग्‍नीवर अवलंबून आहेत. अग्‍नी नष्ट झाला तर शरीर नष्टच होते. म्हणून अग्‍निज्ञान प्रश्नविषय होतो. वात, मूत्र, पुरीष, आर्तव, स्वेद वगैरे मलांची प्रवृत्ती कशी होते याचे ज्ञान प्रश्नपरीक्षेने होते. यावरून दोषांच्या व त्यांच्या निरनिराळ्या स्थानांच्या (गर्भाशय, बस्ती वगैरे) विकृतीचे ज्ञान होते. कोणत्या कालामध्ये व्याधीचा प्रारंभ झाला अथवा व्याधिवृद्धी झाली वगैरेंवरून दोषांचे ज्ञान प्रश्नाने होते. अशा प्रकारे प्रश्नपरीक्षेने विविध विषयांचे ज्ञान होते.

प्रत्यक्ष परीक्षा : चक्षू, घ्राण, रसना, त्वचा व श्रोत्र या पाच ज्ञानेद्रियांनी केली जाणारी परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा होय. या पाच परीक्षांपैकी रसनेंद्रियद्वारा रोग्याची परीक्षा करणे घृणास्पद असल्यामुळे ती परीक्षा रोग्याला विचारून अथवा अन्य साधनांनी केली जाते. उदा., प्रमेहामध्ये रोग्याच्या मूत्रातील माधुर्य मुंग्यांच्या साहाय्याने ओळखले जाते अथवा अन्य व्याधींमध्ये रोग्याच्या तोंडाची कडू, आंबट वगैरे चव रोग्याला विचारून ठरविली जाते.

चक्षुरेंद्रियांनी केलेल्या परीक्षेला दर्शन, त्वचेद्वारा केलेल्या परीक्षाला स्पर्शन, श्रोत्रद्वारा केलेल्या परीक्षेला श्रवण व घ्राणेंद्रियद्वारा केलेल्या परीक्षेला घ्राणन परीक्षा असे म्हणतात. शरीराचा अपचय, उपचय, वर्ण, आकृती, चेष्टा वगैरे गोष्टी दर्शन परीक्षेचे विषय आहेत. त्याचप्रमाणे मल, मूत्र, थुंकी वगैरे पदार्थांचेही दर्शन परीक्षेने परीक्षण करावे लागते. शरीर किंवा शरीरावयवांचे शैत्य, औष्ण्य, रौक्ष्य, स्‍निग्धता, मृदुता, कठिनता, स्पर्शासहिष्णुता, पीडनासहिष्णुता, स्वाप, विपरीत स्पर्शता वगैरे विषयांचे ज्ञान स्पर्शन परीक्षेत होते. शिवाय यकृत, प्‍लीहा वगैरे अवयवांच्या वृद्धीचेही ज्ञान स्पर्शन परीक्षेने होते. शरीरात संचित होणाऱ्या जल, रक्त, पूय वगैरेंचे ज्ञान स्पर्शन परीक्षेचाच विषय आहे. शरीरात उत्पन्न होणाऱ्या निरनिराळ्या प्राकृत अथवा विकृत शब्दांचे ज्ञान श्रवण परीक्षेने होते. उच्छ्‌वास व निःश्वासाने प्राणवहस्रोतसांमध्ये निर्माण होणारा तसेच हृदयाचा प्राकृत शब्द, श्रवण परीक्षेचा विषय आहे. संधिविकृतीमुळे संधीची हालचाल होत असताना निर्माण होणारा विकृत शब्द प्राणवहस्रोतसांमध्ये कफसंचितीमुळे निर्माण होणारा विकृत शब्द अंत्रकूजन वगैरे विकृतीचेही ज्ञान श्रवण परीक्षेने होते. तसेच आकोठण परीक्षेने उदर अथवा उरःस्थानात निर्माण केलेल्या शब्दाचाही श्रवण परीक्षेतच अंतर्भाव होतो. शरीरस्थ गंधाचे अथवा शरीराच्या बाहेर निघालेल्या निरनिराळ्या पदार्थांच्या गंधाचे ज्ञान घ्राणन परीक्षेने होते. क्षतज अथवा क्षयज कास तसेच फुप्फुस विद्रधी या व्याधींमध्ये उच्छ्‍वासाला दुर्गंधी येते. पुरीष, मूत्र, थुंकी वगैरेंच्या गंधाचे ज्ञानही घ्राणन परीक्षेने होते.

