मॉर्फीन : अफूपासून मिळणारे एक प्रमुख ⇨ अल्कलॉइड. मॉर्फीन हे नाव ग्रीक पुराणातील स्वप्नांची देवता ‘मॉर्फीअस’ यावरून आलेले आहे. मॉर्फिनाला ‘मॉर्फीया’ असेही म्हणतात. मॉर्फीन हे फेनँथ्रीन गटातील एक प्रमुख अल्कलॉइड आहे. कारण मॉर्फीन जर जस्ताच्या चूर्णाबरोबर ऊर्ध्वपातित केले (उष्णता देऊन मिळणारे बाष्प थंड केले), तर फेनँथ्रीन सांगाडा मिळतो. अफूच्या झाडापासून मिळणाऱ्या अफूत तिच्या वजनाच्या १०% मॉर्फीन असते. चार्ल्‌स डेरोस्ने यांनी १८०३ मध्य अफूच्या अर्कापासून मॉर्फीन अशुद्ध स्वरूपात मिळविले. त्यानंतर १८०६ मध्ये एफ्. डब्ल्यू. ए. सेरट्यूर्नर यांनी मॉर्फीन शुद्ध स्वरूपात मिळवून त्याचे क्षारक (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे तयार करणाऱ्या पदार्थाचे) गुणधर्म निश्चित केले. अल्कलॉइड समूहातील शुद्ध स्वरूपात मिळविलेले हे पहिलेच संयुग होय.

सूत्र. १. मॉर्फिनाची रेणवीय संरचनामॉर्फिनाचे रेणुसूत्र C17H19NO3 असून त्याचा वितळबिंदू २५४ से. आहे. त्याचे स्फटिक वर्णहीन व प्रचिनाकार [→ स्फटिकविज्ञान] असून त्यात पाण्याचा एक रेणू स्फटिकजलाच्या स्वरूपात आढळतो. स्फटिक १००° से. ला तापवल्यास हे स्फटिकजल निघून जाते व निर्जल मॉर्फीन शिल्लक राहाते. मॉर्फिनाचे सल्फेट (C17H19NO3·H2SO4·5H2O) व हायड्रोक्लोरिक (C17H19NO3HCl·3H2O) ही लवणे वापरली जातात.

मॉर्फिनाची रेणवीय संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) ठरवण्याचे कार्य जवळ जवळ ७५ वर्षे चालले होते. १९२५ मध्ये सर रॉबर्ट रॉबिन्सन व जे. एम्. गुलँड या शास्त्रज्ञांनी मॉर्फिनाची संरचना निश्चित केली. त्यानंतर सु. २५ वर्षांनी १९५४ मध्ये एम्. गेट्स व जी. चूडी या शास्त्रज्ञांनी मॉर्फिनाच्या संश्लेषणात (घटर द्रव्ये एकत्र आणून कृत्रिम रीत्या तयार करण्यात) यश मिळविले. त्यांनी डांबरातून मिळणाऱ्या शेफर्स अम्ल म्हणजे २-नॅप्थॉल-६ सल्फॉनिक अम्ल [C10H6(OH)SO3H] या मध्यस्थ संयुगापासून सुरुवात करून २७ टप्प्यांनी मॉर्फीन मिळविले. या त्यांच्या संश्लेषणामुळे मॉर्फिनाच्या संरचनेस दुजोरा मिळाला. मॉर्फिनाची संरचना वर दर्शविल्याप्रमाणे आहे. मॉर्फिनाचे घूर्णन विन्यास विश्लेषण (एका बंधाभोवती ज्याचे घूर्णन-परिभ्रमण-होऊ शकेल अशा अणूंची रेणूमधील अवकाशीय मांडणी कशी झाली आहे याचा अभ्यास) झालेले आहे.

