स्वस्थवृत्त : ( आयुर्वेद ). आरोग्यसंपन्न व्यक्तींचे आरोग्य ( स्वास्थ्य ) कायम ठेवणे आणि रोगी असतील त्यांच्या विकृतीचे शमन करणे असे आयुर्वेदाचे द्विविध प्रयोजन आहे. आरोग्य त्रिविध आहे.(१) आरोग्य, (२) अति-आरोग्य व (३) संपूर्ण आरोग्य. ह्या तीनही प्रकारांचे खाली थोडयात स्पष्टीकरण दिले आहे.
(१) आरोग्य : याला कल्य, सुख, स्वास्थ्य, धातुसाम्य, समदोषत्व आणि प्रकृती असे पर्यायी शब्द आहेत. ज्या शरीरात तीनही दोष, सातही धातू , सर्व मल आणि त्यांच्या क्रिया सम आहेत आत्मा, इंद्रिये आणि मन प्रसन्न आहेत शारीर स्नायू रेखीव आहेत सर्व इंद्रिये बळकट असल्याने सहसा रोगाचे आक्रमण होत नाही तहान, भूक, उन्ह, थंडी, परिश्रम सहन होऊ शकतात जठराग्नीची क्रिया व पचनशक्ती सम असते आवाज स्पष्ट असतो वर्ण चांगला ( श्याम ) असतो शरीर पुष्ट असते भोजनसमयी रुची चांगली असते योग्य वेळी गाढ झोप लागते विकृत स्वप्ने पडत नाहीत प्रसन्न मनाने जागही येते सर्वही अंगप्रत्यंगे निरोगी असून त्यांची लांबी, रुंदी, घेर इ. प्रमाणबद्ध असतात उदा., छाती २४ अंगुले विशाल व १२ अंगुले उंच, पोट १२ अंगुले, कमर १६ अंगुले विस्तीर्ण व घेर ५० अंगुले इत्यादी ( अंगुल म्हणजे हाताच्या मधल्या बोटाच्या मधल्या पेऱ्याची जास्तीत जास्त रुंदी ). याचप्रमाणे सर्व लहान-मोठ्या अवयवांचे प्रमाण जे शास्त्रकारांनी सांगितले आहे ते ध्यानी आणूनच आरोग्याची अंशांशात्मक कल्पना करावी.
(२) अति-आरोग्य : याला ‘ अतिकल्य ’ असेही म्हणतात. वरील लक्षणांसह असा मनुष्य अतिबलवान व परमसुखयुक्त असतो. तो आत्मविश्वासपूर्वक कोणतेही काम हाती घेणारा, संपूर्ण धातुसारवान पुरुष लक्षणांनी युक्त [⟶ दोषधातुमलविज्ञान ] असतो आणि पहिल्या प्रकारात वर्णिलेल्या अंगप्रत्यंगांच्या प्रमाणापेक्षा असलेला कमी-अधिकपणा सौष्ठवाला पोषकच असतो उदा., डोके, हनुवटी, पाठ ही मोठी ढुंगण, कमर, छाती ही अधिक पुष्ट हातापायांची बोटे, मांड्या, बाहू ही अधिक लांब जीभ, कपाळ, छाती ही अधिक विस्तीर्ण परंतु जननेंद्रिय व मान आखूड नखे व जीभ पातळ इ. लक्षणे अधिक आढळतात.
(३) संपूर्ण आरोग्य : याला योग, मोक्ष, निष्ठा ( दुःखाचा आत्यंतिक नाश ) असे पर्यायी शब्द आहेत. यात वरील दोन्ही प्रकारांची लक्षणे असून शिवाय आत्म्याच्या ठिकाणी मन स्थिर झालेले असते. कोणत्याही ऐहिक उपभोगाची इच्छा नसते. पूर्ण तृप्त असून सुखदुःखाची बाधा होत नाही. मनाचे रज व तम हे दोष नाहीसे झालेले असतात. धी, धृती व स्मृती सम असतात. त्याच्या हातून ⇨ प्रज्ञापराध (बुद्धीच्या प्रमादाने घडलेले कृत्य ) होत नाहीत. दिव्य सामर्थ्य निर्माण झालेले असते. त्याला अष्टविध ऐश्वर्याची प्राप्ती झालेली असते.
स्वस्थवृत्ताचा हेतू आयुष्य सुखी असणे व ते हितावह असणे असाही आहे. [⟶ आरोग्यविज्ञान ].
(१) सुखी आयुष्य : ज्याला शारीर व मानस रोगांची पीडा नाही, विशेषतः ज्याची अवस्था यौवनसंपन्न आहे बल, वीर्य, यश, पौरुष, पराक्रम ही दीर्घकाल कार्यक्षम असून ती आनुवंशिकत्वाने प्राप्त झालेली आहेत ज्याला कोठेही संचार करण्यास संकोच वाटत नाही प्रत्येक कार्यसिद्धीसाठी आवश्यक साधनसामग्री जो मिळवू शकतो इंद्रिये, इंद्रियार्थ ज्ञान आणि कला ही संपूर्ण अंशाने ज्याच्या ठिकाणी असतात अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या व सुंदर अशा नानाविध विषयांचा जो सतत उपभोग घेतो त्याचे आयुष्य सुखी समजावे.
(२) हितावह आयुष्य : सत्यवादी, मनोनिग्रही, सावध, विचारपूर्वक कार्य करणारा, ज्ञान व कला यांचा सतत अभ्यासी, शांत स्वभावी, तपस्वी, ज्ञानी, क्षमाशील प्रीती, रोष, ईर्ष्या, उन्मत्तपणा व अहंकार यांना आपल्या स्वाधीन ठेवणारा धर्म, अर्थ आणि काम यांचा परस्परविरोध न येईल असे वागणारा वृद्धांची सेवा व पूजनीयांची पूजा करणारा विविध प्रकारचे दान करण्याची प्रवृत्ती असणारा भूतमात्रांचा हितेच्छुक, परधनाची इच्छा न करणारा अध्यात्म तत्पर राहून इह परलोकाकडे लक्ष ठेवणारा आणि धृती, स्मृती व बुद्धी चांगली असणारा मानव हा हितायुषी समजावा.
याप्रमाणे आरोग्य, अति-आरोग्य प्राप्त होण्यासाठी व आपले आयुष्य सुखी अथवा हितावह होण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या आहार आणि आचाराचे परिपालन नियमाने व निष्ठेने करावयास पाहिजे. अशा त्या आहार व आचाराचा प्रारंभ दररोजच्या सूर्योदयापासून होत असतो. म्हणून दररोज पाळावयाच्या आहार-आचारांना ‘ दिनचर्या ’ म्हटले आहे.
प्रस्तुत नोंदीत ‘ स्वस्थवृत्त ’ या संबंधीची माहिती पुढील प्रकरणांत विषयानुक्रमाने दिलेली आहे आणि या प्रकरणांखाली आवश्यक तेथे महत्त्वाचे उपविषय दिलेले आहेत : (१) दिनचर्या, (२) आहारविधी, (३) शरीर प्रसाधन व संरक्षण, (४) निद्राविचार, (५) ब्रह्मचर्य, (६) ऋतुचर्या, (७) स्वाथ्य संपादन, (८) निवासस्थानादी विचार, (९) सद्वृत्त, (१०) सात्म्यासात्म्य विचार, (११) जनपदोध्वंस, (१२) जनपदोध्वंस प्रति-कार, (१३) देशविचार, (१४) औपसर्गिक रोग, (१५) कालमृत्यु--अकालमृत्यू , (१६) रोगानुत्पादन, (१७) मलवृद्धी व क्षय, (१८) आगंतुरोग, (१९) आहार-शयन-अब्रह्मचर्य, (२०) आचार रसायन.
दिनचर्या : प्रातरुत्थान व मलमूत्रोत्सर्जन : ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीच्या ४ घटकांचा काळ अर्थातच पहाटे ४॥ ते ५॥ ही वेळ निरोगी मनुष्याने जागे होऊन दिनक्रम सुरू करण्यास योग्य अशी आहे. या वेळी उठून मलमूत्र प्रवृत्तीचे वेग आले असता ते विधी आटोपावेत. वेग आले नसतील, तर कुंथून मलमूत्रप्रवर्तन करू नये. मलमूत्र प्रवृत्तीनंतर मलमार्ग स्वच्छ करून दंत आणि मुखधावन करावे. वेगांना अवरोध किंवा त्यांचे मुद्दाम प्रवर्तन केल्याने रोग होतात.
दंत व मुखधावन : तुरट, तिखट किंवा कडू यांपैकी कोणत्या तरी रसाच्या वनस्पतींच्या काड्यांचे दातवण अथवा चूर्ण दात घासण्यासाठी वापरावे. दातवणासाठी रुई, वड, बाभूळ, कडुनिंब इ. झाडांची काडी १२ अंगुले लांब व करंगळीच्या टोकाइतकी जाड, सरळ, गाठी-रहित, ताजी व न किडलेली असावी. तिचे एक टोक चावून मऊ कुंचलीसारखे करावे व त्या कुंचलीने हिरड्या दुखवणार नाहीत अशी दक्षता घेऊन दात घासावेत. यानंतर याच वनस्पतींच्या साली किंवा वड, उंबर, पिंपळ यांसारख्या क्षीरी वृक्षांची साल पाण्यात उकळून त्या पाण्याने अथवा साध्या पाण्याने पुष्कळसे गुळणे करावेत, याला गंडूष म्हणतात. याच काढ्यात अथवा साध्या पाण्यात तिळाचे तेल घालून गुळणे करणे अधिक हितावह होय. यामुळे दातांचे रोग होत नाहीत, तोंडाला चांगली रुची येते, आंबट खाल्ले तरीही दात आंबत नाहीत आणि मजबूत राहून लवकर पडत नाहीत. यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर बराच वेळ थंड पाणी शिंपावे म्हणजे चेहरा प्रसन्न राहून हुशारी वाटते.
मधुर, अम्ल आणि लवण रसांची द्रव्ये नेहमीच्या दंतधावनात वापरू नयेत. मात्र ती दोष, दुष्टी अथवा निरनिराळ्या दोषांनी होणाऱ्या रोगांत वापरावी असे सुश्रुतमत आहे. विशिष्ट विकृतीत म्हणजे अतिदुर्बलावस्थेत तहान लागली असता किंवा थकवा आला असता किंवा मद्यपानाने ग्लानी आली असता, तसेच अजीर्ण, ओकारी, श्वास, खोकला, ताप, अर्दितरोग ( तोंड वाकडे होणे ), तोंड येणे, हृदयविकार, डोळे, डोके व कान यांचे रोग असतानाही रोगवर्धक गुणधर्माच्या मंजनाने दंतधावन वर्ज्य असावे.
जिव्हा निर्लेखन : तोंडाच्या आतील व जिभेवरील घाण, विरसता ( बेचवपणा ), दुर्गंध जाऊन रुची वाढावी, तोंड स्वच्छ होऊन हलकेपणा वाटावा, जीभ, दात व घसा यांचे रोग होऊ नयेत म्हणून हळूहळू जीभ घासून मळ खरडून काढावा लागतो. यास ‘ जिव्हा निर्लेखन ’ म्हणतात. या कार्यासाठी सोने, चांदी, तांबे इ. धातूंची पातळसर लवचिक पट्टी करून तिचा वापर करावा किंवा दंतधावनासाठी सांगितलेल्या काड्यांपैकी कोणत्याही वृक्षाची काडी उभी चिरून चपटी करावी व तिचा उपयोग करावा. [⟶ जीभ ].
अंजन : अंजनासाठी सुरमा वापरावा आणि आठवड्यातून एक वेळ डोळ्यात रसांजन घालावे म्हणजे स्राव होऊन डोळ्याला कफविकाराची भीती राहाणार नाही. तमा ( क्षय ), बलास ( कफ ) आणि सर्पविष यांवरही डोळ्यात अंजनाचा उपयोग करण्याविषयी अथर्ववेदात उल्लेख आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंजन उपयुक्त होय.
नस्य : औषध हुंगणे किंवा औषधांनी सिद्ध केलेले तेल, तूप इ. स्नेह प्रकार नाकात घालणे याला ‘ नस्य ’ म्हणतात. नाकात घातलेला स्नेह तोंडात पोहोचू नये अशा प्रमाणबद्ध क्रियेला ‘ प्रतिमर्श नस्य ’ असे शास्त्रीय नाव आहे.
नस्याचे लाभ : नाक हे डोयावरील मार्गाचे प्रवेशद्वारच आहे. यामुळे नाकाच्या मार्गाने गेलेल्या औषधांचा परिणाम ऊर्ध्वभागातील अवयवांवर होतो आणि तेथे रोग होत नाहीत. खांदे, मुख, मान, छाती इ. अवयव दृढ, पुष्ट व सुंदर होतात. चेहऱ्यावरील वांग, सुरकुत्या इ. येत नाहीत, आलेल्या सुरकुत्या नष्ट होऊन चेहरा सुंदर होतो. याशिवाय अवस्थापरत्वे नस्याचे कफनाश, मुखदुर्गंध परिहार, थकवा व जडत्व नष्ट होऊन दृष्टी प्रसन्न होणे इ. लाभ होतात. [⟶ नस्य ].
धूमपान : शरीराच्या ऊर्ध्वभागात कफ आणि वातविकार होऊ नयेत आणि कालपरत्वे संचित झालेल्या दोषांचा परिहार व्हावा म्हणून औषधी धूर सेवन करणे या विधीला ‘ धूमपान ’ असे शास्त्रीय नाव आहे. इष्ट ती द्रव्ये सूक्ष्म वाटून त्यांचा एका काडीला लेप द्यावयाचा व तो वाळल्यावर आतील काडी काढून घ्यावयाची म्हणजे औषधी वात तयार होते. ती विशिष्ट पद्धतीच्या तयार केलेल्या यंत्रात ठेवून पेटवावयाची व येणारा धूर सेवन करावयाचा, अशी धूमपानाची पद्धती आहे. वातीला ‘ धूमवती ’ आणि यंत्राला ‘ धूमयंत्र ’ असे नाव आहे. धूमसेवन करण्यात तो नाकाने ओढावयाचा तसाच तोंडानेही ओढावयाचा असतो. सोडताना मात्र तोंडानेच सोडावा नाकाने सोडल्यास डोळ्यांना अपाय होण्याची भीती असते.
जागरण झाले असेल अथवा मध, दूध किंवा स्नेहपान केले असेल अथवा राग, शोक इ. मानसिक परिणामांनी त्रस्त असताना धूमपान करू नये. गर्भिणी स्त्रीनेसुद्धा धूमपान करणे इष्ट नाही.
तांबूल सेवन : नागवेलीची पिकलेली पाने, कात, चुना व सुपारी ह्या वस्तूंचा साधारणतः तांबूल म्हणजे विडा होतो. यांशिवाय केशर, जायफळ, कापूर इ. १३ द्रव्यांचा मिळून विडा केला जातो, त्याला ‘ त्रयोदशगुणी तांबूल ’ म्हणतात. झोपून उठल्यावर, दोन्ही वेळच्या जेवणानंतर, सभा इ. प्रसंगी आणि मैथुनानंतर विडा खावा. तोंड स्वच्छ व दुर्गंधरहित होऊन चेहरा प्रसन्न होणे आणि थकवा नष्ट होणे हे मुख्यतः तांबूल सेवनाचे सुपरिणाम होत. विरेचन औषध घेतले असेल किंवा भूक लागली असेल, तर विडा खाणे वर्ज्य करावे. तसेच अधिक विडे खाणे हे सुद्धा दृष्टी, केस, दात आणि कानांना अपायकारक असून पचनविकृती आणि वायू व रक्तदुष्टीचे विकार करणारे असते.
अभ्यंग : शरीराला तेल, तूप, चरबी इ. स्नेह द्रव्यांचे मर्दन करणे म्हणजे अभ्यंग होय. स्पर्श हा त्वचेचा धर्म आहे, वायू हा त्वचेच्या ठिकाणी राहून कार्य करतो, म्हणून त्या वायूचे रुक्षादी गुण वाढू नयेत यासाठी अभ्यंग अत्यावश्यक आहे.
त्वचेला चिवटपणा येणे, सुरकुत्या न पडणे, केस पांढरे न होणे, दृष्टी मंद न होणे इ. लाभ अभ्यंगाने होतात, म्हणून दररोज अभ्यंग करणे हितावह आहे. निदान डोके व हातापायांचे तळवे यांत स्नेह जिरविणे आणि कानातही कोमट थेंब सोडणे हे न चुकता व्हावे.
डोक्यावर विशिष्ट पद्धतीने स्नेह भरून ठेवण्याच्या कृतीला ‘शिरःपूरण’ म्हणतात. मस्तकातील इंद्रियांचे कार्य सुरळीत राहावे आणि त्वचाही सुंदर व्हावी म्हणून शिरःपूरणाचा उपयोग होतो.
डोक्याप्रमाणेच कानातही कोमट तेल किंवा योग्य तो स्नेह भरण्याच्या कृतीला ‘ कर्णपूरण ’ नाव आहे. कानासंबंधी वातरोग, बहिरेपणा, मान व हनुवटी जखडणे इ. प्रकार होऊ नयेत या दृष्टीने कर्णपूरणाची आवश्यकता आहे. कर्णपूरण सूर्यास्तानंतरच करावे.
पायांना अभ्यंग केल्याने त्यांचा खरखरीतपणा, स्तब्धता, रुक्षता, अतिचालण्याने आलेली बधिरता, पाय फुटणे, भेगा पडणे या गोष्टी घडत नाहीत. गृध्रसी वात व सिरा स्नायूंचा संकोच होण्याचे टळते. पाय सुकुमार व मजबूत होतात.
पायांच्या ठिकाणी दोन सिरा आहेत. त्या नेत्रांकडे जातात व म्हणूनच पायांना लावलेला स्नेह त्या सिरांच्या मार्फत नेत्रांना पोहोचून हे सर्व लाभ घडतात. नेत्रातसुद्धा स्नेह घालण्याविषयी शास्त्राचा सल्ला आहे.
अजीर्ण झाले, विरेचन किंवा वांतीचे औषध घेतले अथवा बस्ती घेतली असेल, तर अभ्यंग करू नये केल्यास आम आणि अग्निमांद्याची पीडा होते. [⟶ मर्दन चिकित्सा ].
व्यायाम : शरीराचे स्थैर्य व बल वाढविणारी विशिष्ट व पद्धतशीर अशी शरीराची केलेली हालचाल म्हणजे व्यायाम होय. काबाडकष्टाच्या निमित्ताने होणारे श्रम किंवा केली जाणारी हालचाल या दृष्टीने व्यायाम नव्हे.
शरीराला हलकेपणा येऊन त्या त्या अवयवांना कार्य करण्याची भरपूर शक्ती येणे, उत्साह वाटणे, जठराग्नी प्रदीप्त होणे आणि अवास्तव मेद झडून जाऊन सर्व अवयव रेखीव आणि सुटसुटीत होणे हे व्यायामा-पासून होणारे लाभ आहेत.
नैसर्गिक बल चांगले असणाऱ्यांनी हेमंत, शिशिर आणि वसंत ऋतूंत स्निग्ध आहार सेवन करून शक्तीच्या निम्म्याने व्यायाम करावा. इतरांनी तर तो यापेक्षाही कमी करावा. विशेषतः वात तसेच पित्त प्रकृतीचे लोक, बाल, वृद्ध यांनी तो मुळीच करू नये अथवा अत्यल्प करावा.
व्यायाम, आहार इत्यादींच्या सेवनात देशकालादी बरोबरच वयाचाही विचार करावा लागतो. बाल्य, मध्यम आणि जीर्ण किंवा वृद्ध असे वय त्रिविध संभवते.
बाल्यवय : हे वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मानले आहे. या वयात शारीरधातुघटक अपरिपक्व, शरीर सुकुमार आणि लेश सहन करण्यास असमर्थ असते.
मध्यमवय : हे वयाच्या सोळाव्या वर्षानंतर सत्तराव्या वर्षापर्यंत मानले आहे. या वयात पुन्हा अवस्था भेदाने वृद्धी, यौवन, संपूर्णता व थोडी हानी म्हणजेच उतरती कळा असे ४ भेद कल्पिले आहेत. विसाव्या वर्षापर्यंत वृद्धी, तिसाव्या वर्षापर्यंत यौवन, चाळीसाव्या वर्षापर्यंत सगळे धातू , इंद्रिये बलवान होऊन वीर्य संपूर्णता असते. त्यानंतर सत्तराव्या वर्षापर्यंत ते काहीसे कमी होत जाते.
वृद्धवय : सत्तराव्या वर्षानंतर धातू , इंद्रिये, बल, पौरुष, वीर्य, पराक्रम, ग्रहण, धारण, स्मरण व वचन यांचा क्षय होत जातो. त्वचेला सुरकुत्या, पांढरे केस, टक्कल इत्यादींनी युक्त शरीर होत जाऊन खोकला, श्वासादींनी पीडित होते. क्रमशः शारीरक्रिया करण्यास असमर्थ होत जाते व थोड्याही वादळी वाऱ्याने वा पाणी अगर पावसाने एखादे जुनाट घर कोसळावे तसे ते थोड्याही आपत्तीने कोसळते.
