अकिरासुझूकी, अकिरा : (१२ सप्टेंबर १९३०– ). जपानी कार्बनी रसायनशास्त्रज्ञ. त्यांना ‘कार्बनी संश्लेषणामध्ये पॅलॅडियम उत्प्रेरका-द्वारे संकर संयुग्मीकरण’ या संशोधनाबद्दल २०१० सालचे रसायनशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक रिचर्ड एफ्. हेक व ई एड्ची नेगिशी यांच्या समवेत विभागून मिळाले.

सुझूकी यांचा जन्म जपानमधील मुकावा-होक्काइडो येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण होक्काइडो विद्यापीठात पूर्ण झाले. १९५९ मध्ये पीएच्.डी. प्राप्त केल्यानंतर त्यांची त्याच विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी १९६३– ६५ या काळात हर्बर्ट चार्ल्स ब्राउन यांच्यासमवेत पर्‌ड्यू विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेटकरिता संशोधन केले. होक्काइडो विद्यापीठातून १९९४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ओकायामा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स (१९९४-९५) आणि कुराशिकी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड द आर्ट्स (१९९५– २०००) इ. विद्यापीठांत विविध पदे भूषविली. सुझूकी सध्या होक्काइडो विद्यापीठात कार्यरत आहेत.

सुझूकी यांनी संशोधित केलेल्या ‘कार्बनी संश्लेषणातील पॅलॅडियम उत्प्रेरकाद्वारे संकर संयुग्मीकरण ‘या तंत्रामुळे सुविकसित अशी रसायने तयार करण्याच्या शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. निसर्गात जेवढे कार्बनाधारित जटिल रेणू तयार होतात, त्यांसारखे जटिल रेणू या तंत्राद्वारे निर्माण करणे शक्य झाले आहे.

कार्बनी रसायनशास्त्र सृष्टीतील जीवनाचा मूलाधार आहे. ज्यायोगे काही अद्‌भुत घटना निसर्गात घडलेल्या आढळतात. उदा., फुलातील रंग, सापातील विष, सूक्ष्मजंतूंचा नाश करणारे पेनिसिलीनसारखे घटक इत्यादी. कार्बनी रसायनशास्त्रामुळे मानवाला निसर्गातील रसायनशास्त्रावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कार्यात्मक रेणूंचा सांगाडा तयार करण्यासाठी कार्बन अणूंची क्षमता वापरणे शक्य झाले. त्यामुळेच मानवाला उपयुक्त अशा नवनवीन औषधांचे व प्लॅस्टिकसारख्या द्रव्यांचे शोध लागले.

जटिल वा गुंतागुंतीची रसायने तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना कार्बनाचे अणू एकत्र जोडणे गरजेचे असते. कार्बनाचे अणू स्थिर असून ते सहजासहजी एकमेकांशी विक्रियाशील नसतात. पूर्वी शास्त्रज्ञ कार्बनाच्या संयुग्मीकरणासाठी करीत असलेल्या प्रक्रियेतून अनेक अनावश्यक उप-उत्पादने निर्माण होत असत. ‘पॅलॅडियम उत्प्रेरकाद्वारे संकर संयुग्मीकरण’ या तंत्रामुळे अधिक अचूक व कार्यक्षम असे तंत्र उपलब्ध झाले. कार्बन व पॅलॅडियम अणू यांतील समिपस्थता रासायनिक विक्रिया सुरू करते. या रासायनिक तंत्राचा वापर संशोधनात, व्यापारी उत्पादनांत (उदा., औषधे) आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांत होतो.

सुझूकी यांना जपान ॲकॅडेमी पारितोषिक (२००३), एच्. सी. ब्राउन लेक्चर ॲवॉर्ड (२०००), डोटालॅन्को लेक्चरशीप ॲवॉर्ड (१९९५) इ. पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

वाघ, नितिन भ.