वसंत कल्प : बहुतेक वसंत कल्प हे जीर्ण ज्वर व धातुगत ज्वर यांवर उपयुक्त होतात. ज्वरानंतर शरीर पुष्ट व बलवान व्हावे म्हणून ते देतात. लघुमालिनी, मधुमालिनी, सुवर्णमालिनी, बृहन्मालिनी हे याचे प्रकार प्रचारात आहेत.

लघुमालिनी : कलखापरी मिरी थोड्या लोण्यात खलून लिंबाच्या रसात खलावीत. याला मालीनी प्राग्वसंलही म्हणतात. रक्तातिसार, रक्ती मूळव्याध, रक्तप्रदर, विषमज्वर, नेत्ररोग यांवर हा चांगला असून गर्भ, गर्भिणी व बालक यांना हा पोषक आहे.

मधुमालिनी : हा प्राणिज कल्प आहे. यात अंड्याचा बलक, हिंगूळ, मिरी इ. द्रव्ये व लिंबाच्या रसात खल आहे. हाही जीर्ण ज्वरनाशक व पौष्टिक आहे. गर्भ, गर्भिणी व बालक यांना पोषक आहे. रोगानंतरच्या अशक्ततेनंतर घेतला असता चांगलेच वजन वाढवितो.

सुवर्णमालिनी : लघुमालिनीची द्रव्ये अधिक सुवर्ण, मोती व हिंगूळ घालून त्याच पद्धतीने हा करावयाचा असतो. गुणही त्याप्रमाणेच पण अधिक स्थिरकर व बलवर्धक आहेत.

बृहन्मालिनी : हा थोडा निराळा आहे. अभ्रक, वैक्रांत, सुवर्णमाक्षिक, प्रवाळ, रौप्य इ. द्रव्ये यात असतात. शतावरी, हळद, कस्तुरी, कापूर यांचे पाणी व काढा यांची भावनाही द्यावयाची असते. हा धातूगत व जीर्ण ज्वरावर उपयुक्त आहेच पण सर्व प्रमेह, मूत्रकृच्छ्र, मूतखडा यांवरही उपयोगी आहे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री