बेंझिड्रीन :(ॲम्फेटामीन, ॲसिटेड्रीन, ॲडिपॅन इ.). अमाइन वर्गातील [⟶ अमाइने] एक संयुग. रेणुसूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) C9H13N. संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) १ – फिनिल – २ – ॲमिनो प्रोपेन किंवा बीटा फिनिल आयसोप्रोपिल अमाइन अशी असून ती खालीलप्रमाणे दर्शवितात :

बेंझिड्रीन

 

यातील क्र.२ चा कार्बन अणू असममित (चार वेगवेगळ्या अणूंना वा अणुगटांना जोडलेला) असल्यामुळे याची दक्षिणवलनी (d) व वामवलनी (1) अशी दोन प्रकाशतः सक्रिय आणि त्यांच्या समरेणवीय मिश्रणामुळे (मिश्रणात दोन्ही प्रकारचे रेणू सारख्याच प्रमाणात असलेले) झालेले बहिःपूरित (d1) हे प्रकाशतः निष्किय असे तिसरे अशी एकंदर तीन रुपे माहीत आहेत [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र].

निर्मिती: बेंझिड्रीन हे अनेक संश्लेषण (घटकद्रव्ये एकत्र आणून कृत्रिम रीतीने घडवून आणण्यात येणाऱ्या) विक्रियांनी बनविता येते. उदा., सामान्यतः हे बहिःपूरित रुप आणि त्याचे सल्फेट व फॉस्फेट आणि दक्षिणवलनी रुपाचे सल्फेट यांच्या रुपात उपलब्ध असते.

 

फिनिल ॲसिटोन ओंक्झाइम

बहिःपूरित किंवा (d1) बेंझिड्रीन : प्रवाही द्रव पदार्थ, अमाइनांचा विशिष्ट वास व कडू जळजळीत चव. उकळबिंदू २००-२०३ से. पाण्यात अल्प प्रमाणात विद्राव्य (विरघळते). अल्कोहॉल व ईथर यांत चांगले विरघळते. जलीय विद्राव लिटमसाबरोबर क्षारकधर्मी. अम्लांबरोबर विक्रिया होऊन याची लवणे बनतात.

बेंझिड्रीन सल्फेट :[C6H5CH2CH(NH2)CH3]2H2SO4. अल्कोहॉली विद्रावात बेंझिड्रिनाचे सल्प्यूरिक अम्लाने ⇨ उदासिनीकरण केले म्हणजे हे मिळते. हे स्फटिकरूप असून कडवट लागते. चाखल्यानंतर बधिरता भासते. वितळबिंदू ३०० से. च्यावर असून या तापमानाला त्याचे अपघटन (घटकद्रव्ये अलग होण्याची क्रिया) होते. अल्कोहॉलापेक्षा हे पाण्यात जास्त विद्राव्य आहे.

बेंझिड्रीन फॉस्फेट : [C6H5CH2-CH (NH2)-CH3] H3PO4. हे चवीला कडू असून ३०० से. तापमानाच्या आसपास अपघटन होऊन वितळते. अल्कोहॉलात अल्पविद्राव्य. सल्फेटापेक्षा पाण्यात जास्त विद्राव्य आणि बेंझीन, प्लोरोफॉर्म व ईथर यांत अविद्राव्य.

दक्षिणवलनी किंवा (d) बेंझिड्रीन : (d1) बेंझिड्रिनावर (d) टार्टारिक अम्लाची विक्रीया केल्याने जे लवणमिश्रण मिळते त्यातून (d) बेंझिड्रीन (d) टार्टारेट वेगळे करतात. विरल सल्प्यूरिक अम्लाने त्याचे अपघटन केले म्हणजे (d) बेंझिड्रीन मिळते.

याच्या सल्फेटाचे स्फटिक पट्टिका किंवा शलाका यांच्या आकाराचे असतात. चव कडवट, बधिरता भासविणारी असते. विशिष्ट चलन [µ]२०D + २१.८ [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र] . वितळविंदू ३०० से.च्यावर अल्कोहॉलापेक्षा पाण्यात जास्त विद्राव्य. (d) ॲम्फेटामीन सल्फेट, डेक्सेड्रिन सल्फेट, ॲफाटीन, डेक्सॅम्फेटामीन इ. व्यापारी नावांनीही हे ओळखले जाते.