दोष दृष्ट्या विचार करता बालवय हे कफप्रधान, मध्यमवय पित्तप्रधान आणि वृद्धवय किंवा जीर्णवय वातप्रधान असते हा विचार करूनच प्रत्येक व्यक्तीने करावयाचा व्यायाम आणि घ्यावयाचा आहार यांचे प्रमाण निश्चित करणे इष्ट असते. [⟶ वयःस्थापन ].
शक्तीच्या निम्म्याने व्यायाम करावा असे वर सांगितले आहे. त्या अर्धशक्ती व्यायामाचे प्रमाण शास्त्रकारांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तोंडाने श्वासोच्छ्वास करण्याची आवश्यकता वाटू लागेल आणि काख, कपाळ व हातापायाचे सांधे इ. ठिकाणी घाम येऊ लागेल तेव्हा व्यायाम अर्धशक्ती झाला असे समजून थांबवावा.ग्रीष्म आणि वर्षा ऋतूंत मनुष्यांचे नैसर्गिक बलच कमी असते, म्हणून बलवंतांनीही व्यायाम अर्धशक्तीहूनही कमीच करावा व अशक्तांनी तो मुळीच करू नये.
तहान लागली, भोवळ आली, नुकतेच जेवण झाले किंवा स्त्रीसमागमाने क्षीणता आली असेल, तर व्यायाम वर्ज्य करावा.
क्षय, रक्तपित्त, खोकला, दमा, भोवळ इ. विकार अतिव्यायाम केल्याने होतात, म्हणून तो तसा करू नये. व्यायाम वाढवावयाचा असेल, तर तो क्रमाक्रमाने वाढवीत जावा. त्याचप्रमाणे तो एकदम न सोडता क्रमाक्रमानेच कमी करावा किंवा सोडावा. शिवाय देश, काल, बल, वय आणि आहार यांचाही बारकाईने विचार करून व्यायामाचे प्रमाण ठरवावे म्हणजे अपाय होण्याची भीती उरणार नाही. [⟶ व्यायाम ].
अंगमर्दन : व्यायामानंतर शरीराला सुख होईल अशा बेताने अंगमर्दन ( चंपी ) करून घ्यावे, म्हणजे थकवा नाहीसा होऊन प्रसन्नता वाटते व झोप चांगली येते. [⟶ मर्दन चिकित्सा ].
उद्वर्तन : अभ्यंगानंतर स्नानापूर्वी अंगाला उटणे लावण्याच्या क्रियेला उद्वर्तन म्हणतात. या क्रियेमुळे त्वचेचा तेलकटपणा जाऊन ती स्वच्छ व सुंदर होते, तिच्या ठिकाणी मेद असेल तर तो झडतो. या उटण्या-साठी वाळा, हळद, कचोरा, चंदन इ. सुगंधी, कडू व तुरट रसाची द्रव्ये वापरावीत.
स्नान : अतिथंड किंवा अतिऊन पाण्याने स्नान करू नये. सामान्यतः शीतजल स्नान हे डोळ्यांना हितावह होय. अतिथंड पाणी हिवाळ्यात स्नानासाठी वापरणे वात आणि कफाचा उपद्रव करते. तसेच उन्हाळ्यात ऊन पाणी पित्त व रक्ताची दुष्टी करते. म्हणून स्नानाला भरपूर असे समशीतोष्ण पाणी वापरावे. डोयावरून स्नानासाठी ऊन पाणी वापरू नये. ते केस व डोळ्यांची शक्ती कमी करते.
निद्रा, दाह, थकवा, घाम, कंडू , तहान, शरीराचा मल, डोळ्यांवर येणारी झापड यांना घालवून हृदयाच्या क्रियेला साह्य देणे, सर्व इंद्रियांना सावध ठेवणे, पुरुषत्व शक्ती वाढविणे, रक्ताची प्रसन्नता निर्माण करणे, मन प्रसन्न ठेवून उत्साह आणि बल वाढविणे आणि जठराग्नी प्रदीप्त करणे इत्यादींकरिता स्नान हे शरीर आणि मनाला हितावह होत असते.
डोळे येणे, पडसे, अजीर्ण, नुकतेच जेवण झालेले असणे आणि अर्दित इ. विकारात स्नान करणे हितावह नसते. [⟶ स्नान व स्नानगृहे].
उद्धर्षण व उत्सादन : स्नानाच्या वेळी मलापहरणासाठी करावयाचा विधी उद्धर्षण होय. उटण्यासाठी सांगितलेल्या द्रव्यांची कोरडी पूड अंगाला रगडणे, समुद्र फेस किंवा विटेचा तुकडा अथवा पूर्वी वज्री ह्या नावाची पितळ किंवा तांब्याची वस्तू किंवा गोल, गुळगुळीत,चपटा दगडही अंग घासण्यासाठी वापरीत, हे सर्व उद्धर्षणच होय. मेदस्वी लोक किंवा लठ्ठ शरीराच्या पहिलवानांसारख्याचा मेद कमी करण्यास उद्धर्षण विधी उपयुक्त ठरतो.
त्वचा मऊ, तुकतुकीत, सुंदर होऊन तिच्या ठिकाणी खाज, पुळ्या इ. होऊ नये म्हणून त्वचेला हलकेपणा येण्याकरिता उत्सादन क्रिया करावयाची असते. त्या दृष्टीने तीळ, बदामासारखी द्रव्ये दुधात वा पाण्यात वाटून तो पदार्थ त्वचेवर चोळावा.
उद्धर्षण रुक्ष असते, तर उत्सादन स्निग्ध असते हा या दोहोंत फरक आहे.
अनुलेपन : चंदन, कापूर इ. योग्य द्रव्ये स्नानानंतर अंगास उटीसारखी लावणे यास अनुलेपन म्हणतात. हिवाळ्यात केशर, अगरू यांसारख्या उष्ण द्रव्यांचा आणि उन्हाळ्यात चंदन, कापूर व वाळा यांसारख्या शीत द्रव्यांचा अनुलेपनासाठी उपयोग करणे श्रेयस्कर असते.
आहारविधी : स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून प्रसन्न मनाने आहार घेणे योग्य असते या वेळी अलंकार, सुगंधी फुले व त्यांच्या माळा अंगावर धारण करणे, सुगंधी धूप जाळणे इ. गोष्टी मनाच्या प्रसन्नतेस साहाय्यक ठरतात.
भोजन काळ : सकाळ व संध्याकाळ असे दोनच वेळा भोजन घेणे स्वास्थ्याला पोषक असते. एकभूक्त असणे हे सुखपरिणामकर असते, असे शास्त्रमत आहे. तथापि, पूर्वदिवशीच्या आहाराचे पचन होऊन मलमूत्रादी प्रवृत्ती चांगली झाली व भूकही सडकून लागली आहे, हे ध्यानी आणून आहार घेणे योग्य ठरते. एकदा काहीही खाल्ल्यानंतर तीन तासापर्यंत दुसरा आहार घेऊ नये आणि दोन जेवणांत सामान्यतः सहा तासांचे अंतर असावे.
उत्साह, वर्ण, स्वर, दृष्टी मंद होणे, मन विषण्ण होणे, शरीर कृश होणे, थकवा बराच वाटून नीट बोलताही न येणे, हृदयात पीडा व चेहरा सुकणे इ. सर्व लक्षणांवरून भूक फार लागली आहे असे ओळखावे. तालू , ओठ, जीभ, गळा व गाल यांच्या ठिकाणी शुष्कता कान व डोळे दुर्बल झाल्यामुळे ऐकू व पाहू नयेसे वाटणे विषाद व मोह होणे स्मृती, अग्नी, मेधा, सुख व भाषण शक्ती कमी होणे आणि जीभ लांबल्या-सारखी होणे ही अत्यंत तहान लागल्याची लक्षणे होत. भूक लागली असता पाणी पिणे किंवा तहान लागली असता जेवण करणे या दोन्ही गोष्टी अपाय करणाऱ्या आहेत.
आहारमात्रा : पोटाचे ४ भाग कल्पून २ भाग अन्न व १ भाग पाणी सेवन करावे आणि वायूच्या संचारासाठी १ भाग रिकामा ठेवावा हीच खरी आहारमात्रा होय. याचा स्पष्ट अर्थ असाच होतो की, पोटाला तडस लागेतो जेवण न करता ते झाल्यावर बसणे, उठणे, बोलणे व श्वासोच्छ्वास क्रिया सहज करता येतील इतपत केलेला आहार हाच प्रमाणबद्ध किंवा योग्य मात्रेचा झाला असे समजावे.
अन्नाच्या हलकेपणावर किंवा जडपणावरही आहाराची मात्रा अव-लंबून असते. उदा., साठे साळी, मूग इ. धान्य किंवा लावा, कपिंजला- सारख्या पक्ष्याचे अथवा ससा, हरिण यांसारख्या पशूंचे मांस हलके असले तरी अतितृप्ती होईपर्यंत त्यांचे सेवन करणे श्रेयस्कर होणार नाही. तसेच गहू , तांदूळ इत्यादींच्या पिठाचे लाडू वगैरेसारखे पदार्थ, दूध इत्यादींसह केलेली पक्वान्ने, उडदाचे पदार्थ, जलचर प्राणी ( उदा., मासे, कासव यांसारखे ) किंवा ज्यांना पाणी अधिक लागते अशा म्हैस यांसारख्या पशूंचे मांस हे पचनास जड असते. म्हणून त्यांचे सेवन अर्धी भूक ठेवून करणे हे त्यांचे योग्य प्रमाण समजावे.
काही पदार्थ तर सेवनातून संपूर्णतया वर्ज्य करणे इष्ट असते. उदा., अतिकृश किंवा रोगाने मेलेल्या प्राण्याचे मांस, डुक्कर, गाय व म्हैस यांचे मांस, मासे, दही, उडीद इत्यादींचे सतत सेवन करणे स्वास्थ्याला हानिकर असते.
सतत सेवन करण्याच्या दृष्टीने अगदी थोडयात सांगायचे तर साठे साळी, मूग, सैंधव, आवळे, आकाशातून पडणारे व भूमीचा स्पर्श न होऊ देता संग्रह करून ठेवलेले अंतरिक्ष अथवा दिव्य जल, तूप, जांगल प्राण्याचे मांस आणि मद्य हे पदार्थ योग्य होत असे म्हणता येते.
आतापर्यंत केलेल्या विवेचनाचा सूत्ररूपाने असाच अर्थ समजावयाचा की, स्वास्थ्य नित्य टिकून राहील आणि कोणत्याही नव्या विकाराला शरीरात प्रविष्ट होण्याला वाव मिळणार नाही असाच आहार घ्यावा.
आहार प्रकार : स्वास्थ्य रक्षणासाठी आहार घेण्यात वेळ, पद्धती, प्रमाण इ. बाबतींत दक्षता घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आहारसेवनाच्या प्रकारातही जाणता वा अजाणता जे संभाव्य दोष असतात तेही कटाक्षाने टाळावयास पाहिजेत. अशा या संभाव्य दोषांचे (१) समशन, (२) अध्यशन आणि (३) विषमाशन असे तीन प्रकार असतात. त्यांचे थोडयात स्पष्टीकरण खाली दिले आहे.
समशन : शाली इ. सारखे पथ्यकारक आणि त्याच वर्गातील राळा, वरी इ. अपथ्यकारक धान्ये किंवा असेच पथ्य आणि अपथ्यकारक इतर पदार्थ एकत्र शिजवून खाणे.
अध्यशन : एकदा जेवण झाल्यावर योग्य काळ उलटण्यापूर्वीच पुन्हा खाणे.
विषमाशन : अवेळी, प्रमाणाहून अत्याधिक किंवा अत्यल्प खाणे हे तीनही प्रकार फार मोठ्या व्याधी उत्पन्न करतात. याशिवाय आपणास न आवडणारे, अवष्टंभकारक, जळालेले, कच्चे राहिलेले, पचायला जड,रुक्ष, थंडगार, विदाही, शुष्क व अधिक पाण्याने गचगचित झालेले अन्न अहितकारक असते. तसेच शोक, क्रोध, लोभ, भय, चिंता इ. विकारांनी शरीर ग्रस्त असेल तर योग्य वेळी व योग्य प्रमाणात सेवन केलेले चांगले अन्नही पचत नाही.
चतुर्विध जठराग्नी : आहाराचे पचन ज्या जठराग्नीच्या शक्तीवर अवलंबून असते तो जठराग्नी चतुर्विध संभवतो. त्याची ती स्थिती दोषांच्या विकृतीवर अवलंबून असते.
विषमाग्नी : वाताने दुष्ट झालेला अग्नी विषम असतो. सेवन केलेले अन्न योग्य वेळी व योग्य प्रमाणात असूनही कधी चांगले पचते, तर कधी पचत नाही यांवरून ही विषम स्थिती ओळखता येते.
तीक्ष्णाग्नी : पित्ताने दुष्ट झालेला अग्नी तीक्ष्ण असतो. अशा लोकांनी प्रमाणापेक्षा अधिक अन्न सेवन केले तरी ते सहज व लवकर पचते. अग्नीची हीच स्थिती अशीच वाढत राहिली, तर त्याला अत्यग्नीचे स्वरूप प्राप्त होते. वाताच्या दुष्टीमुळे जेव्हा अन्न नीट पचत नाही तेव्हा पोट फुगणे, शूळ, उदावर्त, अतिसार, पोटाला जडत्व, पोटात गुरगुर असा आवाज आणि मल प्रवृत्तीच्या वेळी कुंथावे लागणे ही लक्षणे उत्पन्न होतात. तसेच पित्तदुष्टीने अत्यग्नी असलेल्यांना अन्न पचल्यानंतर गळा, टाळू , ओठ कोरडे पडणे, पोटात दाह व अंग तापणे असे उपद्रव झालेले आढळतात.
मंदाग्नी : कफाच्या दुष्टीने अग्नी मंद होतो. मंदाग्नी असलेल्या लोकांनी थोडेही अन्न सेवन केले, तरी ते पचण्यास फार वेळ लागतो आणि पोट व डोयाच्या ठिकाणी जडत्व, खोकला, श्वास ( दमा ), तोंडाला पाणी सुटणे, वांती व सर्व अवयव गळून गेल्यासारखे वाटणे असे उपद्रव संभवतात.
या तीन प्रकारांव्यतिरिक्त जठराग्नीची आणखी एक स्थिती संभवते ती समाग्नीची होय व हीच स्थिती वरील तिन्हींपेक्षा श्रेष्ठ होय. कारण या समाग्नी असलेल्या व्यक्तीने योग्य काळी व योग्य प्रमाणात सेवन केलेले अन्न चांगले पचते. तीनही दोषांचे साम्य असणाऱ्या व्यक्तींचीच अशी स्थिती संभवते. ‘दोषानभिपन्न’ असे ह्या समाग्नीला दुसरे शास्त्रीय नाव असून वर सांगितलेल्या तीन प्रकारच्या अग्नींना ‘विक्रियापन्न’ असे म्हटले आहे.
शरीरस्थ अग्नीला फुंकर घालून नित्य अस्तित्वात ठेवण्याचे कार्य प्राण, अपान आणि समान हे तीन वायू देहात करीत असतात. प्राण आणि अपान हे जठराग्नीला फुंकर घालण्याचे म्हणजे धमनाचे (फुंकणीचे) कार्य करीत असतात व समान वायू त्याला चालू ठेवतो. मात्र, हे तीनही वायू स्वस्थानी असून जर अविकृत म्हणजे दूषित झालेले नसतील तरच त्यांचे कार्य व्यवस्थित घडते.
प्राणवायूचे कार्य मुखमार्गाने अन्नाचा आत प्रवेश करविणे अशा स्वरूपाचे असून अपान वायू संपूर्ण पचन झालेल्या अन्नातील मलभागाला शरीराबाहेर घालविण्याचे कार्य करीत असतो. समान वायू हा प्राणवायूने प्रविष्ट केलेल्या अन्नाचे कोठ्यात ग्रहण, नंतर त्याचे पचन, विवेचन म्हणजे त्यातील ग्राह्य आणि त्याज्य अर्थातच सारभूत आणि किट्ट किंवा मलभूत अंशांचे पृथक्करण करून सारभूत अंशांना योग्य अशा स्थानी शरीरात पोहोचविणे आणि मलभूत अंशाला बाहेर टाकण्यासाठी मलमार्गाकडे पाठविण्याचे कार्य करीत असतो. [⟶ दोषधातुमलविज्ञान ].
एकांत हितकारक आहारद्रव्ये : जी द्रव्ये शारीर घटकांशी सहज समरस होतात ती आहारद्रव्ये एकांत ( निश्चित ) हितकारी होत. अशा द्रव्यांचे नित्यसेवनही बाधक होत नाही. पाणी, तूप, दूध व भात ही अशी द्रव्ये होत. याच्या उलट अग्नी गुणाची, क्षार किंवा विषे ही एकांत अहितकर द्रव्ये म्हटली जातील. उदा., विष ( काही द्रव्ये परस्परमिश्रणानंतर विषतुल्य परिणाम करतात. उदा., समभाग तूप आणि मध ). सगळीच द्रव्ये सर्वांना एकांत म्हणजे एकसारखी किंवा नित्य वापरण्याने हितावह असत नाहीत. उदा., जी द्रव्ये वातप्रकृती मानवांना हितावह ती पित्तप्रकृतीच्या लोकांना हितावह नसून अहितकारी होतात उदा. लसूण. या दृष्टीने शास्त्र-कारांनी सर्वसाधारण हितावह असा आहारद्रव्यांचा निर्देश केला आहे.
तांबड्या साळी, साठे साळी इ. साळींचे प्रकार गहू, जोंधळा, बाजरी, जव ही एकदल किंवा शूक धान्ये मूग, मसूर, हरभरा, तूर इ. द्विदल धान्ये मेथी, चाकवत, गिलकी, भेंडी, पडवळ इ. भाज्या तीळ, खोबरे, जवस यांसारखी तैलद्रव्ये बकरी, हरीण, डुक्कर यांसारख्या पशूंचे व कोंबडा, लावा, तित्तिरादी पक्ष्यांचे मांस गायीचे दूध, तूप इ. स्निग्ध पदार्थ लवण वर्गातील सैंधव आणि अम्ल वर्गातील डाळिंब, आवळे यांसारखी फळे ही प्रशस्त ( आरोग्यदायक ) होत.
रात्री तूप व मधातून त्रिफळाचूर्ण सेवन करणे नेत्राच्या आरोग्याला हितावह आहे.
संयोगाने विषासारखा परिणाम करणारी द्रव्ये कोहळा, आंबट फळे, लवण, कुळीथ, पेंड, दही, तेल, जलचर प्राण्यांचे मांस, तांदळाचे पीठ, वाळविलेल्या कोरड्या भाज्या, शेळी व मेंढीचे मांस, मद्य, जांभूळ, चिलीचिम नावाचा मासा, घोरपड व डुक्कर यांचे मांस यांतील कोणतेही एक, दोन वा अधिक पदार्थ परस्पर मिश्र करून किंवा दुधाशी खाऊ नयेत.
आहार समयी पावित्र्य : स्वयंपाक व भोजनाची जागा एकांत व निवांत असावी स्वच्छ असावी. स्वयंपाकाची तसेच जेवणासाठी आणि वाढण्यासाठी वापरावयाची भांडी अंतर्बाह्य स्वच्छ असावीत. स्वयंपाक करणारे व वाढणारे स्त्री-पुरुष नम्रतेने वर्तन करणारे कार्यकुशल, पवित्र आचार-विचारांचे, प्रेमळ आणि स्वच्छ राहणीचे असावेत. जेवणाऱ्यासाठी आणि त्याचबरोबर भोजनाचे ताट अथवा पान ठेवण्यासाठी उंच आसन किंवा पाट वगैरे असावे.
आहारद्रव्य संस्कार : आहार रुचिकर आणि पचन सुलभ होण्याच्या दृष्टीने त्या त्या द्रव्याला अनुसरून भाजणे, उकळणे, शिजविणे, धुणे इतर सुगंधी व पाचक द्रव्याचे मिश्रण करणे इ. संस्कार करावे लागतात.
