अग्नि : अग्नी म्हणजे जिच्यामुळे उजेड व उष्णता ही उत्पन्न होतात, अशी वेगाने घडून येणारी रासायनिक विक्रिया. या विक्रियेच्या अंगी स्वत:ला चालू ठेवण्याचा गुण असतो व मुद्दाम विझविल्याशिवाय किंवा जळण संपल्याशिवाय ती थांबत नाही. सामान्य जैव पदार्थांतील कार्बन किंवा एखादे ज्वलनशील द्रव्य व ऑक्सिजन यांचा वेगाने संयोग होऊन उष्णता, ज्योत व प्रकाश ही उत्पन्न होतात [→ ज्वलन]. ऑक्सिजनाशिवाय इतर मूलद्रव्यांशी विक्रिया होण्यामुळेही अग्नी उत्पन्न होणे शक्य असते. उदा., जस्तासारख्या काही विक्रियाशील धातू क्लोरिनाच्या वातावरणात घातल्यामुळेही प्रकाश व उष्णता उत्पन्न होतात. अशा विक्रियांचाही समावेश अग्नी या संज्ञेत केला जातो.

ज्योतीमुळे अग्नीचे अस्तित्व कळून येते पण अग्नी असला म्हणजे ज्योत असलीच पाहिजे असे नाही. ज्योतीशिवायही अग्नी असू शकतो. जळताना इंधन बाष्परूपात असेल तर ज्योत निमाण होईल. सामान्यत: ज्योतीमधील कण तापदीप्त (तापल्याने प्रकाश देणारे) झाले म्हणजे प्रकाश उत्पन्न होतो. ज्योतीचा रंग हा ज्वलनाच्या विक्रियेत भाग घेणार्याय द्रव्यांवर व तापमानावर अवलंबून असतो [→ ज्योत].

अग्निनिर्मितीचा शोध हा मानवाने लाविलेल्या महत्त्वाच्या अशा शोधांपैकी एक किंवा सर्वांत महत्त्वा‍चाही ठरेल. आधुनिक उद्योगधंद्यांत व दळणवळणाच्या यंत्रांत व उपकरणांत व वाहनांत अग्नीचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो व अग्नीचा नियंत्रित उपयोग हा यांत्रिक युगातील व्यवहारांचा पायाच आहे. विस्तवाशिवाय आपले घरगुती व्यवहारही चालणार नाहीत. अनियंत्रित अग्नि हा आग लावणे, भाजणे इ. अपघातांस कारणीभूत होतो. या अपघातांचे निवारण करण्याची व्यवस्था करावी लागते.

कारेकर, न.वि.

अग्निनिर्मितीचे तंत्र मनुष्यास प्रथम अवगत झाल्याचा क्षण हा मानवी प्रगतीचा अत्यंत महत्त्वा‍चा टप्पा होय. भौतिक प्रगती व बऱ्याच प्राचीन धर्मसंस्था यांत अग्नीला प्रमुख स्थान आहे. थंडी, हिस्त्र प्राणी, शत्रू इत्यादिकांपासून बचाव, औषधे, अन्न पक्क करणे व धातू गाळून त्यांपासून हत्यारे निर्मिणे यांचे मुख्य साधन अग्नी.

प्राथमिक संस्कृतींनी मुख्यत्वे अग्निनर्मितीची तीन तंत्रे वापरली, ती म्हणजे घर्षण, आघात व बर्हिर्गोल भिंगातून ज्वालाग्राही वस्तूंवर उष्ण सूर्यकिरण टाकणे. वाळक्या कडक लाकडाचा घुसळदांडू व लाकडाचा पाट यांस ‘अरणी’ म्हणतात. या घुसळदांडूच्या खाली मऊ, भुसा होईल असा लाकडाचा तुकडाही जोडतात. या पाटाला मध्यभागी खोलगट भाग असतो. पाटाच्या खोलगट भागात घुसळदांडू दोरीने जलद फिरविला म्हणजे भुसा तयार होऊन तो जळू लागतो. घुसळदांडूच्या डोक्यावर दाबपट्टी बसविलेली असते व मुळाशी लाकडाच्या चौकोनी तुकडा बसविलेला असतो. या घुसळदांडूस ‘प्रमंथ’ म्हणतात. ग्रीक पुराणातील प्रमिथिअसची कल्पना प्रमंथावरून सुचली असे काही विद्वान म्हणतात. प्रमिथिअस ह्या देवपुत्राने मनुष्यजातीला अग्निरूप देणगी दिली त्यामुळे देवराज झ्यूस प्रमिथिअसवर नाराज झाला व त्याला जंगलातील खडकावर निरंतर जखडून टाकण्याची शिक्षा केली, अशी ग्रीक पुराणातील कथा आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

अग्नि (आयुर्वेद) : एक शारीर घटक. शरीरात बाह्य द्रव आल्यानंतर शरीर-घटकांशी ते आत्मसात व्हावे म्हणून त्याचे पचन करणारा जो घटक तो अग्नी होय. शरीराचे दोषधातू, उपधातू, इंद्रिये यांचे सूक्ष्म घटक व त्यांनी बनलेले अवयव यांत अग्नी असतो. अग्नीचे पचनकार्य अखंड चालू असते. प्रत्येक घटकाचा गुण वाढविण्याचेही एक कार्य चालू असते. पचनानंतर मलद्रव्ये, विशुद्ध द्रव्ये व सारद्रव्ये बनत असतात. अग्नी हा पित्तांतर्गत असतो. त्याचे स्थूलत : पाचक, रजक, आलोचक, भ्राजक व साधक असे पाच भाग कल्पिले आहेत. त्यांची कार्येही निरनिराळी आहेत.

पहा : दोषधातुमलविज्ञान.

जोशी, वेणीमाधवशास्त्री