प्रत्यक्षाच्या आधारावर अनुमान करून जे ज्ञान प्राप्त होते त्याला अनुमान असे म्हणतात. म्हणून अनुमानप्रमाणाने होणारे ज्ञान प्रत्यक्षाइतकेच प्रमाणभूत आहे. उदा., उदरामध्ये द्रवसंचिती झाल्यावर उदकपूर्ण, दृतिस्पर्श, पाण्याच्या हालचालीचे ज्ञान वगैरे लक्षणे रोग्यामध्ये होतात अशा अवस्थेत व्रीहीमुख शस्त्राने वेध केल्यास द्रवाचे ज्ञान प्रत्यक्षानेही होते. अर्थात उदरस्थ द्रवामुळे प्रक्षोभ, कंप आदी प्रत्यक्ष लक्षणे व उदरस्थ द्रव यांचा नित्य संबंध असतो म्हणून वेध करून द्रवाचे प्रत्यक्ष न करताही प्रक्षोभ, कंप वगैरे लक्षणांनी उदरस्थ द्रवाचे जे ज्ञान होते त्याला अनुमान असे म्हणतात. पाचनशक्तीवरून अग्‍निबलाचे अनुमान, व्यायामशक्तीवरून शरीरबलाचे अनुमान, विषय ग्रहण करण्याच्या शक्तीवरून मेधाबलाचे अनुमान वगैरे अनुमान परीक्षेची उदाहरणे आहेत.


अनुमानाचे तीन भेद होतात. (१) कार्यावरून कारणाचे अनुमान : जसे गर्भधारणेवरून मैथुनाचे अनुमान. (२) कारणावरून कार्याचे अनुमान : योग्य साहाय्यक परिस्थिती मिळाल्यानंतर कारणरूप बीजापासून कार्यरूप फलाचे अनुमान. (३) सामान्यतो दृष्टः कार्यरूप अथवा कारणरूपही नसलेल्या धूमावरून वन्हीचे अनुमान.

अशा प्रकारे सर्वप्रकारची व्याधिपरीक्षा ही आप्तोपदेश, प्रत्यक्ष व अनुमान या तीन प्रमाणांनीच होते.

वेगविधारणज व्याधी : शरीरातील बहिर्गमनशील द्रव्यांचे बहिर्मुखस्रोतसांमधून शरीराबाहेर निघण्याची प्रवृत्ती निर्माण होणे यास वेग असे म्हणतात. वेगकाली ही द्रव्ये आपापल्या स्रोतसांमध्ये उन्मुख होऊन शरीराबाहेर निघण्यास अगदी तयार झालेली असतात. यांना बाहेर काढण्याचे, गती देण्याचे काम वायूचे असते. म्हणून प्रवृत्त झालेल्या वेगाचा अवरोध केल्यास वायूचा प्रकोप होतो. शिवाय ज्या वेगाचा अवरोध केला जातो त्याप्रमाणे विशेष लक्षणेही होतात. अवरोध केल्यामुळे व्याधी निर्माण करणारे वेग चौदा आहेत. (१) मूत्र (२) पुरीष (३) शुक्र (४) अधोवात (५) ओकारी (६) शिंक (७) ढेकर (८) जांभई (९) भूक (१०) तहान (११) अश्रू (१२) निद्रा (१३) श्रमाने वाढलेला श्वास (१४) खोकला.

