अर्बियम : रासायनिक मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Er. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ६८. अणुभार १६७.२७. आवर्त सारणी (मूलद्रव्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली कोष्टकरूप मांडणी,→ आवर्त सारणी ) गट ३. लँथॅनाइड मालेतील एक धातू. शुद्ध इट्रिया (Y2O3) म्हणून मानलेल्या एका नमुन्यावर प्रयोग करीत असताना स्वीडनमधील सी. जी. मूसांडर यांना त्यात आणखी दोन मूलद्रव्यांची ऑक्साइडे आढळली त्यांना त्यांनी ‘अर्बिया’ व ‘टर्बिया’ अशी नावे दिली (१८४३). पण या मूलद्रव्यांच्या व त्यांच्या जोडीने आढळणाऱ्‍या इतर विरल मूलद्रव्यांच्या मिश्रणातून त्यांची संयुगे शुद्ध स्वरूपात अलग काढणे अतिशय कठीण असल्यामुळे त्यांच्यात भेद करता येत नसे. पुढे मूसांडर यांनी ज्याला टर्बिया हे नाव दिले होते त्याला अर्बिया (व ओघानेच त्याच्यातील धातूला अर्बियम) असे नाव देण्यात आले (१८६०). अर्बियम त्रिसंयुजी (संयोग होण्याची क्षमता तीन असलेली, →संयुजा) असून तिची गुलाबी रंगाची अनेक लवणे तयार होतात.

 

अर्बियम ही झेनोटाइम, फर्ग्युसनाइट, गॅडोलिनाइट इ. खनिजांत कित्येक विरल मूलद्रव्यांच्या जोडीने आढळते. नैसर्गिक अवस्थेतील मूलद्रव्यांत सहा स्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) आढळतात. खनिजांपासून शुद्ध अर्बिया किंवा धातू मिळविणे अतिशय कठीण असते. पूर्वी ती भागात्मक स्फटिकीकरणाने (तापमानाच्या ठराविक टप्प्यात योग्य भागाचे स्फटिकीकरण करून, →स्फटिकीकरण) मिळविली जात असे. पण अलीकडे ] आयन विनियम पद्धतीने ती अधिक सुलभपणे काढता येऊ लागली आहे.

 

पहा : विरल मृत्तिका संक्रमणी मूलद्रव्ये.

 

 ठाकूर, अ. ना.