सूत्र १. निकोटीन

निकोटीन : अल्कलॉइड वर्गातील एक द्रवरूप संयुग [⟶ अल्कलॉइडे]. रेणुसूत्र C10H14N2 संरचना सूत्र (रेणूतील अणूंची जोडणी दाखविणारे सूत्र) पुढीलप्रमाणे आहे.

ते ३ – (१, मिथिल–२–पायरॉलिडिल)–पिरिडीन या नावानेही ओळखले जाते.

या संयुगाची प्रकाशत: सक्रिय (एकाच प्रतलात कंपने होणाऱ्या म्हणजेच ध्रुवित प्रकाशावर परिणाम करणारी) अशी दोन रूपे संभवतात. त्यांपैकी एक दक्षिणवलनी (+) (ध्रुवित प्रकाशाचे प्रतल उजवीकडे वळविणारे) व दुसरे वामवलनी (–) (ध्रुवित प्रकाशाचे प्रतल तितकेच डावीकडे वळविणारे) आहे. निसर्गात आढळणारे रूप वामवलनी असते. तेच येथे वर्णिले आहे.

उपस्थिती : तंबाखूच्या झाडाच्या (निकोटियाना टाबॅकम) पानांत मॅलिक व सायट्रिक अम्लाबरोबर संयोग झालेल्या रूपांत हे असते [⟶ तंबाखू].

इतिहास : एल्. व्हकलीन यांनी १८०९ मध्ये तंबाखूच्या धुरामधून हे वेगळे काढले. यावर वेगवेगळ्या रासायनिक विक्रिया केल्या म्हणजे जी संयुगे निर्माण होतात, ती ओळखून व त्यांच्या निर्मितीची संगती लावून १८९३ मध्ये पिनर यांनी याची संरचना ठरविली. तिला १९०४ मध्ये संश्लेषणाने (साध्या संयुगांपासून रासायनिक विक्रियांनी एखादे संयुग बनविण्याच्या प्रक्रियेने) पाठिंबा मिळाला.

प्राप्ती : तंबाखूची पाने, देठ इत्यादींच्या चूर्णाचे पाण्याने निष्कर्षण करून मिळणाऱ्या विद्रावात दाहक (कॉस्टिक) सोडा किंवा अन्य क्षार (अम्लाबरोबर विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ अल्कली) मिसळला म्हणजे निकोटीन सुटे होते. ते बाष्प-ऊर्ध्वपातनाने (मिश्रणात वाफ प्रवाहित केल्याने जे बाष्पमिश्रण मिळते ते थंड करून पदार्थ मिळविण्याच्या प्रक्रियेने) वेगळे करतात आणि त्याचे ऑक्झॅलेट बनवितात. त्याचे विघटन (संयुगाचे घटक वेगळे करणे) केले म्हणजे शुद्ध निकोटीन मिळते.

औद्योगिक उत्पादनासाठी तंबाखूच्या पानांचे व देठांचे वाया जाणारे तुकडे, चुना पाण्यात मिसळून केलेले संधारण (न विरघळणारा घन पदार्थ ज्यात तरंगत आहे असा द्रव) व दाहक सोडा यांचे मिश्रण करून त्याचे ट्रायक्लोरोएथिलीन या कार्बनी विद्रावकाने (विरघळविण्याची पात्रता असलेल्या द्रवाने) निष्कर्षण करतात. निष्कर्ष वेगळा करून व कमी दाब देऊन तापवून तो संहत (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण मूळच्यापेक्षा जास्त आहे असा) करतात. नंतर विरल सल्फ्यूरिक अम्लाने त्यातील निकोटीन हे सल्फेटाच्या रूपात काढून घेतात. क्षाराने त्याचे विघटन केले म्हणजे निकोटीन बनते. ते ईथर पेट्रोलियम-ईथर या विद्रावक मिश्रणात (विरघळविणाऱ्या पदार्थाच्या मिश्रणात) विरघळवून घेतात. या विद्रावातील विद्रावक नायट्रोजनाच्या वातावरणात ऊर्ध्वपातन करून काढून टाकला म्हणजे निकोटीन शिल्लक राहते. संश्लेषणाने निकोटीन बनविता येते परंतु ते फार महाग पडते.

भौतिक गुणधर्म : वर्णहीन किंवा पिवळट रंगाचा द्रव हवेच्या संपर्काने याचा रंग तपकिरी होतो आणि त्याला तंबाखूचा वास येऊ लागतो बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) उकळबिंदू २४६° से. (७३० किमी. वातावरण दाब असताना) पाण्यात व कार्बनी विद्रावकांत विरघळते. प्रकाशीय वलन 

[α]

२०° 

– १६६·४°

D 

[⟶ ध्रुवणमिति]. याच्या डायपिक्रेटाचे आखूड, पिवळे व प्रचिनाकार (प्रिझमच्या आकाराचे) स्फटिक २२४° से.ला वितळतात व हा गुणधर्म निकोटिनाच्या अभिज्ञानासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) वापरता येतो.

सूत्र २. निकोटिनिक अम्ल ( R = OH ) निकोटिनामाइड ( R = NH2 )

सूत्र ३. डायब्रोमोटिकोनीनरासासनिक गुणधर्म : हे क्षारधर्मी आहे. अम्लाशी संयोग होऊन याची लवणे बनतात. ऑक्सिडीकरणाने (ऑक्सिजनाचा अंतर्भाव होऊन रेणूचे तुकडे पडण्याने) निकोटिनिक अम्ल (सूत्र २ R = OH) व ब्रोमिनाच्या विक्रियने डायब्रोमोटिकोनीन (सूत्र ३.) हे कीटोन बनते. निकोटिनाची संचरना ठरविताना या संयुगांचा फार उपयोग झाला.

उपयोग : विषारी असल्यामुळे प्रत्यक्ष निकोटिनाचा उपयोग केला जात नाही परंतु त्यापासून बनविलेले निकोटिन सल्फेट कीटनाशक म्हणून आणि निकोटिनिक अम्ल (ब गटातील एक जीवनसत्त्व निॲसीन) व निकोटिनिक अम्ल अमाइड ( सूत्र २ R = NH2) यांच्या निर्मितीत निकोटीन उपयोगी पडते [⟶ निॲसीन]. मज्जातंतूंच्या, श्वसनाच्या व रक्ताभिसरणाच्या क्रियांविषयी काही उपयुक्त माहिती निकोटिनाच्या सेवनाने शरीरावर होणाऱ्या परिणामांवरून मिळालेली आहे.

विषारी परिणाम : एका सिगारमध्ये असणारे निकोटिन मनुष्याच्या मृत्यूस पुरेसे असते. धूम्रपानाने येणारे तात्पुरते उत्तेजन निकोटिनामुळेच असावे [⟶ धूम्रपान].

तंबाखू गिळल्यास विषारी परिणाम अपेक्षेइतका होत नाही. कारण पोटात गेल्यावर निकोटिनाचे जे अल्प शोषण होते त्याने वांती होते व तंबाखू बाहेर पडल्यामुळे जास्त निकोटिनाचे शोषण होऊ शकत नाही.

ठाकूर, अ. ना.