आहारासाठी जो पदार्थ घ्यावयाचा त्याचा आहारात प्रत्यक्ष उपयोग करण्यापूर्वी संस्कार दृष्टीने अग्नीशी जितका घनिष्ट संबंध येईल तितका तो पदार्थ पचनसुलभ होतो. भाकरी, पोळी, फुलके यांना तवा, रानशेणीचा निखारा किंवा कोळशाच्या निखाऱ्यावर भाजल्याने ते पचनास अधिकाधिक हलके होतात परंतु उकडून वाफेवर शिजवलेले मोदक इ. पदार्थ किंवा उकडलेले व शिजविलेले कंद जड होतात यावरून ही कल्पना स्पष्ट होते. अग्निसंस्काराशिवाय आणखीही काही निराळे संस्कार खाद्यपेय पदार्थांवर करून आपण वापरीत असतो. परिणामाच्या दृष्टीने त्यांची काही उदाहरणे अशी ः (१) तांदूळ चांगले धुवून त्यात योग्य तेवढे पाणी घालून शिजविले व शिजताना येणारे पाणी काढून घेतले की तांदळाचा गुरू गुण जाऊन ते लघू होतात. (२) दही शोथ ( सूज ) उत्पन्न करणारे असताही ते सायीसहित घुसळून घेतल्यास सूजनाशक होते. हा मंथन संस्काराचा परिणाम. (३) वाळा, चंदन अथवा सुगंधी फुलांनी सुगंधित केलेले पाणी अगदी थोड्या प्रमाणात सेवन करूनही आल्हाद देते व तहान शमविते, हा सुगंधी द्रव्यांचा संस्कार होय. (४) पाडास आलेला आंबा गवत किंवा धान्यराशीत ठेवून योग्य कालावधीपर्यंत झाकल्याने तो पक्व, मृदू, मधुर आणि रसाळ होतो. हा गवत आणि धान्याचा संस्कार तसाच झाडावरही कालांतराने आंबा पक्व आणि मधुर होतो हा कालसंस्कार.(५) लोखंडाच्या पात्रात पाणी किंवा दूध ठेवून सेवन करणे पांडुरोगात हितावह होतेे, हा पात्र संस्कार. यांशिवाय फोडणी, तळण, इतर पदार्थांचे मिश्रण इ. अनेक संस्कार करून खाद्यपेयद्रव्ये उपयोगात आणली जातात. कोणत्याही द्रव्यातील प्रतिकूल गुण घालवून त्यात अनुकूल गुण निर्माण करणे हाच संस्काराचा हेतू आणि अर्थ आहे.
विरुद्धाशन : परस्परविरुद्ध गुणधर्मांचे पदार्थ एकत्र करून खाणे याला विरुद्धाशन म्हणतात. ते अपायकारक असते म्हणून टाळणे इष्ट असते. त्याचे काही प्रकार खाली दिले आहेत.
संयोग विरुद्ध : गोड व आंबट अथवा थंड व उष्ण गुणधर्मांचे पदार्थ एकत्र मिश्र करून खाणे रोगकारक होते. उदा., फळे व दूध तसेच मासे आणि दूध यांचे मिश्रण खाणे मुळा, लसूण यासारखे पदार्थ खाऊन दूध पिणे, तूप व मधाचे समप्रमाण मिश्रण इ. प्रकार संयोग विरुद्ध होत. असे सेवन घडल्याने षंढता, अंधत्व, विसर्प, कुष्ठ, संग्रहणी इ. विकारांची शयता असते.
मानविरुद्ध : मध आणि पाणी किंवा मध आणि तूप समप्रमाणात मिश्र करून सेवन करणे तेल, तूप, चरबी इ. स्नेह द्रव्यांतील कोणतीही दोन स्नेहद्रव्ये किंवा मध आणि दोन स्नेह अथवा पाण्याबरोबर विशेषतः अंतरिक्षोदकाबरोबर कोणतेही दोन स्नेह समप्रमाणात मिश्र करून सेवन करणे वर्ज्य सांगितले आहे.
कर्मविरुद्ध : चातक, मोर, लावा, तितर ह्या पक्ष्यांचे अथवा घोरपडीचे मांस एरंडाच्या किंवा दारूहळदीच्या विस्तवावर किंवा एरंड तेलात शिजवून खाणे, काशाच्या भांड्यात दहा दिवस ठेवलेले शिळे तूप सेवन करणे, मधाचे सेवन उष्ण द्रव्याबरोबर ऊन करून किंवा ग्रीष्म आणि शरद यांसारख्या उष्ण ऋतूत करणे, मांस किंवा आले शिजविलेल्या भांड्यात कोकमाची, तिळाच्या चटणीबरोबर मयाळ भाजी, डुकराच्या चरबीबरोबर बगळ्याचे भाजलेले मांस नारळासह खाणे अथवा भास पक्ष्याचे मांस लोखंडी सळईच्या टोकावर टोचून आणि विस्तवावर भाजून खाणे वर्ज्य सांगितले आहे.
रस, वीर्य, विपाक विरुद्ध : मधुर आणि अम्ल हे दोन रस एकत्र मिश्र करून सेवन करणे रस आणि वीर्य या दोन्ही दृष्टीने विरुद्ध होते. मधुर आणि लवण किंवा मधुर आणि तिखट ह्या रसांचे पदार्थ एकत्र खाणे रस, वीर्य व विपाक ह्या तीनही दृष्टीने विरुद्ध होते मधुर आणि कडू हे मिश्रण रस व विपाक दृष्टीने विरुद्ध, मधुर आणि तुरट किंवा अम्ल आणि लवण हे रस दृष्ट्या, अम्ल आणि तिखट हे रस विपाक दृष्ट्या, आंबट आणि कडू किंवा अम्ल आणि तुरट हे रस, वीर्य, विपाक ह्या तीनही दृष्टीने, लवण व तिखट हे रस आणि विपाकाच्या दृष्टीने, लवण आणि कडू किंवा लवण आणि तुरट हे सुद्धा रस, वीर्य, विपाक अशा तीनही दृष्टीने, तिखट आणि कडू हे रस व वीर्याच्या आणि तिखट- तुरट किंवा कडू -तुरट हे मिश्रण रस दृष्ट्या विरुद्ध होते.
स्वतःच्या मनावर ताबा नसणारा मनुष्य अशा कोणत्याही प्रकारे मिश्र आहार सेवन करील, तर शास्त्रीय दृष्ट्या विरुद्ध व परिणामी एखादा रोग, एका किंवा अनेक इंद्रियांच्या कार्यशक्तीचा नाश किंबहुना मृत्यूलाही तो कारणीभूत ठरू शकतो.
रोगोत्पत्तीचे आणखी एक कारण : सेवन केलेले जे द्रव्य शरीरात पोहोचून दोष प्रकोप करील परंतु त्या प्रकुपित दोषांना शरीरातून ऊर्ध्व किंवा अधोमार्गाने बाहेर घालविणार नाही, तर असे ते द्रव्यही रोगोत्पादक होऊ शकेल. उदा., वांती व्हावी ह्या उद्देशाने गेळफळ किंवा विरेचनाकरिता निशोत्तर ही द्रव्ये दिल्यावर जर वांती किंवा विरेचन झालेच नाही, तर औषधी द्रव्यांचा हीनयोग झाल्यामुळे कुपित दोष आतच राहून निराळाच दुष्परिणाम रोगरूपाने घडल्यावाचून राहणार नाही.
अशा विरुद्धाशनामुळे रोगोत्पत्ती झाल्यास त्या रोगाचे निरसन करण्यासाठी वमन किंवा विरेचन देणे अथवा शमन औषध द्यावे लागते.केव्हा केव्हा हिताहारशमनानेही उपशम करता येतो. [⟶आतुरचिकिर्त्सो].
आहार परिणमन : मऊ पदार्थ खाणे, द्रव पदार्थ पिणे, अर्धद्रव पदार्थ चाटणे व कडक पदार्थ चावून खाणे अशा चार प्रकारच्या आहाराला अनुक्रमे अशित, पीत, लीढ आणि खादित अशा संज्ञा आहेत. हा चतुर्विध आहार जठराग्नीत पोहोचतो, जठराग्नीद्वारे त्यावर पचनसंस्कार होतात, पुढे निर्माण होणाऱ्या रसरक्तादी धातूंचे अपक्व घटक त्यात असतात. नंतर अधिक पचन होऊन क्रमशः त्या धातूंची निर्मिती होत जाऊन शरीर बल वर्णयुक्त होऊन आयुष्यवर्धन होत असते. हे सर्वही होत असता आहाराचा प्रसादभूत म्हणजे शरीरपोषणास आवश्यक असा एक आणि अनावश्यक म्हणून त्याज्य असा मलरूप भाग वेगळा होत असतो. यांपैकी सार भागापासून धातू घटक, ओज, पंचेद्रिय द्रव्ये, शरीरसंधी, बंध आणि पिच्छादी अवयव यांचे पोषक घटक होतात आणि किट्ट किंवा मलरूप भागापासून स्वेद, मूत्र, पुरीष ( विष्ठा ), मलरूप वात, पित्त, कफ कान, डोळे, नाक, तोंड, केसांची मुळे व जननेंद्रिय यांचा मळ, डोयाचे केस, श्मश्रू म्हणजे दाढी व चेहऱ्यावरील केस आणि लोम म्हणजे त्वचेवरील सूक्ष्म लव तसेच नखे इ. वाढतात, अनावश्यक मलांना त्या त्या इंद्रियांद्वारे बाहेर टाकले जाते. हे सर्वही प्रसादरूप आणि किट्ट किंवा मलस्वरूप घटक वय आणि शरीराच्या वाढीबरोबर योग्य प्रमाणात देहात राहून सर्व धातूंचे साम्य राखले जाते. याचा सरळ अर्थ असा की, योग्य अशा चतुर्विध आहारामुळेच शारीरस्वास्थ्य टिकते आणि आहाराच्या अयोग्य सेवन प्रकारामुळे रोगोत्पत्ती होते.
आहार सेवन विशेष विधी : (१) भोजन नित्य ताजे व ऊन असावे. (२) आहारात मधुरादी सहाही रसांचा समावेश ऋतुमानानुसार आणि स्वतःच्या प्रकृतीला अनुसरून त्या त्या रसाच्या न्यूनाधियाने करावा. मधुर रस मुख्य असावा. (३) भोजनास बसण्यापूर्वी घरातील बाल, वृद्ध, गुरुजन, आश्रित माणसे व पाळलेले पशुपक्षी यांना खानपान देऊन तृप्त करावे. (४) अन्न अतिथंड, शिळे, पुन्हा ऊन केलेले नसावे. (५) बाजारात विक्रीस असलेले किंवा अन्नसत्र इ. ठिकाणाचे अन्न सेवन करू नये.(६) भोजन अत्यंत घाईने किंवा फारच संथपणे करू नये. (७) जेवताना सर्व लक्ष जेवणाकडेच असावे. तसे ते नसेल तर अन्न नीट पचत नाही व रोग होतात. (८) जेवणात दही रात्री घेऊ नये. मुगाचे कढण, मध, साखर, आवळकाठी यांसारखे पदार्थ मिश्र करूनच दही सेवन करावे. दह्याचे नित्य सेवन व अधमुरे दही खाणे त्रासदायक व व्याधिकारक आहे. (९) भोजनातील आंबट पदार्थ मातीच्या अथवा काचेच्या पात्रात किंवा दगडी पात्रात घ्यावे. पिण्याचे पाणी व दूध यांसाठी तांब्याचे भांडे वापरणे चांगले.
पेयद्रव्ये : पाणी : भोजनात दूध, ताक, कढी, सार, फळांचे रस, मांसरस इ. पदार्थ पातळ असतात, त्यामुळे पाणी कमी प्यावे किंवा मुळीच न घेतले तरी भागू शकेल परंतु हवेतील उष्णता, खाद्यपेय पदार्थांचा तिखट-पणा, रुक्ष किंवा नावडते पदार्थ खाताना पाणी अधिक घ्यावेच लागते. तथापि, एकंदरीत जेवतानाच थोडे थोडे पाणी मधूनमधून जरूरीप्रमाणे पिणे हितावह असते. जेवणाच्या आधी पाणी पिणे कृशता आणणारे असते, तर जेवणाच्या शेवटी पाणी पिणे स्थूलता वाढविते, म्हणून प्रकृती व काळाचा विचार करून पाणी गरजेनुसार वर सांगितल्याप्रमाणे जेवण चालू असताच घेणे बरे. त्या योगे शरीर सम राहते. पावसाळ्यासारख्या दिवसांत अथवा पाणी गढूळ, दूषित असेल तर ते खूप उकळून, गाळून, थंड करून घेणे चांगले. मिळेल तर नारळाचे पाणी घेणे चांगले ( अधिक विस्तार पुढे ‘ अनुपान ’ आणि ‘ जनपदोध्वंस ’ या प्रकरणांत आहे ). पाणी हे जीवन असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते संपूर्ण बंद करणे श्रेयस्कर नसते, म्हणून विशिष्ट प्रसंगी योग्य संस्कारयुक्त असे पाणी घ्यावे.
दूध : गाय, शेळी अथवा म्हैस ह्या तिन्हीं पैकीच कोणत्या तरी प्राण्याचे दूध सर्वसामान्यपणे वापरण्यात येते. यांशिवाय मेंढी, घोडी, गाढवी, सांडणी व हत्तीणीच्या दुधाचेही गुणधर्म शास्त्रात वर्णिले आहेत, परंतु त्यांचा उपयोग अगदी अपवाद स्वरूपात किंवा औषधी स्वरूपातच केला जातो.
सकाळचे दूध कफकर, पचायला जड, अवष्टंभक आणि थंड असते. याचे कारण संपूर्ण रात्रीचे शीत असे सोमगुण त्यात वाढतात, शिवाय गुरांना व्यायामही नसतो. ती स्वस्थ बसून किंवा उभ्यानेही आराम घेत असतात हेच होय. परंतु संपूर्ण दिवसभर सूर्यप्रकाश मिळतो, रानाची मोकळी हवा मिळते, चरताना ताजे खाद्य मिळते व रानात हिंडण्याच्या निमित्ताने व्यायामही घडतो यामुळे अपराण्ह काळी म्हणजे तिन्ही सांजाच्या वेळी काढलेले दूध हे वाताचे अनुलोमक, थकवा घालविणारे आणि डोळ्यांना हितावह होते. त्यातल्या त्यात धारोष्ण दूध हे अमृतोपम असते. सेवनीय म्हणून ते अधिक चांगले मानले जाते. दूध पुष्कळसे उकळून आटवून घेणे हे पचनास जड व थंड असते. म्हणून ज्यांची पचनक्रिया चांगली आहे त्यांच्या देहाची ते पुष्टी करते.
सामान्यतः गायीचे दूध इतर सर्व प्राण्यांच्या दुधापेक्षा श्रेष्ठ व शक्ति-वर्धक आहे. बकरीचेही दूध तसेच असून क्षयरोग्यांना ते विशेष हितावह असते. याचे कारण बकऱ्यांचा देह लहान, त्यांचे खाणे कडू, तिखट इ. सर्व रसांच्या वनस्पतींचे असते त्या पाणी कमी पितात आणि चरताना हिंडण्याचा, उड्या मारण्याचा व्यायामही त्यांना भरपूर घडत असतो हे होय. बकरीचे दूध सर्व व्याधिनाशक असते अशी त्याची प्रशंसा आहे. म्हशीचे दूध गाय आणि शेळी या दोघांच्याही दुधाच्या सर्वतोपरी उलट गुणधर्मांचे असते. [⟶पथ्यापथ्य].
ताक : दह्यात अर्धे पाणी मिसळून घुसळल्यावर आलेले लोणी काढून घेतलेले असे फार घट्ट किंवा पातळ नसलेले, मधुर, अम्ल व तुरट रसाचे ताक असावे. लोणी मुळीच न काढलेले, अर्धवट लोणी काढलेले आणि संपूर्ण लोणी काढलेले असे ताकाचे तीन प्रकार संभवतात. तीनही रसयुक्त ताक सर्व प्रकृतीत हितावह असते.
ताक सेवनाचे नियम : (१) थंडीचे दिवस व अग्निमांद्य असता ताक अवश्य घ्यावे. (२) वात प्रकृतीच्या लोकांनी आंबट ताक सैंधव घालून घ्यावे. (३) पित्त प्रकृतीच्या लोकांनी ते साखर घालून घ्यावे. (४) कफ प्रकृतीच्या लोकांनी सुंठ, मिरे, पिंपळीपूड घालून घ्यावे. (५) परंतु अशा मिश्रणाचे ताक उन्हाळ्यात घेऊ नये. (६) ताक फार घट्ट किंवा अगदीच पातळ असू नये.(७) दाह वाटत असता ताक घेणे योग्य नाही.
अनुपान : खाद्यपदार्थाबरोबर अथवा ते खाल्यानंतर त्या खाद्य-पदार्थाचे परमाणू विरळ व्हावेत, मऊ व्हावेत व सहज पचावेत म्हणून जो द्रव पदार्थ सेवन करावयाचा त्याला अनुपान असे म्हणतात. उदा., (१) जव, गहू इत्यादींपासून बनविलेले व विदाही पदार्थ खाताना थंड पाणी, (२) पिष्टमय व दुर्जर पदार्थांना ऊन पाणी, (३) साठे साळीसाठी दूध, (४) मांसयुक्त पदार्थांना मद्य, (५) स्थूल माणसांनी मध, पाणी सेवन करणे ही सर्व अनुपाने होत. परंतु गवई, वक्ते, घोकून पाठांतर करणारे विद्यार्थी यांनी ते ते कार्य चालू असता, संपल्याबरोबर व जेवणानंतर पाणी पिऊ नये. जेवणानंतर घेतलेले पाणी आहारातील स्नेह नष्ट करून रोगोत्पत्तीस कारणीभूत होते. अशा लोकांनी मधुर व स्निग्ध द्रव्यांनी सिद्ध केलेले कोमट दूध घेणे हितावह असते. माठातील पाणी अथवा बर्फयुक्त खाद्यपेय पदार्थही अग्निनाश करून कफाच्या विकृतीला पोषक होत असल्याने शयतो टाळावे.
अपवाद : इतके सगळे असले तरी ज्यांचे नैसर्गिक बळ चांगले आहे, जे सपाटून कामही करतात, ज्यांचा जठराग्नी वेळी-अवेळी व जाडे भरडेही अन्न सहज पचविण्याइतका प्रखर आहे तसेच ज्यांचे पोट मोठे आहे अशा लोकांनी खानपानाचे हे नियम क्वचित मोडले तरी त्यांच्या स्वास्थ्याला ते बाधक होत नाहीत. [⟶ आहार व आहारशास्त्र आहार व औषधि].
शरीर प्रसाधन व संरक्षण : प्रसाधन शब्दाचा अर्थ शृंगारणे असा आहे. स्वतःच्या मनाच्या प्रसन्नतेसाठी आणि संबंधित जनांच्याही मनात चांगली भावना उत्पन्न व्हावी, तिरस्कार उत्पन्न होऊ नये या दृष्टीने वस्त्रालंकारादींनी शरीर सुशोभित करावयाचे असते. स्वास्थ्याशीही त्याचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून त्याचे काही प्रकार शास्त्रात त्यापासून होणाऱ्या लाभासह वर्णिले आहेत. त्याचप्रमाणे घरात व घराबाहेरही शरीर सुरक्षित राहावे म्हणूनही काही प्रसाधन करावयाचे असते. यातील काही प्रकारांचे वर्णन थोडयात खाली दिले आहे.
वस्त्रधारण : रक्षोघ्न म्हणून वस्त्राचा सर्वप्रथम गुण सुश्रुताने वर्णिला आहे. त्याचा अर्थ सूक्ष्मजीव सृष्टीचे घातक आक्रमण त्याचप्रमाणे भूतप्रेतादी पीडा न व्हावी हा गुण वस्त्रांनी शरीर झाकण्यात आहे. ही वस्त्रे नित्य स्वच्छ, त्या त्या ऋतूच्या हवामानाचे दुष्परिणाम टाळणारी, सभ्यतेला साजेशी असावीत. त्यात भडकपणा नसावा आणि गरजेपेक्षा ती शरीरावर अधिक वापरूही नयेत, असे करण्यात मनाची प्रसन्नता राहून वर उल्लेखिलेले उद्देश साधतात. [⟶ वस्त्रे ].
गंध व पुष्पमाला धारण : चंदन, केशर, कस्तुरी इ. सुगंधित असे गंध कपाळी लावणे तसेच अत्तर इ. सुगंधी पदार्थ, सुगंधी पुष्पमाला हुंगण्या-साठी पुष्पांचे गुच्छ धारण करणे, आयुष्याला हितकर, तुष्टी व पुष्टिदायक, इतरांच्या मनात आदर निर्माण व्हावा, जंतूंचा संसर्ग बाधू नये या दृष्टीने हितावह असते आणि शरीर व मनाची अवकळा घालविते.
रत्ने व अलंकार धारण : अनुकूल परिस्थिती असेल त्या प्रमाणात शरीरावर हिरे, माणिक, मोती इ. रत्ने आणि सोने, चांदी व तांबे यांपैकी कोणत्या तरी धातूंचे अलंकार अंगावर धारण करणे हे सुद्धा शुभ, जंतुनाशक, मनाला प्रसन्नता देणारे, प्रीतिसंपादनास पोषक व ओजोवर्धक आहे. [⟶ जडजवाहिर रत्ने ].
नख व केशप्रसाधन : नखे आणि केस सामान्यतः पाच दिवसांनी कापून स्वच्छ ठेवावीत. स्त्रियांनी केसाची स्वच्छता राखणे, त्यांची निरनिराळ्या प्रकारे आकर्षक रचना करून ते बांधणे व पुष्पमाला-दींनी शृंगारणे आवश्यक आहे, असा अथर्ववेदा त उल्लेख आहे. [⟶ केशभूषा सौंदर्यप्रसाधने ].
पादत्राण : कोठेही जाताना पायांना सुखावह असे पादत्राण वापरावे. पादत्राणे वापरण्याने काटे, खडे इ. बोचून त्रास होणे टळते, शिवाय ते डोळ्यांना हितावह पायांना भेगा पडणे, फुटणे व अन्य रोग यांपासून संरक्षण मिळते. पादत्राणाशिवाय वावरणाऱ्याला आरोग्य व आयुष्याची हानी आणि नेत्ररोगाची पीडा होण्याची भीती असते. [⟶ पादत्राणे पादभूषणे ].