उपयोग व विषारीपणा: वैद्यक व शल्यक्रियाविज्ञानात मॉर्फिनाचे महत्त्व अतुलनीय आहे. मॉर्फीन हायड्रोक्लोराइड हे लवण सर्वांत जास्त प्रभावी वेदनाशामक आणि आस्वापक (त्वरित निद्रा आणणारे) आहे. मॉर्फिनाची वेदनाशामकता तीन प्रकारांनी घडून येते : (१) मेंदूतील अभिवाही मस्तिष्क केंद्रातील [थॅलॅमसातील → तंत्रिका तंत्र] वेदनेची जाणीव मॉर्फीन कमी करते (२) मस्तिष्क बाह्यकामध्ये वेदनेच्या प्रतिक्रियेत बदल घडवून आणते आणि (३) मॉर्फीन वेदनेची प्रभावसीमा वृद्धिंगत करीत असल्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता वाढते व शामक परिणाम होतो किंवा झोप लागते. मॉर्फीन लंबमज्जेतील [मेरुरज्जूच्या वरच्या टोकाशी संलग्न असलेल्या व खाली निमुळत्या होत गेलेल्या शंक्वाकृती भागातील → तंत्रिका तंत्र] श्वसन, खोकला व रक्तवाहिनी प्रेरक (रक्तवाहिन्यांच्या भित्तीचे प्रसरण आणि आकुंचन यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या) या केंद्राची क्रियाशीलता कमी करते व अप्रत्यक्ष रीत्या वमन केंद्र (ओकारीवर नियंत्रण ठेवणारे केंद्र) उत्तेजित करते. जठरांत्र मार्गावर (जठर व आतडे यांनी मिळून होणाऱ्या मार्गावर) मॉर्फिनाचा संकोचोत्पादक आणि बद्धकोष्ठताकारक असा परिणाम होतो. बद्धकोष्ठताकारक परिणाम वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्यांत आतड्याची आंतरखंडीय क्रमसंकोची हालचाल, परिसंकोचकांचा (नैसर्गिक छिद्र बंद करणाऱ्या वलयाकार स्नायूंचा) संकोचक ताण व संकोचक ताण कायम ठेवून मलविसर्जन प्रतिक्षेप [→ प्रतिक्षेपी क्रिया] कमी होणे यांचा समावेश होतो. शिवाय मोठ्या आतड्यात पाण्याचे पुनर्शोषण होऊन मलकोरडा पडून खडा होतो. आस्वापक व वेदनाशामक यांखेरीजही मॉर्फिनामध्ये इतर अनेक औषधी गुणधर्म आहेत. ह्रदीय दमा, अतिसार, डांग्या खोकला यांवर मॉर्फीन औषध म्हणून वापरतात. मॉर्फिनामुळे अंतर्गत रक्तस्त्राव त्वरित थांबतो. रक्ताधिक्यामुळे होणारे ह्रद्‌स्थगन (प्रमाणाबाहेर रक्त साठल्याने हृदयक्रिया थांबणे) तसेच संभाव्य गर्भपात टाळण्यासही मॉर्फिनाचा उपयोग केला जातो. एखाद्या व्यक्तीस अपघातामुळे किंवा तत्सम आघातामुळे होणाऱ्या तीव्र वेदनांवर याचा उपयोग केला जातो. मॉर्फीन पोटात देता येते परंतु ते अंतःक्षेपणाच्या (इंजेक्शनाच्या) स्वरूपात दिल्यास त्याचा परिणाम फार लवकर घडून येतो. शस्त्रक्रियेनंतरही वेदनाशामक म्हणून मॉर्फीन अंतःक्षेपणाच्या स्वरूपात देण्यात येते. तथापि ते रुग्णांना गोळीच्या स्वरूपात अधिक सुलभ रीतीने देता येणे शक्य आहे, असे लिव्हरपूल येथील वैद्यांनी प्रयोगान्ती दाखवून दिले आहे. मात्र ही गोळी गिळून टाकण्याऐवजी ती पुढचे वरील दात व वरचा ओठ यांच्या दरम्यानच्या जागेत ठेवण्यास रुग्णाला सांगितले जाते. या स्थितीत ही गोळी अगदी हळूहळू (सु. पाच ते सहा तासांत) विरघळते आणि मॉर्फीन मुखाच्या अस्तराद्वारे अभिशोषिले जाऊन रक्तात मिसळते. गोळी विरघळण्यास दीर्घ कालावधी लागला, तरी तिचा परिणाम होण्यास अर्ध्या तासातच सुरुवात होते व अंतःक्षेपणापेक्षाही ती अधिक काळ क्रियाशील राहते. गोळीच्या सेवनामुळे मळमळणे, भोवळ येणे यांसारखे आनुषंगिक परिणाम उद्‌भवण्याची शक्यता कमी आहे, असे या वैद्यांचे म्हणणे आहे.