औषधी उपयोग : सल्फेटाच्या योग्य मात्रेने संवेदनाहारी औषधे, मादक पदार्थ, मद्य इत्यादींचे अनिष्ट परिणाम घालविता येतात. शारीरिक व मानसिक क्रियांना हे प्रोत्साहन देते, चित्तवृत्ती उल्हसित करते व झोप कमी करते. याच्या सेवनाने चित्ताची एकाग्रता करणे सोपे पडते आणि दीर्घकाल काम केले, तरी थकवा जाणवत नाही. या गुणधर्मामुळे काही ट्रक चालक, खेळाडू, विद्यार्थी इ. याचे अनिर्बंध सेवन करतात असे आढळून आले आहे. अस्वस्थता आणि सौम्य मानसिक विकृतींवर उपचार म्हणून हे वापरतात. मद्यासक्ती कमी करण्याचा मनोनिग्रह टिकण्यास याची मदत होते. निद्रापस्मार या रोगात झोपण्याची अनिवार इच्छा होते व तिचे निवारण करण्यासाठी तसेच मेंदूचा दाह झाल्यामुळे उत्पन्न झालेली स्नायूंची ताठरता कमी करण्यासाठी इतर औषधांबरोबर याची योजना गुणकारी ठरते. याने भूक मंद होते म्हणून लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार नियंत्रण करताना याचा उपयोग करतात. रक्तवाहिन्यांचे आकुंचन करण्याच्या याच्या गुणधर्मामुळे परागज्वर, दमा, तीव्र ⇨ नाडीव्रण व यांसारख्या इतर परिस्थितीत नाकातील श्लेष्मकलेचे (पातळ बुळबुळीत अस्तराचे) आकुंचन करण्यासाठी अंतःश्वसनाद्वारे याचा उपयोग करतात. सर्दीमुळे चोंदलेले नाक मोकळे व्हावे यासाठी हुंगावयाच्या नळ्यांत हे वापरीत असत पण या नळ्यांच्या अनिर्बंध उपयोगामुळे विषारी परिणाम होतात असे आढळून आल्यावर अशा बेंझिड्रीनयुक्त नळ्यांची निर्मिती ब्रिटन व अमेरिकेत आता बंद करण्यात आली आहे.

याच्या सेवनाने काही दुष्परिणामही संभवतात. उदा., अस्वस्थता, निष्कारण सुखाभास किंवा दुःखाभास, निद्रानाश, संभ्रम, कंप, क्षोभ व डोकेदुखी हे विकास अनिर्बंध उपयोगाने होऊ शकतात. मळमळ, ओकाऱ्या व अतिसार होऊन पोटात पेटके येण्याची शक्यता असते. तसेच दीर्घकाळ सेवनाने याची आसक्तीही निर्माण होते व तीमुळे व्यक्तिमत्वावर अनिष्ट परिणाम होतो. याचे व्यसन मादक द्रव्यांच्या सेवनाच्या व्यसनाइतके तीव्र नसते. बेंझिड्रीन घेण्याचे एकदम बंद केल्यास विषण्णपणा, अशक्तपणा, कंप, जठरांत्र मार्गाचे (जठर व आतडी यांनी मिळून होणाऱ्या अन्नमार्गाचे) विकार इ. विकास उद्‌भवतात पण मॉर्फिनासारख्या द्रव्यांच्या बाबतीतील तीव्र लक्षणे यामध्ये आढळत नाहीत. शक्तिपात व मृत्यूही ओढवण्याची शक्यता असते. वरील कारणांमुळे याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसारच करणे आवश्यक आहे.

पशुवैद्यकात याचा उपयोग मेंदू व मेरुरज्जू (पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या दोरीसारख्या मज्जातंतूंनी बनलेल्या भागाचा) शोथ (दाहयुक्त सूज), मादक पदार्थामुळे झालेली विषबाधा आणि शुद्धिहारकाच्या योजनेत निर्माण झालेला मृत्यूचा धोका यांचे निवारण करण्यासाठी करता येतो.

सूर्यवंशी, वि. ल. केळकर, गो. रा.