हीगर, ॲलन जे. : (२२ जानेवारी १९३६). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. विशिष्ट प्लॅस्टिकांमध्ये रासायनिक दृष्ट्या किंचित बदल केल्यास त्यांमधून धातूंप्रमाणे लगेच वीज (विद्युत्) वाहू शकते, हा शोध लावल्याबद्दल हीगर यांना ॲलन जी. मकडरमड आणि हीडेकी शीराकावा यांच्यासमवेत २००० सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

हीगर यांचा जन्म सू सिटी (आयोवा, अ. सं. सं.) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ॲक्रन तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नेब्रॅस्का विद्यापीठ आणि बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ या ठिकाणी झाले. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची भौतिकी विषयातील पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९६१). नंतर १९८२ पर्यंत त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनकार्य केले. त्यानंतर ते सँता बार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आणि इन्स्टिट्यूट फॉर पॉलिमर्स अँड ऑर्गॅनिक सॉलिड्स या संस्थेचे संचालक झाले.

हीगर यांनी १९९० मध्ये संवाहक बहुवारिकांवर आधारित प्रकाश उत्सर्जन करणाऱ्या दृश्य पटलांचा विकास आणि निर्मिती करण्याकरिता UNIAX कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली. २००० मध्ये अमेरिकन कॉर्पोरेशन द्यू पाँ या कंपनीने UNIAX ही कंपनी विकत घेतली. २००१ मध्ये हीगर यांनी प्लॅस्टिकपासून पातळ, लवचिक सौर विद्युत् घट निर्माण करण्याकरिता कोनार्का टेक्नॉलॉजीज ही कंपनी स्थापन केली.

हीगर, मकडरमड आणि शीराकावा यांनी काळे चूर्ण असलेल्या पॉलिॲसिटिलीन या बहुवारिकाचे (लहान, साध्या रेणूंच्या संयोगाने बनणाऱ्या प्रचंड रेणूंच्या संयुगाचे) संशोधन केले. १९७७ मध्ये या तिघांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात पॉलिॲसिटिलीन हे आयोडीन बाष्पाच्या संपर्कात आणले. त्यांनी या बहुवारिकामध्ये अपद्रव्ये समाविष्ट करण्याकरिता अर्धसंवाहक पदार्थांमध्ये विद्युत् संवाहक गुणधर्म निर्माण करावयाच्या अपद्रव्य भरण प्रक्रियेसारखी योजना तयार केली. आयोडिनाचे अपद्रव्य भरण केल्यामुळे पॉलिॲसिटिलिनाची विद्युत् संवाहकता दहा दशलक्षांश पटीने वाढली. या बहुवारिकाची संवाहकता काही धातूंएवढी असल्याचे माहीत झाल्यामुळे शास्त्रज्ञांना इतर संवाहक बहुवारिकांचा शोध लावण्यास मदत झाली आणि रेणवीय इलेक्ट्रॉनिकीचे क्षेत्र उदयास आले.

हीगर यांना १९९८ मध्ये नेब्रॅस्का विद्यापीठाची सन्माननीय डी.एस्सी. पदवी मिळाली. त्यांना बाल्झन पारितोषिक, इएन्आय पुरस्कार आणि ऑलिव्हर ई. बक्ली कंडेन्स्ड मॅटर पारितोषिक (१९८३) हे मानसन्मानही मिळाले.

सूर्यवंशी, वि. ल.