हेक, रिचर्ड फ्रेड : (१५ ऑगस्ट १९३१). अमेरिकन कार्बनी रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी संश्लेषणामध्ये पॅलॅडियम उत्प्रेरक वापरून होणाऱ्या संकर संयुग्मीकरण विक्रियेचा शोध लावल्याबद्दल हेक यांना २०१० सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जपानी शास्त्रज्ञ ई-ईची नेगिशी आणिअकिरा सुझूकी यांच्यासमवेत विभागून मिळाले. हेक यांनी अल्किने (ओलेफिने) संयुगांबरोबर अरिल हॅलाइडे संयुगांचे संयुग्मीकरण घडविण्याकरिता पॅलॅडियमाचा उत्प्रेरक म्हणून वापर केला. कार्बन-कार्बन बंध तयार करणाऱ्या विक्रियेचा शोध ‘हेक विक्रिया’ म्हणून प्रसिद्ध आहे. 

रिचर्ड फ्रेड हेक

हेक यांचा जन्म स्प्रिंगफील्ड (मॅसॅचूसेट्स, अ.सं.सं.) येथे झाला. हेक आठ वर्षांचे असतानाच त्यांचे कुटुंब लॉस अँजेल्स येथे स्थलांतरित झाले. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून रसायनशास्त्राची बी.एस्सी. (१९५२) आणि साउल वाइनश्टाइन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. (१९५४) या पदव्या संपादन केल्या. अधिछात्रवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी झुरिक (स्वित्झर्लंड) येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे डॉक्टरोत्तर संशोधन केले. १९५७ मध्ये ते विल्मिंग्टन (डेलावेअर) येथील हर्क्यूलीझ कॉर्पोरेशनमध्ये महत्त्वाच्या पदावर रुजू झाले. ते डेलावेअर विद्यापीठात रसायनशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र विभागात प्राध्यापक होते (१९७१–८९). सध्या ते याच विद्यापीठात विलिस एफ्. हेरिंग्टन गुणश्री प्राध्यापक आहेत. 

हेक यांनी १९६० च्या दशकाच्या शेवटी पॅलॅडियमाचा उत्प्रेरक म्हणून वापर करून अरिल मर्क्युरी संयुगांच्या ओलेफिनांबरोबर होणाऱ्या संयुग्मीकरण विक्रियेचा शोध लावला. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी विक्रियेत सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू ठेवले आणि कार्बनी संश्लेषणाकरिता शक्तिमान संश्लेषण पद्धती विकसित केली. हेक यांनी कार्बन मोनॉक्साइड, अल्किने आणि डाइने (डायओलेफिने) यांच्याबरोबर ऑर्गॅनोपॅलॅडियम संयुगांची असलेली एकमेव क्रियाशीलता पद्धतशीरपणे शोधून काढण्याकरिता प्रयत्न केले. हेक यांचे या संशोधनासंबंधीचे सात लेख (लेखमाला) लागोपाठ जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

हेक विक्रियांचे महत्त्व कार्बनी संश्लेषण जगतात हळूहळू वाढत गेले. १९८२ मध्ये ऑरगॅनिक रिॲक्शन्स या प्रकरणामध्ये हेक यांना माहीत असलेली सर्व उदाहरणे ४५ पृष्ठांमध्ये देण्यात आली. २००२ पर्यंत आंतररेणवीय हेक विक्रियांसाठी मर्यादित असलेल्या उपयोजनांची माहिती वरील प्रकरणात समाविष्ट केल्यामुळे त्याची ३७७ पृष्ठे झाली. आज कार्बनी संश्लेषणात कार्बन-कार्बन बंध निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पद्धतींमध्ये हेक विक्रियेचा समावेश होतो. या विक्रियेसंबंधी २००९ मध्ये ६०० पृष्ठांच्या व्याप्तिलेखासह अनेक शास्त्रीय पुनर्विलोकन लेख प्रकाशित झाले.

हेक यांचे पॅलॅडियम उत्प्रेरित संकर संयुग्मीकरण विक्रिया हे कार्य अनेक विक्रियांचे पूर्वगामी असे ठरले. उदा., बोरॉनिक अम्लांबरोबर (सुझूकी संकर संयुग्मीकरण), ऑर्गॅनोझिंक संयुगे (नेगिशी संकर संयुग्मीकरण), ऑर्गॅनोनिकेल संयुगे (कुमाडा-कोरिऊ संकर संयुग्मी-करण). परिष्कृत रसायने, सुगंधी द्रव्ये, पीडक-नाशके आणि औषधी द्रव्ये यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याकरिता प्रक्रिया रसायनशास्त्रज्ञ हेक विक्रिया वापरतात.
 

हेक यांचे अनेक शास्त्रीय लेख विविध वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांना वॉलिस एच्. कारदर्स पुरस्कार (२००५), एच्. सी. ब्राउन पुरस्कार (२००६) इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

घोडराज, रवीन्द्र