छत्रधारण : छत्र म्हणजे छत्री. वृष्टी, वायू, धूळ, ऊन्ह यांपासून संरक्षण आणि शरीराचा वर्ण, दृष्टी ओजरक्षण करणारे आहे. [⟶ छत्री].
दंडधारण : दंड म्हणजे काठी. आपणावर चाल करून येणारी कुत्रा, बैल इ. जनावरे, विंचू , साप इ. सरपटणारे प्राणी तसेच आपला शत्रू यांच्यापासून रक्षण व त्यांचा प्रतिकार करणे थकल्यामुळे किंवा उंचसखल जागेवरून जाताना शरीराचा तोल सांभाळणे म्हातारपणी शरीराला आधार म्हणून काठी हाती असणे उपयुक्त आहे. शिवाय ती हाती असल्याने धैर्य, उत्साह, स्थैर्य व आत्मविश्वास निर्माण होतो.
शिरस्त्राण : डोयाला संरक्षण म्हणून जे वापरावयाचे ते शिरस्त्राण होय. पागोटे, फेटा, टोपी इ. स्वरूपाचे शिरस्त्राण असते. ऊन्ह, वारा व धूळ यांच्यापासून डोयाचे संरक्षण, शिवाय वरून एखादा पदार्थ पडून आघात होणे अथवा घाण इ. पडून डोयास त्रास होऊ नये म्हणून उपयुक्त. [⟶ शिरस्त्राण ].
देवतादी पूजन : देवतांचे पूजन, अतिथींचा अन्नवस्त्रादींनी सन्मान व सत्कार, विद्वानांचे व वृद्धांचे पूजन आणि सन्मान, सत्कार ह्या गोष्टी इहलोकी आयुष्यात यश देणाऱ्या, धनधान्य समृद्धीकर असून मृत्यूनंतर स्वर्गलोकी सद्गती प्राप्त करून देणाऱ्या आहेत असे मानले जाते.
व्यवसाय : धर्माने ज्याचा निषेध केला नाही, असा व्यवसाय करून उपजीविका करावी. चित्त शांत ठेवावे. नित्य शिकण्याची आवड ठेवून मिळेल तो सद्गुण स्वीकारण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सुख व समाधान प्राप्त होते.
निद्राविचार : स्वास्थ्यासाठी आहाराप्रमाणेच निद्रेचीही आवश्यकता असते. आयुष्यातील सुख-दुःख, पुष्टी, सबलत्व-अबलत्व, पौरुषत्व--नपुंसकत्व, ज्ञान-अज्ञान, जगणे-मरणे ह्या गोष्टी निद्रेच्या आधीन आहेत.
निद्रा कशी येते ? कफदोष आणि तमोगुण हे निद्राजनक आहेत. शारीर व मानसिक श्रमांनी मन आणि इंद्रिये थकतात आणि क्रमशः आपापले इंद्रियार्थ ( विषय ) इंद्रियाधिष्ठाने व इंद्रिय प्राणवह स्रोतसे यांपासून परावृत्त होऊन स्वस्थानी येतात आणि झोप लागते.
शय्या : झोपण्यासाठी खाट अथवा पलंगाची उंची गुडघ्याइतकी व रुंदीही पुरेशी तसेच त्यांवर पुरेशी लांब, रुंद व मऊ गादी, स्वच्छ चादर, उशी आणि पांघरण्यासाठी ऋतुमानाला अनुसरून सुती, रेशमी वा लोकरी चादर, शाल, कांबळे इ. असावे.
खाट किंवा पलंग वात प्रकृतीसाठी बेलाच्या, पित्त प्रकृतीसाठी वडाच्या आणि कफ प्रकृतीसाठी टेंभुर्णी किंवा बिब्याच्या लाकडांनी बनविणे चांगले. झोपण्याची जागा एकांत, पुरेशा हवा-प्रकाशाने युक्त, स्वच्छ आणि समपातळीची असावी. झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके असावे. गुरुजन किंवा वडील माणसांकडे पाय करून झोपू नये व झोपताना देव चिंतन करावे, वाईट गोष्टींचे चिंतन करू नये.
निद्राप्रमाण : सामान्यतः सर्वसाधारण आणि स्वस्थ प्रकृतीच्या लोकांना यामद्वय म्हणजे सहा ते आठ तास झोप आवश्यक असते. बाल, वृद्ध, अधिक कष्टाची कामे करणारे आणि रोगी यांना यापेक्षा अधिक झोपेची आवश्यकता असते. स्वस्थ प्रकृतीच्या लोकांनी झोप रात्रीच घ्यावी. इतरांनी रात्री तशीच दिवसाही झोप घेण्यास अडचण नाही. अतिनिद्रा किंवा जागरण वर्ज्य करून झोप बेताचीच घ्यावी अशी शास्त्राज्ञा आहे.
दिवसा झोप : स्वस्थांनी दिवसा झोप घेतल्यास कफ व पित्त हे दोष वाढतात परंतु जागरण झाले असल्यास दुसऱ्या दिवशी जागरणाच्या काळाच्या निम्मे इतका वेळ जेवणापूर्वीच दिवसा झोप घेतल्यास त्रास होत नाही. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा असता दिवसा झोप घेणे बाधत नाही. विशेषतः अशी झोपसुद्धा पडून न घेता बसून घ्यावी. गायक, अध्ययन करणारे, मद्यपी, ओझी वाहणारे किंवा अधिक कष्टाची कामे करणारे, पायी प्रवास करणारे, स्त्री सेवनामुळे थकलेले, कृश झालेले असताना तसेच क्रोध, शोक, भीती यांमुळे मानसिक ग्लानी आली असल्यास दिवसा झोप घेणे बाधत नाही. स्वस्थांनी तर रात्री जागरणही करू नये. कारण त्या जागरणाने शरीरात रुक्षता वाढते. वर सांगितल्या-प्रमाणे बसून झोप घेणे याला आसीन प्रचलायित म्हणतात.
निद्रानाशकर आहार-विहार : वमन, विरेचन, उपवास ह्या शारीरिक कारणांनी वात वाढल्यामुळे तसेच भीती, चिंता व क्रोध ह्या मानसिक कारणांनी चित्तक्षोभ होऊन निद्रानाश होतो. शय्या सुखावह नसली तरीही झोप येत नाही. सत्त्वगुणाधिय असलेले व योगाभ्यासी लोकांनी तमोगुण जिंकलेला असतो, म्हणून त्यांनाही झोप फारशी लागत नाही तरी सुद्धा त्यामुळे त्यांना पीडा होत नाही, म्हणून त्यांना निद्रानाश हा विकार आहे असे म्हणता येत नाही.
सुखनिद्राकर आहार-विहार : दूध, उसाचा रस आणि यांपासून केलेले पदार्थ, मद्य अशा वस्तूंचे सेवन, अभ्यंग, डोयावर तेलमर्दन, कानात तेल घालणे, अंग रगडून घेणे, स्त्रियांचे आलिंगन आणि मनाला प्रसन्नता आणणारे विषय हे झोप आणण्यास मदत करतात.
मांसाहारी लोकांनी निद्रानाश झाल्यास बिळात राहणाऱ्या साळ,घोरपड , ससा, अजगर, साप, उंदीर, मुंगूस अशा प्राण्यांच्या मांसाचा रस किंवा कोंबडा, बदक, मोर, तितर, कबूतर यांसारख्या विष्किर म्हणजे पायांनी उचकटून वेचून खाणाऱ्या पक्ष्यांच्या मांसाचा रस घ्यावा.
झोप घेणे व जागरण करणे ह्यांस अपवाद : दिवसा वा रात्री झोप घेणे हे ज्यांनी आत्मसात केले म्हणजे सवयीने पचनी पाडले आहे, त्याचप्रमाणे अनेक कारणास्तव ज्यांना जागरण घडणे अपरिहार्य आहे त्यांनी दिवसा झोप घेतलीच पाहिजे आणि जे दिवसा झोप घेत असतील त्यांनी रात्री जागणे हेच उचित होय. असे केल्याने दिवसा झोपण्याचे वा रात्री जागण्याचे दोष बाधक होत नाहीत. [⟶ झोप].
ब्रह्मचर्य : आहार आणि निद्रा यांच्याप्रमाणेच स्वास्थ्याला ब्रह्मचर्य पालन अत्यावश्यक आहे. प्रायः व्यवहारात ब्रह्मचर्य पालन म्हणजे स्त्री- समागमापासून अलिप्त असा केला जातो. तथापि, शास्त्रीय दृष्ट्या सर्व इंद्रियांचा संयम म्हणजे त्या त्या इंद्रियांना आपापले विषय सेवन करण्याच्या अतिरिक्त प्रवृत्तीपासून अलिप्त ठेवणे असा अर्थ आहे व तसा संयम घडल्यावाचून ब्रह्मप्राप्ती होणे म्हणजे आत्मज्ञान होणार नाही. येथे मात्र व्यवहार दृष्ट्या जो स्त्रीसमागम असा मर्यादित अर्थ आहे त्यासंबंधीच विचार करावयाचा आहे. आहार आणि निद्रा यांप्रमाणेच ब्रह्मचर्याचेसुद्धा युक्तीने पालन झाले म्हणजे शरीराचे बल, वर्ण, सुख आणि दीर्घायुष्य यांचा लाभ होतो. स्त्रीच्या ऋतुकाळातील सोळा दिवसांपैकी पहिले ४ दिवस सोडून आणि काही तिथी व पर्वकालाचे दिवस वर्ज्य करून स्त्रीसमागम करणे हे ब्रह्मचर्यच होय. ब्रह्मचर्यपालन अथवा अब्रह्मचर्य यांचा हाच अर्थ होय. [⟶ ब्रह्मचर्य ].
व्यवाय योग्य वय : व्यवाय म्हणजेच स्त्रीसमागम किंवा मैथुनक्रिया. वयाच्या २०—२५ व्या वर्षी पुरुष आणि १६ व्या वर्षानंतर स्त्री मैथुन-क्रियेस योग्य ठरतात आणि ही पात्रता पुरुषाची ७० व्या आणि स्त्रीची ५० व्या वर्षापर्यंत असू शकते.
व्यवाय विषयक नियम : (१) हेमंत व शिशिर ऋतू ह्या चार महिन्यांत स्वस्थ प्रकृतीच्या मानवांचे नैसर्गिक बलही चांगले असते.तेव्हा वाजीकरण योग [⟶ वयःस्थापन वाजीकरण ] म्हणजे मैथुन-शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे व पौष्टिक आहारांचे सेवन करून यथेष्ट काम सेवन करावे. (२) वसंत आणि शरद ऋतूत तशी स्थिती नसली तरी नैसर्गिक हवामान प्रसन्नतेचे असते. या दृष्टीने ह्या चार महिन्यात व्यवाय ३-३ दिवसांनी करण्यास अडचण नाही. (३) परंतु ग्रीष्म आणि वर्षा ऋतूंचे ५ महिने नैसर्गिक बल तर कमी असतेच परंतु वायुमानही उष्ण असल्यामुळे व्यवाय कर्मात १५-१५ दिवसांचे अंतर ठेवणे उचित असते. (४) शुभ्रवस्त्र परिधान, सुगंधी पदार्थ व माळांचे धारण आणि स्त्री-पुरुषांची मने परस्पर अनुकूल व प्रसन्न असणे इष्ट असते. (५) समागमाच्या दिवशी पुरुषाने दूध, तूप युक्त आहार आणि मधुर व स्निग्ध औषधिसिद्ध दूधतुपाचे सेवन करावे आणि स्त्रीने तेल व उडीद युक्त आहार व उपचार घ्यावेत. (६) निरोगी शरीर प्रकृती : मनाची प्रसन्नता, सुगंधी द्रव्ये, वस्त्रे, माळांचा उपयोग, सुखावह शय्या आणि प्रमाणबद्ध आहार ह्या सर्व गोष्टी मैथुनापूर्वी अनुकूल असणे सुपरिणामकारी असते. (७) प्रत्यक्ष मैथुन क्रियेत स्त्री-पुरुषांनी आपली शरीरे समस्थितीत ठेवावी. (८) भूक, तहान लागली असता, जेवण नुकतेच झाले असता अथवा मल-मूत्रादी वेग आले असता मैथुन-क्रियेस प्रवृत्त होणे इष्ट नाही. (९) व्यवायानंतर स्नान, आटीव किंवा साखरयुक्त दूध, उसाच्या रसाचे पदार्थ, थंड वारा, मांसरस सेवन करणे आणि झोप घेणे ह्या गोष्टी हितावह होतात. [⟶लैंगिक वर्तन लैंगिक शिक्षण ].
नपुंसकत्व : प्रिय असलेल्या व आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या स्त्रीशी समागम करण्याचे विचार मनात येतात परंतु जननेंद्रियाच्या शैथिल्यामुळे जो पुरुष स्त्रीसमागम करू शकत नाही, कदाचित समागम घडलाच तर ज्याची श्वासोच्छ्वास क्रिया वाढते, सगळ्या अंगाला घाम सुटतो व ती क्रिया व्यर्थ ठरते आणि ज्याचे शुक्र म्हणजे वीर्य बीजयुक्त नसते तो पुरुष नपुंसक समजावा. ह्या अवस्थेलाच लैब्य असेही शास्त्रीय परिभाषेत म्हटले जाते.
नपुंसकत्वाचे प्रकार : नपुंसकत्वाचे बरेच प्रकार शास्त्रातून वर्णिले आहेत त्यांपैकी काहींचा उल्लेख उदाहरणासाठी खाली केलेला आहे.
बीजोपघातज क्लैब्य : शुक्र क्षीण व गुणरहित असते म्हणून शोक, चिंता वगैरे मानसिक दोषांमुळे, अतिरिक्त विषय सेवनाने आणि अतिशीत व रुक्ष भोजनामुळे शुक्रात दुष्टी झाली आहे आणि मैथुन सामर्थ्य नष्ट झाले आहे अशा पुरुषाच्या नपुंसकावस्थेला हे नाव आहे. [⟶ वीर्य शुक्राणु ].
ध्वजभगसंभव क्लैब्य : हे लैब्य लवणक्षारादी भोजन, अत्यल्पवयी स्त्रीशी गमन, जननेंद्रियावर शस्त्र, दात, नख, काष्ठ इत्यादींचा आघात, वीर्यस्खलन होत असता वीर्याच्या गतीचा अवरोध यामुळे जननेंद्रिय शिथिल झाल्याने येते.
जरासंभव क्लैब्य : वृद्धावस्थेस पोचलेल्या व्यक्तीचे सप्तधातू क्षीण होत जाऊन बल, वीर्य व इंद्रियेही दुर्बल झाल्याने हा प्रकार संभवतो.
शुक्रक्षयसंभव क्लैब्य : शोक, क्रोध, भय, ईर्षा इ. विकारांमुळे, रुक्ष आणि न मानवणारा आहार सेवन केल्याने व अति स्त्रीसमागमामुळे क्रमशः रसादी धातू क्षीण होत होत अंगी शुक्राचाही क्षय झाल्याने हा प्रकार संभवतो.
याशिवाय द्विरेता, पवनेंद्रिय इ. प्रकार चरकाने व आसेय, सौगंधिक इ. प्रकार सुश्रुताने वर्णन करून त्यांची लक्षणेही सांगितली आहेत.
मानस क्लैब्य : स्त्रीसमागमाची प्रबल इच्छा असूनही स्त्रीकडून अनुकूल असे हावभाव व साथ न घडली किंवा स्त्री नावडती वा द्वेष्टी असली तर मनोभंग होऊन लैब्य येते, तोही एक विशिष्ट असा नपुंसक प्रकार आहे. [⟶ शरीर व मन ].
नपुंसकतेवर सामान्य उपचार : मनाला प्रिय असे खानपान, प्रिय गोष्टींचे स्मरण, प्रिय वस्तूंचा स्पर्श, नवयौवना प्रिय स्त्रीचा सहवास, तांबूल सेवन, मद्य-अत्तरे-पुष्पमाला धारण, मनोहर उद्यानात संचार, मनाला त्रास न होऊ देणे, मधुर रसात्मक स्निग्ध व दुधातुपाचे सिद्ध योग, वृष्यवटिका इ. आणि शास्त्रोक्त विधीने रसायन प्रयोग करावे.
वृष्यय योग : मधुर, स्निग्ध, जीवनशक्तीला हितावह, पौष्टिक, पचायला हलके आणि मनाला प्रसन्नकर व हर्षोत्पादक द्रव्यसेवन आणि अशाच प्रसंगांचे आयोजन ह्या सर्व प्रक्रियांना ‘ वृष्य ’ म्हटले आहे.
वृद्धापकाळ, चिंता, परिश्रम, लंघन, अतिस्त्रीसेवन, भीती, शोक इत्यादींमुळे ज्यांचे शुक्र क्षीण झाले आहे, अशांच्या शरीरमनोबल-वृद्धीला वृष्य योग उपयुक्त होत. परंतु मनावर ताबा न ठेवू शकणारे, आळशी, व्यसनी, दरिद्री अशा व्यक्तींना यथायोग्य वृष्य योग सेवन शय होत नाही आणि मानसिक दोषांमुळे त्यांचा योग्य तो परिणामही होत नाही. शुक्राची उत्पत्ती व पुष्टी करून संबंधित अवयवांना पर्याप्त बल प्राप्त व्हावे म्हणूनच वृष्य योग सेवन करावयाचे असतात. [⟶ वंध्यत्व ].
ऋतुचर्या : हवामानानुसार संपूर्ण वर्षाचे प्रत्येकी दोन महिन्यांप्रमाणे सहा विभाग संभवितात. त्या प्रत्येक विभागाला ऋतू म्हटले आहे.
ऋतूंची गणना व नावे : (१) शिशिर ( माघ-फाल्गुन ), (२) वसंत ( चैत्र-वैशाख ), (३) ग्रीष्म ( ज्येष्ठ-आषाढ ), (४) वर्षा ( श्रावण–भाद्रपद ), (५) शरद ( आश्विन-कार्तिक ) व (६) हेमंत ऋतू ( मार्गशीर्ष–पौष ). यात वसंत-ग्रीष्म ( उन्हाळा ), वर्षा-शरद ( पावसाळा ) आणि हेमंत-शिशिर ( हिवाळा ) असे तीन काळ प्रामुख्याने अनुभवास येतात.
गुणरूपाने भेद : शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ह्या ऋतूंत सूर्य उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करीत असतो. किरणांच्या प्रखरतेने वायू अत्यंत तीक्ष्ण, उष्ण आणि रुक्ष स्वभावी होतो. ह्यामुळे ह्या कालखंडात मनुष्याचे प्रतिदिनी बलहरण होत असते. म्हणून या काळाला आदानकाल म्हटले आहे. ह्या सहा महिन्यांचा कालखंड म्हणजे ‘ उत्तरायण ’ होय.
वर्षा, शरद, हेमंत हा सहा महिन्यांचा कालखंड ‘ दक्षिणायन ’ होय. ह्या काळात सूर्याची गती दक्षिणेकडे वळते व त्याच्या किरणांची प्रखरताही कमी भासते. चंद्राचे सौम्य भाव वाढतात मेघवृष्टीने व थंड वाऱ्यांनी पृथ्वीचा पृष्ठभाग शांत होतो आणि ह्यापूर्वी कमी झालेली शक्ती जणू प्रतिदिनी परत मिळते. म्हणून याला ‘ विसर्गकाल ’ म्हटले आहे.
ऋतुपरत्वे दोषसंशोधन : वसंत ऋतूत सूर्यकिरणांनी कुपित होणार्या कफाचे संशोधन वमनोत्तर करावे हा कफ ह्या पूर्वीच्या हेमंत व शिशिर ह्या थंडीच्या दिवसातच संचित झालेला असतो. ग्रीष्म ऋतूत वायू संचित होतो व तो वर्षा ऋतूत ढगांनी सूर्य झाकला जाऊन प्रकुपित होतो, त्या वायूची बस्तिकर्मोत्तर शुद्धी करणे इष्ट असते. तसेच वर्षा ऋतूत जे पित्त संचित होते ते शरद ऋतूतील प्रखर सूर्यकिरणांनी कुपित होते.त्याचे संशोधन विरेचनोत्तर झाले पाहिजे. यथाकाल ह्या मलरूप दोषांचे संशोधन झालेच पाहिजे.
शिशिर ऋतुचर्या : आदानकालातील रुक्षता सुरू झाली तरी सुद्धा थंडी फार असते म्हणून शिशिर ऋतूत यापुढे हेमंत ऋतूत जो आहार--विहार सांगावयाचा आहे त्याचेच अधिक कटाक्षाने पालन करावे. शेगड्या पेटवून अन्य प्रकारे घरात उष्णता राहील अशी व्यवस्था करून थंडीचा प्रतिकार करावा. तिखट, कडू व तुरट रसाचे, वातवर्धक, हलके व थंड खाद्यपेय वर्ज्य करावे.
