स्टाउडिंगर, हेर्मान : (२३ मार्च १८८१—८ सप्टेंबर १९६५). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी बहुवारिके ही दीर्घ-शृंखलायुक्त रेणू असल्याचे प्रयोगाने दाखविले. त्यांनी ⇨ बहुवारिकीकरण आविष्काराचे स्पष्टीकरण दिल्यामुळे संश्लेषित प्लॅस्टिक आणि इतर उच्च बहुवारिक उत्पादनांमध्ये वापरण्यात येणार्‍या प्रक्रियांचा विकास झाला. उच्च रेणुभार असलेल्या संयुगांसंबंधी (बृहत् रेणूंसंबंधी) केलेल्या विशेष कार्याबद्दल त्यांना १९५३ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

हेर्मान स्टाउडिंगर

स्टाउडिंगर यांचा जन्म वर्म्झ ( जर्मनी ) येथे झाला. त्यांनी डार्मस्टाट, म्यूनिक आणि हाल विद्यापीठांत रसायनशास्त्राचे अध्ययन केले. १९०३ मध्ये त्यांनी हाल विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. १९०७ मध्ये ते स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठात व्याख्याते झाले. नंतर ते केमिकल इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्निकल कॉलेज ऑफ कार्लझ्रूए येथे कार्बनी रसायनशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक झाले. त्यानंतर ते फेडरल टेक्निकल इन्स्टिट्यूट, झुरिक ( स्वित्झर्लंड ) येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते (१९१२—२६). १९२६ मध्ये त्यांची केमिकल इन्स्टिट्यूट ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ फ्रायबुर्ख या संस्थेच्या संचालक पदावर नियुक्ती झाली, तसेच ते ॲल्बर्ट लूटव्हिख विद्यापीठात प्राध्यापक होते (१९२६—५१).

बी. ए. एस्. एफ्. या रासायनिक उत्पादने तयार करणार्‍या जर्मन कंपनीकरिता स्टाउडिंगर १९१० मध्ये आयसोप्रिनाच्या संश्लेषणासंबंधी  संशोधन करीत होते. १९२० मध्ये त्यांनी लिमोनिनाच्या उत्ताप विच्छे-दनाने आयसोप्रीन सहज रीत्या तयार करता येणे शक्य असते, याचा शोध लावला. कृत्रिम रबर तयार करण्या-करिता बेंझॉइल पेरॉक्साइड उत्प्रेरक म्हणून वापरून आयसोप्रिनाचे बहुवारिकीकरण करता येणे शक्य असल्याचे त्यांना आढळून आले. १९२२ मध्ये स्टाउडिंगर आणि जे. फ्रिट्शी यांनी बहुवारिके बृहत् रेणू असून ते सामान्य सहसंयुजी बंधाने जोडले जात असल्याचे दाखविले. या त्यांच्या कार्यामुळे बहुवारिक रसायनशास्त्राचा पाया घातला गेला. स्टाउडिंगर यांनी उच्च रेणुभार संयुगांप्रमाणेच लहान रेणुभार संयुगांच्या रसायनशास्त्रातही कार्य केले. त्यांनी कीटीन (H2CCO),कार्बनी फॉस्फरस संयुग आणि कीटकनाशक चूर्णात परिणामकारक असलेल्या घटकांचे रासायनिक संघटन यांसंबंधीचे शोध लावले.

स्टाउडिंगर यांना नोबेल पारितोषिकाशिवाय कान्नीद्झारो पारितोषिक आणि इतरही अनेक मानसन्मान मिळाले. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके पुढीलप्रमाणे : Die hochmolekularen organischen Ver-bindungen, Kautschuk und Cellulose (१९६१ इं. शी. ‘ द हाय-मॉलिक्युलर ऑर्गॅनिक कंपाउंड्स, रबर अँड सेल्युलोज ’) Makromolekulare Chemie und Biologie (१९४७ इं. शी. ‘ मॅक्रोमॉलिक्युलर केमिस्ट्री अँड बायॉलॉजी ’ ) आणि Arbeitserinne-rungen (१९६१ इं. शी. ‘ वर्किंग मेम्वार्स ’ ).

स्टाउडिंगर यांचे फ्रायबुर्ख ( जर्मनी ) येथे निधन झाले.

साळुंके, प्रिती म.