मूत्रनिग्रहामुळे बस्ती व मूत्रमार्गामध्ये वेदना, कष्टाने लघ्वी होणे, शिरोरूजा अशी लक्षणे होतात. पुरीषवेग निग्रहामुळे वायू व पुरीष यांचा अवरोध, पिंढऱ्या वळणे, पोट वायूने फुगणे, पक्वाशयात वेदना, शिरशूल ही लक्षणे होतात. शुक्रवेग निग्रहामुळे मेढ्रवृषणवेदना, शूल, अंगमर्द, हृदयप्रदेशात वेदना, मूत्रविबंध, शुक्राश्मरी  व षंढता ही लक्षणे होतात. अधोवातनिग्रहामुळे पुरीष, मूत्र व वात यांचा संग आध्मान, गुल्म, उदावर्त, वेदना, अग्‍निमांद्य, हृदयविकृती वगैरे व्याधी होतात. ओकारीच्या निग्रहामुळे कंडू, जाड गांधी, अरुची, व्यंग, शोथ, पांडू, ज्वर, कुष्ठ, उम्हासे येणे वगैरे व्याधी निर्माण होतात. शिंकेच्या निग्रहामुळे मन्यास्तंभ, शिरशूल, अदिर्त, अर्धावभेदक, इंद्रियदौर्बल्य वगैरे विकृती होतात. ढेकरांच्या निग्रहामुळे उचकी, श्वास, अरुची, कंप, हृदय व उरःप्रदेशामध्ये विबद्धता ही लक्षणे होतात. जांभईच्या निग्रहामुळे आक्षेप, संकोच, विनाम, सुप्ती, कंप वगैरे लक्षणे होतात. भुकेच्या निग्रहामुळे कार्श्य, दौर्बल्य, वैवर्ण्य, अंगमर्द, अरुची, भ्रम ही लक्षणे होतात. तहानेच्या निग्रहामुळे कंठशोष, आस्यशोष, बाधिर्य, श्रम, अंगसाद व हृदयव्यथा वगैरे लक्षणे होतात. अश्रुनिग्रहामुळे प्रतिश्याय, अक्षिरोग, हृद्रोग, अरुची, भ्रम आदी लक्षणे होतात. निद्रानिग्रहामुळे जृंभा, अंगमर्द, तंद्रा, शिरोरोग, अक्षिगौरव वगैरे लक्षणे होतात. श्रमाने वाढलेल्या श्वासाच्या निग्रहामुळे गुल्म, हृद्रोग, संमोह वगैरे लक्षणे होतात.

