ॲस्पिरीन : एक कार्बनी संयुग त्याला ॲसिटील सॅलिसिलिक अम्‍ल असेही नाव आहे. ते ॲस्पिरीन या सामान्य नावाने ओळखले जाणारे औषध होय. रेणवीय सूत्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणुप्रकार व त्यांच्या संख्या दाखविणारे सूत्र) C9H8O4. संरचना सूत्र (रेणूमध्ये अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना) वर दाखविल्याप्रमाणे असते.

ॲस्पिरिनाचा शोध झेरार या फ्रेंच शास्त्रज्ञांनी १८५३ मध्ये लावला. त्याचा औषध म्हणून उपयोग प्रथम हर्मन ड्रेसर (१८९३) यांनी केला.

ॲस्पिरीन हे गंधविहीन शुभ्र स्फटिकमय असून त्याचा वितळबिंदू १३५—१३७ से. आहे. १४०से. ला ते उकळते व अपघटन पावते (तुकडे होतात). रसायनत: ते दुर्बल अम्‍ल आहे (म्हणजे याच्या विद्रावात आयनीभवन—विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट तयार होण्याची क्रिया—अगदी अल्प प्रमाणात होते). ते पाण्यात अल्प व अल्कोहॉल, क्लोरोफॉर्म इ. कार्बनी विद्रावकांत पुष्कळ विरघळते.

कृती : ॲस्पिरिनाचे व्यापारी उत्पादन ॲसिटिक ॲनहायड्राइड व सॅलिसिलिक अम्‍ल यांची विक्रिया घडवून केले जाते. तापमान ९० से. पेक्षा कमी राहील अशी व्यवस्था केलेल्या निष्कलंक (स्टेनलेस) पोलादाच्या किंवा काचेचा लेप असलेल्या भांड्यात वरील दोन द्रव्ये मिसळतात. सुमारे तीन तासांनंतर भांड्यातील विद्राव गाळून घेऊन तो स्फटिकीकरणाच्या पात्रात घातला जातो. तेथे त्याचे तापमान सुमारे ०से. ठेवून स्फटिकीभवन होऊ दिले जाते. केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर जाण्याच्या प्रेरणेचा उपयोग करणाऱ्या) उपकरणाने स्फटिक वेगळे करून व धुवून वाळविले जातात. तरीही त्यांच्यात सुमारे अर्धा टक्का पाणी राहू शकते.

औषधी उपयोग : ॲस्पिरीन हे सॅलिसिलिक अम्‍लाच्या स्वरूपात आतड्यातून शोषले जाते. ज्वर, सर्दी, संघिज्वर, संधिशूल (सांध्यातील वेदना), डोकेदुखी, अंग दुखणे इत्यादींवर वेदनाशामक म्हणून ते उपयुक्त आहे. ते जास्त प्रमाणात घेतल्यास अंधारी येणे, चक्कर, मानसिक गोंधळ, मळमळ, उलटी, अतिसार इ. लक्षणे होतात. काही व्यक्तींना ॲस्पिरीन घेतल्यावर अंगावर पित्त उठणे यासारखी लक्षणे दिसतात. ॲस्पिरीनाचा जठरश्लेष्मस्तरावर (पोटाच्या आतील बाजूच्या पातळ बुळबुळीत थरावर) विपरीत परिणाम होऊन क्वचित रक्तस्रावही होतो. संश्लेषणाने (कृत्रिम रीतीने) बनविलेल्या औषधांपैकी ॲस्पिरीन हे सर्वांत लोकप्रिय ठरलेले आहे.

 मिठारी, भू. चिं.