वसंत ऋतुचर्या : शिशिर ऋतूतील थंडी आणि त्यावेळी केलेला जड, मधुर आणि स्निग्ध आहार यांमुळे संचित कफ प्रखर सूर्यकिरणांनी ह्या ऋतूत पातळ होतो व तो जठराग्नीला मंद करून कफरोग निर्माण करतो. म्हणून ह्या ऋतूत कफनाशक आहार-विहाराचीच योजना करावयास पाहिजे. त्या दृष्टीने वांतीच्या द्वारे ऊर्ध्व मार्गाचे शोधन करण्यासाठी तीक्ष्ण अशी वामक औषधे घ्यावीत. गहू, जव इ. धान्ये जुनी वापरावीत. मांसाहारी लोकांनी कोंबडी, बकरी इ. जांगल प्राण्यांचे मांस सळईच्या टोकावर घेऊन विस्तवावर भाजून खावे.
फळे : खिरणी, करवंद, जांभळे इ. घ्यावीत. ह्या ऋतूत पाझरणार्या कडुनिंब किंवा खैराच्या जुनाट वृक्षांच्या खोडांचा द्रव ( डिंक ) सेवन करावा. आसवारिष्टे, मध, द्राक्षे, मधपाणी यांचे मिश्रण सेवन करावे.
विहार : अभ्यंग, व्यायाम, उष्णोदक स्नान करावे. थंडी अधिक असता आरंभी अगरू, नंतर केशर व पुढे थंडी कमी होऊन उष्णता वाढेल त्याप्रमाणे चंदन व शेवटी कापूर ही द्रव्ये उटीसाठी वापरावीत. दुपारी दक्षिण दिशेचा वारा येईल अशा जागी किंवा जलाशयाच्या शेजारी अथवा वाळ्याचे पडदे वगैरे लावून थंड वाटेल अशा व्यवस्थेने बसावे. दिवसा झोप टाळावी. जडान्न, आंबट, स्निग्ध, मधुर आहार घेऊ नये.
ग्रीष्म ऋतुचर्या : सूर्यकिरणांच्या वाढत्या प्रखरतेने पृथ्वीतील द्रव आणि कफाची स्निग्धता कमी होते त्याविरुद्ध शुष्क व रुक्ष गुणांची वाढ झाल्याने वात दोषाचा ह्या ऋतूत संचय होतो व मनुष्याला शक्ती कमी कमी वाटू लागते. म्हणून ह्या ऋतूत स्निग्ध परंतु पचनास हलके व मधुररसप्रधान अन्न सेवन करावे. इतर रसाचे पदार्थ कमी घ्यावेत. द्रव आहार अधिक घ्यावा.
आहार : पांढर्याशुभ्र तांदळाचा भात, दूध, तूप, साखर, गव्हाची खीर, शेवया, थोड्या प्रमाणात शिरा, श्रीखंड, आंब्याचा रस अथवा त्यात तीळ, सुंठ, तूप घालून केलेल्या वड्या ( खांडव ), तांदळाची धिरडी व जांगल देशातील प्राण्यांचे मांस घ्यावे.
दुपारच्या वेळी आंब्याचे पन्हे, नारळाचे पाणी इ. घ्यावे. वाळा, मोगरा, चमेली इत्यादींनी सुगंधित केलेले थंडगार पाणी प्यावे.
विहार : भोजनोत्तर दिवसा झोप आवश्य घ्यावी. खिडया दरवाजां-वर वाळ्याचे पडदे पाणी शिंपून ओले ठेवावे. वाळ्याच्या पंख्याने वारा घ्यावा. शय त्यांनी गळ्यात मोत्याचा कंठा घालावा. सुगंधी पुष्पहार घालावेत. फुले हुंगावी, चंदन, वाळा, कापूर अशा थंड द्रव्यांची उटी लावावी. द्राक्षाचे वेल अथवा जाईजुईचे मांडव घातलेल्या बागेत वा परसात बसावे. उकळून चांदण्यात थंड केलेले दूध साखर घालून प्यावे. चंद्रप्रकाशात बसून गप्पागोष्टीत मन रमवावे. मद्यपान, व्यायाम व अतिश्रम वर्ज्य करावेत.
वर्षा ऋतुचर्या : मेघाच्छादित आकाश, वृष्टी, तुषारयुक्त थंड वारे आणि पूर्वऋतूत तापलेल्या भूपृष्ठावर पाऊस पडल्याने निघणार्या वाफा या सर्व घटनांमुळे अगोदरच मंद झालेला जठराग्नी अधिकच मंद होतो, खाद्यपेय वस्तू व वनौषधीत जलांश अधिक वाढतो. त्यांच्यामध्ये अम्लत्व येते व त्यामुळे द्रव, अम्ल इ. पित्ताचे गुण वाढून पित्ताचा संचय होतो. बहुतेक पदार्थ यामुळेच आंबतात असा हा वर्षा ऋतू असतो. यामुळे पूर्वऋतूत संचित वायू ह्या ऋतूत प्रकुपित होतो. यामुळे ह्या ऋतूत पचनविकृतीचे अनेक रोग निर्माण होतात. म्हणून अम्ल, लवण रसाचे पण पित्ताला न वाढविणारे, कडू , तिखट व अग्निदीपन करणारे, परंतु फार रुक्ष किंवा स्निग्ध नसलेले पदार्थ ह्या ऋतूत सेवन करावेत.
आहार : साळी, जव, गहू व तूर, मूग इ. जुन्या धान्यांच्या भाकरी, पोळ्या, वरण, कढणे इ. वापरावीत. त्याबरोबर जांगल देशातील प्राण्यांचे मांस घ्यावे.
विहार : मल शोधनार्थ बस्ती, मधापासून केलेले मद्य, मधयुक्त पाणी, पंचकोल चूर्ण व संचळयुक्त दह्याची निवळ, आकाशातून पडलेले परंतु जमिनीचा स्पर्श न झालेले असे धरून ठेवलेले पाणी किंवा आडाचे पाणी उकळून थंड करून घ्यावे. अगरू, वाळा, हळद, नागरमोथा इ.पदार्थांचे कोरडे चूर्ण अंगाला मर्दन करणे, सुवासिक द्रव्ये, तलम धूपित वस्त्रे, तसेच पादत्राणे वापरावीत. तुषार आणि झोत न येईल अशा जागी गच्चीवर बसावे. अजीर्ण होऊ देऊ नये, दिवसा झोप, व्यायाम व ऊन्ह वर्ज्य करावे.
शरद ऋतुचर्या : शरद ऋतूत सूर्यकिरण पुनश्च प्रखर होतात. वर्षा ऋतूच्या हवामानात थंड झालेल्या शरीराला ही अकस्मात वाढलेली उष्णता बाधक होते. पूर्वीच्या ऋतूतील संचित असे पित्त ह्या ऋतूत कुपित होऊन पित्तविकार करते. म्हणून पित्ताला जिंकण्यासाठी कडू औषधांनी सिद्ध केलेले तूप प्यावे. विरेचन घ्यावे आणि सिरावेध करून रक्त काढावे.
आहार : भूक लागल्यावर कडू , गोड व तुरट रसाचे हलके असे साळी, मूग, आवळे, पडवळ, साखरयुक्त अन्नपदार्थ, जांगल देशातील प्राण्यांचे मांस आणि मधाचे सेवन करावे.
विहार : दिवसभर सूर्यकिरणांनी संतप्त व रात्रभर तारका आणि चंद्रकिरणांनी थंड झालेले व पहाटे उगवणार्या अगस्ती तार्याच्या प्रकाश संसर्गाने निर्विष झालेले पाणी ह्या ऋतूत सर्व दोषनाशक असते. ह्या पाण्याला ‘ हंसोदक ’ असे नाव आहे. त्या पाण्याचे सेवन करावे. सुगंधी पुष्पमाला, स्वच्छ वस्त्र परिधान करणे व चांदण्यात बसणे या ऋतूत हितावह असते.
अभ्रयुक्त ऊन्ह अंगावर येऊ देऊ नये. चरबी, तेल, क्षार, दही व ते घालून केलेले पदार्थ, दिवसा झोप, पूर्व दिशेचा वारा वर्ज्य करावा. बेडूक, मासे, कासव, म्हैस अशा पाण्यात राहणार्या व अधिक पाणी लागणार्या आनूप प्राण्यांचे मांसही वर्ज्य करावे.
हेमंत ऋतुचर्या : ह्या ऋतूत कडायाच्या थंडीमुळे शरीराबाहेरील उष्णता आतच कोंडली जाते. तिचा जठराग्नीशी संयोग होऊन तो दीप्त होतो. शिवाय ह्या ऋतूत रात्र मोठी असते, यामुळे स्वस्थ आणि बलवंतांना सकाळीच भूक लागते. जडान्न किंवा प्रमाणापेक्षा थोडे अधिक अन्न पचविण्याची शक्ती जठराग्नीला येते. म्हणून बलकारक आहार-विहार ह्या ऋतूत उपयुक्त ठरतात.
आहार : गहू, तांदूळ इ. धान्ये नवीच वापरावीत. उडीद, मूगासारख्या द्विदल धान्याचाही उपयोग करावा. उसाचा रस किंवा त्यापासून झालेले गूळ, साखर अशा पदार्थांनी युक्त पक्वान्ने दूधतुपासह सेवन करावीत. सकाळीच भूक लागत असून जर ह्या ऋतूत आहार घेतला नाही, तर तीव्र जठराग्नी रसादी धातूंनाच पचवून शक्ती क्षीण करतो.
विहार : वातनाशक तेलाचे अभ्यंग, डोयावर तैल मर्दन, त्वचेच्या ठिकाणी उष्णता यावी म्हणून कुस्तीसारखा व्यायाम करून अंग रगडून घ्यावे, ऊन पाण्याचे स्नान, अगरू, केशरासारख्या उष्ण द्रव्यांची उटी, धूप घेणे, लोकरीची वा रेशमी तलम वस्त्रे किंवा हरीण इत्यादींसारख्या पशूंच्या कमावलेल्या, उष्णस्वभावी व हलयाशा चामड्यांची वस्त्रे वापरावीत. अंगावर बारीक कपडा ठेवून कोवळे सूर्यकिरण अंगावर घ्यावे म्हणजे घाम येईल. हातापायांना मोजे वापरावेत, पादत्राणे वापरावीत. तळघरातील शेगड्या इ. पेटवून आश्रय घ्यावा.
स्त्रीसमागमाच्या बाबतीत पाळावयाच्या नियमांचा उल्लेख ‘ ब्रह्मचर्य ’ ह्या प्रकरणात प्रत्येक ऋतूच्या दृष्टीने आला आहेच.
कडू, तिखट, तुरट रसाचे व वातवर्धक खाद्यपेय पदार्थ, थंड पदार्थ, जोराचा वारा व उपोषणे ही हेमंत ऋतूत वर्ज्य करावीत.
ऋतुचर्येचे तात्पर्य : ह्या पूर्वी ‘ आहार ’ प्रकरणात ऋतुमानानुसार रसाचे प्राधान्य ठेवून तो षड्रसात्मक असावा हे सांगितले आहेच. ऋतुमानापरत्वे रसाचे प्राधान्य कसे असावे ते शास्त्रकारांनी सांगितले आहे, त्याचा आशय असा : (१) हेमंत आणि शिशिर ह्या हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या ऋतुकाळात मधुर, अम्ल आणि लवण रसांचा आहारात अग्रक्रम आणि कटूतिक्तकषाय रससेवन अल्प प्रमाणात व्हावे. (२) वसंत ऋतूत कटूतिक्तकषाय रसांना प्राधान्य आणि पहिल्या तिन्हींचे अल्प सेवन. (३) ग्रीष्म म्हणजे प्रखर उन्हाळा. यात केवळ मधुररसप्रधान आहार असावा. इतर अल्प. (४) वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. यात अम्ल, लवण रसांचे प्राधान्य व इतर रस अल्प. (५) शरद ऋतूमध्ये मधुर, तिक्त आणि कषाय हे रस अधिक व इतर कमी असावेत.
ऋतुसंधी : एका ऋतूचा शेवटचा व पुढच्या ऋतूचा पहिला आठवडा मिळून होणारा दोन सप्ताहांचा काल हा त्या दोन ऋतूंचा संधिकाल असतो. अशा ह्या संधिकालात पहिल्या ऋतूतील आहार-विहार क्रमशः १/४, १/८ किंवा १/१६ प्रमाणाने कमी करीत जाऊन त्याच प्रमाणाने पुढील ऋतूचा आहार सेवन करू लागावे. म्हणजे एकदम पूर्वीचा आहार सोडून पुढचा सुरू केल्याने होणार्या असात्म्य सेवनाचे दुष्परिणाम टळतील.
देशकालादींचा बदल होत असता वमनादी शुद्ध कार्य अनिवार्य असून व तेव्हा अनुकूल वातावरण अन्य साधनांनी निर्माण करून त्या त्या क्रिया कराव्यात, काळ वाया जाऊ देऊ नये.
काल-अर्थ-कर्म ह्यांचा हीन, मिथ्या व अतिमात्रक योग : हे सहा ऋतू आपापल्या गुणांप्रमाणे न घडता संपूर्ण विपरीत होतील त्या वर्षी त्यांचा हीन योग झाला असे म्हणावे. उदा., हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या ऋतूंत अनुक्रमे थंडी, पाऊस आणि उष्णतेचा अभाव असणे हीन योग. हिवाळ्यात अतिउष्णता, उन्हाळ्यात अतिथंडी इ. घडणे हा मिथ्या योग. अतिथंडी, अतिवृष्टी आणि अतिउष्णता हे त्या त्या काळाचे अतियोग होत.
कालाप्रमाणेच अर्थ म्हणजे इंद्रियांकडून स्वतःच्या विषयाचे ग्रहण. याचेही असेच योग संभवतात. जसे डोळे बांधून किंवा अंधारात बसून राहणे हा नेत्राशी होणारा त्याच्या अर्थाचा हीन योग. नको तो प्रसंग पाहणे हा त्या दृष्टीचा नेत्राशी मिथ्यायोग आणि अतिसूक्ष्म, तेजस्वी वा भयंकर दृश्ये पाहणे हा अतियोग होय.
शरीर, वाणी आणि मन ह्यांच्या कर्मांच्याही बाबतीत असेच तीन योग संभवतात.
असे हे कालाचे, अर्थाचे वा कर्माचे तीनही प्रकारचे योग घडणे रोगोत्पादक ठरते आणि असे काहीही न घडता योग्य तेच घडणे याला सम्यक् योग असे नाव असून तोच आरोग्याला पोषक म्हणून श्रेष्ठ होय.
स्वास्थ्यसंपादन : सहज म्हणजे जन्मतःच प्राप्त झालेले स्वास्थ्य सतत रक्षण करावयाची जशी आवश्यकता मानवाला आहे, तशीच आयुष्यात प्रसंगवश झालेले रोग यथायोग्य उपचारांनी बरे करणे व त्यानंतर पुनश्च रोगाचे आक्रमण होऊ नये आणि नष्ट झालेले सहज आरोग्य संपूर्णतया प्राप्त व्हावे हीसुद्धा आवश्यकता आहे. यासाठी विशिष्ट आहार आणि आचाराचे पालन करणे इष्ट असते. असे हे नष्ट झालेले आरोग्य पुन्हा मिळविणे ह्या क्रियेलाच स्वास्थ्यसंपादन म्हणता येईल.
स्वास्थ्यसंपादन करण्यासाठी ज्या आहार-आचारांचे पालन करावयाचे ते आहार-आचार त्या त्या व्यक्तीच्या सहज प्रकृतीला अनुसरूनच असले पाहिजेत. व्यक्तीची सहज प्रकृती कोणत्या दोषाची आहे व त्या दोषानुसार त्या व्यक्तीला केव्हा, कोठे, कोणत्या आहार-आचाराने कोणते विकार होण्याची शयता आहे हे ध्यानी घेऊन त्याने कोणते आहार-आचार पाळावेत, कोणते टाळावेत हे निश्चित करावे लागेल आणि आयुष्यभर निष्ठापूर्वक त्याचे पालन करावे लागेल. [⟶ दोषधातुमलविज्ञान प्रकृति ].
ह्या सज्ञ प्रकृतीत सर्वच लोक समदोष प्रकृतीचे असतात असे नाही किंबहुना असे लोक अपवाद म्हणूनच आढळतात व ते पूर्ण निरोगी असतात व हीच खरी प्रकृती परंतु गर्भावस्थेतच एक वा दोन दोषांच्या आधियाने प्राप्त झालेली प्रकृती घेऊन जन्माला आलेल्या व्यक्तींची प्रकृती एकदोषज किंवा द्विदोषज असते, तीच त्यांची सहज प्रकृती होय. शास्त्रीय परिभाषेत तिला दोष प्रकृती असे नाव आहे. अशाच व्यक्तींची संख्या जगात अधिक आहे. त्या त्या एक अथवा द्विदोषांच्या लक्षणांनी त्या व्यक्तीचा देह घडलेला असतो.
ज्यांच्या जन्मसिद्ध प्रकृतीत वाताचे आधिय असेल ते लोक प्रायः नित्य रोगी असतात परंतु अशी ही विकृती त्यांना काहीशी सह्य असते. वात प्रकृतीच्या लोकांचे हातपाय फुटीर असतात, अंगावर टचटचित शिरा दिसतात, जठराग्नीची क्रिया विषम असते, ह्या मुख्य गोष्टी संभवितात. या प्रकारे वात दोषाप्रमाणेच पित्त व कफ ह्या दोन्ही दोषांच्याही बाबतीत म्हणता येते.
असे हे सहज दोष मारक होत नाहीत, फक्त विकार करतात म्हणून नित्य योग्य उपचारांनी त्यांना आटोयात ठेवावे लागते. अशा ह्या कृतीला ‘ प्रकृतिस्थापन चिकित्सा ’ म्हटले आहे. दोषजन्य सहज विकृती आणि आहार-विहारादी परिणामजन्य विकृती यांतील हा फरक लक्षात ठेवण्यासारखा आहे.
निवासस्थानादि विचार : सूतिकागार, कुमारागार, व्रणित योग्य आगार आणि स्वयंपाकगृह यांच्या रचनेच्या बाबतीत ज्या सूचना आढळतात, त्यांवरून निवासस्थानाविषयीही आयुर्वेदाच्या शास्त्रीय दृष्टीची कल्पना करता येते.
घरासाठी जमीन निवडणे : प्रशस्त वास्तूसाठी पूर्व किंवा उत्तर बाजूला उतरती आणि काळ्या अथवा सुवर्णासारख्या पिवळ्या मातीची जमीन असावी. त्या जागेत हाडे अथवा खापराचे तुकडे नसावेत, मातीला विशिष्ट सुगंध असावा.
घरासाठी लाकूड : बेल, टेंभुर्णी, खैर इ. वृक्षांचे अथवा अथर्ववेदवेत्ते विद्वान किंवा वास्तुविद्याकुशल लोकांच्या विचारे योग्य असे लाकूड घर बांधण्यासाठी वापरावे.
घराची रचना : घराची जागा विशाल असावी, घर सर्व बाजूंनी मजबूत असावे, घरात येणारा वारा एका बाजूने मोकळा येईल अशी योजना असावी, घराचा दरवाजा दक्षिणेस असावा, पूर्व आणि उत्तरेस यथायोग्य दरवाजे अथवा खिडया असाव्यात, अंधार नसावा. दुष्ट पशू , सर्प, विंचू, उंदीर, टोळ इ. प्राण्यांचा उपद्रव होऊ नये अशा भिंती पया, नेहमी सारवून स्वच्छ ठेवलेल्या, तळात बिळे वगैरे होऊ शकणार नाहीत अशी त्यांची मजबुती असावी आणि सांसारिक गरजांना अनुसरून उपयोगात आणावयाच्या खोल्या स्वतंत्र योजना केलेल्या असाव्यात. उदा., बैठक, स्नानगृह, स्वयंपाकगृह, शयनगृह, मलमूत्र विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था, भरपूर व स्वच्छ पाण्याची विहीर अथवा आड आणि घाण पाणी वाहून जाण्यासाठी पया गटारी बांधल्या जाव्यात.
त्या त्या ऋतूचे हवामान त्रासदायक होऊ नये ही योजना शय तर घर बांधणीत असावी. उदा., हिवाळ्यात ऊबदार तळघर, तीव्र उन्हाळ्यात उपयोगी धारास्नानाची सोय, आवारात बाग, कारंजे इ. योजना, घनदाट छाया देणारे वृक्ष सभोवार असणे, रात्री स्वच्छ चांदणे व मोकळ्या हवेची सोय म्हणून घराला गच्ची असणे श्रेयस्कर असते. या योगे झोपण्याची व बसण्याची सोय होते.
बैठकीत स्वच्छ सुखासनांची योजना, स्वयंपाकगृहाला लागूनच सामग्री संपन्नसे साहित्य गृह व जाते, उखळ, मुसळ इ. उपकरणांची योजना, शय्या- गृहात पुरेशा खाटा अथवा पलंग आणि त्यांवर ऋतूला अनुसरून आणि प्रसंगोपात्त उपयुक्त मच्छरदाण्या, अंथरूण व पांघरुणाची व्यवस्था असावी.
सद्वृत्त : सद्वृत्त म्हणजे सदाचार. काया, वाचा, मनाने झालेले सदाचार पालन हे मनाला प्रसन्नता देऊन आत्मिक बल वाढविणारे असते. म्हणून सद्वृत्ताला स्वस्थवृत्तात फार मोठे महत्त्व आहे. [⟶ सद्वृत्त ].