स्रोतोदुष्टीची कारणे व लक्षणे : अतिप्रमाणाने अथवा अकाली तसेच अहित भोजन केल्याने अथवा अग्‍निदुष्टीमुळे अन्नवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यांच्या दुष्टीमुळे अन्नाची इच्छा न होणे, अरुची, अविपाक, ओकारी वगैरे लक्षणे होतात. अत्यधिक उष्मा, आमदोष, भय, मद्यपान, अतिशुष्क, पदार्थांचे सेवन, तृष्णाविरोध वगैरे कारणांमुळे उदकवहस्रोतसे दुष्ट होतात. ती दुष्ट झाल्यामुळे जिव्हा, तालू, कंठ, क्लोम तथा ओष्ठ यांची शुष्कता तसेच तृष्णा ही लक्षणे होतात. धातुक्षय, वेग संधारण, रूक्ष पदार्थांचे सेवन, व्यायाम, क्षुधा त्याचप्रमाणे अन्न दारुण कर्मांमुळे प्राणवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यांच्या दुष्टीमुळे श्वासवेगाधिक्य, अडखळत श्वासोच्छवास, थोडाथोडा श्वासोच्छवास, सशब्द अथवा सशूल श्वासोच्छवास ही लक्षणे होतात. गुरू, शीत अतिस्‍निग्ध, प्रमाणाने अधिक अथवा पथ्यकर व अपथ्यकर भोजन एकाच वेळी करण्यामुळे त्याचप्रमाणे अधिक चिंतेने रसवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यांच्या दुष्टीमुळे रसधातू दोषज विकार उत्पन्न होतात. विदाही अन्नपान, स्‍निग्ध, उष्ण व द्रव पदार्थांचे अधिक सेवन तसेच आतप व अग्‍निसेवनामुळे रक्तवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यांच्या दुष्टीमुळे रक्तदोषज विकार उत्पन्न होतात. आर्द्रतोत्पादक स्थूल, गुरभोजन तसेच भोजनानंतर दिवसा झोप या कारणांमुळे मांसवहस्रोतसे दुष्ट होतात. यांच्या दुष्टीमुळे मांसप्रदोषज विकार उत्पन्न होतात. अव्यायाम, दिवसा झोप, मेदोवर्धन पदार्थांचे अधिक सेवन, वारुणी दारूचे अधिक सेवन वगैरे कारणांमुळे मेदोवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यांच्या दुष्टीमुळे मेदोदोषज विकार उत्पन्न होतात. व्यायाम, अतिसंक्षोम, अस्थींचे अतिविघट्टन तथा वातवर्धक पदार्थांच्या अतिसेवनामुळे अस्थिवहस्रोतसे दुष्ट होतात. अस्थिवहस्रोतसांच्या दुष्टीमुळे हाडावर हाड, दातावर दात, दंतशूल, अस्थिभेद, अस्थिशूल, विवर्णता, केश, लोम, नख, श्मश्रू यांचे विकार होतात. उत्पेषण, अति अभिष्यांदी तसेच विरोधी अन्नसेवन, अभिघात, प्रपीडन, वगैरे कारणांमुळे मज्‍जावहस्रोतसे दुष्ट होतात. यांच्या दुष्टीमुळे मज्‍जाप्रदोषज विकार उत्पन्न होतात. अकालयोनिगमन, मैथुननिग्रह, अतिमैथुन त्याचप्रमाणे शस्त्र, अग्‍नी यांच्यामुळे शुक्रवहस्रोतसे दुष्ट होतात. यांच्या दुष्टीमुळे शुक्रदोषजन्य विकार उत्पन्न होतात. पुरीषवेग विधारण, अत्यशन, अजीर्ण, अध्यशन वगैरे कारणांमुळे पुरीषवहस्रोतसे दुष्ट होतात. यांच्या दुष्टीमुळे कृच्छ्रतापूर्वक अल्प, सशब्द, सशूल, अतिद्रव, अतिग्रथित अथवा अत्यधिक पुरीषप्रवृत्ती होते. मूत्रवेगयुक्त असताना पाणी पिणे अथवा भोजन करणे अथवा स्त्रीसेवन करणे त्याचप्रमाणे मूत्रनिग्रह वगैरे कारणांमुळे मूत्रवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यांच्या दुष्टीमुळे मूत्रप्रवृत्ती थांबून थांबून, थोडी थोडी, पुष्कळ वेळा प्रमाणाने अधिक दाट अथवा सशूल होते. व्यायाम, अतिसंताप, क्रमविपरीत शीत तथा उष्णसेवन, क्रोध, शोक अथवा भय वगैरे कारणांमुळे स्वेदवहस्रोतसे दुष्ट होतात. यांच्या विकृतीमुळे स्वेदाचा अभाव अथवा आधिक्य, त्वचेचा खरखरीतपणा अथवा श्लेक्ष्णता, अंगदाह, लोमहर्ष वगैरे विकार होतात. आर्तववहस्रोतसांच्या विकृतीमुळे वंध्यत्व, मैथुनासहत्व व आर्तवनाश वगैरे विकार होतात.

दोषांचे कोष्ठांतून शाखागमन : मुखापासून गुदापर्यंत असलेल्या अखंड अशा नलिकेला महास्रोतस अथवा कोष्ठ असे म्हणतात. कोष्ठ हेच दोषांचे प्रमुख स्थान आहे. महास्रोतसामध्ये आमाशय कफाचे, पच्यमानाशय पित्ताचे व पक्वाशय हे वाताचे प्रमुख स्थान आहे. रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्‍जा, शुक्र हे धातू व त्वचा (त्वचाश्रित रस) यांना शाखा अशी संज्ञा आहे. कोष्ठातून दोषांचे शाखागमन खालील कारणांमुळे होते. (१) व्यायामामुळे उत्पन्न झालेल्या क्षोभामुळे दोष कोष्ठ सोडून शाखेत जातात. (२) अग्‍नीच्या तीक्ष्णतेमुळे विलयन झालेले दोष कोष्ठातून शाखेत जातात. (३) अतिशय वाढलेले पाणी ज्याप्रमाणे जलाशय सोडून अन्य स्थानात जाते त्याप्रमाणे वाढलेले दोष अहितसेवनाने अतिशय वाढतात व आपले कोष्ठातले स्थान सोडून शाखेत जातात. (४) वायूचे चलत्व वाढल्यामुळे दोषांचे कोष्ठातून शाखेकडे क्षेपण होते.