मॉर्फिनाचा मोठा दोष म्हणजे त्याच्या सेवनाबद्दल निर्माण होणारी आसक्ती. मॉर्फिनामध्ये सुखभ्रम निर्माण करण्याचा गुणधर्म असल्यामुळे त्याचे व्यसन लागण्याचा फार संभव असतो. या व्यसनामुळे मॉर्फिन घेणाऱ्या व्यक्तीचा शारीरिक व मानसिक ऱ्हास होऊ लागतो व अखेर त्या व्यक्तीचा अधःपात होऊ लागतो. व्यसनाधीन व्यक्तीस मॉर्फीन देणे एकाएकी बंद करण्यातही धोका असतो व त्यामुळे ती व्यक्ती दगावण्याचाही संभव असतो. मॉर्फीन घेण्याचे प्रमाण हळूहळू कमी करीत गेल्यासच हे व्यसन सुटू शकते. या कारणामुळेच अत्यावश्यक असल्याशिवाय औषध म्हणून सुद्धा मॉर्फिनाचा उपयोग करीत नाहीत. 


अनुजात: (एका संयुगापासून तयार केलेली अन्य संयुगे). बऱ्याचशा नैसर्गिक अल्कालॉइडांचे मूळ ‘अफू’ (ओपियम) हे आहे म्हणून मॉर्फिनासारखे गुणधर्म असलेल्या सर्व मादक पदार्थांना ओपिएट्स असे संबोधतात. मॉर्फिनापासून ⇨ कोडीन, डायोनीन, डायलॉडिड (डायहायड्रोमॉर्फिनोन), मेटोपॉन असे अनुजात मिळतात. कोडीन स्वतंत्रपणेही अफूमध्ये असते. मॉर्फिनाचे ॲसिटिलीकरण [ॲसिटिल गटाचा (CH3CO-) समावेश करण्याची क्रिया] केल्यास डायॲसिटिल मॉर्फिन मिळते, त्यालाच ‘हेरॉइन’ असे म्हणतात. याची वेदनाशामक क्षमता मॉर्फोनाच्या चौपट आहे परंतु ते तीव्र आसक्तिकारक असल्याने त्याच्या निर्मितीवर कायदेशीर बंधने आहेत. हे तपकीरीसारखे ओढतात किंवा अंतःक्षेपणाने घेतात. नॅलोर्फीन (एन-ॲलिलमॉर्फीन) हा मॉर्फिनाचा अनुजात मॉर्फिनाने होणाऱ्या परिणामावर उत्तम मारक आहे. मॉर्फिनाची विषबाधा झाली असेल, तर त्यावर उतारा म्हणून नॅलोर्फीन देतात.

सूत्र २. मॉर्फिनापासून अ‍पोमॉर्फीन मिळविण्याची विक्रियामॉर्फीन किंवा मॉर्फीन हायड्रोक्लोराइड हायड्रोक्लोरिक अम्लाबरोबर १५०° से. ला व दाबाखाली तापवल्यास त्यातून पाण्याचा एक रेणू जाऊन ॲपोमॉर्फीन (C17H17NO2) मिळते. मॉर्फिनाचे शरीरक्रियात्मक गुणधर्म नाहीसे होतात व ते फक्त तीव्र वमनकारक होते. त्याचा वैद्यकात वांतिकारक व शिथिलीकारक (ताण कमी करणारे) म्हणून उपयोग करतात.

पहा : अफू अल्कलॉइडे मादक पदार्थ.

संदर्भ : 1. Fieser, L.F. Fieser, M. Organic Chemistry, New Delhi, 1962.

             2. Satoskar, R.S. Bhandarkar, S. D. Pharmacology and Pharmacotherapeutics, 2 Vols. Bombay, 1978.

पाठक, श. पु. घाटे, रा. वि.