सदाचार मर्यादा : सदाचार हा केवळ स्वतःपुरता नसून संबंधात येणार्या घरातील व घराबाहेरील आबालवृद्ध स्त्री-पुरुषांशी संबंधित असतो. इंद्रियांचे निर्मलत्व, शुचित्व आणि त्यांचा यथायोग्य उपयोग : (१) शरीराची सर्वही इंद्रिये अंतर्बाह्य स्वच्छ असणे इष्ट आहे. त्यासाठी अभ्यंग, स्नान, उद्धर्षण ( अंग घासणे ), उत्सादन ( उटी लावणे ) इत्यादींचा यथायोग्य उपयोग करावयास हवा आणि अंतःस्वच्छतेसाठी त्या त्या वेळी व ऋतूत बस्ती, वमन, विरेचन, नस्य इत्यादींचे सेवन केले पाहिजे. यायोगे अंतर्बहिर्मल प्रमार्जन होते. (२) शुचित्व म्हणजे पावित्र्य. वाणी, वचन आणि वपू म्हणजे शरीर ह्या तिन्हींचे पावित्र्य म्हणजेच काय-वाङ्मन शुचित्व होय व ते असणे अत्यावश्यक आहे. (३) इंद्रियांचा उपयोग : त्या त्या इंद्रियाचा योग्य उपयोग होणे स्वास्थ्य पोषक आहे व त्यासाठी प्रत्येक इंद्रियाकडून त्याच्या शक्तीप्रमाणे काम करून घेतलेच पाहिजे. असे करीत असता इंद्रियावर अधिक ताण पडू नये किंवा त्याला अगदीच निष्क्रियही ठेवू नये, कारण हे दोन्ही प्रकार स्वास्थ्य विघातक आहेत. त्याचप्रमाणे विकृत किंवा अयोग्य स्वरूपाचे काम इंद्रियांकडून करून घेणे हाही एक प्रकार संभवतो व तोसुद्धा स्वास्थ्याला घातकच ठरतो. ह्या तीनही प्रकारांना क्रमशः अतियोग, हीनयोग आणि मिथ्यायोग अशी शास्त्रीय नावे आहेत. इंद्रियाकडून योग्य प्रमाणात योग्य ते काम करून घेणे याला समयोग म्हणतात व तोच श्रेष्ठ होय. यांशिवाय वेशभूषा, अलंकार, केशरचना, दंडधारण, आतपत्र म्हणजे छत्री, उपानह म्हणजे पादत्राण यांचाही उपयोग करणे सद्वृत्तात अंतर्भूत होते, यांच्याविषयी पूर्वी माहिती आली आहेच. (४) भाषण : ओळखीच्या अथवा आपल्याकडे आलेल्या व्यक्तीशी आपणच प्रारंभी बोलावे. त्या बोलण्यात सरळपणा, आदर आणि अगत्य दिसून यावे. बोलणे फार जलद अथवा अतिमंद गतीचे, शंकास्पद, अस्पष्ट अथवा तुच्छता दर्शक असू नये. याचकाशीही त्याला बोचेल अथवा अपमान वाटेल असे बोलू नये. (५) गमन-चंक्रमण : कार्यानिमित्त जाणे ते गमन आणि स्वास्थ्यासाठी जाणे हे चंक्रमण होय. ह्या दोन्ही प्रसंगी पायी चालावयाचे असते. तेव्हा आपल्या पुढील चार हातावरील मार्गावर दृष्टी ठेवून चालावे, वेळ रात्रीची असता हाती काठी, पायी पादत्राणे, डोकीला फेटा, पागोट्यासारखे काही शिरस्त्राण अवश्य असले पाहिजे. शय तो एखादा गडी किंवा कुणी साहाय्यकही बरोबर घ्यावा. अत्यंत घाईने किंवा रेंगाळत चालू नये आणि शक्तीपेक्षा अधिक पायी चाल करू नये. (६) रात्री झाडाखाली, चवाट्यावर, मठ अथवा मंदिरात वस्तीला राहू नये. (७) वधस्थान, निर्जन प्रदेश, ओसाड व पडके घर आणि स्मशान येथे दिवसाही वस्ती करू नये. (८) सूर्याकडे टक लावून पाहू नये. तसेच सूक्ष्म, तेजस्वी वा अपवित्र दृश्ये पाहू नयेत. (९) डोयावर मोठे ओझे घेऊन दूरवर अथवा दीर्घकाळ जाऊ नये. (१०) मद्य तयार करणे व त्याची विक्री करणे, ते दुसर्याला देणे व स्वतःसाठी घेणे वर्ज्य करावे. (११) समोरून येणारा वार्याचा झोत, ऊन्ह, धुरळा, पावसाचे तुषार, झोंबणारा वारा इ. टाळावे. (१२) शिंक, ढेकर, खोकला, हास्य, जांभई याप्रसंगी तोंडापुढे वस्त्र धरावे तसेच ह्या क्रिया आणि झोप, जेवण, मैथुन ह्या क्रियांच्या वेळी शरीर वेडेवाकडे ठेवू नये. (१३) नीच, दुष्ट व कृपण लोकांशी संबंध ठेवू नये व श्रेष्ठांशी भांडू नये. (१४) संधिकाळी खाणे, विषयसेवन, झोप, अध्ययन व चिंतन करू नये.
सात्म्यासात्म्य विचार : ज्या आहार-आचाराचे सतत सेवन बाधक होत नाही म्हणजेच देश, काल, जाती, ऋतू, रोग, व्यायाम, उदक, दिवसाची झोप तसेच कोणत्याही विशिष्ट रसाचे सतत सेवन शास्त्र दृष्ट्या प्रकृतीविरुद्ध असूनही काहीही विकार करीत नाही त्याला सात्म्य असे म्हणतात. या विरुद्ध ते सर्व असात्म्य होय. ह्या असात्म्य आहार-विहाराचा हीनयोग, मिथ्यायोग अथवा अतियोग इंद्रियांची विकलता किंवा प्रसंगवश मरणालासुद्धा कारणीभूत होत असतो म्हणूनच त्याला असात्म्य म्हणतात.
सदैव आरोग्य, आळसाचा अभाव, कोणत्याही गोष्टीची अत्यासक्ती नसणे, सर्व इंद्रियांची प्रसन्नता, आवाज, वर्ण, प्रजनन सामर्थ्य, यथास्थित असणे हे सर्व सात्म्यदर्शक भाव आहेत. हे भाव जन्मतःच असल्यामुळे ती व्यक्ती सदैव आरोग्यसंपन्न असते. यासंबंधीचे सविस्तर विवेचन मराठी विश्वकोशातील ‘सात्म्यासात्म्य’ या नोंदीत दिलेले आहे.
जनपदोध्वंस : एकाच वेळी सामूहिक आरोग्यात बिघाड होऊन मृत्युसंख्या वाढणे अशा परिस्थितीला जनपदोध्वंस किंवा सार्वजनिक अनारोग्य असे म्हणतात. वायू , उदक, देश, काल इ. जे नैसर्गिक भाव मानवी शारीरभावांशी समान आहेत, त्यात वैगुण्य उत्पन्न झाल्यामुळे एकाच काळी सारख्याच लक्षणांचे रोग निर्माण होतात, आणि तेच जनतेच्या जीविताची हानी अत्याधिक संख्येत करतात हे याचे वैशिष्ट्य.
चरकाचार्यांनी याची सांगितलेली उपपत्ती : जेव्हा देश, शहर अथवा गावाचे प्रमुख समजले जाणारे व राजसत्ताधारी लोक अधर्माने प्रजेला वागवू लागतात तेव्हा त्यांचे आश्रितोपाश्रित, शहर अथवा ग्रामीण लोक आणि व्यावसायिक लोकही तसेच अधर्माचरण करून अनारोग्य वाढवितात, ते पुढे नाशास कारणीभूत होते अशा वेळी ऋतूंचे वायुमान विकृत होऊन योग्य वेळी मेघवृष्टी व्हावी तशी होत नाही, मुळीच होत नाही किंवा विकृत स्वरूपाची होते, वारे चांगले वाहत नाहीत, जमीन दूषित होते, जलाशय कोरडे पडतात औषधीसुद्धा आपला नैसर्गिक स्वभाव सोडून विकृत होतात आणि त्यांच्या व त्यांचे सेवन करणार्या व्यक्तींच्या बरोबर होणार्या स्पर्श व खानपानामुळे ती विकृती सांसर्गिक स्वरूपात पसरून साथीचे रोग होतात आणि बहुसंख्य जनता मृत्युमुखी पडते.
जनपदोध्वंस होण्याचे युद्ध हेही एक कारण आहे. शस्त्रास्त्रांनी परस्परांशी युद्धास प्रवृत होणार्या व्यक्ती, समाज अथवा राष्ट्रेसुद्धा लोभ, क्रोध, मोह व मानापमान यांना वश होऊनच परस्परावर आक्रमण करीत असल्यामुळे तो अधर्मच ठरतो आणि परिणामी बहुजनसंख्या बळी पडते.
ऋतूंवर परिणाम होऊन त्या त्या ऋतूचे शीत, उष्ण, वायू, वृष्टी इ. विकृत होतात, औषधी व जल दुष्ट होते आणि अशा त्या दूषित औषधी व अन्नजलाचा उपयोग केल्याने मरक म्हणजे पटकी वगैरेंसारख्या विविध रोगांचा उपद्रव होतो असे सुश्रुताचार्यांचे म्हणणे आहे.
क्वचित प्रसंगी असे काहीही न होता रक्षस् म्हणजे प्रकृतीला क्षीण करणार्या अदृश्य सूक्ष्मजीवांचेच आक्रमण होऊन जनपदोध्वंस करणारे रोग उत्पन्न होतात.
वैगुण्य कसे येते ? वरील कारणांमुळे सर्वप्रथम वायूची दुष्टी होते. वायूमुळे जल, स्थल, देश, काल यांची क्रमशः दुष्टी होते व हीच अधिकाधिक वाढून शेवटी अपरिहार्य आणि घातक ठरते.
वायुदुष्टी लक्षणे : वाहणारा वायू ऋतूला अनुसरून शीत, उष्ण इ. नसतो. तो अगदीच स्तब्ध किंवा चंचल, झोंबणारा, अतिगारठ्याचा, अतिउष्ण, रुक्ष, अतिसर्द, सोसाट्याचा, घोंघावणारा, उलटसुलट दिशेने वाहणारा आणि वक्रगतीचा होतो. न मानविणारा दुर्गंध त्यात येतो आणि वाफ, वाळू , धुरळायुक्त व धुरकट असा तो होतो.
अशा ह्या विकृत वायूचा शरीराशी नासामार्गाने आतील इंद्रियांवर आणि त्वचेद्वारे बाह्य अवयवांवर परिणाम घडतो फुप्फुस व हृदय ह्या महत्त्वाच्या इंद्रियांवर परिणाम झाल्याने श्वास, खोकला, उचकी, मोह, मूर्च्छा व भोवळ यांसारखे भयंकर उपद्रव होतात. ह्या वायूच्या निमित्तानेच अनेक हानिकारक सूक्ष्मजीवांचा प्रवेश शरीरात होऊन विकृती होते.
शत्रूकडूनही केव्हा केव्हा वातावरणात विषारी द्रव्ये पसरविली जाऊन वायू दूषित केला जातो, विषारी धूर सोडला जातो. त्यामुळेही व्यक्ती आणि समुदायाचे स्वास्थ्य बिघडते. म्हणून अशा वायूची लक्षणे ओळखून त्यापासून संरक्षण व त्याचा प्रतिकारक उपायही करावयास पाहिजे.
दूषित वायूची लक्षणे : विषमय दूषित वायूचा प्रवाह चालू असेल त्या वातावरणात संचार करणारे पक्षी जमिनीवर पडतात. त्या वायूच्या संपर्कात येणारी माणसे खोकला, पडसे, डोकेदुखी व नानाविध नेत्ररोगांनी पीडित होतात.
अशा ह्या दुष्ट वायूचे परिणाम शास्त्रकारांच्या लक्षात त्या वेळी आले व त्याला अनुसरून त्याचे प्रतिकारक उपायही त्यांनी शोधून निवेदन केले आहेत, ते पुढे जनपदोध्वंस प्रतिकार ह्या सदरात सांगितले आहेत. वायूप्रमाणेच जल, देश, कालाचीही दुष्टी व त्यावरील उपायही शास्त्रात सांगितले आहेत, त्यांचा क्रमशः विचार आता करणे आहे.
जलदुष्टी कारणे व लक्षणे : आड, तळी, तलाव, झरे, विहिरी, नद्या इ. जलाशयांपासून आपणास पाणी मिळते. काही प्रदेशांतून मेघांच्या वर्षावाचे पाणी स्वच्छ अशा मोठमोठ्या चुनेगच्ची हौदात साठवून पुढे त्याचाच उपयोग केला जातो.
वर सांगितल्याप्रमाणे वायुदुष्टीचा परिणाम सर्व जलाशयांवर होतो म्हणजेच त्या जलाशयांचे पाणीही दूषित होते. शिवाय जलाशयांची स्वच्छता न राखली जाणे, त्यांच्या आसपास मलमूत्रोत्सर्ग होत राहणे, त्यांमध्ये निरनिराळ्या प्राण्यांची अंडी, केर, पालापाचोळा पडून तो त्यातच सडणे, शेवाळ, चिखल इ. साचून किडे उत्पन्न होणे, जलाशयांवर दिवसा सूर्य-प्रकाश व रात्री चांदणे नसणे, जलाशय अंधार असलेल्या जागेत असून स्वच्छ अशा बाहेरच्या वायूचाही प्रवेश नसणे इ. अनेक कारणांनीसुद्धा पाणी दूषित होते. असे पाणी स्नान, पान, अन्नसंस्कार, कपडे धुणे इत्यादीं-साठी वापरले की त्या ठिकाणी राहणार्यांना रोगांना बळी पडावे लागते.
जलाशयांच्या जलदुष्टीचे आणखीही एक कारण संभवते ते शत्रूकडून विषद्रव्ये जलाशयात टाकली जाणे हे होय. अशा सर्व कारणांनी होणार्या दुष्ट जलाची लक्षणे आणि होणारे विकार यासंबंधीची माहिती मराठी विश्वकोशातील ‘ विषतंत्र ’ या नोंदीत सांगितली आहे.
काही नद्यांचेही पाणी विकृत असते उदा., ज्यांचा प्रवाह खळाळून वाहत नाही, संचित होतो अशा पाण्यामुळे कृमी, श्लीपद (हत्ती रोग), हृद्रोग, गळ्याचे व डोयाचे विकार होतात.
देशपरत्वे विशिष्ट नदीकाठच्या प्रदेशात विशिष्ट रोग बहुसंख्य जनतेला झालेले आढळतात. दुष्ट जलामुळे सूज, गुल्म इ. अनेक विकारही होतात. समुद्राचे पाणी तर तीनही दोषांची दुष्टी करणारे असते.
दुष्ट जलशुद्धीचे उपाय : (१) जलाशयातील पालापाचोळा, शेवाळ, चिखल इ. काढून टाकणे. (२) जलाशयाला सूर्य व चंद्रप्रकाश आणि वारा मिळेल अशी योजना करणे. (३) पाणी उकळून त्यावरील फेस जाऊन एकचतुर्थांश उरलेले पाणी थंड झाल्यानंतर वापरावे. (४) पाणी उकळून थंड करावे व त्याचा गढूळपणा निवळण्यासाठी त्यात निवळीचे बी, तुरटी, गोमेद मणी, मोती, बिसग्रंथी इ. टाकून ठेवून पाणी निवळल्यावर घ्यावे. (५) लोखंड तापवून लाल करून त्या पाण्यात विझवावे किंवा दगडाचा गोटा असाच तापवून विझवावा व ते पाणी घ्यावे. (६) सूर्याच्या प्रखर किरणात खूप तापवून पाणी घ्यावे. (७) चौपदरी कापडातून किंवा जाड कापडातून पाणी गाळून घ्यावे. (८) पाण्यातील दुर्गंध जाण्यासाठी पाडळ, मोगरा वगैरे सुगंधी फुले किंवा वाळा, चंदन वगैरेंसारखी सुगंधी द्रव्ये पाण्यात घालावीत.
पाणी थंड करणे व त्याची व्यवस्था : (१) प्रवात स्थापन : पाणी पात्रात घालून पात्राचे तोंड स्वच्छ कापडाने बांधून उलटे करून हवेशीर टांगणे. (२) उदक प्रक्षेपण : भांड्यात पाणी भरून भांड्याच्या गळ्यापर्यंत कापड गुंडाळावे आणि त्यावर नित्य पाणी घालून ते कापड सतत ओले ठेवणे. (३) यष्टिका भ्रामण : पाण्याचे भांडे काठीला बांधून युक्तीने ते गरगर फिरविणे. (४) व्यजन : पंख्याने किंवा कापडाने वारा घालणे. (५) वस्त्रोद्धरण : जाड कापडातून पाणी गाळणे. (६) वालुका प्रक्षेपण : पाण्याचे भांडे वाळूत ठेवणे. (७) शियावलंबन : पाण्याचे भांडे शियावर ठेवणे.
पाणी सुरक्षित ठेवणे : ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट असून यासाठी पुढील पाच प्रकार सांगितले आहेत. त्यासाठी (१) फलक : उंच जागी सावरीच्या किंवा इतर लाकडाच्या फळीवर ठेवणे. (२) त्र्यष्टक : तीन पायाच्या अष्टकोनी घडवंचीवर ठेवणे. (३) मुंजवलय : मुंज म्हणजे मोळ नावाचे गवत. त्याचे कडे किंवा चुंभळ करून ठेवणे. (४) उदमंचिका : वेत, कळक किंवा लाकडी घडवंचीवर ठेवणे. (५) शिय : उंच टांगलेल्या शियावर ठेवणे. या पाचही प्रकारांचा हेतू पाण्याला जमिनीचा स्पर्श होऊ न देता ते दूषित न व्हावे हाच आहे.
हिताहितावह जल : (१) आनूप म्हणजे दलदलीच्या प्रदेशातील पाणी अनेक दोषकारक विशेषतः अभिष्यंदी असते. त्यामुळे ते पिण्यास त्याज्य असते कारण ते कफकारक होते. (२) जांगल देशातले पाणी दोषरहित अतएव ते पिण्यास योग्य असते. (३) साधारण देशातील पाणी त्याहीपेक्षा उत्तम व ते पचनानंतर विदाह करीत नाही. ते तृषा शमविते, मनाला आल्हाद देते, जठराग्नी प्रदीप्त करते, मधुर आणि थंड असते. (४) पाणी उकळून त्यावरील फेस जाऊन एकचतुर्थांश उरले, स्वच्छ झाले म्हणजे पचनास हलके व गुणावह होते. (५) नारळातील पाणी स्निग्ध, मधुर, थंड, हृदयाला हितावह, अग्निदीपक, पौष्टिक, बस्तिशोधक, पित्त व तहान शामक, परंतु पचनास जड असते. (६) शिळे पाणी आंबते व कफाचा उत्लेश करते, यामुळे ते तहानेसाठी हितावह नसते. (७) आड, तळी, विहिरी इ. भूमिगत जल हे उषःकाली घेणे चांगले. या वेळी ह्या जला-शयातील पाणी निर्मल आणि अधिक शीत असते. विशेष लक्षात ठेवावयाची गोष्ट हीच की कोणताही वास नसलेले, विशिष्ट चव नसलेले, तृषाशामक, पवित्र जागेतील थंड, स्वच्छ, हलके आणि हृदयाला हितावह असे पाणी गुणांनी श्रेष्ठ व ग्राह्य समजावे.
शुद्ध जल लक्षण : (१) दिवसभर सूर्यकिरणांनी तापलेले व रात्री चंद्रकिरणांनी थंड झालेले असे जलाशयातील पाणी शुद्ध, निर्विष व दोषरहित होते, त्याला हंसोदक म्हणतात. (२) आकाशातून पडलेले व जमिनीचा स्पर्श न होताच संचित केलेले किंवा गारा विरवून केलेले पाणी शुद्ध असते. (३) खळाळून वाहणार्या प्रवाहाचे, उंचावरून खडकावर पडून छिन्नविच्छिन्न झालेले व पुढे वाहणारे, खडक वा वाळूच्या जमिनीत वाहणारेही पाणी चांगले. (४) चांदीच्या भांड्यात तांदूळ घालून त्यात घातलेले जे पाणी तांदळाचा रंग बदलवीत नाही व तांदूळ गचगचित होत नाही तेही शुद्ध जलच होय.
भूमिदेशदुष्टी लक्षणे : (१) ज्या भूमीची माती मूळचा वर्ण, गंध, रस व स्पर्श बदलते अथवा मुळातच माती विकृत असते ती भूमी दूषित समजावी. (२) माती ओलसर, दलदलीची असून सर्प, व्याघ्रादी प्राण्यांची वस्ती असलेली उंदीर, घुशी इत्यादींची बिळे असलेली गिधाड, घुबड, टोळ, डास व माश्यांचा उपद्रव असलेली ज्या जमिनीत पेरलेले बी न उगवता वाळते वा नष्ट होते आणि नित्य वस्ती करणारे पशुपक्षी निघून गेले असतील, ती भूमी दूषित समजावी. तसेच जेथे कोल्हा, कुत्र्यांचे रडणे ओरडणे चालू आहे सामान्य लोकांच्याही ठिकाणी धर्म, सत्य, लज्जा, आचार, शील इत्यादींविषयी आस्था राहिलेली नाही जवळपासचे जलाशय अकस्मात क्षुब्ध होतात उल्कापात, धरणीकंप होतात सूर्य, चंद्र, तारे यांच्याभोवती रुक्ष, धुरकट, तांबूस वलये उत्पन्न होतात व एकाएकीच कारण नसताही त्रस्त झाल्याचे, रडण्याचे, बडबडण्याचे, ओरडण्याचे आवाज ऐकू येतात तोही भूमिदेश दूषित आहे असे समजावा.
