हेरोव्हस्की, यारोस्लाफ : (२० डिसेंबर १८९०–२७ मार्च १९६७). चेक रसायनशास्त्रज्ञ. रासायनिक विश्लेषणाची उपकरणात्मक पद्धती असलेल्या विद्युत् वैश्लेषिक तंत्राचा शोध लावून, त्याचा विकास केल्याबद्दल हेरोव्हस्की यांना १९५९ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. विश्लेषण करावयाच्या विद्रावामध्ये बुडविलेल्या दोन विद्युत् अग्रांवर पूर्वनिश्चित वर्चस् लागू केल्यानंतर विद्रावातून वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे मापन हेरोव्हस्की यांचे उपकरण करते. या पद्धतीचा उपयोग ऑक्सिडीभवनक्षम आणि क्षपणक्षम पदार्थांच्या राश्यात्मक आणि गुणात्मक निश्चिती करण्यासाठी करतात. 

 

यारोस्लाफ हेरोव्हस्की
 

हेरोव्हस्की यांचा जन्म प्राग (चेकोस्लोव्हाकिया) येथे झाला. त्यांचे शिक्षण प्राग येथील चार्ल्स विद्यापीठात आणि लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये झाले. त्यांनी १९१३ मध्ये बी.एस्सी. पदवी संपादन केली. १९१८ मध्ये प्राग येथे पीएच्.डी. आणि १९२१ मध्ये लंडन येथे डी.एस्सी. या पदव्या संपादन केल्या. ते चार्ल्स विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲनॅलिटिकल केमिस्ट्री या संस्थेत सहप्राध्यापक (१९२२–२६) आणि भौतिकीय रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि संचालक होते (१९२६–५४). तसेच ते चेकोस्लोव्हाक ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या पोलॅरोग्राफिक इन्स्टि-ट्यूटचे संचालक होते (१९५० १९५२–६३). 

 

हेरोव्हस्की यांनी लंडन येथे एफ्. जी. डॉनन यांच्या सूचनेप्रमाणे सुरू केलेल्या संशोधनामुळे विद्युत् वैश्लेषिक तंत्राचा शोध लागला. १९२४ मध्ये दाखविण्यात आलेल्या पहिल्या प्रात्यक्षिकानंतर दहा वर्षांच्या आत विद्युत् वैश्लेषिक तंत्र ही पद्धती सर्वसामान्य म्हणून वापरात आली. 

 

हेरोव्हस्की यांची लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजचे फेलो म्हणून १९२७ मध्ये निवड करण्यात आली. त्यांना ड्रेझ्डेन येथील टेक्निकल युनिव्हर्सिटी (१९५५), युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्सा (१९५६), युनि-व्हर्सिटी ऑफ पॅरिस (१९६०) इ. विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली. ते अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस ( बॉस्टन १९३३), हंगेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९५५), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (बंगलोर, १९५५), पोलिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (वॉर्सा, १९६२), पोलॅरोग्राफिक सोसायटी (लंडन) आणि पोलॅरोग्राफिक सोसायटी ऑफ जपान या संस्थांचे सन्माननीय सदस्य होते. त्यांना १९५१ मध्ये चेकोस्लोव्हाकियामध्ये स्टेट प्राइझ, फर्स्ट ग्रेड आणि १९५५ मध्ये ऑर्डर ऑफ द चेकोस्लोव्हाकिया रिपब्लिक हे सन्मान मिळाले. हेरोव्हस्की यांचे संपूर्ण संशोधन कार्य पोलॅरोग्राफी या ग्रंथात १९४१ मध्ये प्रसिद्ध झाले. 

 

हेरोव्हस्की यांचे प्राग येथे निधन झाले. 

घोडराज, रवीन्द्र खोब्रागडे, स्नेहा दिलीप