ग्लुकोसाइडे : ⇨ ग्लायकोसाइडांचा एक प्रकार. या संयुगात ग्लुकोजाच्या वलयी (जिची टोके एकमेकांना जोडलेली आहेत अशी कार्बन अणूंची साखळी असलेल्या ) संरचनेतील हेमिॲसिटल हायड्रॉक्सिल गटातील (–OH) हायड्रोजनाचे प्रतिष्ठापन (हायड्रोजन अणूच्या जागी दुसरा अणू अथवा गट येणे) अल्किल अथवा अरिल गटाने झालेले असते.

ग्लुकोजाच्या पायरॅनोज (पाच कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांचे वलय) व फ्यूरॅनोज (चार कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांचे वलय) अशा दोन संरचना आहेत. या प्रत्येकाचे D व L असे दोन विन्यास (रेणूतील अणूंच्या मांडण्या) होतात आणि पुन्हा ग्लुकोसाइडातील अल्किल गटाच्या त्रिमितीय मांडणीनुसार आल्फा आणि बीटा अशी दोन रूपे होतात. ग्लुकोसाइडाच्या नामकरणात या सर्वांचा समावेश करावा लागतो. D – ग्लुकोजापासून बनणाऱ्या भिन्न ग्लुकोसाइडांच्या संरचना व नावे उदाहरणादाखल खाली दिली आहेत.

R = अल्किल अथवा अरिल गट.

आल्फा D - ग्लुकोपायरॅनोसाइडआल्फा D - ग्लुकोपायरॅनोसाइड

 आल्फा D - ग्लुकोफ्यूरॅनोसाइडबीटा D - ग्लुकोफ्यूरॅनोसाइड

L – ग्लुकोजापासून याचप्रमाणे चार संरचना होतात.

सामान्यतः फ्यूरॅनोसाइडांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाच्या रेणूचे तुकडे पडणे) जास्त सुलभतेने होते. निसर्गात त्यांचे अस्तित्वही कमी प्रमाणात आढळते.

ग्लुकोसाइडांचे निसर्गातील अस्तित्व व गुणधर्म ग्लायकोसाइडांसारखेच आहेत [→ ग्लायकोसाइडे]. अम्लांनी त्यांचे जलीय विच्छेदन होऊन ग्लुकोज व शर्करेतर पदार्थ निर्माण होतात. त्याला अग्लायकोन म्हणतात. ग्लुकोसायडेज नावाच्या एंझाइमांनीही (सजीवांच्या शरीरात रासायनिक विक्रिया घडवून आणणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांनीही) ही विक्रिया होते. ती विवेचक असून या वर्गापुरतीच मर्यादित आहे.

फुलाफळांचे रंग [→ अँथोसायनिने व अँथोझँथिने] आणि अनेक सुगंध, रंजकद्रव्ये किंवा औषधी म्हणून उपयोगी पडणारी संयुगे निसर्गात ग्लुकोसाइडांच्या रूपात असतात आणि त्यांच्यापासून ती वेगळी काढली जाते.

बहुतेक सर्व नैसर्गिक ग्लुकोसाइडे बीटा D – प्रकारची व वाम वलनी (एकाच पातळीत कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाची पातळी डाव्या बाजूस वळविणारी) आहेत. फिलिरीन हे फॉर्सिथिया सस्पेन्सा  या वनस्पतीत असलेले ग्लुकोसाइड मात्र दक्षिण वलनी (ध्रुवित प्रकाशाची पातळी उजव्या बाजूस वळविणारे) असून ते आल्फा D – प्रकारचे आहे. अल्किल अथवा अरिल गट लहान असलेली ग्लुकोसाइडे अत्यंत दुर्मीळ आहेत, पण स्कॅबिओजा सक्सिसा  या वनस्पतीत मिथिल बीटा D – ग्लुकोसाइड आढळते.

विलो वृक्षाच्या सालीत सॅलिसीन हे ग्लुकोसाइड असते. त्याच्या जलीय विच्छेदनाने D – ग्लुकोज आणि सॅलिजेनीन हे अग्लायकोन मिळते. निळीच्या पानात असणाऱ्या इंडिकान या ग्लुकोसाइडापासून D – ग्लुकोज व इंडॉक्सिल मिळते. केशरामध्ये पिक्रोक्रॉसीन नामक जे ग्लुकोसाइड आहे, त्यामध्ये सॅफ्रॅनाल हे अग्लायकोन आहे. या संयुगामुळेच केशराला सुगंध येतो. कूमारीन वर्गातील कित्येक संयुगे आणि व्हॅनिलीन हे स्वाददायी म्हणून खाद्यपदार्थात वापरले जाणारे संयुग निसर्गात ग्लुकोसाइडांच्या रूपांत असतात. प्राण्यांच्या तंत्रिका तंत्रामधील (मज्जासंस्थेतील) सेरिब्रोसाइडे, गँग्लिओसाइडे व वनस्पतींमध्ये असणाऱ्या टॅनीन नामक संयुगांत ग्लुकोसाइडी बंध असतात.

काही ग्लुकोसाइडांची सूत्रे

सेल्युलोज, स्टार्च व ग्लायकोजेन यांमध्ये अनेक ग्लुकोज एकके ग्लुकोसाइडी बंधांनी जोडलेली असतात. त्यामुळे रासायनिक दृष्टीने ती ग्लुकोसाइडे होत. परंतु त्यामध्ये अग्लायकोनही ग्लुकोजच असल्यामुळे त्यांचा समावेश पॉलिसॅकॅराइड वर्गात करतात.

संदर्भ : Mcllroy, R. J. The Plant Glycosides, London, 1950.

मिठारी, भू. चिं.