मुर्दाडशिंग : (मुडदारशिंग). संयुग. याला इंग्रजीत लिथार्ज, लेड वा प्लंबस किंवा यलो लेड ऑक्साइड, लेड प्रोटॉक्साइड वा मोनॉक्साइड ही नावे आहेत. रासायनिक सूत्र PbO वि. गु. ९·५३ वितळबिंदू ८८८° से. अम्ल व क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ) यांच्यात विरघळते पण पाण्यात विरघळत नाही. लिथार्ज चांदीच्या धातुक निक्षेपांत (कच्च्या रूपातील धातूच्या साठ्यात) आढळते. हे कुर्दिस्तान, ऑस्ट्रिया व कॅलिफोर्नियात आढळते. शिसे ५५५° से. ला हवेत तापविल्यास हे ऑक्साइड मिळते. चांदीयुक्त शिशाच्या खनिजांपासून क्यूपेलीकरणाने शुद्ध चांदी मिळविताना लिथार्ज तयार होते. क्युपेलीकरणामध्ये चांदी शुद्ध करण्यासाठी प्रथम तिची शिशाबरोबर मिश्रधातू बनवितात आणि शिसे चांदीपासून वेगळे करण्यासाठी वितळलेल्या शिशाचे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] करतात. अशा तऱ्हेने लिथार्ज तयार होतो. शिशापासून लिथार्ज बनविण्याची भट्टी नोड यांनी तयार केली (१८९५) व तिचे एकस्व (पेटंट) घेतले. नंतर बार्टन व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्यात सुधारणा केल्या.

मॅसिकॉट हे निसर्गात आढळणारे शिशाचे मोनॉक्साइड आहे. त्याचे वि. गु. ९·३ व वितळबिंदू ६००° से. असून ते अमेरिकेतील कोलोरॅडो, आयडाहो, नेव्हाडा व व्हर्जिनिया या राज्यांत आढळते. मॅसिकॉट व लिथार्ज यांचे रासायनिक सूत्र एकच असले, तरी त्यांची भौतिक स्थिती वेगळी आहे. शिशाचे ३४५° से. ला ऑक्सिडीकरण केल्यास मॅसिकॉट तयार होते व ते वितळल्यास त्याचे लिथार्जमध्ये रूपांतर होते.

शिशाच्या मोनॉक्साइडाचे पिवळा विषम लंबाक्ष व अधिक स्थिर असा तांबडा चतुष्कोणीय असे दोन स्फटिक प्रकार आहेत [⟶ स्फटिकविज्ञान]. ५८५° से. हे त्यांचे संक्रमण (एकाचे दुसऱ्यात रूपांतर होण्याचे) तापमान असून यांत्रिक दाबाने पिवळ्यापासून तांबडा प्रकार बनतो. शिशाचे मोनॉक्साइड हे उभयधर्मी (अम्लीय व क्षारीय हे दोन्ही गुणधर्म असणारे) आहे. सोडियम हायड्रॉक्साइडाबरोबर याच्यापासून सोडियम प्लंबाइट (Na3PbO2) तयार होते. १००° से. ला कार्बन मोनॉक्साइडाने, ३१०° से. ला हायड्रोजनाने तर ५५०° से. ला कार्बनाने याचे ⇨ क्षपण होते.

संचायक विद्युत् घट, फ्लिंट काचा व भिंगे, रंगद्रव्य, रंगलेप, व्हार्निश, शाई, लिनोलियम, कीटकनाशके, रबर, एनॅमल, आगकाडीचा गुल, औषधी द्रव्ये इत्यादींमध्ये हे वापरतात. शिशांची इतर संयुगे बनविण्यासाठी, मृत्तिकापात्रांना झिलई देण्यासाठी व कातडी कमविण्यासाठीही याचा उपयोग करतात.

संदर्भ : Partington, J. R. General and Inorganic Chemistry, New York, 1966.

जमदाडे, य. कों.