डड्ली रॉबर्ट हर्शबाखहर्शबाख, डड्ली रॉबर्ट : (१८ जून १९३२). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ. ⇨ यूआन त्सेली व जॉन सी. पोलॅन्यी (कॅनडा) यांच्यासमवेत हर्शबाख यांना १९८६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. या तिघांच्या महत्त्वपूर्ण संशोधन काऱ्यामुळे रासायनिक विक्रियांची गतिकी (गतिशास्त्रीय अध्ययन) या रसायनशास्त्रातील संशोधनाच्या नवीन क्षेत्राचा विकास झाला असून त्यामुळे रासायनिक विक्रियांची मूलभूत यंत्रणा उघड होण्यास मदत झाली.

हर्शबाख यांचा जन्म सॅन होसे (कॅलिफोर्निया) येथे झाला. त्यांचे शिक्षण स्टॅनफर्ड व हार्व्हर्ड विद्यापीठांत झाले. स्टॅनफडर्र् विद्यापीठातून बी.एस्. व एम.एस्. या पदव्या मिळविल्या-नंतर त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातून रासायनिक भौतिकीतील पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९५८). त्यांनी अमेरिकेतील बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापनाचे काम केले (१९५९–६३). त्यानंतर १९६३ मध्येच त्यांची रसायनशास्त्राचे गुणश्री प्राध्यापक म्हणून हार्व्हर्ड विद्यापीठात नियुक्ती झाली. तेथे ते विज्ञानाचे बेअर्ड प्राध्यापकम्हणून कार्यरत होते (१९७६–२००३). त्यानंर ते टेक्सस ए अँड एम् विद्यापीठाचे प्राध्यापक झाले (२००५).

हर्शबाख यांनी रासायनिक विक्रियांमधील बदल सविस्तरपणे समजून घेण्यासाठी रेणवीय शलाका प्रकीर्णन तंत्र वापरले. हे तंत्र तेव्हा मूलकण भौतिकीमध्ये लोकप्रिय होत होते. त्यांनी छेदित रेणवीय शलाका तंत्र शोधून काढले. या तंत्रात रेणूंच्या शलाका काळजीपूर्वक नियंत्रित केलेल्या परिस्थितीत श्राव्यातीत गतीला एकत्र आणल्या जातात. या कार्यपद्धतीमुळे रासायनिक विक्रिया या घटनेचे तपशीलवार म्हणजे रेणवीय पातळीवर परीक्षण करणे शक्य झाले.

हर्शबाख यांचे चारशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना एसीएस पाउलिंग पदक (१९७८), पोलॅन्सी पदक (१९८१), लँगम्यूर पारितोषिक (१९८३) व नॅशनल ॲवॉर्ड ऑफ सायन्स (१९९१) तसेच गुगेनहम फेलो (१९६८) व अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे फेलो आदींनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

दीक्षित, रा. ज्ञा.