शाखाश्रित झालेले दोष अल्पबळ असल्यास अथवा देशाची व कालाची अनुकूलता नसल्यास व्याधी उत्पन्न न करता शाखेमध्येच पडून राहतात. योग्य कारण तसेच अनुकूल काल व देश मिळाल्यावर बलवान होऊन व्याधी निर्माण करतात. शाखाश्रित दोष बलवान असतील तर हेतू, काल वगैरेंची वाट न पाहता तात्काल व्याधी उत्पन्न करतात.

दोषांचे शाखेमधून कोष्ठगमन : खालील कारणांमुळे दोष शाखा सोडून कोष्ठाश्रयी होतात. (१) शाखाश्रित दोषांची वृद्धी केल्याने दोषशाखा सोडून कोष्ठात जातात. (२) विलयनाने द्रवीभूत झालेले दोष द्रवत्वामुळे शाखेतून कोष्ठात येतात. (३) दोषांचे पाचन झाल्यावर पक्वदोष अबद्धतेमुळे शाखेमध्ये स्थिर न राहता कोष्ठात येतात. (४) स्रोतसांच्या अवरोध दूर झाल्यामुळे मोकळ्या झालेल्या स्रोतसांतून शाखाश्रित दोष कोष्ठाश्रित होतात. (५) दोषांना कोष्ठातून शाखेमध्ये क्षेपण करणाऱ्या वातदोषांचा निग्रह केल्यामुळे दोष शाखा सोडून स्वस्थानी म्हणजे कोष्ठात येतात.

दोष दूष्यांचा आश्रयाश्रयीभाव : वायू व दोषाचा आश्रय अस्थी, धातू, पित्ताचा आश्रय स्वेद व रक्त त्याचप्रमाणे कफाचा आश्रय रस, मांस, मेद, मज्‍जा व शुक्र हे धातू होत. सामान्यपणे आश्रयाचे वर्धन अथवा क्षपण करणारा क्रियाक्रम आहारविहार तदाश्रित दोषांचेही वर्धन अथवा क्षपण करतो. स्वेद अथवा रक्त यांचे वर्धन अथवा क्षपण करणाऱ्या क्रियाक्रमाने पित्ताचेही वर्धन अथवा क्षपण होते. तसेच रस, मांस वगैरे कफाचे आश्रय असणाऱ्या दूष्यांच्या वर्धन अथवा क्षपणाने तदाश्रित कफाचे वर्धन अथवा क्षपण होते. ज्याप्रमाणे आश्रयाचा परिणाम आश्रयीवर होतो त्याचप्रमाणे आश्रयीचा परिणाम आश्रयावरही होतो. वायू व त्याचा आश्रय अस्थी हे फक्त या नियमाला अपवाद आहेत. लंघनाने वायूचे वर्धन होते परंतु त्याचा आश्रय असलेल्या अस्थीचे मात्र क्षपण होते. बृहणाने वायूचे क्षपण व अस्थीचे वर्धन होते.

धातूंचे वर्धन, क्षपण वा धात्वग्‍नी : कायाग्‍नी हा सर्व अग्‍नीमध्ये प्रधान आहे. त्याचेच अंश धातूमध्ये आश्रित असून रसादी धातूंचे पाचन करतात. धातूंमध्ये आश्रित असल्यामुळे यांना धात्वग्‍नी म्हणतात. धात्वग्नींच्या प्राकृतत्वावर धातूंचे प्राकृतत्व अवलंबून असते. धात्वग्‍नी मंद झाल्यामुळे धातूची वृद्धी होते व धात्वग्नींच्या तीक्ष्णतेमुळे धातूंचा क्षय होतो. रसाग्‍नीच्या क्रियेने अस्थायी रसधातूवर क्रिया होऊन स्थायी रसधातूमध्ये त्याचे परिणमन होते. रसाग्नीच्या मंदतेने रसधातूचे योग्य पाचन न होता साम अर्थात अपरिपक्व रसधातूची वृद्धी होते. रसाग्‍नी तीक्ष्ण झाल्यामुळे रसधातूचे अधिक पाचन होते अर्थात रसाचा क्षय होतो. याचप्रमाणे कोणत्याही धात्वग्‍नीच्या मंदत्वामुळे धातुवृद्धी व धात्वग्‍नीच्या तीक्ष्णतेमुळे धातुक्षय होतो.

