लॅझुराइट : ⇨ फेल्स्पॅथॉइड गटातील खनिज, स्फटिक घनीय [⟶स्फटिकविज्ञान] पण विरळाच आढळतात. बहुधा घट्ट वा कणमय राशीच्या रूपात आढळते. ⇨ पाटन : (011)अस्पष्ट. कठिनता ५-५.५ वि.गु. २.४-२.४५. रंग गडद निळा, कधीकधी हिरवट वा जांभळट निळा. चमक काचेसारखी. दुधी काचेप्रमाणे पारभासी. रा.सं. (Na, Ca)4 (AlSiO4)3 (SO4,S,Cl). यांपैकी सल्फेट, गंधक व क्लोरीन यांचे प्रमाण बदलते तर सोडियमाच्या जागी अल्पसे रुबिडियम, सिझियम, स्ट्राँशियम वा बेरियम आलेले असते. सोडियमामुळे याची ज्योत पिवळी दिसते आणि हायड्रोक्लोरिक अम्लात हे विरघळून हायड्रोजन सल्फाइड वायू बाहेर पडतो.

लॅपिस लॅझुली : या खनिजी द्रव्यांच्या मिश्रणात लॅझुराइट हा प्रमुख घटक असून हे मुख्यत्वे त्यातच आढळत असल्याने येथे लॅपिस लॅझुलीचे वर्णन थोड्या विस्ताराने दिले आहे. त्यात लॅझुराइटाशिवाय कॅल्साइट, हॉयेनाइट, सोडालाइट व इतर सिलिकेटी खनिजे (उदा., डायोप्साइड, अँफिबोल, फेल्स्पार, अभ्रक, ॲपेराइट, स्फीन वा झिर्कॉन) थोड्याफार प्रमाणात मिसळलेली असतात. तसेच यामध्ये पायराइट या सोनेरी खनिजाचे कण, चकत्या वगैरे विखुरलेल्या असल्याने यांचा निळा रंग खुलून दिसतो आणि हे याचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे लॅपिस लॅझुलीचे रा.सं. व परिणामी भौतिक गणधर्म वेगवेगळे असतात. हे पारभासी ते अपारदर्शक असून ह्याची चमक काचेसारखी ते ग्रिजासारखी असते आणि याला चांगली झिलई देता येते.

लॅपिस लॅझुली बहुतकरून स्फटिकी चुनखडकांत (संगमरवरांत) आढळते आणि सामान्यपणे ते ग्रॅनाइटांच्या राशीलगत संस्पर्शी रूपांतरणाने तयार झालेले असते. अफगाणिस्तानमधील बदक्शान येथील याचा साठा सर्वात महत्त्वाचा असून तेथे सहा हजार वर्षापासून याचे खाणकाम करण्यात येत आहे. १२७१ च्या सुमारास मार्को पोलो यांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख आढळतो. याशिवाय रशिया (बैकल सरोवरालगत), चिली (ओव्हायेनजीक), इटली (रोमजवळ), कॅलिफोर्निया, ब्रह्मदेश, तिबेट इ. ठिकाणी हे आढळते.

लॅपिस लॅझुली फार पूर्वीपासून शोभिवंत कामांसाठी व गौण रत्न म्हणून वापरात आहे. शोभिवंत कामांसाठी याचा रशियात (उदा., लेनिनग्राडचे सेंट आयझॅक कॅथिड्रल) व इटलीत विशेष उपयोग करण्यात येई. शिवाय ईजिप्शियन, रोमन, ॲसिरियन व बॅबिलोनियन लोक याचा पुढील गोष्टींसाठी वापर करीत : दागदागिने, कुट्टिमचित्रे, सौंदर्यप्रसाधने, जडावाचे काम, फुलदाण्या, वाडगे, मणी, पिना, मुद्रा वगैरे. अल्ट्रामरीन नावाचे रंगद्रव्यही यापासून बनवीत आता ते कृत्रिम रीतीने बनवितात. यात औषधी गुण असल्याचाही समज होता म्हणून याची पूड दुधात कालवून व्रण व भाजल्याच्या जखमा यांवर लावीत. बायबलमधील सफायर (नील) हे रत्न म्हणजे लॅपिस लॅझुलीच होय. हे डिसेंबर महिन्याचे पर्यायी रत्न मानले जाते.

सर्वसाधारणपणे लॅपिस म्हणून विकले जाणारे द्रव्य हे बहुधा कृत्रिम रीतीने रंगविलेली कॅल्सेडोनी, हॉर्नस्टोन किंवा जमुनिया ही खनिजे असतात. मात्र त्यांच्यात पायराइटाच्या सोनेरी रेघा-ठिपक्यांऐवजी क्वॉर्ट्झाचे पांढरे ठिपके व रेघा असतात. अशा प्रकारे याच रंगाच्या पण भिन्न रा.सं. असलेल्या खनिजांना स्थानिक नावेही दिलेली आढळतात. उदा., निळ्या ठिपक्यांच्या कॅल्सेडोनीला जर्मन लॅपिस, निळ्या सूर्यकांत मण्याला (जॅस्परला) स्विस लॅपिस, भारतातील हिरवट सर्पेंटाइनाला लॅपिस लॅझुली म्हणतात.

अरबी निळा व लॅटिन दगड या अर्थाच्या शब्दांवरून लॅपिस लॅझुली हे नाव पडले आहे तर यातील निळ्या घटकाला रंगावरून व ॲझुराइटाशी असलेल्या साम्यावरून फोन कोबेल यांनी १८५३ साली लॅझुराइट हा शब्द वापरला.

पहा : फेल्स्पॅथॉइड गट.

ठाकूर, अ. ना.