कॉल्चिसीन : कॉल्चिकम ऑटम्नेल या वनस्पतीत असणारे प्रमुख अल्कलॉइड. सूत्र C22H25O6N.  या वनस्पतीच्या कंदापासून आणि बियांपासून ते मिळवितात. लिलिएसी कुलातील कळलावी (ग्लोरिओसा सुपर्बा ) व इतरही काही वनस्पतींत ते आढळते.

एथिल ॲसिटेट या विद्रावकातून (विरघळविणाऱ्या पदार्थातून) याचे पिवळ्या रंगाचे सुयांसारखे स्फटिक मिळतात. वितळबिंदू १५५ से. कॉल्चिसिनाची पुढील संरचना सिद्ध झाली आहे.

याचे संश्लेषणही (कृत्रिम पद्धतीने बनविणे) करण्यात आले आहे.

कॉल्चिसीन पाण्यात हळूहळू पण विपुल प्रमाणात विरघळते. विरल एथिल अल्कोहॉलामध्ये ते तत्काल विरघळते.

वनस्पतींच्या रंगसूत्रांच्या (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांच्या) विभाजनावर त्याचा विशिष्ट परिणाम होतो. वनस्पतींचा क्रमविकास (उत्क्रांती), प्राण्यांची वाढ तसेच कर्करोग यांसंबंधीच्या संशोधनात याचा उपयोग होतो. कॉल्चिसिनाचा उपयोग करून संपूर्णपणे बहुगुणित [ज्यांच्या पेशींतील रंगसूत्रांची संख्या जननपेशींतील रंगसूत्रांच्या नेहमीच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त असलेले व त्याद्वारे इच्छित गुणधर्म आणलेले, → बहुगुणन] प्राणी निर्माण करणे शक्य झालेले नाही; परंतु अंशत: बहुगुणित असे ससे, बेडूक आणि डुकरे यांची पैदास करता आली आहे. कॉल्चिसीनाचा उपयोग करून फुले, फळे व बीजे यांचे आकार (उदा., शर्करा-बीट, कापूस, तंबाखू) वाढविणे साध्य झाले आहे.

कॉल्चिसीन त्वचेला लावले तर वेदना व रक्तसंचय होतो व हुंगले तर खूप शिंका येतात. ते पोटात घेतले तर आतड्यात येणाऱ्या पित्ताचे प्रमाण वाढते. त्याची जास्त मात्रा घेतल्यास जठर-आंत्रशोथ व वृक्कशोथ (पोट-आतडे व मूत्रपिंड यांची दाहयुक्त सूज) होतात व त्याचबरोबर वांती, अतिसार व पोटात रक्तस्राव होतो व शेवटी प्रकृती ढासळून मृत्यू येतो. हृदय व तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) यांवर अवसन्न क्रिया होऊन त्यांचा वेग वाढतो. फक्त गाऊटच्या (रक्तातील यूरिक अम्लाचे प्रमाण वाढल्याने हाडे, सांधे व इतरत्र त्याची लवणे साचल्यामुळे होणाऱ्या रोगाच्या) चिकित्सेतच काय तो कॉल्चिसिनाचा औषधी उपयोग होतो.

जमदाडे, ज. वि.