ऋतूत कोणताही बिघाड नसता वा बदल झाला नसताही ग्रामीण देवतांचा तसेच गुरुजनांचा वा ऋषिजनांचा क्षोभ, रक्षस् निर्माण करणार्या सूक्ष्मजीवाणूंचा क्षोभ व अधर्माचरणामुळेही देशदुष्टी होते.
विषारी औषधी, फुले इ. असलेल्या भूमिभागाकडून येणारा वायू ज्या ज्या प्रदेशात पोहोचेल तेथेसुद्धा एकाच वेळी विशिष्ट रोगोत्पत्ती होते. अशा वेळी प्रायः खोकला, श्वास, वांती, पडसे, डोकेदुखी व ताप यांसारखे उपद्रव होतात.
घर, अस्वच्छ टाकाऊ अंथरूण, आसन, वाहन व रत्नादी वस्तूंचा वापर केल्यानेही हेच परिणाम घडण्यास अधिक मदत होते.
प्रशस्त भूमी : खाचखळगे, ढेकळे, दगड व वारूळे नसलेली प्रेते जाळली वा पुरली जात नसलेली वालुकामय नव्हे व माती खारी नाही अशी माती चिकण असून मऊ, स्थिर, काळी, पांढरी, पिवळी किंवा तांबडी असलेली व पेरलेली उगवते अशी भूमी प्रशस्त होय.
पंच भौतिक गुणवैशिष्ट्ययुक्त भूमी : (१) पार्थिव गुणवैशिष्ट्य भूमी : दगड पुष्कळ, खोदण्यास कठीण, माती जड व काळी किंवा श्यामल, जाड खोडांचे वृक्ष वाढतात व धान्यही चांगले होते. (२) आपगुण भूयिष्ट भूमी : माती पांढरी, चिकण, थंड, खणल्यावर पाणी जवळच लागते, जलाशय जवळच असतात, धान्य अथवा गवत चकाकणारे, वृक्ष कोवळे आणि नाजूक असतात. (३) अग्निगुण भूयिष्ट भूमी : दगडांनी युक्त, हलकी व निरनिराळ्या रंगांची माती, झाडे कमी व दूरदूर अंतरावर व त्यांच्या फांद्याही बहुधा पांढर्या असतात. (४) वायुगुण भूयिष्ट भूमी : माती रुक्ष, राखाडी किंवा करड्या रंगाची धूसर वृक्ष छोटे छोटे, लहान ढोलीचे व अल्परस-युक्त असतात. (५) आकाशगुण भूयिष्ट भूमी : श्यामवर्ण, मऊ माती, समपातळीची किंवा खळगेयुक्त सपाटीची, पाणी अव्यक्त रसाचे, उंच पर्वत आणि वृक्षही उंच वाढणारे परंतु सारहीन असतात.
भूमिगुण वैशिष्ट्यानुसार औषधी : पंच भौतिक गुणधर्मांच्या भूमीत उत्पन्न होणारी औषधी द्रव्ये सुद्धा त्या त्या विशिष्ट कार्यासाठीच शय तो घेणे श्रेयस्कर होईल. जसे : (१) पृथ्वी आणि आपगुण विशिष्ट भूमीत झालेली विरेचन द्रव्ये घ्यावीत. (२) अग्नी, आकाश आणि वायुगुण भूयिष्ट भूमीतली वमन द्रव्ये घ्यावीत. (३) वरील दोन्ही प्रकारांनी संमिश्र भूमी असेल, तर दोन्ही प्रकारची म्हणजेच विरेचन व वमनाची द्रव्ये घ्यावीत. (४) केवळ आकाशगुण भूयिष्ट भूमी असेल, तर तेथील शमन द्रव्ये घेणे उत्तम.
स्वास्थ्यसंपादनासाठी द्रव्यांची निवड : गंध, वर्ण आणि रसाच्या दृष्टीने भूमीचे सहा प्रकार संभवतात, म्हणूनच तिच्यात उत्पन्न होणारी बीजद्रव्ये सुद्धा सहा रसांनी युक्त असतात. पाण्याला वस्तुतः स्वतःचा असा रस नाही, परंतु त्याचा भूमीशी संसर्ग झाल्यावर त्याला विशिष्ट रसाची चव येते. सर्वगुणसंपन्न भूमीला साधारण भूमी म्हणतात व तिच्यात उत्पन्न होणार्या द्रव्यात तिचे गुण येतात.
स्वास्थ्यसंपादनासाठी दुर्गंध व कीडरहित, सत्त्वयुक्त, रसादी सर्वगुण-संपन्न आणि विशेषतः नवीनच द्रव्य वापरण्याकरिता घ्यावे. परंतु वावडिंग, पिंपळी, मध व तूप यांसारखी काही द्रव्ये जुनीच वापरणे श्रेयस्कर असते. [⟶ पथ्यापथ्य ].
कालदुष्टी : शिशिरादी सहा ऋतूंत प्राकृत हवामान असणे स्वास्थ्याला पोषक असते परंतु पूर्वी वायू , जल व देश दुष्टीची जी कारणे सांगितली आहेत त्याच कारणांनी हवामानही अकस्मात दूषित होते व त्यामुळे हिवाळ्यात उन्हाळा अथवा पावसाळा, उन्हाळ्यात पावसाळा किंवा हिवाळा, तर पावसाळ्यात उन्हाळा अथवा हिवाळा असे काही तरी विपरीत घडते, हीच त्या ऋतूंची म्हणजेच कालाची दुष्टी होय.
त्या त्या ऋतूत थंडी, ऊन्ह अथवा पावसाचे प्रमाण कमी, अधिक किंवा मुळीच नसणे असाही कालदुष्टीचा प्रकार संभवतो आणि ह्या सर्वही प्रकारांचा परिणाम स्वास्थ्यावर सामूहिक दृष्टीने विपरीत होऊन बहुजनसंख्या कोणत्या तरी विशिष्ट स्वरूपाच्या एकाच रोगाला बळी पडते. हा कालदुष्टीने झालेला जनपदोध्वंस.
अशा तऱ्हेने वायू , जल, देश अथवा कालदुष्टीचे हे परिणाम घातक होण्यास स्वास्थ्यानुकूल आहार-विहाराचा भंग हे कारण असतेच असे नव्हे. इतकेच काय पण अशा कोणत्या तरी विशिष्ट रोगाने आक्रांत झालेल्या व्यक्तीच्या सहवासात आसन, शयन, श्वासोच्छ्वास, भोजन,वस्त्रप्रावरणादींचा अथवा त्या व्यक्तीने वापरलेल्या अलंकार, पुष्पमाला इत्यादींचाही वापर करून संबंधित झालेल्या अन्य व्यक्तीही त्याच रोगाच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शयता असते. म्हणूनच अशा रोगांना सांसर्गिक स्वरूपही येत असते. जनपदोध्वंसक रोग सांसर्गिक होणे शय असते परंतु सांसर्गिक रोग जनपदोध्वंस होतातच असे नाही हे लक्षात ठेवावयास हवे.
जनपदोध्वंस प्रतिकार : मानवेतर प्राण्यांना जनपदोध्वंस कारणांची घडामोड सृष्टीत होत असल्याचे ज्ञान अगोदर होत असते, ही एक गोष्ट विशेषच म्हटली पाहिजे. नित्याचे मुक्त संचार करणारे पशुपक्षी, उंदीर वगैरे प्राणी ज्या प्रदेशाचा त्याग करून निघून जातात तेथे ती जन-पदोध्वंसनाचीच सूचना होय असे समजून मानवांनीही स्थान त्याग करून अन्य प्रदेशात जावे हे उत्तम.
शिवाय जो कोणताही सामूहिक उपद्रव सुरू झाला असेल त्याला अनुसरून आहार, आचार आणि औषधादींच्या उपायाने स्वास्थ्यरक्षण करावयास पाहिजे.
देशविचार : स्वास्थ्याच्या दृष्टीने देशाचेही भेद लक्षात घ्यावे लागतात. जांगल, आनूप आणि साधारण असे देशाचे तीन भेद आहेत.
जांगल देश : एकाच पातळीत सपाट असा दूरवर पसरलेला, ज्यात काटेरी वृक्षच अधिक, इतरांची संख्या कमी, जेथे वृष्टी अल्प होते, नद्याही भरपूर प्रवाहाने नित्य वाहणार्या नसतात तसेच झरे, तलाव इ. जलाशयही अत्यल्प जलयुक्त किंवा क्वचित निर्जल असतात, वारे उष्ण व दारुणगती युक्त वाहतात, उत्तुंग पर्वत टेकड्या इत्यादींची संख्या तुरळक असते आणि ज्या देशात राहणारी माणसे कठीण व वाळ्या शरीराचीच अधिक असून वातपित्तात्मक रोग ज्या देशात अधिक होतात तो जांगल देश होय.
आनूप देश : जांगल देशाहून अगदीच उलट स्वरूपाचा म्हणजेच ज्या देशात नद, नद्या व जलाशय नित्य अथांग पाण्याने भरलेले आणि प्रवाहयुक्त असतात, वृष्टी अत्याधिक होते, थंड वारे मंद गतीने नित्य वाहत असतात, गगनचुंबी वृक्ष आणि विशाल व उत्तुंग पर्वतांनी जो देश व्याप्त आहे, जेथील माणसे मृदू , सुकुमार व गुबगुबीत शरीराचीच अधिक दिसतात आणि कफ व वात दोषजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक असतो तो आनूप देश होय.
साधारण देश : थंडी, उष्णता व वृष्टी यांचे प्रमाण मध्यम, वारे अतिउष्ण वा अतिशीत नसणारा, माणसे मध्यम शरीरबांध्याची असून दोषांच्या समतेमुळे रोगांचेही प्रमाण बहुधा नसते. असा देश साधारण देश म्हटला जातो व तोच श्रेष्ठ समजावा.
दिशा भेदाने वायूचे गुणधर्म : पूर्व दिशेचा वारा : शीत, अतिमधुर, वातप्रकोपी, स्निग्ध व लवण हे गुण अतिअल्प आणि गुरू गुणाचे आधिय असल्याने विदाह उत्पन्न करणारा, रक्तपित्त वाढविणारा आणि व्रण रोगी, उरःक्षत, विषसंसर्ग आणि कफसंबंधी विकृतीला अहितकारक असतो.
पश्चिम दिशेचा वारा : स्वच्छ परंतु रुक्ष, तीक्ष्ण, खरखरीत व झोंबणारा असून शरीराची स्निग्धता कमी करणारा व बलनाशक असतो परंतु कफ व मेदाचे शोषण करणारा असल्याने त्यासंबंधी रोग असतील त्यांना हितकर असतो.
दक्षिण दिशेचा वारा : याला मलयानील असे नाव आहे. हा वारा शीत, अतिमंद, सुगंधी, कडवट, मधुर, तुरट, आल्हादकारक, कामोत्तेजक, विदाह न करणारा, डोळ्यांना हितावह व बलवर्धक असतो.
उत्तर दिशेचा वारा : स्निग्ध, मधुर, सौम्य तसेच शीत किंवा उष्ण नसल्याने कोणताही दोष वाढवीत नाही बलकर आहे. क्षीण झालेले क्षयी आणि विषपीडित यांना तो हितावह असतो.
ईशान्य दिशेचा वारा : शीत, कफ व वात प्रकोपक तसेच व्रण, सूज, खोकला, श्वास, क्षय ह्या रोग्यांना हितावह नसतो.
आग्नेय दिशेचा वारा : सुशीतल, किंचित कडवट, मधुर असून कफ आणि वात ह्या दोषांचे रोग करणारा असतो.
नैर्ऋत्य दिशेचा वारा : रुक्षोष्ण, तिखट, अम्ल असून पित्त व रक्तदोषवर्धक, शरीर बलशोषक व कफयुक्त असतो.
वायव्य दिशेचा वारा : प्रशस्त, तुरट, शुष्क, प्रसन्न, वातकारक असून व्रण व सूज असणार्या रोग्यांना अयोग्य असतो.
यांशिवाय वारा घेण्याच्या साधनांचा उपयोगही परिणाम करीत असतो.
वस्त्रांचा वारा : (१) पांढर्या वस्त्रांचा वारा व्रण व सुजेच्या रोग्यांना हितावह नव्हे. (२) तांबड्या वस्त्रांचा वारा कफ व रक्तदुष्टी करून विविध रोगकारी असतो. श्रम, ग्लानी, तहान, निद्रा, तंद्रा व कृशत्व करणारा असतो.
पंख्याचा वारा : (१) बांबूच्या कामट्यांच्या पंख्याचा वारा तंद्रा व निद्राकर, रुक्ष, अतिकषाय व वात प्रकोपक असतो. (२) वाळ्याचा व मोरपिसांचा वारा सुगंधी, मंद व शीतगुणयुक्त असून ग्लानी, मूर्च्छा, श्रम, शोष, विसर्प व विष दर्पनाशक आहे. (३) ताडाच्या पंख्याचा आणि केळीच्या पानांचा वारा थंड, मधुर, श्रमहर, ओलेपणामुळे कफकारक, झोप व प्रीती वाढविणारा असून सूज, दाह, पित्त, ग्लानी व वातनाशक आहे.
काशाच्या भांड्याचा वारा रुक्ष, किंचित उष्ण, वातशामक, दाह व श्रमनाशक, स्वेदनाशक व सुखाची झोप आणणारा असतो.
वृष्टी व सूर्याची उष्णता यांचा देशावर परिणाम : ऋतूंच्या परिवर्तनाचा देशावर स्वास्थ्यानुकूल वा प्रतिकूल परिणाम होणे अपरिहार्य असते. ग्रीष्म ऋतूत सूर्यकिरणांची अतिप्रखरता आणि वर्षाऋतूत अतिवृष्टी झाली, तर तिचाही परिणाम स्वास्थ्यावर अनिष्ट होतो. ग्रीष्म ऋतूत सूर्याच्या प्रखर किरणांनी पृथ्वीवरील द्रव आणि स्निग्ध गुणांचे शोषण होऊन रुक्षता निर्माण होते, रुक्ष गुणाने वायूची वृद्धी होते, वायू उष्ण होतो, सूर्य आणि वायू यांचे उत्तर दिशेच्या कक्षेतून गमन होत असल्याने तो मार्गही रुक्ष होतो व भूपृष्ठावरील सौम्य गुण नष्ट होऊन आग्नेय गुण वाढल्याने भूपृष्ठाच्या त्या कक्षेत येणार्या प्रदेशात राहणार्या मानवांची शक्ती कमी होते.
वर्षा ऋतूत मेघवृष्टीने भूमी आर्द्र होते, वनस्पती उगवतात. त्या कोवळ्या असल्याने अल्पवीर्य असतात. मेघवृष्टीबरोबर पाण्यात भूपृष्ठावरील माती, धूळ इ. मिश्र होऊन जलाशय गढूळ व चिखल युक्त होतात. आकाश मेघाच्छादित आणि वायू शीत व आर्द्र होतो. यामुळे प्राण्यांचा जठराग्नी मंद होतो, सौम्य गुणांची वृद्धी, सूर्य हीनबल होऊन परिणामी अपचन व तज्जन्य रोग वाढतात. इतर ऋतूंबद्दलही असेच म्हणता येईल. अर्थातच स्वास्थ्य रक्षण करावयाचे तर त्या त्या ऋतूत शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आहार-विहाराचे परिपालन करून व ऋतूंचे गुणधर्म हवामानाला अनुसरून नसतील तर बदलत्या हवामानाला अनुसरून आहार–विहार आणि अन्य साधनांचा अवलंब करून यथायोग्य प्रतिकाराने दुष्परिणाम टाळून स्वास्थ्य सांभाळावे.
श्रेष्ठतम द्रव्य-गुण-कर्म : योग्य तो एकमेव श्रेष्ठतमभाव निर्माण करणारी द्रव्ये, गुण आणि कर्मे शास्त्रात वर्णिली आहेत. उदा., पाणी हे जीवनक्रियेला तात्काळ चालना देण्यात श्रेष्ठ, सुरा ही थकवा नष्ट करण्यात, दूध हे जीवनक्रियेसाठी, मांस हे पुष्टीसाठी, तूप हे वातपित्तशमनासाठी, म्हशीचे दूध झोप आणण्यासाठी, आवळा वयःस्थापन म्हणजे शरीराला जरा ( वार्धय ) न येऊ देण्यासाठी, हिरडा सर्व पथ्यकर द्रव्यात, ताक हे ग्रहणी, मूळव्याध आणि तुपाच्या अधिक सेवनाने होणार्या रोगांसाठी श्रेष्ठ द्रव्य असल्याचे अनुभवाने म्हणता येते.
गुणकर्मांच्या श्रेष्ठतेच्या दृष्टीने वमनक्रिया कफनाशनासाठी, विरेचन पित्तासाठी, बस्ती वातासाठी, योग्य काळी भोजन आरोग्यदायक म्हणून, एकवेळ भोजन पचनसुलभतेच्या दृष्टीने, आयुष्यवर्धनासाठी ब्रह्मचर्य-पालन, आणि बलवर्धनासाठी सर्वरसांचे नित्य सेवन श्रेष्ठ गणले आहे.
अपाय करण्यातही काही गोष्टी श्रेष्ठ आहेत. उदा., क्षारसेवन पुरुषत्वनाशक म्हणून, वेगांचा अवरोध करण्याची सवय रोगोत्पत्तीसाठी, अतिरिक्त विषयसेवन क्षयोत्पादक म्हणून, शुक्रवेगधारण नपुंसकत्व आणण्यात, फार लंघन हे आयुष्याचा र्हास करण्यात व एकाच रसाचे नित्यसेवन दुर्बलता आणण्यात श्रेष्ठ होय. अशी अनेक उदाहरणे शास्त्रकारांनी ग्रंथातून दिली आहेत. येथे फक्त नाममात्र निर्देशन केले आहे.
औपसर्गिक रोग : एका व्यक्तीच्या सहवासात वा संसर्गात आलेल्या व्यक्तीला त्या पहिल्या व्यक्तीला असलेल्या ज्या रोगांची बाधा होण्याची शयता असते ते सर्व रोग औपसर्गिक रोग होत. परस्पर ह्या दोन्ही व्यक्तींचा सहवास, सहभोजन, श्वासोच्छ्वास, एकत्र शय्या, बैठक, आलिंगन, चुंबन, संभोग ह्या क्रियांमुळे घडतो व त्यामुळे हा रोग संसर्ग पोहोचतो. इतकेच नव्हे तर एका व्यक्तीने वापरलेली वस्त्रे, माला, उटणी, लेप इत्यादींचा वापर दुसर्या व्यक्तीने केला तरी सुद्धा ही बाधा होऊ शकते. कुष्ठ, ज्वर, क्षय, डोळे येणे वगैरे रोग अशा जातीचे होत. अर्थातच रोगांचा उपसर्ग टाळण्यासाठी वरील सर्व गोष्टी कटाक्षाने टाळावयास हव्यात.
कुष्ठादी हे सांसर्गिक रोग आहार-विहारातील घडणारे दोष, दूषित वायू , उदक, देश, काल यामुळेच प्रथम एका व्यक्तीला होतात.
उपचार : अशा ह्या रोगांवर करावयाचे उपचार त्या त्या रोगाला अनुसरून करावे लागतातच परंतु त्याबरोबर रोगी व्यक्तींचा शारीर संसर्ग, वर सांगितल्याप्रमाणे वस्त्रमाल्यादींचा उपयोग कटाक्षाने टाळणे, दूषित वायू , उदक, देश व कालाची शुद्धी इ. क्रियांच्या द्वारे उपचार करणे इष्ट असते. [⟶ आतुरचिकित्सा].
कालमृत्यु-अकालमृत्यू : शंभर वर्षे हे ह्या युगातील मानव प्राण्याचे आयुर्मान शास्त्रसंमत आहे. अर्थातच निरामय स्थितीत पूर्ण शंभर वर्षांचे आयुष्य उपभोगल्यानंतर येणारा जो मृत्यू तो कालमृत्यू होय.
चरकाचार्य म्हणतात : (१) प्रकृतिसंपत् म्हणजे वात, पित्त, कफ हे तीनही दोष प्रकृतीत सम असणे. (२) गुणसंपत् म्हणजे शरीरातील धातु- सारत्व, संहनन इ. संपन्न असणे किंवा मातापित्याकडून सर्व सद्गुणांची प्राप्ती होणे. (३) आत्मसंपत् म्हणजे धर्माचरणाच्या नित्यसेवनाने आत्मबल वाढणे आणि (४) सात्म्योपसेवन म्हणजे पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे प्रकृतीला अनुकूल अशा आहार-विहाराचे निष्ठापूर्वक सातत्याने परिपालन करणे ह्या चार गोष्टीच प्रामुख्याने मनुष्याला शतायुषी करण्यास पोषक असतात.
