आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेलनोबेल, आल्फ्रेड बेअरनार्ड : (२१ ऑक्टोबर १८३३–१० डिसेंबर १८९६). स्वीडिश अभियंते, स्फोटकांचे संशोधक, उद्योगपती व प्रख्यात नोबेल पारितोषिकांचे प्रणेते. त्यांनी डायनामाइट व इतर शक्तिमान स्फोटक पदार्थ शोधून काढले. त्यांचा जन्म स्टॉकहोम (स्वीडन) येथे झाला. तेथे १८४१-४२ च्या दरम्यान ते प्रथम शाळेत गेले पण नंतर त्यांचे शिक्षण खासगी शिक्षकांकरवीच झाले. त्यांनी पॅरिसमध्ये एक वर्ष (१८५०) रसायनशास्त्राचा अभ्यास केला. नंतर अमेरिकेत जॉन एरिक्‌सन यांच्या हाताखाली त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. नोबेल यांना स्वीडिश, रशियन, फ्रेंच, इंग्रजी व जर्मन भाषा चांगल्या अवगत होत्या. अमेरिकेहून परतल्यावर ते प्रथम वडिलांच्या रशियातील सेंट पीटर्झबर्ग येथील कारखान्यात काम करू लागले पण तो लवकरच बंद पडला व ते स्वीडनला परतले. या कारखान्यात त्यांनी स्फोटक द्रव्यांचा विशेषतः नायट्रोग्लिसरिनाचा अभ्यास केला. नायट्रोग्लिसरिनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी त्यांनी एक कारखाना उभारला पण या कारखान्यात १८६४ साली भयंकर स्फोट होऊन त्यात त्यांचा धाकटा भाऊ मरण पावला, तसेच नायट्रोग्लिसरीन घेऊन जाणारे एक जहाज स्फोटाने नाश पावले. त्यामुळे या कारखान्यावर बंदी आली. म्हणून त्यांनी सरोवरात नांगरलेल्या जहाजावर हाताळण्यास सुरक्षित अशी स्फोटके बनविण्याचे प्रयोग चालू केले. त्यांतूनच डायनामाइट या प्रसिद्ध स्फोटकाचा शोध लागला. कीझेलगूर या सच्छिद्र मृत्तिकेत नायट्रोग्लिसरीन शोषित करून त्यापासून डायनामाइट बनवितात. हे हाताळण्यास सुरक्षित असते. या शोधाचे ब्रिटनमध्ये एकस्व (पेटंट) १८६७ मध्ये व अमेरिकेत १८६८ मध्ये त्यांनी मिळविले. त्यानंतर नायट्रोसेल्युलोज [→ गनकॉटन] व नायट्रोग्लिसरिन यांचा कलिल विद्राव [→ कलिले] बनवून त्यापासून उत्स्फोटक (ब्लास्टिंग) जिलेटीन वा गेलिनाइट हे एक आदर्श स्फोटक द्रव्य त्यांनी १८७५ मध्ये बनविले. ते कॉर्डाइट या स्फोटकाचे पूर्वद्रव्य होय. याचे एकस्व त्यांनी १८७६ मध्ये मिळविले. त्यानंतर बॅलिस्टाइट या धूर न होणाऱ्या स्फोटकाचा शोध त्यांनी लावला व त्याचे एकस्व १८८८ मध्ये मिळविले. हे डायनामाइटापेक्षा जास्त शक्तिमान आहे. जी स्फोटके केवळ पेटविल्याने उडत नाहीत त्यांचा स्फोट घडविण्यासाठी उपयोगी पडतील अशा विस्फोटकांचा (डेटोनेटरांचा) शोधही त्यांनी लावला. तोही स्फोटकांच्या शोधाइतकाच महत्त्वाचा आहे. नोबेल यांनी शोधून काढलेली विस्फोटके तसेच डायनामाइट व उत्स्फोटक जिलेटीन यांमुळे खाणकामाच्या उद्योगात फार मोठी क्रांती घडून आली.

यांशिवाय विद्युत् रसायनशास्त्र, प्रकाशकी, धातुविज्ञान इ. क्षेत्रांतही उपयोगी पडेल असे काही संशोधन त्यांनी केले. त्यांनी सु. ३५५ एकस्वे मिळविली. 

अनेक देशांत काढलेले स्फोटकांचे कारखाने आणि बाकू तेलक्षेत्राचा व्यवहार यांपासून त्यांना अमाप संपत्ती मिळाली. विधायक कार्यासाठी ज्यांचा उपयोग व्हावा अशा शोधांचा दुरुपयोग विनाशक कामासाठी केला जातो हे पाहून त्यांना फार वाईट वाटत असे. बहुधा यामुळेच त्यांनी आपल्या संपत्तीचा विनियोग भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक, साहित्य आणि शातंता यांच्याशी संबंधित अशा मौलिक आणि मानवी हितसंवर्धक कार्यासाठी पारितोषिके देण्याकरिता व्हावा अशी व्यवस्था मृत्युपत्रात करून ठेवली [→ नोबेल पारितोषिके].

१०२ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला त्यांच्या सन्मानार्थ नोबेलियम हे नाव देण्यात आले आहे. ते सॅन रेमो (इटली) येथे मृत्यू पावले.

पहा : नायट्रोग्लिसरीन स्फोटक द्रव्ये.

ठाकूर, अ. ना.