पूर्वधातूची वृद्धी झाल्यामुळे क्रमाने पुढील धातूचीही वृद्धी होत जाते व पूर्वधातूचा क्षय झाल्याने पुढील धातूचा क्षय होतो.

सामान्यपणे अतिअल्प व बिघडलेल्या मधुरादी रसांच्या सेवनाने कफादी दोषांचा प्रकोप होतो. प्रकुपित दोष रसादी दूष्यांना विकृत करतात. विकृत दोष व दूष्य दोन्ही मिळून मलपुरीषादी मलांना विकृत करतात. विकृत मलस्रोतसांना दुष्ट करून निरनिराळ्या प्रकारचे व्याधी निर्माण करतात.

उपद्रव : संप्राप्तिकालामध्ये भेदावस्था हा सहावा चिकित्सेचा क्रियाकाल आहे. या कालामध्ये कारणे घडत राहिली अथवा व्याधीची उपेक्षा केली गेली अथवा अयोग्य चिकित्सा केली गेली किंवा दोष प्रथमपासूनच बलवान असतील तर रोगारंभक दोष अतिवृद्ध झाल्यामुळे निराळ्या स्रोतसांमध्ये स्थानसंश्रय करून मूळ व्याधीबरोबरच आणखी निराळाच व्याधी उत्पन्न करतात. अशा

व्याधीला मूळ व्याधीचा उपद्रव असे म्हटले जाते. सामान्यपणे उपद्रव मूळ व्याधीच्या मध्य कालामध्ये निर्माण होतात. उपद्रव निर्माण झाल्यामुळे सुखसाध्य व्याधी कष्टसाध्य होतो. कष्टसाध्य उपद्रवयुक्त व्याधी याप्य होतो. याप्य व्याधीमध्ये उपद्रव निर्माण झाल्यावर तो व्याधी मारक होतो.

मृत्युसूचक निश्चित लक्षणांना अरिष्ट असे म्हटले जाते. आयुष्य म्हणजे चेतनानुवृत्ती. चेतनानुवृत्ती खंडित होणे म्हणजेच मृत्यू. अरिष्ट लक्षणे ही मृत्युसूचक असल्यामुळे चेतनानुवृत्ती दर्शविणाऱ्या शरीरस्थ क्रियांनी अरिष्ट लक्षणे दिसून येतात. जीवित शरीरातील सर्व क्रिया वात, पित्त, कफ या त्रिदोषांवरच आधारित आहेत. वायू हा तिन्ही दोषांमध्ये प्रमुख आहे. पित्त व कफ हे पंगू असून वायूमुळेच त्यांचे संचलन होते. वायूच्या पाच प्रकारांमध्येही प्राणवायू हा मुख्य आहे. प्राणवायूमुळेच शेष, उदान, समान, प्राण आणि व्यान या वायूंचे नियमन होते. म्हणून चेतनानुवृत्तीशी जास्तीत जास्त निगडित असलेला असा दोष प्राणवायू हा आहे. त्यामुळे अरिष्ट लक्षणांमध्ये प्राणवायूच्या विकृतीचे प्राधान्य दिसून येते. प्राणवायूचे मुख्य स्थान शिर हे आहे व संचरण स्थान ऊर तसेच कंठ आहे. बुद्धी, हृदय, इंद्रिये, चित्त यांचे धारण प्राणवायू करतो. अर्थात अरिष्ट लक्षणांमध्ये प्राणवायूचे धारणकर्म विकृत झाल्यामुळे बुद्धी, हृदय, इंद्रिये, चित्त यांची विकृती मुख्यत्वाने दिसून येते. चेतनानुवृत्ती नष्ट होण्याची वेळ जवळ येत असल्यामुळे शरीरातील प्राकृत भावांमध्ये वैपरित्य निर्माण होते. मलांची दुर्गंधी नष्ट होते. दिवसा तारे दिसतात. दुःखी चेहरा अचानक आनंदी होतो. इ. इ.

अंतरकर, धों. स.