त्सीग्‍लर, कार्ल : (२६ नोव्हेंबर १८९८–१२ ऑगस्ट १९७३). जर्मन कार्बनी रसायनज्ञ. १९६३ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक यांना जूल्यो नॅता यांच्याबरोबर विभागून मिळाले.

त्यांचा जन्म जर्मनीतील हेल्सा या गावी झाला. मारबर्ग विद्यापीठात शिक्षण घेऊन १९२० मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली व तेथेच १९२५ पर्यंत व्याख्याता म्हणून काम केले. त्यानंतर ते फ्रँकफुर्टला गेले व १९२७ मध्ये हायड्लबर्ग विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १९३६–४३ कालखंडात ते हाल–झाले विद्यापीठात प्राध्यापक व केमिकल इन्स्टिट्यूटचे संचालक होते. १९४३ मध्ये ते माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर कोल रिसर्च या संस्थेचे संचालक व त्याच वेळी आखेन टेक्‍निकल हायस्कूलचे सन्मान्य प्राध्यापक झाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी ⇨ कार्बनी–धातू  संयुगांविषयी संशोधन केले. यातूनच पुढे अंतर्ज्वलन–एंजिने खराब होऊ नयेत म्हणून गॅसोलिनात मिसळण्यात येणाऱ्या टेट्रा–एथिल लेड ह्यासारख्या प्रत्याघाती पदार्थांचा शोध लागला [⟶ अंतर्ज्वलन–एंजिने]. ॲल्युमिनियन ट्राय–एथिल व एथिलीन एकत्र घेऊन तापविल्यास एथिलिनाचे द्विवारिक (एकाच प्रकारचे दोन रेणू एकमेकांशी संयोग पावून बनलेले संयुग) – १– ब्युटीन–तयार होते असे त्यांनी १९५३ मध्ये ई. होल्ट्सकँप यांच्या सहकार्याने जे संशोधन केले त्यातून निष्पन्न झाले. या विक्रियामिश्रणात कलिल स्थितीतील (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेल्या विशिष्ट प्रकारच्या द्रवमिश्रणाच्या स्थितीतील) निकेल अल्पांशाने होते व त्याने ही विक्रिया उत्प्रेरित (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता विक्रियेची गती वाढण्याची क्रिया) झाली होती म्हणून यासंबंधी त्यांनी सांगोपांग संशोधन आरंभिले. ॲल्युमिनियन ट्राय–एथिल व टिटॅनियम ट्राय–क्लोराइड यांचे मिश्रण वापरले असता उत्प्रेरण होऊन एथिलिनाचे साखळीसारखी अशाख संरचना असलेले उच्च रेणुभाराचे बहुवारिक (एकाच प्रकारचे अनेक रेणू एकमेकांशी संयोग पावून बनलेले जटिल संयुग) मिळते, असे त्यांना दिसून आले. ही विक्रिया सु. ५०°–१५०° से. इतके तापमान व ०·३५–१४ किग्रॅ./सेंमी. इतका कमी दाब वापरून घडून येते आणि बळकट व उच्च वितळबिंदू असलेले बहुवारिक निर्माण होते. त्या काळी प्रचलित असलेल्या पद्धतीत यापेक्षा जास्त तापमान व दाब वापरावा लागत असे व शिवाय बहुवारिक शाखायुक्त होत असे त्यामुळे त्सीग्‍लर यांची पद्धत बहुमोल ठरली. अशा तऱ्‍हेची मिश्र उत्प्रेरके पॉलिप्रॉपिलीन इ. प्लॅस्टिके, मानवनिर्मित तंतू व संश्लिष्ट रबरे यांच्या उत्पादनातही महत्त्वाची ठरली आहेत. या कामगिरीबद्दलच त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.

यांशिवाय दुसऱ्याही कित्येक क्षेत्रांत त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : अनेक अणू ज्यांच्या घटनेत आहेच अशी मोठमोठी वलयी संयुगे विरल विद्राव वापरून सुलभतेने बनविण्याची एक पद्धत त्यांनी सिद्ध केली. ती ‘रुग्‍ली–त्सीग्‍लर विरलीकरण पद्धत’ म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या पद्धतीने त्यांनी बहिःपूरित (एकाच पातळीत कंपन पावणारा म्हणजे ध्रुवित प्रकाश ज्यातून गेल्यास प्रकाशाचे प्रतल डावीकडे वा उजवीकडे वळवू न शकणाऱ्या) मस्कोनपासून प्राणिज कस्तुरीचा सुगंध असलेली संयुगे बनविली, त्याचप्रमाणे ब्युटाडाइनापासून ऊष्मीय द्विवारिकीकरणाने सायक्लोब्युटाडाइन (१, ५) तयार केले. सोडियम हा उत्प्रेरक वापरला असता ब्युटाडाइनापासून ब्युना रबर बनते. या विक्रियेची यंत्रणा त्यांनीच प्रथम स्पष्ट केली. ग्रीन्यार विक्रियाकारकाप्रमाणेच [⟶ ग्रीन्यार विक्रिया] विक्रिया करणारी परंतु जास्त विक्रियाशील अशी लिथियम–अल्किल संयुगे धातुरूप लिथियम आणि अल्किल हॅलाइडे यांपासून बनविण्याची एक औद्योगिक पद्धत त्यांनी शोधून काढली. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि द्विबंधयुक्त कार्बनी संयुगे यांपासून लिथियम टेट्रा–अल्किल संयुगे त्यांनी बनविली व आधुनिक प्रक्षालकांकरिता (वस्तू स्वच्छ करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या साबणसदृश पदार्थांकरिता) लागणाऱ्या उच्च प्राथमिक अल्कोहॉलाचे एथिलिनापासून संश्लेषण केले. ते प. जर्मनीतील म्यूलहाइम येथे निधन पावले.

कानिटकर, बा. मो.