रोगाच्या निमित्ताने अथवा आघात-अपघाताने वयाच्या शंभरीपूर्वी येणारा मृत्यू तो अकालमृत्यू होय. शक्तीपेक्षा अधिक श्रम, शरीराची वेडीवाकडी हालचाल, मलमूत्रादी वेगांचा अवरोध करण्याची सवय, आघात-अपघात, रोगावर वेळीच योग्य उपचार न होणे, राग शोकादींचे आत्यंतिक परिणाम आणि अव्यवस्थित आहार — विहार ही अकालमृत्यूची कारणे संभवतात.
रोगानुत्पादन : रोग उत्पन्नच न होऊ देणे यालाच रोगानुत्पादन म्हणतात. स्वास्थ्यासाठी तेच सर्वप्रथम दक्षतेने करावयाचे हेच आयुर्वेद-शास्त्राचे प्रधान उद्दिष्ट आहे. झालेल्या रोगांचा प्रतिकार हे त्यानंतरचे कर्तव्य. रोगोत्पत्तीच्या अनेक कारणांतील अत्यंत महत्त्वाचे कारण शरीरधर्मानुसार मलमूत्रादी वेगांचा अवरोध करणे हे होय. त्या वेगांचे सर्वसाधारण १४ प्रकार संभवतात. ह्या वेगांचा अवरोध जसा रोगकारक होतो त्याचप्रमाणे वेग आला नसता त्याला बळेच प्रवृत्त करणे हेही रोगकारक असते. वेगांच्या अव- रोधाला वेग विधारण व प्रवर्तनाला वेगोदीरण अशी नावे आहेत. ह्या वेगाच्या अवरोधामुळे होणारे उपद्रव आणि त्यांचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत :
अपान वायूचा वेगावरोध : अधोमार्गाने वारा सरणे ही अपान वायूची नैसर्गिक प्रवृत्ती आहे परंतु तसा तो सरत असता संकोच, लज्जा अथवा भीतीने किंवा दुर्लक्ष होऊन अडविला जातो. दीर्घकाल ही सवय चालू राहिल्यास गुल्म, उदावर्त, थकवा, वात, मूत्र वा मलाचा अवष्टभंग, नेत्ररोग, अग्निमांद्य व हृद्रोग हे संभवतात.
उपाय : गेळफळ इ. औषधांची वात ( फलवर्ती ) अपान मार्गात ठेवणे. अभ्यंग करणे, वातनाशक द्रव्यांचा काढा मोठ्या द्रोणीत (टबात) घालून त्यात बसणे, घाम येईल असे वाफारे, शेक इ. उपचार आणि बस्ती घेणे.
उद्गार ( ढेकर ) अवरोध : अरुची, सर्व अंगात कंप, हृदय व छाती जखडणे, पोट फुगणे, खोकला व उचकी हे उपद्रव होतात.
उपाय : उचकीनाशक खानपान व औषध देणे, धूमपान, नस्य, कवलग्रह यांची शास्त्रोक्त योजना करावी. महाळुंग रस आणि सौवर्चल ( पादेलोण, संचळ ) मद्यामध्ये मिश्र करून पिण्यासाठी द्यावी.
मल प्रवर्तन वेगावरोध : पिंडर्यांत गोळे येणे, पडसे, डोकेदुखी, वायू ऊर्ध्व होणे, गुदामध्ये कातरल्यासारखी पीडा, हृदयाचा अवरोध, मल प्रवृत्ती तोंडातून होऊ लागणे आणि शिवाय वर सांगितलेले अपान वायू आणि ढेकर यांच्या अवरोधाचेही उपद्रव संभवतात.
उपाय : जवाचे अन्न, दह्याची निवळ, चाकवतासारख्या भाज्या आणि मल प्रवर्तक व मल भेदक इतर आहार देणे.
मूत्र वेगावरोध : ओटीपोट, जननेंद्रिय व जांघा यांत वेदना, अंगभंग ( अंग फुटते आहे असे वाटणे ), मुतखडा, आणि शिवाय वरील तीनही वेगावरोधामुळे होणारे उपद्रव संभवतात.
उपाय : अपानकाली ( जेवणास बसताना ) तूप पिण्यास द्यावे. तसेच भोजनानंतरही द्यावे. या पद्धतीला ‘ अवपीडक पद्धती ’ म्हणतात.
शिंकेच्या वेगाचा अवरोध : शिरःशूल, इंद्रिय दौर्बल्य, मन्यास्तंभ (मान आखडणे ), अर्दितवात ( तोंड वाकडे होणारा वात ) असे उपद्रव संभवतात.
उपचार : स्नेह, स्वेदविधी करावा. औषधी धूमपान, अंजन, नस्य, मान वर करून सूर्याकडे पाहणे ( डोळे मिटून ) असे तीक्ष्ण उपाय करावेत.
तहानेच्या वेगाचा अवरोध : तोंड व टाळू सुकणे, अंग गळून जाणे, बहिरेपणा, मोह, भोवळ आणि हृद्रोग हे उपद्रव संभवतात.
उपाय : तूप घालून सातूचा मंथ थंड पाण्यात केलेला प्यावा. थंड कण्हेरी प्यावी. इतरही शीतोपचार या वेळी हितावह होतात.
भुकेच्या वेगाचा अवरोध : अंग फुटल्यासारखे वाटणे, अरुची, ग्लानी, कृशता, शूल व भोवळ हे उपद्रव संभवितात.
उपाय : हलके परंतु स्निग्ध व उष्ण असे अल्पसे भोजन द्यावे.
निद्रावेगाचा अवरोध : मोह, डोयात जडत्व, डोळे जड वाटणे, आळस, जांभया अधिक येणे व अंग मोडून येणे हे उपद्रव संभवतात.
उपाय : झोपणे, सुखस्पर्शयुक्त अंगमर्दन करणे यावेळी हितावह होते.
खोकल्याचा वेगावरोध : खोकला वाढतो, श्वास लागतो, अरुची, हृद्रोग, क्षय आणि उचकी हे उपद्रव संभवतात.
उपाय : खोकल्यावरील योग्य ते उपाय करावेत.
श्रमाने लागलेल्या श्वासाचा वेगावरोध : गुल्म, हृद्रोग, मोह उत्पन्न करतो.
उपाय : विश्रांती हाच मुख्य उपाय आणि वातनाशक चिकित्सा व मांसरसाशी भोजन.
जांभईचा वेगावरोध : शिरःशूल, दुर्बलता इ. उपद्रव संभवतात.
उपाय : स्नेह, स्वेद आणि वातनाशक चिकित्सा.
अश्रूंचा वेगावरोध : पडसे, नेत्ररोग, शिरःशूल, हृदयशूल, मन्यास्तंभ, अरुची, भ्रम आणि गुल्मरोग यांचा संभव असतो.
उपाय : झोप घेणे, मद्यसेवन, प्रिय गोष्टीत मन गुंतविणे.
वांतीचा वेगावरोध : विसर्प ( धावरे रोग ), कोठ ( अंगावर लालसर गांधीसारखी मंडले उमटणे ), कुष्ठ, नेत्ररोग, खाज, पांडुरोग, ज्वर, खोकला, श्वास, उम्हासे, व्यंग ( वांग ) आणि सूज हे उपद्रव संभवतात.
उपाय : औषधी पाण्याने गुळणे करणे, औषधी धूर घेणे, लंघन, रुक्ष अन्न खाऊन ते ओकून काढणे, व्यायाम, रक्तमोक्ष, विरेचन आणि क्षार किंवा लवणयुक्त तेलाचे अभ्यंग करणे.
शुक्र वेगाचा अवरोध : शुक्रस्राव, गुह्य भागात वेदना, सूज, ताप, हृदयपीडा, मूत्रावरोध, अंग मोडून येणे, आंत्रवृद्धी, मुतखडा व नपुंसकता हे उपद्रव संभवतात.
उपाय : कोंबड्याचे मांस, मद्यपान, साळीचे अन्न, बस्तिविधी, अभ्यंग, गोखरूसारख्या बस्तिशुद्धिकर औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले दूध आणि प्रिय स्त्रियांशी रममाण होणे.
वेगविधारणामुळे उत्पन्न झालेल्या विकारांचे साध्यासाध्यत्व : ही सर्व कारणे स्वास्थ्याला विघातक म्हणजेच अपथ्यच होत. यासाठी ती टाळणेच हितावह होय. जेव्हा अशा विकारांनी पीडित रोगी अत्यंत तहान व भूक लागून व्याकूळ होईल, क्षीण बल होईल आणि वांतीच्या बरोबर मलही येऊ लागेल तेव्हा तो असाध्य समाजावा. वेगावरोधाने ज्या ज्या विकृती उत्पन्न होतील त्या सर्वांना मिळून उदावर्त म्हणतात.
वेगावरोधाने वायू प्रकुपित होतो. याचा प्रतिकार करताना वायूच्या गतीला अवरोध होऊन उलट म्हणजे प्रतिलोम गती मिळणे ही गोष्ट प्रामुख्याने वेगावरोधाच्या प्रत्येक प्रकारात घडत असते, यासाठी वायूला स्वस्थानी आणून त्याची गती अनुलोम करणे इष्ट असते. म्हणून स्नेह, स्वेद, बस्तिविधी इ. उपचार करावयास हवेत.
कोणते वेग धारण करणे इष्ट आहे ? : लोभ, ईर्षा, मात्सर्य, द्वेष, क्रोध इ. मानसिक विकारांच्या वेगांना आवरलेच पाहिजे. तसे न केल्यास मन व शरीर दोन्हीही विकृत होऊन स्वास्थ्याची हानी होईल. असे वेग आवरण्याला संयमाचीच जरूरी आहे.
चरकाचार्यांनी अप्रशस्त कर्म, साहस कर्म आणि काया-वाचा-मनाने होणारी निष्फल कामे करण्याच्या मोहाचा वेगही आवरावा असे म्हटले आहे. तसेच इतरांना काया-वाचा-मनाने दुखविणे, अतिविषयसेवन, हिंसा, चोरी इ. प्रवृत्तींनाही आवरण्याची सूचना दिली आहे.
मलांचे यथाकाली शोधन : प्रतिक्षणी झिजणार्या शरीराची घडामोड अव्याहत चालू असते. ह्या घडामोडीत शरीरपोषणास आवश्यक असे घटक अन्नपानातून पचनमार्गे शोषले जातात आणि मलरूप अशा त्याज्य भागांचे विसर्जन शरीराकडून घडत असते. तरी सुद्धा त्याज्य मलांश शरीराबाहेर विसर्जित होत असता त्याचे अवशेष त्या त्या मार्गात अत्यल्प प्रमाणात साचत राहतात आणि निरनिराळ्या ऋतूंमध्ये स्वाभाविक दोषांची शरीरात वाढ होत असता, जर त्यावेळी ह्या मलांशाला विसर्जित केले गेले नाही, तर त्यामुळे स्वास्थ्य बिघडते. म्हणून अशा ह्या संचित मलांचे विसर्जन स्नेह, स्वेद, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, शिरावेधद्वारा रक्तमोक्षण अशा प्रक्रियांनी करावयास हवे. या प्रकारे संशोधनाने दोष शुद्ध झाल्यावर ते पुन्हा वाढून अस्वास्थ्य उत्पन्न करीत नाहीत.
हेमंतातील संचित दोषांचे वसंत ऋतूत, ग्रीष्मातील संचित दोषांचे वर्षा ऋतूत आणि वर्षा ऋतूतील संचित दोषांचे शरद ऋतूत शोधन करावे म्हणजे त्या त्या ऋतूसंबंधीच्या दोषवृद्धीचे रोग होत नाहीत.
मलवृद्धी व क्षय : आपले संपूर्ण शरीर हे रंध्रमय आहे. ही रंध्रे अंतःशरीरातील स्रोतसांची बाहेरची मुखेच आहेत. या रंध्रांतून शरीराच्या अंतर्भागात उत्पन्न होणारा मल शरीराबाहेर टाकला जातो.
शरीराच्या अधोभागी दोन, शिरोभागी सात आणि त्वचेतून घाम बाहेर जाण्यासाठी असंख्य सूक्ष्म रंध्रे आहेत. यांनाच मलायने म्हटले आहे.पचन व्यापारात खाद्यपेय द्रव्यांचे रसरक्तादी धातुघटकात रूपांतर होत असताच त्याज्य भाग शरीराबाहेर पडावा ही नैसर्गिक योजना असते. त्याज्य भागाला मल ही संज्ञा आहे. मल, मूत्र आणि घाम हे मुख्य मल असून नाक, कान, डोळे, घसा व गुह्येंद्रिये यांच्या ठिकाणीसुद्धा निरनिराळ्या धातुघटकांचे मल असतात. अशा ह्या सर्वही मलांची उत्पत्ती नियमित व योग्य प्रमाणात होत राहणे आणि त्यांचे यथाकाल यथा प्रमाणात विसर्जन होत राहणे शारीरस्वास्थ्याला अत्यावश्यक आहे. मल उत्पन्न होत राहून त्यांचा संचय होत राहिला, विसर्जन झाले नाही तर त्या मलामुळे त्या त्या इंद्रियांच्या ठिकाणी जडत्व निर्माण होते व त्या त्या इंद्रियांसंबंधी विकार उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे जर ह्या उलट त्या त्या इंद्रियातून प्रमाणाहून अधिक मलाचे विसर्जन होऊ लागल्यास उत्पत्तीपेक्षा मलाचा खर्च अधिक होतो, म्हणजेच त्या त्या मलाच्या रूपाने पुढेपुढे ते ते धातुघटकच शरीरातून जाऊ लागतात व मलक्षयजन्य विकार उत्पन्न होतात. मलक्षयामुळे त्या त्या इंद्रियालाही क्षीणत्व आणि हलकेपणा प्राप्त होतो. यासाठी शरीरात मलाची वृद्धी किंवा होणारा क्षय ह्या दोन्हीच्या प्रमाणावर नित्य लक्ष असणे इष्ट आहे.
मलवृद्धी किंवा मलक्षय ह्यासंबंधी होणार्या विकारात दुष्ट दोषांचा विचार करून उपचार करावयाचा असतो. अर्थातच तो विचार करताना वृद्ध दोषांचा र्हास करणे, क्षीण झाले असतील त्या दोषांना वाढविणे आणि जे समान स्थितीत असतील त्यांची ती स्थिती टिकवून ठेवणे हेच स्वास्थ्यसंपादनाचे महत्त्वाचे गमक आहे. [⟶ दोषधातुमलविज्ञान ].
आगंतुरोग : शरीरात आरंभी दोषदुष्टी नसता अनेकानेक बाह्य कारणांनी स्वास्थ्य विकृत होते व नंतर त्या कारणांनुसार दोषाच्या दुष्टीची निर्मिती होते. अर्थातच प्रथम रोगोत्पत्ती व नंतर दोषदुष्टी घडणारी ही स्थिती असल्यामुळे त्या रोगाला आगंतुरोग म्हणतात.
अनिष्ट ग्रहांची बाधा, विषसंसर्ग, वादळी विकृत वारे, भाजणे, पोळणे, शस्त्र, काष्ठ, दगड इत्यादींचे आघात होऊन झालेले व्रण, आघात–अपघातादींनी हाड मोडणे अथवा अन्य अवयव विकृत होणे हे सर्व प्रकार तसेच राग, द्वेष, भीती, कामविकार, शोक ही सर्व आगंतुरोगाचीच उदाहरणे होत.
आगंतुरोगप्रतिबंध : अशा ह्या आगंतुरोगांची पीडा न व्हावी म्हणून बुद्धिपूर्वक घडणारे आहार —विहार विषयक अनाचार टाळणे, इंद्रियांच्या उच्छृंखल वृत्तींना आवरणे, एकदा घडलेल्या अपराधाचे अथवा असाव-धानतेने घडलेल्या दुष्परिणामाचे स्मरण ठेवून ती दक्षता बाळगणे. देश, काल, आत्मानात्म विचार, सद्वृत्तीचे अनुष्ठान करणे ह्यातून यथायोग्य उपायांचे यथाशय परिपालन करणे इष्ट असते.
मनःशांती : शरीराप्रमाणेच मनाच्या स्वास्थ्यासाठी मनाला विचलित होऊ न देता शांत ठेवणे, त्रस्त वा उन्मत्त न होऊ देणे अत्यावश्यक असते, म्हणून त्याकरिता : (१) इंद्रिये आणि त्यांचे विषय यांचा असात्म्य संयोग न घडू देणे. (२) कोणतेही कार्य हाती घेताना दूरदृष्टीने त्याच्या परिणामाचा सारासार विचार करणे. (३) आपले म्हणणे कुणालाही सांगणे, सुचविणे वा बोलणे युक्तिसंगत असावे. (४) आपल्या प्रत्येक वागणुकीत देश, काल व आत्मगुणांचा विचार असावा. (५) चंचल मनाला अधिक भ्रमण करण्यात गुंतवू नये. (६) बुद्धिंद्रियांवर त्यांच्या शक्तीपेक्षा अधिक कार्याचा भार घालू नये. (७) कोणत्याही कार्यात वा गोष्टीत नसता दीर्घसूत्रीपणा करू नये. (८) अतिक्रोध, अतिहर्ष, अतिशोक यांच्या आधीन होऊ नये. (९) कार्यामध्ये झालेल्या लाभाचा हर्ष अथवा गर्व किंवा हानीसाठी दैन्य स्वीकारू नये. (१०) कोणत्याही साहस कर्मापासून काया-वाचा-मनाने अलिप्त राहावे. यांशिवाय ङ्क सद्वृत्त ङ्ख प्रकरणात सांगितलेल्या सर्व गोष्टींचे परिपालन करावे.
आहार-शयन-अब्रह्मचर्य : शरीर धारण व स्वास्थ्य रक्षणासाठी शास्त्राने सांगितलेल्या गोष्टींमध्ये मुख्यतः आहार म्हणजे भोजन, शयन म्हणजे झोप आणि अब्रह्मचर्य म्हणजे विषयसेवन ह्या तीन गोष्टींचे युक्तीने म्हणजेच त्या त्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने सेवन करणे हीच गोष्ट महत्त्वाची ठरते.
अगदी प्रारंभीच सांगितल्याप्रमाणे शरीरस्थ वातादी तीनही दोष, रसादी सप्तधातू व पुरीषादिमल यांची कामे तसेच जठराग्नीचे पचनकार्य ही सर्व सुरळीत व समप्रमाणात असून आत्मा, इंद्रिये आणि मन यांची नित्य प्रसन्न स्थिती राहणे म्हणजेच स्वास्थ्य होय. ते सतत टिकून राहण्यासाठी नित्य हित व मित आहारसेवन, योग्य आणि मर्यादित विहार, विषयसेवनात परिमितता, दानबुद्धी, क्षमावृत्ती, प्राणिमात्रांविषयी समभाव, आप्तेष्टांची यथाशय सेवा व त्यांना साह्य करण्याची वृत्ती सदैव जागृत ठेवणे हेच स्वस्थवृत्ताचे गमक आहे.
आचार रसायन : मानसोन्नतीच्या दृष्टीने स्वस्थ लक्षणाच्या निवेदनात अगदी प्रारंभी सांगितलेल्या तीन प्रकारांपैकी अति-आरोग्य व संपूर्ण आरोग्य संपादनाच्या दृष्टीने ‘ आचार रसायन ’ विधीचे विशेष महत्त्व आहे. त्यासाठी सत्यभाषण, क्रोधत्याग, मद्यमैथुननिवृत्ती, अहिंसाप्रवृत्ती, शांत स्वभाव, मधुर भाषण, इष्ट देवतेचा जप, पवित्र आचारविचार, धैर्य, दान, तप, वयोवृद्ध व गुरुजन ह्यांची पूजा आणि सेवा, दुःखितांचा कळवळा, जागरण किंवा झोपेविषयी सारखीच वृत्ती, दूध, तूप युक्त आहार-सेवन, देशकाल प्रमाणाची जाणीव, अहंकाररहित वृत्ती, अध्यात्माकडे इंद्रियांचा ओढा, आस्तिक आणि संयमी सज्जनांचा सहवास, धर्मावर आत्यंतिक निष्ठा व तद्नुसार आचरण ह्या सर्व गोष्टी जो आचरणात आणतो तो पुरुष नित्य रसायन सेवन करीत आहे, असे समजावे.
सद्वृत्त परिपालनाचाही यात समावेश होतो. ह्या प्रकारचे आचार परिपालन मनःशांती प्राप्त करून देणारे, शरीरात सौम्य भाव निर्माण करणारे, कृतज्ञता आदी सत्प्रवृत्तींची वाढ करून ओजोवृद्धी करणारे असल्याने स्वास्थ्यसंपादन आणि स्वास्थ्यरक्षण ह्या दोन्ही दृष्टींनी ते हितावह होते.
पहा : आतुर चिकित्सा; आयुर्वेद; आरोग्यविज्ञान; ग्रहचिकित्सा; दोषधातुमलविज्ञान; पथ्यापथ्य; शरीर; वमन; सात्म्यासात्म्य; सृष्टि व मानव.
जळूकर, दत्तात्रेयशास्त्री